दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये

इ स पु पहिल्या ते आठव्या शतकातील भारत

चेर ,पांड्य आणि चोळ राजघराणी

दक्षिणेतील प्राचीन राजसत्तांमधील तीन राजसत्तांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये येतो. चेर, पांड्य आणि चोळ या त्या राजसत्ता होत. या राजसत्ता इसवी सनापूर्वीच्या चौथ्या शतकात किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या. त्यांचा उल्लेख रामायण, महाभारत या महाकाव्यांमध्ये करण्यात आला आहे. तमिळ भाषेतील संघम साहित्यात या तीन राजसत्तांचा उल्लेख आहे.

मौर्य सम्राट अशोकाच्या लेखांमध्येही त्यांचा उल्लेख आहे. ‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी’ या पुस्तकात ‘मुझिरीस’ हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे. हे बंदर चेर राज्यात होते. मुझिरीस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे.

पांड्य राज्याचा विस्तार आजच्या तमिळनाडूमध्ये होता. तेथील उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना खूप मागणी होती. मदुराई ही पांड्य राज्याची राजधानी होती. प्राचीन चोळांचे राज्य तमिळनाडूतील तिरूचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते.

सातवाहन राजघराणे

मौर्य साम्राज्याच्या न्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशांतील स्थानिक राजे स्वतंत्र झाले. त्यांनी छोटी छोटी राज्ये स्थापन केली. त्यांपैकी एक सातवाहन घराणे होते. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्यांची राजधानी होती. राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता.

पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणेघाटातील लेण्यात असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आहेत. काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत. उदा., गौतमीपुत्र सातकर्णी. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे. त्याच्या पराक्रमांचे वर्णन नाशिक येथील लेण्यांमधील कोरीव लेखामध्ये केलेले आहे.

त्याने शक राजा नहपान याचा पराभव केला. गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात ‘त्रिसमुद्रतोयपीतवाहन’ असा केलेला आहे. तोय म्हणजे पाणी. घोडे हे राजाचे वाहन. ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्याले आहे’, असा त्याचा अर्थ होतो. तीन समुद्र म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर.

त्याच्या काळात सातवाहनांचे साम्राज्य उत्तरेकडे नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते. हाल नावाच्या सातवाहन राजाचा ‘गाथासप्तशती’ हा माहाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथात सातवाहन काळातील लोकजीवनाची माहिती मिळते.

सातवाहन काळात भारतीय व्यापारात खूप वाढ झाली. महाराष्ट्रातील पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांना व्यापाराची केंद्रे म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले. या काळात अनेक कलावस्तूंचे उत्पादन तेथे होऊ लागले.

भारतीय मालाची निर्यात रोमपर्यंत होत असे. काही सातवाहन नाण्यांवर जहाजाच्या प्रतिमा आहेत. महाराष्ट्रातील अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे, कान्हेरी, जुन्नर येथील लेण्यांमधील काही लेणी सातवाहनांच्या काळात खोदलेली आहेत.

Jahajachi Pratima Asalele Nane Ani Karle Yethil Chityagruh

वाकाटक राजघराणे

इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाच्या सुरुवातीस सातवाहनांची सत्ता क्षीण झाली. त्यानंतर उदयाला आलेल्या राजघराण्यांमध्ये वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणे होते. वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव ‘विंध्यशक्ति’ असे होते. विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला.

प्रवरसेनानंतर वाकाटकांचे राज्य विभागले गेले. त्यातील दोन शाखा प्रमुख होत्या. पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन (नागपूरजवळ) येथे होती. दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल्म म्हणजे सध्याचे वाशिम (जिल्हा वाशिम) येथे होती. विंध्यशक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला.

त्याच्या कारकिर्दीत वाकाटकांचे साम्राज्य उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशांपासून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत पसरले होते. कोल्हापूरचे त्या काळातील नाव ‘कुंतल’ असे होते. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता, याची माहिती आपण यापूर्वी घेतली आहे.

Ajintha Yethil Ek Leni

हरिषेण या वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा मंत्री होता. तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. अजिंठा येथील १६ क्रमांकाचे लेणे त्याने खोदवून घेतले होते. अजिंठ्याच्या इतरही काही लेण्यांमधील खोदाईचे, तसेच ती लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचे काम हरिषेणाच्या कारकिर्दीत झाले.

Ajintha Yethil Bodhisatva Padmapani

वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने ‘माहाराष्ट्री’ या प्राकृत भाषेतील ‘सेतुबंध’ या ग्रंथाची रचना केली. तसेच कालिदासाचे ‘मेघदूत’ हे काव्यही याच काळातील आहे.

चालुक्य राजघराणे

कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ता बलशाली होती. वाकाटकानंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब, कलचुरी इत्यादी सत्तांचा समावेश होता. त्या सर्वांवर चालुक्य राजांनी वर्चस्व प्रस्थापित केले. पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली.

कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती. बदामीचे प्राचीन नाव ‘वातापि’ असे होते. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले होते. बदामी, ऐहोळे, पट्टदकल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजांच्या कारकिर्दीत बांधली गेली.

Pattadkal Yethil Mandir

पल्लव राजघराणे

पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती. तमिळनाडूतील कांचीपुरम ही त्यांची राजधानी होती. महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता. त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला. तो स्वतः नाटककार होता.

Mahabalipur Yethil Rathmandir

महेंद्रवर्मनचा मुलगा नरसिंहवर्मनने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतवून लावले. त्याच्या कारकिर्दीत महाबलिपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे खोदविली गेली. ही रथमंदिरे अखंड पाषाणात खोदलेली आहेत. पल्लव राजांचे आरमार प्रबळ आणि सुसज्ज होते.

त्यांच्या काळात भारताचा आग्नेय आशियातील देशांशी जवळचा संबंध आला. देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यापार भरभराटीला आला. युआन श्वांग याने कांचीला भेट दिली होती. त्यांच्या राज्यात सर्व धर्मांच्या लोकांना सहिष्णुतेने आणि न्यायाने वागवले जाई, असे त्याने म्हटले आहे.

राष्ट्रकूट राजघराणे

राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीच्या काळात त्यांची सत्ता विध्य पर्वतापासून दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती. दन्तिदुर्ग या राजाने प्रथम त्यांची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली. कृष्ण राजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले.

आतापर्यंत आपण प्रामुख्याने प्राचीन भारतातील विविध राजकीय सत्तांची माहिती घेतली. पुढील पाठात प्राचीन भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेऊ.

Leave a Comment