पर्यटनाची परंपरा
आपल्या देशात पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे. तीर्थक्षेत्रांना भेट देणे, स्थानिक जत्रायात्रांना जाणे, विद्याभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे, व्यापारासाठी जाणे, या निमित्तांनी पूर्वी पर्यटन घडून येत असे. सारांश स्वरूपात सांगायचे तर मानवाला खूप पूर्वीपासून फिरण्याची आवड आहे.
पर्यटन : दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे पर्यटन होय. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात थॉमस कुकने ६०० लोकांची लीस्टर ते लाफबरो अशी रेल्वे सहल आयोजित केली. पूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल यशस्वीपणे घडवून आणली. कुकनेच पर्यटक तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. यातून आधुनिक पर्यटनयुग सुरू झाले.
पर्यटनाचे प्रकार
आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र असा स्थानिक, आंतरराज्यीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय झालेला आहे. देशातील व परदेशातील पुरावास्तू, इतिहासप्रसिद्ध व निसर्गरम्य स्थळे, प्राचीन कलानिर्मितीची केंद्रे, तीर्थक्षेत्रे, औद्योगिक व इतर प्रकल्प इत्यादींना भेटी देणे ही पर्यटनामागील मुख्य प्रेरणा असते. निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित गोष्टींमधील रम्यता व भव्यता यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची इच्छा जगभरच्या पर्यटकांना असते.
त्यामुळे हिमशिखरे, समुद्रकिनारे, घनदाट जंगले असे उपेक्षित प्रदेश पर्यटनात आले. त्यांच्यावर दृक्-श्राव्य प्रसारमाध्यमांतून कार्यक्रम तयार होऊ लागले. पर्यटनाचे स्थानिक, आंतरराज्यीय, आंतरराष्ट्रीय, धार्मिक, ऐतिहासिक, आरोग्यपूरक विज्ञान, कृषी, नैमित्तिक, क्रीडा पर्यटन असे ढोबळमानाने प्रकार पडतात.
स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन : हा प्रवास सुलभ असतो. तो देशातल्या देशात असल्याने यात भाषा, चलन, कागदपत्रे यांचा फारसा अडथळा नसतो. विशेष म्हणजे आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेप्रमाणे आपण त्याचे नियोजन करू शकतो.
आंतरराष्ट्रीय पर्यटन : जहाज, रेल्वे आणि विमान यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. जहाजांमुळे समुद्रकिनाऱ्यांवरचे देश जोडले गेले. रेल्वेच्या रूळांनी युरोप जोडला आहे. विमानांनी जग जवळ आणले. आर्थिक उदारीकरणानंतर भारतातून परदेशात जाणाऱ्यांची आणि परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
अभ्यास, विरंगुळा, स्थलदर्शन, व्यावसायिक कामे (बैठका, करारमदार इत्यादी) चित्रपटांचे चित्रीकरण यांसारख्या कामांसाठी देश-विदेशात येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे.
ऐतिहासिक पर्यटन : संपूर्ण जगभरातील हा एक महत्त्वाचा पर्यटन प्रकार आहे. लोकांचे इतिहासाच्या संदर्भातील कुतूहल लक्षात घेऊन ऐतिहासिक पर्यटन सहलींचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक गोपाळ नीळकंठ दांडेकर दुर्गभ्रमण यात्रा आयोजित करत असत.
भारतीय पातळीवर राजस्थानातील किल्ले, महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित आश्रम, १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित स्थळे अशाही ऐतिहासिक ठिकाणच्या सहली आयोजित केल्या जातात.
भौगोलिक पर्यटन : यात विविध भौगोलिक वैशिष्ट्ये निरीक्षणासाठी पर्यटन केले जाते. अभयारण्ये, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स (उत्तराखंड), समुद्रकिनारे, भौगोलिक वैशिष्ट्यपूर्ण स्थळे (उदा., लोणार सरोवर निघोज येथील रांजणखळगे, इत्यादी) इत्यादींचा समावेश भौगोलिक पर्यटनात होतो. यातील अनेक स्थळांमधील निसर्गाचे अवलोकन करावे या इच्छेपोटी आणि कुतुहलापोटी अनेक पर्यटक तिथे जात असतात.
आरोग्य पर्यटन : भारतातील वैद्यकीय सेवा व सुविधा पाश्चात्त्यांच्या मते स्वस्त व दर्जेदार आहेत. या कारणास्तव परदेशी लोक भारतात येऊ लागले आहेत. भारतात मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. त्याचा लाभ घेण्यासाठी कितीतरी लोक भारतात येतात. योगशिक्षण आणि आयुर्वेदिक उपचारांसाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.
कृषी पर्यटन : शहरी संस्कृतीत वाढलेल्या आणि कृषी जीवनाची माहिती नसलेल्यांसाठी कृषी पर्यटन हा प्रकार अलीकडच्या काळात झपाट्याने पुढे आला आहे. अलीकडे भारतीय शेतकरी दूरवरच्या कृषी संशोधन केंद्रे, कृषी विद्यापीठे, इझाईलसारखे शेतीच्या क्षेत्रात अभिनव प्रयोगाद्वारे नवीन तंत्रज्ञान विकसित करणारे देश यांसारख्या ठिकाणांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी भेट देऊ लागले आहेत.
क्रीडा पर्यटन : क्रीडा पर्यटन हा विसाव्या शतकात उदयाला आलेला प्रकार आहे. जागतिक पातळीवर ऑलिंपिक, विंबल्डन आणि जागतिक बुद्धिबळ स्पर्धा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्पर्धा तर भारतीय पातळीवर हिमालयीन कार रॅली आणि महाराष्ट्र पातळीवर महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धा यांसारखे प्रकार आहेत. हे सामने पाहायला जाणे म्हणजे क्रीडा पर्यटन.
नैमित्तिक पर्यटन : माणूस पर्यटनासाठी कारणे शोधत असतो. एकविसाव्या शतकात अशा अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. उदा. जगभरातील विविध देशांमधील फिल्म फेस्टिवल्स, संमेलने, आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शने इत्यादी. अशा कारणांसाठी लोक ठिकठिकाणी जात असतात. महाराष्ट्रातील साहित्य रसिकही दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनासाठी जात असतात.
पर्यटनाचा विकास
देशी आणि परदेशी पर्यटकांचे उद्बोधन हा सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा आहे. पर्यटकांची वाहतूक आणि सुरक्षितता, प्रवासातील सुखसोई, उत्तम दर्जाच्या निवासस्थानांची उपलब्धता, प्रवासात स्वच्छतागृहांच्या सोई या गोष्टींना पर्यटनामध्ये प्राधान्य देणे आवश्यक आहे. यामध्ये दिव्यांग पर्यटकांच्या गरजांकडे विशेष लक्ष पुरवणे आवश्यक आहे.
ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी आपणांस काही काळजी घेणे आवश्यक असते. ऐतिहासिक वारशांच्या स्थळांचे विद्रुपीकरण करणे, भिंतीवर मजकूर लिहिणे किंवा झाडांवर कोरणे, जुन्या वास्तू भडक रंगात रंगवणे, परिसर स्थळी सुविधांचा अभाव असणे ज्यायोगे अस्वच्छता वाढते यांसारख्या गोष्टी टाळायला हव्यात.
जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या भाषांमध्ये माहितीपुस्तिका, मार्गदर्शिका, नकाशे, इतिहासविषयक पुस्तके उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पर्यटकांना गाडीतून फिरायला नेणाऱ्या वाहन चालकांना दुभाषाचे प्रशिक्षण देणे, त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम करणे या गोष्टी करता येतील.
ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन
ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन करणे हे एक मोठे आव्हान आहे. आपल्या देशाला प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा ऐतिहासिक स्थळांचा वारसा मिळाला आहे. त्याचबरोबर नैसर्गिक समृद्धीचा वारसाही आपल्याला लाभलेला आहे. या वारशाचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित (सांस्कृतिक) अशा दोन प्रकारचा वारसा असतो.
संपूर्ण जगात गौरवली गेलेली काही महत्त्वाची स्थळे भारतात आहेत. ताजमहाल आणि जंतरमंतर वेधशाळेच्या बरोबरीने महाराष्ट्रातील अजिंठा, वेरूळ, घारापुरी (एलिफंटा लेणी), छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, पश्चिम घाटातील कास पठार यांचा समावेश आहे. जागतिक वारसा स्थळांना भेट देण्याची इच्छा जगभरातील पर्यटकांना असते. ही वारसा स्थळे बघण्यासाठी आपल्या देशात परदेशातून हजारो लोक येतात.
जागतिक वारसा स्थळांमध्ये भारतातील एखादया स्थळाची निवड झाली की आपली छाती अभिमानाने फुगून येते. परंतु आपण जेव्हा सहलीच्या निमित्ताने अशा ठिकाणी जातो तेव्हा आपणांस काय चित्र दिसते? स्थळांच्या परिसरात पर्यटक खडूने, कोळशाने आपली नावे लिहितात, चित्रे काढतात. त्याचा विपरीत परिणाम आपल्या देशाच्या प्रतिमेवर होतो. पर्यटन स्थळांच्या जतनासाठी पुढील निश्चय करणे आवश्यक आहे.
(१) मी पर्यटन स्थळाची स्वच्छता राखीन, कचरा टाकणार नाही.
(२) कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे विद्रूपीकरण करणार नाही.
पर्यटन आणि आतिथ्यक्षेत्रातील व्यावसायिक संधी
पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो. जर आपण त्याकडे व्यावसायिक पद्धतीने लक्ष दिले तर हा एक कायमस्वरूपी व्यवसाय आहे. यात नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यास प्रचंड संधी आहेत. पर्यटनामुळे अनेक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. परदेशी पर्यटकाने विमानतळावर पाऊल ठेवण्याआधीपासून तो भेट देणाऱ्या देशाला उत्पन्न मिळवून देण्यास सुरुवात करतो. त्याने भरलेल्या व्हिसा फीमुळे आपल्या देशाला महसूल मिळतो.
प्रवासखर्च, हॉटेलमध्ये राहणे, खाणे, दुभाष्याची मदत घेणे, वर्तमानपत्रे, संदर्भ साहित्य विकत घेणे, आठवण म्हणून स्थानिक वस्तू विकत घेणे एवढ्या गोष्टी पर्यटक मायदेशी जाईपर्यंत करतो. पर्यटन केंद्रांच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होतो. तेथील हस्तोदयोग व कुटीरोदयोग यांचा विकास होतो. त्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीत वाढ होते. उदा., स्थानिक खाद्यपदार्थ, तेथील हस्तकौशल्याच्या वस्तू इत्यादी गोष्टी पर्यटक आवडीने खरेदी करतात. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारात वाढ होते.
महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास : महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने वैभवशाली वारसा लाभलेले राज्य आहे. अजिंठा, वेरूळ, घारापुरी (एलिफंटा) यांसारखी जागतिक कीर्तीची लेणी, चित्रे शिल्पे, पंढरपूर, शिर्डी, शेगांव, तुळजापूर, कोल्हापूर, नाशिक, पैठण, त्र्यंबकेश्वर, देहू, आळंदी, जेजुरी अशी अनेक देवस्थाने.
हाजीमलंग, नांदेड येथील गुरुद्वारा, मुंबईचे माउंट मेरी चर्च, महाबळेश्वर, पाचगणी, खंडाळा, लोणावळा, माथेरान, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे, कोयनानगर, जायकवाडी, भाटघर, चांदोली ही धरणे, दाजीपूर, सागरेश्वर, ताडोबा ही अभयारण्ये ही महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे महत्त्वाची आहेत. इ.स. १९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली.
त्यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळाली आहे. या महामंडळातर्फे राज्यात ४७ ठिकाणी पर्यटक निवासाची सोय केली आहे. त्यात सुमारे चार हजारांहून अधिक पर्यटकांची निवासाची सोय होते. तसेच अनेक खासगी व्यावसायिकही या व्यवसायात उतरले आहेत.