प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह

वेदकाळाच्या शेवटी यज्ञविधींमधील बारीकसारीक तपशिलांना नको एवढे महत्त्व आले. त्या तपशिलांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते. इतरांना ते मिळवण्याची मोकळीक राहिली नाही. वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत गेले.

माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला, यावर त्याचे समाजातील स्थान ठरू लागले. त्यामुळेच उपनिषदांच्या काळापासून धर्माचा विचार यज्ञविधींपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते.

परंतु उपनिषदांमधील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यांवर भर देणारा होता. सर्वसामान्यांना समजायला अवघड होता. त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले. जसे, शिवभक्तांचा शैवपंथ आणि विष्णुभक्तांचा वैष्णवपंथ. या देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे लिहिली गेली.

इ.स.पू. सहाव्या शतकात सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचारप्रवाह निर्माण झाले. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे. याची जाणीव अनेकांना झाली.

त्यातून पुढे नवीन धर्म प्रस्थापित झाले. व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव महत्त्वाचा नसतो, हे या धर्मांनी ठळकपणे मांडले. त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवले. नवीन विचारांच्या प्रवर्तकांमध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे.

जैन धर्म

जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्माांपैकी एक धर्म आहे. या धर्मात ‘अहिंसा या तत्त्वाला महत्त्व दिलेले आहे. धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थंकर म्हणतात. जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण २४ तीर्थंकर होऊन गेले. वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील चोविसावे तीर्थंकर होत.

वर्धमान महावीर (इ.स.पू. ५९९ ते इ.स.पू. ५२७)

Vardhaman Mahaveer

आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो, त्या राज्यामध्ये प्राचीन काळी वृज्जी नावाचे एक महाजनपद होते. त्याची राजधानी होती वैशाली वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला.

त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते. वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. साडेबारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. हे ज्ञान ‘केवल’ म्हणजे ‘विशुद्ध’ स्वरूपाचे होते, म्हणून त्यांना ‘केवली’ असे म्हटले जाते.

शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा, यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे, म्हणजे विकारांवर विजय मिळवणे. असा विजय त्यांनी मिळवला, म्हणून त्यांना ‘जिन’ म्हणजे ‘जिंकणारा’, असे म्हटले जाऊ लागले.

‘जिन’ या शब्दापासून जैन हा शब्द तयार होतो. विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते. ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे तीस वर्षे उपदेश केला.

लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर ‘अर्धमागधी’ या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधत. त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यांमध्ये सामावलेले आहे.

लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत, त्यांना ‘समवसरण’ असे अर्धमागधी भाषेत म्हणत असत, हे समवसरण समतेवर आधारलेले असे. या समवसरणांमध्ये सर्व वर्णांतील लोकांना प्रवेश असे.

पंचमहाव्रते : पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे पाच नियम.

१. अहिंसा : कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल, असे वागू नये. 

२. सत्य : प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी.

३. अस्तेय : ‘स्तेय’ म्हणजे चोरी. दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी. चोरी न करणे, म्हणजे अस्तेय.

४. अपरिग्रह : मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो. असा साठा न करणे, म्हणजे अपरिग्रह

५. ब्रह्मचर्य: शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य.

त्रिरत्ने : त्रिरत्ने म्हणजे १. ‘सम्यक् दर्शन’, २. ‘सम्यक् ज्ञान’ आणि ३. ‘सम्यक् चारित्र’ ही तीन तत्त्वे. सम्यक् याचा अर्थ ‘संतुलित’ असा आहे.

१. सम्यक् दर्शन : तीर्थंकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे.

२. सम्यक् ज्ञान : तीर्थंकरांच्या उपदेशाचा आणि तत्त्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून, त्याचा सखोल अर्थ समजून घेणे.

३. सम्यक् चारित्र : पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे.

उपदेशाचे सार : महावीरांच्या उपदेशातील अनेकान्तवाद’ म्हटला जाणारा सिद्धान्त सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. अनेकान्त या शब्दातील ‘अन्त’ या शब्दाचा ‘पैलू’ असा अर्थ आहे.

सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एखाददुसन्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून त्या विषयाच्या अनेक पैलूंकडे लक्ष देणे आवश्यक असते, असे या सिद्धान्तात मानण्यात आले आहे.

या सिद्धान्तामुळे समाजामध्ये स्वतःच्या मतांविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही. इतरांच्या मतांविषयी सहिष्णुता निर्माण होते. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो, अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती.

स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते. मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला. सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू दया, जगा आणि जगू दया, असा उपदेश त्यांनी केला.

बौद्ध धर्म

बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते.

गौतम बुद्ध (इ.स.पू. ५६३ ते इ.स.पू. ४८३)

 

Gautam Buddha

गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव होते शुद्धोदन आणि आईचे नाव होते महामाया (मायादेवी). गौतम बुद्धांचे मूळ नाव होते सिद्धार्थ. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून त्यांना ‘बुद्ध’ असे म्हटले  धर्मचक्रप्रवर्तन असे म्हटले जाते.

त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून त्यांना ‘बुद्ध’ असे म्हटले गेले. मानवी जीवनात दुःख का आहे, हा प्रश्न त्यांना पडला. त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला.

Bodhivruksha

एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या ऊरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते. त्या वेळी त्यांना ‘बोधि’ प्राप्त झाली. ‘बोधि म्हणजे सर्वोच्च ज्ञान’. त्या पिंपळाच्या वृक्षाला आता ‘बोधिवृक्ष’ असे म्हणतात.

तसेच ‘ऊरुवेला’ या स्थानाला ‘बोधगया’ असे म्हणतात. त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले. या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला, त्यास ‘धम्म’ असे म्हटले जाते.

या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला ‘धम्मचक्कपवत्तन’ असे पाली भाषेत म्हटले जाते. संस्कृतमध्ये त्याला धर्मचक्रप्रवर्तन असे म्हटले जाते. नंतरच्या काळात त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे पंचेचाळीस वर्षे चारिका केली. चारिका म्हणजे पायी फिरणे.

त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केला. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला ‘त्रिशरण’ असे म्हणतात. त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढीलप्रमाणे आहे.

आर्यसत्ये : मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्ये आहेत. त्यांना आर्यसत्ये म्हटलेले आहे.

१. दुःख : मानवी जीवनात दुःख असते.

२. दुःखाचे : कारण दुःखाला कारण असते.

३. दुःख-निवारण : दुःख दूर करता येते.

४. प्रतिपद : प्रतिपद म्हणजे मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला ‘अष्टांगिक मार्ग’ असे म्हटले आहे.

पंचशील : गौतम बुद्धांनी पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले. त्या नियमांनाच ‘पंचशील असे म्हणतात.

१. प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे.

२. चोरी करण्यापासून दूर राहणे.

३. अनैतिक आचरणापासून दूर राहणे.

४. असत्य बोलण्यापासून दूर राहणे.

५. मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे.

बौदध संघ: आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना ‘भिक्खू’ असे म्हटले जाते.

बुद्धांप्रमाणे भिक्खुही चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत. स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता. त्यांना भिक्खुनी असे म्हणतात. बौद्ध धर्मात सर्व वर्णांतील व जातींमधील लोकांना प्रवेश होता.

उपदेशाचे सार : गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. वर्ण वगैरेंच्या आधारे मानली जाणारी विषमता नाकारली. जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणावरूनच श्रेष्ठ कनिष्ठता ठरते.

‘छोटीशी चिमणीदेखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते हे त्यांचे वचन विख्यात आहे. ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयींचे त्यांचे चिंतन दर्शवते. त्यांनी पुरुषांच्याप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला.

यज्ञासारख्या कर्मकांडाला विरोध केला. त्यांनी उपदेशलेली प्रज्ञा, शील, इत्यादी मूल्ये मानवाचे कल्याण साधणारी आहेत. सर्व प्राणिमात्रांविषयीची ‘करुणा’ हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते.

गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे, तर सर्व मानवजातीला आजही मार्गदर्शक आहे.

लोकायत : लोकायत किंवा चार्वाक या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचारप्रवाहही महत्त्वाचा आहे. त्याचा भर स्वतंत्र विचारावर होता. त्याने वेदांचे प्रामाण्य नाकारले.

प्राचीन काळात भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण होत राहिले. कालांतराने ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम आणि पारशी हे धर्म भारतीय समाजात रुजले.

ज्यू धर्म

ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात केरळमधील कोचीन येथे आले असावेत. ज्यू धर्माला यहुदी धर्म असेही म्हटले जाते. देव एकच आहे. असे ज्यू धर्मीय मानतात.

ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे. त्यांच्या प्रार्थनास्थळाला ‘सिनॅगॉग’ असे म्हणतात.

 

Sinagog

ख्रिश्चन धर्म

ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तांनी केली. तो जगभर पसरला आहे. येशू ख्रिस्तांच्या १२ शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात केरळमध्ये आले. त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे इसवी सन ५२ मध्ये चर्चची स्थापना केली.

ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे. तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्वशक्तिमान आहे. येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते.

आपण सारे एकमेकांचे बंधुभगिनी आहोत. आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर देखील. चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे, असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितले आहे. ‘बायबल’ हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला ‘चर्च’ असे म्हणतात.

Charch

इस्लाम धर्म

इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. अल्ला एकच असून मुहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत. ईश्वराचा संदेश पैगंबरांमार्फत पवित्र कुरआन या धर्मग्रंथामधून प्रकट झालेला आहे. ‘इस्लाम’ या शब्दाचा अर्थ ‘शांती’ असा आहे. या शब्दाचा अर्थ ‘अल्लाहला शरण जाणे’ असाही होतो.

Mashid

सर्वकाळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे, तो सर्वशक्तिमान आणि परम दयाळू आहे, असे इस्लाममध्ये सांगितलेले आहे. मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे, असे मानलेले आहे. मनुष्याने आयुष्यात कसे वागावे, याचे मार्गदर्शन पवित्र ‘कुरआन’

पारशी धर्म

पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव ‘अवेस्ता’ असे आहे. ‘ऋग्वेद’ आणि अवेस्ता यांतील भाषेमध्ये साम्य आहे.

Agyari

पारशी लोक इराणच्या ‘पार्स’ किंवा ‘फार्स’ नावाच्या प्रांतातून भारतात आले, म्हणून त्यांना ‘पारशी’ या नावाने ओळखले जाते. ते प्रथम गुजरातमध्ये आले. ते इसवी सनाच्या आठव्या शतकात आले असावेत असे काहींचे मत आहे.

झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते. ‘अहुर मज्दू’ या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या दोन तत्त्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळांमध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो.

त्या देवळांना ‘अग्यारी’ असे म्हणतात. उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरणतत्त्वे हा पारशी विचारसरणीचा गाभा आहे

Leave a Comment