पूर्ण प्रकरण वाचण्यासाठी, कृपया अधोरेखित केलेल्या प्रकरणाच्या नावावर क्लिक करा
१. भारताची सांस्कृतिक विविधता
भारताला हजारो वर्षांचा इतिहास आहे. इतका प्रदीर्घ इतिहास आणि इतकी प्राचीन संस्कृती असलेले फारच थोडे देश जगामध्ये आहेत. अश्मयुगापासून भारतात लोक राहत आले आहेत. भारताबाहेरील निरनिराळ्या प्रदेशांतून लोक भारतात आले. ते येथील संस्कृतीशी एकरूप झाले. यातून एक संमिश्र भारतीय संस्कृती आकारास आली आहे.
इयत्ता पाचवी इतिहास – 5th Class History Book
देशाच्या वेगवेगळ्या भागांत राहणारे आपण सारे भारतीय आहोत. भाषा, साहित्य, कला इत्यादींत विविधता असली, तरी भारतीय म्हणून आपण एक आहोत. ही विविधता भारतीयांमध्ये ऐक्यभावना निर्माण करण्यास पोषक ठरली आहे. आपले सामाजिक जीवन विविधतेमुळे समृद्ध झाले आहे.
२. विज्ञान आणि मानवी जीवन
भटके जीवन जगणारा अश्मयुगीन मानव आणि अवकाशात झेप घेणारा आजचा विज्ञानयुगातील मानव यांच्या जीवनात फार मोठा फरक पडला आहे. सुरुवातीच्या हजारो वर्षांच्या काळात माणसाने काही महत्त्वाचे शोध लावले. हत्यारे बनवणे, अग्नी निर्माण करणे, चाकाचा उपयोग, शेती करण्याचे ज्ञान इत्यादींचा त्यांत समावेश होता.
या प्रकारच्या ज्ञानामुळे माणसाचे दैनंदिन जीवन काहीसे सुखी बनले व स्थिर झाले. अलीकडच्या काळात, विशेषत: सोळाव्या शतकापासूनच्या पुढील चार शतकांत शरीरशास्त्र, खगोलशास्त्र, पदार्थविज्ञान अशा विज्ञानाच्या विविध शाखांत अनेक शोध लागले. या शोधांचा माणसाच्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष उपयोग व्हावा, यासाठी यंत्रे व उपकरणे यांचे शोध लावण्यात आले.
३. युरोपातील प्रबोधनाचे युग
आज युरोप खंड अनेक क्षेत्रांत आघाडीवर आहे, पण मध्ययुगीन युरोपातील समाज मागासलेल्या अवस्थेत होता. समाजावर धर्मगुरूंचा प्रभाव होता. ते जे सांगतील ते लोकांना मान्य करावे लागे. धर्मगुरूंची प्रवचने हे लोकांचे ज्ञान मिळवण्याचे प्रमुख साधन होते. धर्मगुरूंप्रमाणे राजघराण्यातील लोक व सरदार, उमराव यांनाही समाजात महत्त्व असे.
इयत्ता पाचवी इतिहास – 5th Class History Book
४. क्रांतियुग
समाजजीवनाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशा क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने जे बदल घडून येतात, अशा बदलांना क्रांती म्हणतात. हे बदल ज्या काळात होतात, त्या काळाला ‘क्रांतियुग’ असे म्हणतात. या अर्थाने अठरावे शतक हे क्रांतियुग होते. अठराव्या शतकात अमेरिकेमध्ये स्वातंत्र्ययुद्ध झाले.
फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. या घटनांमुळे अमेरिका व युरोपमध्ये काही तात्कालिक बदल घडून आले. तसेच त्यापुढील काळात जगातील इतर देशांवरही त्याचे परिणाम झाले. या घटनांची आपण थोडक्यात माहिती करून घेऊ.
५. इंग्रजांचे भारतात आगमन व सत्तास्थापना
इंग्रज हे युरोप खंडातील इंग्लंड या देशाचे रहिवासी. त्यांनी भारत देश कसा ताब्यात घेतला, याची माहिती आपण या पाठात करून घेणार आहोत. युरोपीय व्यापाऱ्यांचे भारतात आगमन : भारत आणि युरोप यांच्यात प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. युरोपीय बाजारपेठेत भारताच्या मालाला मोठी मागणी होती. मध्ययुगात हा व्यापार प्रामुख्याने खुष्कीच्या मार्गाने चालत होता. नंतर युरोपातील व्यापारी व राजांनी भारताशी व्यापार करण्यासाठी भारताकडे जाणारा समुद्रमार्ग शोधण्यास सुरुवात केली.
इयत्ता पाचवी इतिहास – 5th Class History Book
६. १८५७ चा राष्ट्रीय उठाव
आधुनिक भारताच्या इतिहासातील १८५७ चा राष्ट्रीय उठाव ही एक महत्त्वाची घटना आहे. इंग्रज राज्यकर्त्यांविरुद्ध जनता व सैनिक यांच्या मनात असंतोष होता. या असंतोषाचा उद्रेक म्हणजे १८५७ चा राष्ट्रीय उठाव होय.
जनतेतील असंतोष : दारिद्र्य आणि बेकारी यांमुळे देशातील लोक गांजून गेले होते. शेतकऱ्यांवरील कराचा बोजा वाढल्यामुळे शेतकरी असंतुष्ट होते. इंग्रजांनी काही राजेरजवाड्यांची संस्थाने म्हणजे त्यांची राज्ये खालसा केली. काहींचे तनखे बंद केले. संस्थाने खालसा केल्यामुळे सैनिक, कारागीर इत्यादी बेकार झाले.
इंग्रजांनी भारतात काही सामाजिक सुधारणा केल्या. सतीची चाल बंद केली. विधवा विवाहास मान्यता दिली. असे कायदे करून इंग्रज सरकार आपल्या धर्मात हस्तक्षेप करत आहे, असे लोकांना वाटू लागले.
इयत्ता पाचवी इतिहास – 5th Class History Book
७. इंग्रज राजवटीचे परिणाम
इंग्रजांच्या आगमनापूर्वी एक अतिशय संपन्न देश अशी भारताची प्रसिद्धी होती. कापड उद्योग, हस्तकला व्यवसाय व अन्य व्यापारी वस्तूंचे उत्पादन यांत भारतीय आघाडीवर होते. भारताचा व्यापार जगभर चालत होता, पण इंग्रजांच्या आर्थिक व व्यापारी धोरणांमुळे भारतातील संपत्तीचा ओघ आता इंग्लंडकडे जाऊ लागला. त्यातून भारताची पिळवणूक सुरू झाली.
भारतात बहुसंख्य लोक खेड्यांतच राहत. ते शेतीवर उपजीविका करत. त्यांना लागणाऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तू गावातच तयार होत. भारतीय अर्थव्यवस्थेत स्थानिक कारागीर हा महत्त्वाचा दुवा होता. ही परिस्थिती इंग्रजांच्या राजवटीत बदलली.
८. नवे विचार : नवी दृष्टी
इंग्रजांच्या राजवटीत पाश्चात्त्य शिक्षणपद्धती भारतात सुरू झाली. देशात नवनव्या कल्पना व विचार येऊ लागले. भारतीय समाजातील जातिभेद, स्त्री-पुरुष विषमता, सतीची चाल, बालविवाह अशा अनिष्ट चालीरीतींमुळे भारतीय समाजाची प्रगती खुंटली होती. ही स्थिती बदलण्यासाठी आधुनिक शिक्षण घेतलेल्या भारतीय विचारवंतांनी प्रयत्न सुरू केले. त्यातून समाजसुधारणा चळवळीची सुरुवात झाली.
९. राष्ट्रीय सभेची स्थापना
राष्ट्रीय जागृती होऊ लागल्यामुळे भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांत राजकीय चळवळी सुरू झाल्या होत्या. त्याला अखिल भारतीय स्वरूप देण्याचे प्रयत्नही या काळात सुरू झाले. ‘इंडियन असोसिएशन’ या संघटनेने कोलकता येथे अखिल भारतीय परिषद भरवली. या प्रयत्नांतून राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची कल्पना पुढे आली.
इयत्ता पाचवी इतिहास – 5th Class History Book
दादाभाई नौरोजी, बद्रुद्दीन तय्यबजी, फिरोजशहा मेहता इत्यादी भारतीय नेत्यांना असे वाटू लागले, की राष्ट्रीय पातळीवर एखादी संघटना असावी. त्यांनी निवृत्त ब्रिटिश अधिकारी सर अॅलन हयूम यांच्या सहकार्याने ‘इंडियन नॅशनल काँग्रेसची म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केली.
१०. राष्ट्रीय चळवळीची वाटचाल
लॉर्ड कर्झन याने इ. स. १९०५ मध्ये बंगाल प्रांताची फाळणी केली. बंगाल प्रांताचा विस्तार मोठा असल्याने प्रशासकीय सोईसाठी फाळणी केल्याचे कारण देण्यात आले; परंतु त्यामागील खरा हेतू हिंदू व मुस्लिम समाजांत फूट पाडून राष्ट्रीय चळवळ कमकुवत करणे हा होता. मुस्लिम बहुसंख्य असलेला पूर्व बंगाल व हिंदू बहुसंख्य असलेला बिहार व ओरिसा मिळून बनलेला पश्चिम बंगाल असे दोन प्रांत निर्माण करण्यात आले. राष्ट्रीय सभेने बंगालच्या फाळणीला कडाडून विरोध केला.
११ . असहकार चळवळ
लोकमान्य टिळकांचे १९२० साली निधन झाले आणि महात्मा गांधी यांच्याकडे स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व आले. सत्याग्रहाचा नवा मार्ग : दक्षिण आफ्रिकेत ब्रिटिशांची सत्ता होती. भारतातील काही लोक तेथे स्थायिक झाले होते. त्यांच्यावर आणि तेथील कृष्णवर्णीय लोकांवर ब्रिटिश राज्यकर्ते अन्याय व जुलूम करत होते. गांधीजी वकिली व्यवसाय करण्याच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेत गेले होते. तेथे त्यांनी भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी त्यांना संघटित केले.
इयत्ता पाचवी इतिहास – 5th Class History Book
१२. सविनय कायदेभंग
लाहोर येथे १९२९ च्या डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले. अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत करण्यात आला. २६ जानेवारी १९३० रोजी जनतेने स्वातंत्र्याची शपथ घेतली. लाहोर अधिवेशनात सविनय कायदेभंगाचा ठरावही मंजूर करण्यात आला.
१३. सशस्त्र क्रांतिकारी चळवळ
भारतीय राष्ट्रीय सभेने भारताला स्वतंत्र करण्यासाठी शांततामय, अहिंसक व सनदशीर मार्गाचा अवलंब केला; परंतु या मार्गाने भारत स्वतंत्र होऊ शकेल, यावर काही तरुणांचा विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला.
राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी ब्रिटिश सत्तेविरुद्ध महाराष्ट्रात उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, कर्नाटकात कित्तुरची राणी चन्नमा आणि पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी सशस्त्र उठाव केले होते. १८९७ साली पुण्यात प्लेगची साथ पसरली होती.
१४. ‘चले जाव’ आंदोलन
दुसरे महायुद्ध १९३९ साली सुरू झाले. ब्रिटिश सरकारने भारतीयांच्या इच्छेविरुद्ध भारताला इंग्लंडच्या बाजूने युद्धात गोवले. याचा धिक्कार करण्यासाठी राष्ट्रीय सभेने वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सुरू केले. या आंदोलनात पहिले सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबा भावे यांची निवड करण्यात आली.
१५. आझाद हिंद सेना
दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्लंडची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती. तेथील जनताही युद्धाला त्रासली होती. त्यामुळे इंग्लंड अडचणीत आले होते. या परिस्थितीचा फायदा घेऊन राष्ट्रीय सभेने ब्रिटिशविरोधी सशस्त्र आंदोलन सुरू करावे, असा प्रचार सुभाषचंद्र बोस यांनी केला. त्यामुळे ब्रिटिश सरकार धास्तावून गेले.
सरकारने सुभाषचंद्र बोस यांना अटक करून कारागृहात डांबले. तेथे त्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे पुढे त्यांना कोलकत्यातील त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले, तथापि सुभाषचंद्र बोस वेशांतर करून ब्रिटिशांच्या पहाऱ्यातून शिताफीने निसटले व जर्मनीची राजधानी बर्लिन येथे गेले.
१६. भारत स्वतंत्र झाला
दुसरे महायुद्ध १९४५ साली समाप्त झाले. या युद्धात इंग्लंडला विजय मिळाला. त्यात इंग्लंडचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेला राष्ट्रव्यापी लढा, क्रांतिकारकांनी केलेल्या सशस्त्र चळवळी, आझाद हिंद सेनेने दिलेला सशस्त्र लढा या घटनांमुळे भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा होऊ लागला, म्हणून भारताचा कारभार भारतीयांच्या हाती सोपवण्याचे ब्रिटिशांनी ठरवले. त्यासाठी त्यांनी भारतीय नेत्यांशी बोलणी सुरू केली.
इयत्ता पाचवी इतिहास – 5th Class History Book
१८ जुलै १९४७ रोजी ब्रिटिश संसदेने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मंजूर केला. या कायदयाने भारताचे विभाजन होऊन भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली.१५ ऑगस्ट १९४७ हा भारताला स्वातंत्र्य देण्याचा दिवस ठरला.
१४ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर दिल्ली येथे ब्रिटिशांचा ‘युनियन जॅक’ हा ध्वज खाली उतरवण्यात आला आणि त्या जागी स्वतंत्र भारताचा तिरंगी ध्वज फडकावण्यात आला. ब्रिटिशांच्या दास्यातून भारत स्वतंत्र झाला. लक्षावधी भारतीयांच्या असीम त्यागाची ही फलश्रुती होती.
Sugam Marathi Vyakaran (M R Walambe)
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास – Chhatrapati Shivaji Maharaj History
इतिहास – वाचण्यासाठी येथे क्लिक करा