माणसाच्या स्वभावाचे कितीतरी पैलू असतात. माणूस कधी रागावतो, तर कधी कोणाला उदारपणे क्षमा करतो. त्याला कधी कोणाबद्दल मत्सर वाटतो, तर कधी कोणाबद्दल प्रेम वाटते. कधी तो फक्त स्वार्थीपणे वागतो, तर प्रसंगी इतरांसाठी त्याग करायला, इतरांना मदत करायलाही पुढे सरसावतो. राग, आनंद, दुःख, मत्सर, नैराश्य, भीती या सगळ्या आपल्या भावना आहेत.
भावनांचा मेळ कसा घालावा?
माणूस विचारक्षम असतो, तसाच तो भावनाशीलही असतो. विचार आणि भावनांचा योग्य तो मेळ आपल्याला घालता आला पाहिजे. कोणी आपल्याला दुखावले, की आपल्याला वाईट वाटते. ते स्वाभाविक आहे; पण किती वाईट वाटून घ्यायचे हे आपल्याला कळायला हवे. एखादयाने चूक केली, तर आपल्याला राग येतो; पण किती रागवायचे याची मर्यादा कळली पाहिजे.
एखादी गोष्ट हवीशी वाटणे हे स्वाभाविक आहे; पण त्यासाठी किती हपापलेपणा करायचा हे कळले पाहिजे. विचारीपणाने भावना आवरता येतात. त्यांच्यावर संयम ठेवता येतो. भावनांवर अशा रीतीने नियंत्रण ठेवणे, भावनांचा मेळ घालता येणे, त्या योग्य रीतीने व योग्य प्रमाणात व्यक्त करणे, याला ‘भावनिक समायोजन’ म्हणतात.
भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व संतुलित बनते. इतरांना समजून घेण्याची आपली क्षमता वाढते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते. इतरांना अकारण दोष देणे, त्यांची उणीदुणी काढणे, त्यांचा मत्सर करणे, त्यांचे यश सहन न होणे या दोषांपासून आपली सुटका होते.
आपण आनंदी राहतो. इतरांशी जुळवून घेण्याची आपली वृत्ती वाढते. आपल्यातील हेकेखोरपणा कमी होतो. आनंद व दुःख यांप्रमाणेच राग हीसुद्धा आपली एक भावना आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी आणि कशाचा तरी राग येत असतो. एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली किंवा आपला अपमान झाला, की राग येतो.
तसेच एखादयावर अन्याय झालेला पाहूनही आपल्याला राग येतो. वारंवार येत असेल किंवा अनावर होत असेल, राग तर त्याचे मानसिक व शारीरिक दुष्परिणाम होतात. आपण रागीट व हट्टी होतो. समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते. रागाच्या भरात आपण इतरांचे मन दुखावतो. आपल्याला डोकेदुखी, निद्रानाश, निरुत्साह अशा काही परिणामांना सामोरे जावे लागते.
आपल्यातील उणिवांची जाणीव
आपले अक्षर सुंदर आहे, आपल्याला गणित छान समजते, विज्ञानाच्या अभ्यासात आपण जास्त रमतो, कविता खूप आवडते असे आपण आणि आपल्या मित्रमैत्रिणी म्हणतात. याचा अर्थ आपल्या आवडीनिवडी आणि क्षमताही वेगवेगळ्या असतात. आपल्याला आपल्या क्षमता जशा हळूहळू समजायला लागतात, तसे आपल्याला काय येत नाही हेही समजू लागते.
एखाद्या विषयात, कलेत, खेळात आपण अधिक तरबेज असतो, तर दुसऱ्या एखादया बाबतीत तेवढी गती नसते. आपल्या क्षमतांबरोबर आपल्यातील उणिवाही माहीत असल्या पाहिजेत, म्हणजे प्रयत्न करून उणिवांवर मात करता येते. एखादी गोष्ट येत नाही, म्हणून जे येते त्यात प्रावीण्य मिळवण्याकडे दुर्लक्ष करू नये.
स्वभाव बदलता येतो
आपल्यापैकी कोणाचाच स्वभाव पूर्णत: चांगला किंवा पूर्णतः वाईट नसतो. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे चांगले गुण आहेत, त्यांचा प्रथम विचार करावा. उणिवा दूर करण्यासाठी एकमेकांना मदत करावी. आपल्यातील चांगल्या क्षमतांबद्दलही बोलावे, तसेच उणिवांबद्दलही मोकळेपणाने चर्चा केली तर ते आपल्या फायदयाचे असते.