दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्लंडची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती. तेथील जनताही युद्धाला त्रासली होती. त्यामुळे इंग्लंड अडचणीत आले होते. या परिस्थितीचा फायदा घेऊन राष्ट्रीय सभेने ब्रिटिशविरोधी सशस्त्र आंदोलन सुरू करावे, असा प्रचार सुभाषचंद्र बोस यांनी केला. त्यामुळे ब्रिटिश सरकार धास्तावून गेले.
सरकारने सुभाषचंद्र बोस यांना अटक करून कारागृहात डांबले. तेथे त्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे पुढे त्यांना कोलकत्यातील त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले, तथापि सुभाषचंद्र बोस वेशांतर करून ब्रिटिशांच्या पहाऱ्यातून शिताफीने निसटले व जर्मनीची राजधानी बर्लिन येथे गेले.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी जर्मन सरकारची मदत मिळावी म्हणून सुभाषचंद्र बोस यांनी प्रयत्न केले. त्यांनी युरोपमधील भारतीय जनतेला संघटित करण्याचा प्रयत्न केला. बर्लिन येथे ‘आझाद हिंद रेडिओ केंद्र सुरू केले. या केंद्रावरून वेळोवेळी केलेल्या भाषणांत त्यांनी भारतीयांना स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र संघर्ष करण्याचे आवाहन केले.
आझाद हिंद सेना: भारतीय क्रांतिकारक रासबिहारी बोस हे त्या काळात जपानमध्ये राहत होते. जपानने सिंगापूर, मलेशिया, म्यानमार इत्यादी प्रदेश ब्रिटिशांकडून जिंकून घेतले होते. त्या प्रदेशांतील भारतीय लोकांची एक संघटना बांधून रासबिहारी बोस यांनी ‘हिंदी स्वातंत्र्य संघ’ स्थापन केला होता.
जपानच्या हाती पडलेल्या ब्रिटिश लष्करातील हिंदी सैनिकांची त्यांनी ‘आझाद हिंद सेना’ स्थापन केली. तिचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी सुभाषबाबूंना निमंत्रण पाठवले. सुभाषचंद्र बोस जर्मनीहून हजारो किलोमीटरचा खडतर सागरी प्रवास करून टोकियोला आले. त्यांनी तेथे आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.
आझाद हिंद सेनेत त्यांनी ‘झाशीची राणी’ या नावाने स्त्रियांचे एक पथक स्थापन केले. या पथकाचे नेतृत्व डॉ. लक्ष्मी स्वामीनाथन यांच्याकडे होते. या पथकात जानकी थिवी, बेला दत्त इत्यादी स्त्रिया सहभागी होत्या.नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली ‘आझाद हिंद सरकार’ स्थापन झाले.
या सरकारला जपान, जर्मनी, इटली इत्यादी राष्ट्रांनी मान्यता दिली. अंदमान व निकोबार बेटांचा ताबा घेऊन आझाद हिंद सरकारने तेथे तिरंगा फडकावला. अंदमानला ‘शहीद’ व निकोबारला ‘स्वराज्य’ अशी नावे दिली.
चलो दिल्ली : भारत स्वतंत्र करण्यासाठी आझाद हिंद सेनेने सिंगापूरहून आगेकूच केले. ‘चलो दिल्ली’ अशी घोषणा देत आझाद हिंद सेना भारताकडे निघाली. भारताच्या आराकान व कोहिमा या प्रदेशांत प्रवेश करताना ब्रिटिश लष्कराशी तिने निकराचा लढा दिला.
पुढे मोहीम चालवणे अशक्य झाले. मुसळधार पाऊस सुरू झाला. जपानची मदत मिळणेही कठीण झाले. या अडचणींमुळे आझाद हिंद सेनेने माघार घेतली. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यात त्यांचे निधन झाले.
ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत असताना आझाद हिंद सेनेचे अधिकारी पकडले गेले. लष्करी न्यायालयाने या अधिकाऱ्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली, पण ब्रिटिश सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने झाली. शेवटी जनतेचा प्रक्षोभ पाहून शिक्षा रद्द करण्यात आल्या.
नौसैनिकांचा उठाव : आझाद हिंद सेनेचा प्रभाव भारतीय नौसैनिकांवर व वायुसैनिकांवरही पडला. ब्रिटिशांची नोकरी करण्यापेक्षा आपणही मातृभूमीसाठी त्यांच्याविरुद्ध उठाव करावा, असे त्यांना वाटू लागले.
मुंबई बंदरात उभ्या असलेल्या ‘तलवार’ या युद्धनौकेवरील भारतीय नौसैनिकांनी १८ फेब्रुवारी १९४६ रोजी ब्रिटिश राजवटीविरुद्ध उठाव केला. त्यांनी नौकेवरील ‘युनियन जॅक’ हा ब्रिटिशांचा ध्वज खाली उतरवला आणि तिरंगा फडकावला.
दिल्ली, लाहोर, अंबाला, मेरठ येथील वायुसैनिकही संपावर गेले. ‘उठाव करणाऱ्या सैनिकांनी कामावर ताबडतोब परतावे, अन्यथा त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल,’ असा आदेश सरकारने काढला, परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ब्रिटिशविरोधी उठाव चालूच राहिले.
ठिकठिकाणी सामान्य जनतेचाही पाठिंबा त्यांना मिळाला.भारतीय लष्कर हा भारतातील ब्रिटिशांच्या सत्तेचा मुख्य पाया होता. तो पायाच आता खिळखिळा होऊ लागला. त्यामुळे भारतात आपली सत्ता फार काळ टिकणे अवघड आहे, याची जाणीव ब्रिटिशांना झाली.