Acharya Vinoba Bhave – आचार्य विनोबा भावे

Acharya-Vinoba-BhaveAcharya Vinoba Bhave

थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक विनोबा भावेंचा जन्म रायगड जिल्ह्यातील गागोदे गावामध्ये ११ सप्टेंबर १८८५ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव विनायक नरहर भावे होते. त्यांचे वडील व आई रखुमाबाई नोकरी निमित्ताने बडोदा गेल्यामुळे त्यांचे माध्यमिक व उच्च शिक्षण बडोदा येथे झाले. नंतर वाई येथे त्यांनी वेदांताचे शिक्षण घेतले.

Acharya Vinoba Bhave – आचार्य विनोबा भावे

ते वाराणसीला असताना तेथील हिंदू विश्वविद्यालयाच्या समारंभात झालेल्या गांधीजींच्या भाषणाने ते एवढे प्रभावित झाले की, गांधीजींची ७ जून १९१६ रोजी त्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली व कोचरबा आश्रमातच गांधीजीबरोबर ते राहू लागले. तेथेच त्यांनी आजन्म ब्रम्हचर्य राहण्याची प्रतिज्ञा घेतली. विनोबांची सेवावृत्ती पाहून गांधीजींनीच त्यांना विनोबा हे नाव दिले होते.

इ.स. १९२१ ला गांधीजींचे एक अनुयायी शेठ जमनालाल बजाज यांनी साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. या शाखेचे संचालक म्हणून सेवाग्राम आश्रमाची सर्व जबाबदारी गांधीजींनी विनोबांवर सोपविली होती. ८ एप्रिल १९२१ ला विनोबा वर्ध्याला आले. इ.स. १९५१ ते १९७३ पर्यंतचा काळ सोडल्यास या आश्रमातच विनोबांनी आपले जीवन घालविले. वर्ध्याचा आश्रम क्रमाने मननवाडी, बजाजवाडी, महिला आश्रम, सेवाग्राम व पवनार इत्यादी ठिकाणी फिरत राहिला.

तांडीविरोधी आंदोलन : गांधीजीचे असहकार आंदोलन इ.स. १९२० च्या सुमारास सुरू होते. परंतु विनोवा या आंदोलनात सहभागी झाले नाहीत. कारण त्यावेळी त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या होत्या. त्या काळामध्ये त्यांनी ताडीच्या विरोधात आंदोलन सुरू केलेत. ताडी हा एक नशीला पदार्थ होता. ह्याच्या सेवनामुळे लोकांचे व त्यांच्या कुटुंबाचे हाल होत. ह्या नशेमुळे आयुष्याची राखरांगोळी होत असे. हे पाहून विनोबाचे मन द्रवित झाले व त्यांना ताडीचे उच्चाटन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जात व ताडीचे झाड दिसले की ते झाडच नष्ट करून टाकत.

Acharya Vinoba Bhave – आचार्य विनोबा भावे

विनोबांचे साम्यवादी विचार : आदर्श समाजाची कल्पना विनोबांच्या मनात रूजत होती. समाजातील लोकांमध्ये राष्ट्रवाद असला पाहिजे. निस्वार्थी वृत्तीने स्वतःला कामात झोकून देणारी तरूण मंडळी असावी. कुणावरही अन्याय होता कामा नये. सर्वांना समान संधी मिळावी, सर्वांनी शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध असाव्यात. समान न्याय असावा, समान सुखसोयी सर्वांना मिळाव्या, श्रमाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढावे, असा विनोबांचा साम्यवादासंदर्भात विचार होता.

त्याच्या मनातील या कल्पनांना निश्चित रूप मिळाल्यानंतर त्यांनी लगेच साम्यवादाचा प्रयोग सुरू केला. अन्न, वस्त्र, निवारा या बाबतीत स्वावलंबन असावे. आठ तास शारीरिक श्रम करणे, सगळ्यांना सारख्या कामासाठी एकसारखे वेतन दिले जावे, सर्वांना एकाच ठिकाणी एकच जेवन मिळावे, अशा प्रकारचा कार्यक्रम राबविण्यात यावा.

वापी यज्ञ : विनोबांनी वापी यज्ञ सुरू केला होता. वापी यज्ञ म्हणजे विहीर खोदण्याचे काम होय. हे काम फक्त त्यांनी दोन ते तीन महिन्यातच पूर्ण करून दाखविले. हे काम सामुदायिक पद्धतीने सुरू केले होते. याचा फायदा हा सर्वांनाच मिळाला. विहिरीला पाणी मुबलक होते. त्यामुळे शेतीला पाणी योग्य प्रकारे मिळू लागले. लोकांनी एक एकर शेतीत उत्तम प्रकारे उत्पादन घेतले.

याचा विनोबांना अतिशय आनंद झाला. विनोबांच्या मतानुसार भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात शेतीला फारच महत्त्व आहे. चरख्याने कपडा मिळेल पण अन्न मिळणार नाही. पोट भरायचे असेल तर अन्नाची गरज आहे आणि अन्न हे शेतीतूनच मिळते. त्याकरिता शेती सुधारणेबाबत ते आग्रही होते.

Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

Veer Savarkar – वीर सावरकर

भूदान चळवळ : भूदान चळवळ ही विनोद भावे यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची घटना होय. आंध्रप्रदेशातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या ठिकाणी इ.स. १९५१ साली विनोबांची सभा सुरू असताना त्या ठिकाणी काही भूमिहीन – लोकांनी विनोबांना जमिनीची मागणी केली.

त्याचवेळी याच गावातील एका भूधारकाने विनोबांना आपली जमीन दान म्हणून दिली. अशा भूमिहीन लोकांना जमिनी मिळाव्या यासाठी विनोबांनी भूदान चळवळ सुरू केली. या कार्याला सिद्धीस नेण्याकरिता त्यांनी गावागावातून खेड्यापाड्यातून पदयात्रा सुरू केली.

मोठ-मोठ्या जमीनदार व मोठ-मोठ्या भूधारकांना विनोबांनी विनंती केली की, त्यांनी स्वः ईच्छेने आपल्या काही जमिनी भूमिहीन मजूरांना द्याव्या. त्यांच्या या कार्याला जमीनदार व भूधारक वर्गाकडून प्रतिसाद मिळाला. अनेक जमीनदार व भूधारक लोकांनी आपल्या जमिनी दान केल्या.

डिसेंबर १९५१ पर्यंत मध्य उत्तर भारतातील तीन लक्ष एकर जमीन विनोबांच्या हाती आली. त्याचबरोबर बिहार राज्यातून सुद्धा इ.स. १९५३ पर्यंत आठ लक्ष एकर जमीन त्यांना मिळाली. एवढेच नाही तर ४३.८१,८७१ एकर जमीन इ.स. १९५७ पर्यंत भूदान म्हणून विनोबांना मिळाली होती. परंतु १९५८ नंतर ही चळवळ ओसरली व अनेक भूधारकांनी आपल्या जमिनी परत घेतल्या.

Acharya Vinoba Bhave – आचार्य विनोबा भावे

ग्रामदान व ग्रामस्वराज्य चळवळ : भूदान चळवळीच्या अंतर्गत विनोबांनी ग्रामदान चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. इ.स. १९५७ पासूनच त्यांनी भूदान चळवळीच्या सोबतच ग्रामदान व ग्रामराज्य चळवळ सुरू केली होती. त्यामुळे भूदान चळवळीचे स्वरूप बदलले व त्याचे रूपांतर ग्रामदान व ग्रामराज्य चळवळीत झाले.

एखाद्या भूमिहीन मजुराला शेतजमीन देण्याऐवजी संपूर्ण खेडेगावास जमीन देण्याची नवी प्रथा या चळवळीच्या अंतर्गत सुरू झाली. या मागची प्रेरणा महात्मा गांधीजींची होती. या योजनेअंतर्गत जी जमीन मिळाली आहे त्या जमिनीवर एका व्यक्तीचा अधिकार नसून ती जमीन संपूर्ण गावाच्या मालकीची राहत असे.

त्या शेतजमिनीवर सर्वांनी मिळून काम करावे व जे उत्पन्न या शेतजमिनीतून मिळेल ते सर्वांनी समान वाटून घ्यावे अशी पद्धत रूढ झाली. या योजनेअंतर्गत इ.स. १९५६ पर्यंत मोठ्या भूधारकांनी जवळपास १२८४० खेडी ग्रामदान म्हणून दिली होती. या ग्रामदान चळवळीची सुरुवात ओरीसात झाली व ती यशस्वी सुद्धा झाली. इ.स. १९६० पर्यंत जवळपास ४५०० पेक्षा ग्रामदाने झालीत. त्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे –

१) ओरीसा-१९४६ एकर, २) महाराष्ट्र-६०३ एकर, ३) केरळ-५४३ एकर, ४) आंध्रप्रदेश-४८३ एकर, ५) मद्रास २५० एकर ज्या गावामध्ये जातिभेद व वर्णभेद नव्हता.

Acharya Vinoba Bhave – आचार्य विनोबा भावे

ज्या गावामध्ये शेतजमिनीच्या बाबतीत विषमता दिसून येत नव्हती, अशाच गावात ही चळवळ यशस्वी झाली. अशा प्रकारची परिस्थिती आदिवासी बहुल गावात राहत असते. म्हणूनच विनोबांनी मोठ्या बुद्धिचातुर्याने या योजनेकरिता अशाच गावाची निवड केली व ती यशस्वी सुद्धा करून दाखविली.

सर्वधर्मिय मंदिर प्रवेश चळवळी : साने गुरुजींच्या मंदिर प्रवेश सत्याग्रहानंतर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांकरिता खुले झाले होते. परंतु परधर्मियांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. मात्र विनोबांनी पंढरपूर येथे इ.स. १९५८ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सर्वोदय संमेलनाला येण्यापूर्वी आपण परधर्मियांसह विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत.

कारण कोणत्याच धर्मात असहिष्णुतेला महत्त्व नाही. मानवता हाच सर्वात मोठा धर्म आहे, अशी घोषणा करून परधर्मिय मंदिर प्रवेश चळवळ उभारली. परंतु पंढरपूरमधील पुराणमतवादी व सनातनी लोकांनी विनोबांच्या या चळवळीला विरोध केला. त्याच्या मते, परधर्मियांना मंदिरामध्ये प्रवेश दिला तर धर्म बुडेल, मंदिराचे पावित्र्य नष्ट होईल.

परंतु पुरोगामी विचाराच्या लोकांनी या चळवळीला पाठिंबा दिला. त्यामुळे विनोबांनी २९ मे १९५८ रोजी त्यांचे परधर्मिय सहकारी हेमा (जर्मन मुलगी) व फातिमा (मुस्लीम मुलगी) व इतर मंडळींनी विठ्ठल मंदिरात प्रवेश केला. या चळवळीने विनोबांनी अखिल मानव जगताला सहिष्णुतेची, समानतेची व एकतेची शिकवण दिली.

Acharya Vinoba Bhave – आचार्य विनोबा भावे

संविनय कायदेभंग चळवळ : ब्रिटिश सत्तेच्या विरोधात १९३० ला सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्यात आली होती. या चळवळीमध्ये विनोबांनी सक्रिय सहभाग घेतल्यामुळे त्यांना बंदी बनविण्यात आले. त्यांनी धुळे कारागृहात शिक्षा भोगली. सुप्रसिद्ध ‘गीताप्रवचने’ त्यांनी या कारागृहातच रचली.

शंभरापेक्षा अधिक सत्याग्रही कैदी आणि इतर गुन्ह्यांसाठी शिक्षा झालेले कैदी या प्रवचनांच्या रविवारच्या सभेत उपस्थित असत. त्यामध्ये शेठ जमनालाल बजाज, गुलाजारीलाल नंदा, अण्णासाहेब दास्ताने, साने गुरुजी इ. मंडळी उपस्थित असायची.

व्यक्तिगत सत्याग्रह : महात्मा गांधीच्या विचाराने व त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन विनोबांनी राजकीय स्वातंत्रता चळवळीत भाग घेतला. त्याकरिता त्यांना तुरूंगात सुद्धा जावे लागले. इ.स. १९४० ला मुंबईमध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरले होते.

या अधिवेशनात गांधीजींनी सरकार सोबत असहकार करण्याचा प्रस्ताव पारित करून घेतला व सर्वसम्मतीने विनोबांची पहिले सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आली. १७ ऑक्टोबर १९४० ला वैयक्तिक सत्याग्रहाचा प्रारंभ झाला. विनोबा भावे यांनी सामान्य जनतेला नवा विचार प्रदान केला की, सरकारला कुठल्याच प्रकारे सहकार्य करायचे नाही.

या विचाराला भारतीय जनतेने पूर्ण प्रतिसाद दिला. सरकार कोंडीत पडले. त्याच कारणाने सरकारने विनोबा भावेसह दुसरे सत्याग्रही पंडित जवाहरलाल नेहरू तसेच मौलाना अब्दुल कलाम आजाद, सरदार वल्लभभाई पटेल यांनाही अटक केली.

Acharya Vinoba Bhave – आचार्य विनोबा भावे

भारत-पाक फाळणी : इ.स. १९४८ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विनंतीवरून विनोबा दिल्लीला गेले. भारत-पाक फाळणीनंतर परागंदा झालेले लक्षावधी शरणार्थी दिल्ली, पंजाब, राजस्थानमध्ये आले होते. या लोकांना सर्वधर्मसमभावाचा उपदेश देऊन प्रेम आणि सद्भावना निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

आणीबाणी आणि विनोबा भावे : कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे विनोबांना धुळे येथील तुरूंगात काही काळ बंदी म्हणून ठेवण्यात आले होते. पण त्यांची लवकरच मुक्तता केली. कारागृहातून मुक्त झाल्यावर विनोबांनी पवनार येथे एक आश्रम सुरू केला. त्यानंतर येथूनच त्यांनी आपले कार्य निरंतर सुरू ठेवले.

२६ जून १९७५ रोजी भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी आणिबाणी लागू केली. त्यावेळी विनोबांनी त्याला आणीबाणी पर्व हे नाव दिले. या आणीबाणीच्या विरोधात लढा देणारे केशवरावजी यांना सरकारने अटक करून नाशिक येथे सेंट्रल जेलमध्ये स्थानबद्ध केले होते. याच जेलमधून त्यांनी विनोबांना अनेक पत्र पाठविलीत.

Acharya Vinoba Bhave – आचार्य विनोबा भावे

विनोबांचे शिक्षणविषयक विचार : विनोबा म्हणतात की, “ज्ञान व कर्म या दोन्ही गोष्टी कपड्यामध्ये जे उमे व आडवे तंतू असतात त्यासारखे असतात. दोन्हीना जर एकत्र गुंफले नाही तर कपडा हा तयारच होऊ शकत नाही. जर या दोन्हींना एकत्र विनले तर कपडा विनला जाऊ शकतो व जीवनाची चादर तयार होते पण आपल्या समाजामध्ये या दोन्ही धाग्यांना कोसोदूर ठेवले जाते.

एकाला श्रेष्ठ तर दुसऱ्याला कनिष्ठ समजले जाते. मग हे कापड कसे विनले जाणार? म्हणजेच बुद्धीवादी श्रेष्ठ आणि कर्मवादी कनिष्ठ असा भेदभाव समाजाला मारक आहे. सध्याची मुले विद्यार्थी असतात म्हणजे शिक्षण घेत असतात म्हणजेच ते काय करतात, तर ते कोणतेही कार्य करत नाही.

कुणाचीही सेवा करत नाही, फक्त पुस्तकी ज्ञान डोक्यात घालतात. पण हे सर्व ज्ञानाला जर सेवाभावाची जोड मिळाली नाही तर ते शून्य आहे. ही मुलं आपल्या दोन्ही हाताचा व दहा बोटांचा वापर करायला शिकत नाहीत. ती फक्त बोटांमध्ये पेन धरून कारकुनीकरण शिकतात. हे जर असेच सातत्याने सुरूच राहिले तर देशाची उत्पादकता व संपन्नता कशी वाढेल.

Acharya Vinoba Bhave – आचार्य विनोबा भावे

” विनोबा शिक्षणपद्धती कशी असावी याविषयी सांगतात की, “मी मुलांना सुट्टी देईन अणि म्हणेन जा, खेळा, पळा चांगले तगडे व्हा, शेतीचे काम करा, स्वराज्याचा आनंद उपभोगा. तोपर्यंत हिंदुस्थानातले शिक्षणतज्ज्ञ तुमच्यासाठी एक नवीन व उत्कृष्ट शिक्षणपद्धती तयार करतील.” विनोबा म्हणतात की, “सरकारने शिक्षणाला सरकारी हस्तक्षेपातून मुक्त करावे.

सरकारने शिक्षकांना पगार द्यावा, कारण ते त्यांचे कर्तव्य आहे. ज्याप्रमाणे न्यायविभाग स्वतंत्र आहे त्याचप्रमाणे शिक्षण विभाग सुद्धा सरकारपासून स्वतंत्र हवा, असे जर झाले नाही तर देशावर फार मोठे संकट ओढवले जाईल.

विनोबांची ग्रंथसंपदा : विनोबा उत्तम लेखकसुद्धा होते. त्यांनी ‘विचार पोथी’, ‘जीवनदृष्टी’, ‘रामनाम एक चिंतन’, ‘स्वराज्यशास्त्र’, ‘भागवत धर्मसार’, ‘कुराणसार’, ‘संतांचा प्रसाद’, ‘गीताई’, ‘अष्टादशी’, ‘ईशावास्यवृत्ती’, ‘उपनिषदांचा अभ्यास’, ‘गीताई-चिंतनिका’, ‘गुरूबोधसार’, ‘जीवनदृष्टी’, ‘मधुकर’, ‘मनुशासनम्’, ‘लोकनीती’, ‘साम्यसूत्रवृत्ति’, ‘साम्यसुत्रे’, ‘स्थितप्रज्ञ दर्शन’ इ. ग्रंथांचे लेखन केले.

तुरूंगात असताना विनोबांनी गीतेवर प्रवचने दिलीत. पुढे हीच प्रवचने साने गुरुजींनी ‘गीता प्रवचने’ या नावानी लिहून काढली. गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘गीताध्याय संगती’ लिहून काढला. त्याचबरोबर गांधीजींच्या एका पुस्तकाचा ‘अभंगव्रते’ हा काव्यात्मक अनुवादही त्यांनी लिहून काढला.

Acharya Vinoba Bhave – आचार्य विनोबा भावे

मृत्यू : ५ नोव्हेंबर १९८२ ला विनोबांना हृदयविकार उद्भवला होता. आचार्यांच्या निधनाची वार्ता भारतभर व जगभर सर्व प्रचारमाध्यमांतून विद्युत्‍वेगाने पसरली. या निधनाला कोणी महानिर्वाण म्‍हणाले, कोणी युगपुरूषाची समाधी म्‍हणाले. महात्‍मा गांधींच्या आध्यात्मिक परंपरेचे ते एक श्रेष्ठ वारसा होते. त्यांचे हे प्रायोपवेशनाचे तंत्र हिंदू धर्म, बौद्ध व विशेषतः जैन धर्म या तिन्ही धर्मांना प्राचीन कालापासून मान्य असलेले तंत्र आहे.

जैन धर्मात या तंत्रास ‘ सल्लेखना ‘ अशी संस्कृत संज्ञा आणि परंपरा ‘ संथारा ‘ ही प्राकृत संज्ञा आहे. हिंदु धर्मात यास ‘ प्रायोपवेशन ‘ म्हणतात. प्राय म्हणजे तप. तपाचा एक मुख्य अर्थ ‘ अनशन ‘ असा आहे. देहाचे दुर्घर व्याधी बरे होऊ शकत नाहीत, असे निश्चित झाल्यावर रूग्णाला जलप्रवेशाने, अग्‍निप्रवेशाने, भृगुपतनाने (उंच कड्यावरून उडी मारून), अनशनाने (अन्नपाणी वर्ज्य करून) किंवा अन्य कोणत्याही इष्ट मार्गाने देहविसर्जन करण्याची हिंदुधर्मशास्त्राने अनुमती दिली आहे.

ज्ञानदेवादी संतती योगमार्गाने देहत्याग केला आहे. हा योगमार्ग गुरूगम्यच आहे. त्याचे वर्णन गीतेच्या आठव्या अध्यायात केले आहे. तात्पर्य, प्रायोपवेशन किंवा योगशास्त्रातील देहत्यागाची युक्ती हिंदुधर्मशास्त्राने मान्य केली आहे. विनोबांनी प्रायोपवेशनाच्या द्वारे देहत्याग केला. अनेक जैन साधू आणि साध्वी स्त्रिया आजही प्रतिवर्षी अशा प्रकारे देहत्याग करीत असतात आणि त्याची वार्ता वृत्तपत्रांतही केव्हा केव्हा येते.

Acharya Vinoba Bhave – आचार्य विनोबा भावे

सुरुवातीला त्यांनी उपचार स्वीकारले. नंतर प्रायोपवेशनाला सुरुवात केली. सतत सात दिवसांच्या प्रायोपवेशनाने १४ नोव्हेंबर १९८२ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी प्राणत्याग केला. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना इ.स. १९८३ ला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. 

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज चरित्र

Leave a Comment