
अलंकार
दागिने किंवा अलंकार माणसाला शोभा देतात. त्याच्या सौदर्यात भर पडते. त्याप्रमाणे भाषेतही अलंकार असतात व त्यांचा योग्य त्या ठिकाणी वापर केल्यास भाषेच्या सौंदर्यातही भर पडते. भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते, अशा शब्दरचनेला अलंकार असे म्हणतात.
केव्हा दोन वस्तूंमधील साम्य दाखवून, तर केव्हा विरोध दाखवून, केव्हा नाद निर्माण करणारे शब्द वापरून, तर केव्हा एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर किंवा परिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो. केव्हा शब्दांतील अक्षररचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते, तर केव्हा योजिलेल्या शब्दांमुळे अर्थाचे सौदर्य खुलून दिसते. यामुळे भाषेच्या अलंकारांचे दोन प्रकार होतात :
- शब्दालंकार
- अर्थालंकार
Alankar – अलंकार
शब्दालंकार
अनेकदा शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळे काव्यात किंवा गद्यरचनेत सौंदर्य निर्माण होत असते. अशा अलंकारांना शब्दालंकार असे म्हणतात. शब्दालंकाराच्या जाती पुढीलप्रमाणे :
1. अनुप्रास :- |
एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो.
उदा:
पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणा-याचे हात हजारी दुबळी माझी झोळी
या वाक्यात प, ह आणि ळ ही अक्षरे पुनःपुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण होती, त्यामुळे या काव्यपंक्तीला शोभा आली आहे.
गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले,
शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले.
रजनीतल, ताम्रनील
स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटि नावांचा कृष्ण मेळ खेळ
Alankar – अलंकार
2. यमक अलंकार :- |
कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा अलंकार होतो.
उदा:
जाणावा ती ज्ञानी
पूर्ण समाधानी
नि:संदेह मनी
सर्वकाळ
अनुप्रासात जशी अक्षरांची पुनरावृत्ती असते तशी यमकातही असते. मात्र अनुप्रासात वर्णाची आवृत्ती कोठेही असू शकते, पण यमकात ही आवृत्ती ठराविक ठिकाणीच होत असते : चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी.
पुष्ययमक :
सुसंगति सदा घडो
सुजनवाक्य कानी पड़ो
कलंक मतीचा झडो
विषय सर्वथा नावडो
दामयमक :
आला वसंत कविकोकिल हाही आला
आलापितो सुचवितो अरुणोदयाला
Alankar – अलंकार
3. श्लेष अलंकार :- |
एकच शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरल्यामुळे जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष हा अलंकार होती. उदा :
सुनील : काय करतोस
अनिल : काय नाही, पडलोय
सुनील : पडलास ? लागलं का मग ?
या संवादात पडला या शब्दाच्या दोन अर्थानी दोघेही बोलत असल्यामुळे थोडी गंमत घडते. पडला या शब्दाचे दोन अर्थ होतात : निवांत पहुडलेले (निजलेले) असणे आणि दुसरा अर्थ म्हणजे कुठून तरी पडणे.
श्लेष म्हणजे अलिंगन किंवा मिठी. एकाच शब्दाला दोन अर्थाची मिठी बसलेली असते, म्हणजे दोन अर्थ चिकटलेले असतात. त्यामुळे एका शब्दाचे दोन अर्थ निघतात. श्लेष हा शब्दालंकार आहे व अर्थालंकार देखील आहे.
उदा :
सूर्य उगवला झाडीत…
झाडूवाली आली रस्ता झाडीत…
शिपाई आले गोळ्या झाडीत…
अन् बाघही आला तंगड्या झाडीत…
उपरोक्त वाक्यांमध्ये झाडीत या शब्दावर श्लेष करण्यात आलेला आहे. प्रत्येक वाक्यात झाडीत शब्दाला वेगवेगळा अर्थ आहे.
श्लेष हा शब्दालंकार आहे व अर्थालंकार देखील आहे.
शब्दश्लेष :
वाक्यात दोन अर्थ असणा-या शब्दाबद्दल दुस-या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष नाहीसा झाला, तर ती शब्दश्लेष होय.
उदा:
मित्राच्या उदयाने सर्वानाच आनंद होतो.
हे मेघा, तू सर्वाना जीवन देतोस
या वाक्यांमध्ये मित्र ऐवजी त्याच अर्थाचे दोस्त, सखा हे शब्द ठेवले, किंवा जीवन शब्दाऐवजी पाणी, जल हे शब्द ठेवले, तर त्यातील श्लेष नाहीसा होतो. म्हणून हा शब्दश्लेष होय
अर्थश्लेष :
वाक्यात दोन अर्थ असणा-या शब्दाबद्दल दुस-या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिल्यास त्यास अर्थश्लेष म्हणतात.
उदा:
तू मलिन, कुटिल, नीरस जडहि पुनर्भवपणेहि कच साच
या आर्येतील मलिन, कुटिल, नीरस, जड हे शब्द बदलून त्याच अर्थाने दुसरे शब्द वापरले, तरी श्लिष्ट अर्थ नाहीसा होत नाही.
Alankar – अलंकार
सभंग श्लेष :
शब्दाचे दोन अर्थ आहेत, हे लक्षात येण्यासाठी त्या त्या शब्दाची विशिष्ट प्रकारे फोड करावी लागत असेल तर या प्रकारच्या श्लेषाला सभंग श्लेष असे म्हणतात.
उदा:
1. श्रीकृष्ण नवरा मी नवरी….
शिशुपाल नवरा मी न -वरी
2. कुस्करु नका ही सुमने….
जरी वास नसे तिळ यांस, तरी तुम्हास अर्पिली ही सु-मने
3. चला ना गडे…
चला नागडे
अभंग श्लेष :
शब्द जसाच्या तसा ठेऊन त्याचे जेव्हा दोन अर्थ संभवतात, त्यास अभंग श्लेष म्हणतात.
उदा:
ते शीतलीपचारे जागी झाली हळूच मग बोले |
औषध नलगे मजला, परिसुनी माता बरे म्हणुनि डोले ||
अर्थालंकार
अनेकदा शब्दांच्या अर्थामुळे काव्यात किंवा गद्यरचनेत सौंदर्य निर्माण होत असते. अर्थालंकाराच्या संदर्भात आपल्या एक गोष्ट लक्षात येते की, आपल्याला जे सांगावयाचे आहे, ते प्रभावी रीतीने सांगण्यासाठी त्याच्यासारख्याच दुस-या गोष्टीची आपण मदत घेती. त्याची तुलना करती.
अर्थालंकाराच्या दृष्टीने पुढील संकल्पना महलाच्या आहेत :
अ) उपमेय : ज्याची तुलना करावयाची आहे, ते किंवा ज्याचे वर्णन करावयाचे आहे, तो घटक
ब) उमपान : ज्याच्याशी तुलना करावयाची आहे, किंवा ज्याची उपमा दिली जाते, तो घटक
क) साधारणधर्म: दोन वस्तूंत असणारा सारखेपणा किंवा दोन वस्तूंतील समान गुणधर्म
ड) साम्यवाचक शब्द: वरील सारखेपणा दाखविण्यासाठी वापरला जाणारा शब्द
Alankar – अलंकार
अर्थालंकाराचे प्रकार :
1. उमपा :- |
दोन वस्तूंतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जेथे दाखविलेले असते, तेथे उपमा हा अलंकार होतो. उपमेत एक वस्तू दुस-यासारखी आहे, असे वर्णन असते.
उदा:
1. मुंबईची घरे मात्र लहान… कबुतराच्या खुराड्यासारखी …
2. सावळाच रंग तुझा पावसाळि नभापरी
3. आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे
सामान्यतः उपमा अलंकारात सारखा, जसा, जेवि, सम, सदृश, गत, परी, समान यांसारखे साम्यवाचक शब्द येतात.
2. उत्पेक्षा :- |
उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो, त्यांतील एक (उपमेय) ही जणू काही दुसरी वस्तू (उपमान) च आहे, अशी कल्पना करणे, याला उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात.
उदा:
1. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू…
2. किती माझा कोंबडा मजेदार | मान त्याची किती बाकदार |
शिरोभागी तांबडा तुरा हाले | जणू जास्वंदी फूल उमललेले ||
अर्धपायी पांढरीशी विजारा | गमे विहगांतिल बडा फौजदार ||
उपमेय हे जणू उपमानच आहे, असे जेथे वर्णिलेले असते, तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो.
उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकाय, गमे, वाटे, भासे, की यांसारखे साम्यवाचक शब्द येतात.
Alankar – अलंकार
3. रुपक :- |
उपमेय व उपमान यांच्यात एकरुपता आहे, ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असते, तेथे रुपक हा अलंकार असतो.
उदा:
बाई काय सांगी। स्वामीची ती दृष्टी ।
अमृताची दृष्टी । मज होय ।।
(स्वामींची दृष्टी व अमृताची वृष्टी ही दोन्ही एकरुपच मानली आहेत)
ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाहे रमा ।
दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी ॥
( येथे मुख (उपमेय) व चंद्र (उपमान) ही एकरूप मानून मुखचंद्रमा असा शब्दप्रयोग केला आहे)
लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा तशी मूर्ती घडते.
येथे लहान मूल हे मातीच्या गोळ्यासारखे असते असे म्हणत उपमेय व उपमान यांच्यातील केवळ सादृश्य न दाखविता त्यांच्यातील अभेद वर्णिलेला आहे.
- उपमेत एक वस्तू दुस-यासारखी आहे (सादृश्य) आहे असे वर्णन असते.
- उपमेच्या थोडे पुढे जाऊन उत्प्रेक्षेत त्या दोन वस्तू जवळजवळ सारख्या (एकत्व) असल्याची कल्पना केलेली असते.
- रुपकात आणखी थोडे पुढे जाऊन त्या दोन वस्तू म्हणजे उपमेय व उपमान या एकरूप असल्याचे स्पष्टपणाने सांगितलेले असते. उत्प्रक्षेप्रमाणे त्यात गुळमुळीतपणा नसतो.
Alankar – अलंकार
4. अनन्वय :- |
उपमेय हे केव्हा केव्हा एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असे उपमान मिळू शकत नाही. उपमेयाची तुलना उपमेयाशीच करावी लागते.
उपमेयाला दुस-या कशाचीच उपमा देत येत नसेल म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, तेव्हा अनन्वय अलंकार होती. अन्वय म्हणजे तुलना अनन्वय म्हणजे तुलना नसणे. ज्या वाक्यात तुलना करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, ती अनन्वय.
उदा:
1. झाले बहु… होतिल बहु… आहेतहि बहु… परि यासम हा
2. आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी
3. कर्णासारखा दानशूर कर्णच…
5. अपन्हुती :- |
अपन्हुती म्हणजे झाकणे किंवा लपवणे. उपमान हे उपमेयाचा निषेध करुन ते उपमानच आहे. असे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा अपन्हुती अलंकार होती.
उदा:
1. न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिला |
न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ ||
2. ओठ कशाचे…. ..देठचि फुलल्या पारिजातकाचे
3. मानेला उचलिती, बाळ मानेला उचलितो |
नाही ग बाई, फणा काढुनि नाग हा डोलती ||
Alankar – अलंकार
6. व्यतिरेक :- |
व्यतिरेक म्हणजे अधिक्य, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, असे वर्णन केलेले असेल तर व्यतिरेक हा अलंकार होतो. उपमेयाचे उपमानावर अधिक्य हे अधिक्य दोन प्रकारांनी दाखविता येते.
उपमेयाच्या उत्कर्षाने
उपमानाच्या अपकर्षाने
उदा:
1. तू माउलीहून मयाळ | चंद्राहूनि शीतळ
पाणियाहूनि पातळ |कल्लोळ प्रेमाचा |
2. सावळा ग रामचंद्र | रत्नमंचकी झोपतो |
त्याला पाहता लाजून | चंद्र आभाळी लोपतो |
3. कामधेनूच्या दुग्धाहूनिही ओज हिचे बलवान
7. भ्रांतिमान :- |
उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर तेथे भ्रांतिमान अलंकार असतो. कवी ज्याचे वर्णन करत आहे. त्या पात्राच्या मनात निर्माण झालेला भ्रम दाखविण्यासाठी त्याची भ्रांतिमान अलंकार वापरला जातो.
उदा:
1. हंसा विलोकुनि सुधाकर अष्टमीचा ।
म्यां मानिला निटिलदेश तिचाच साचा ।
शंख-द्वयी धरुनि कुंकुम कीरवाणी ।
लावावया तिलक लांबविला स्वपाणि ।
(अष्टमीचा चंद्र हा दमयंतीचा भालप्रदेश असावा, अशी समजूत करून घेऊन तिच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावण्यासाठी नळ राजाने आपला हात लांब केला )
2. भृंगे विराजित नवीं अरविंदपत्रे ।
पाहूनि मानुनि तिचीच विशाल नेत्रे ।
घालीन अंजन अशा मतिनें तटाकी ।
कांते वृथा उतरलो, भिजली विलोकी ।
(भुंग्यांनी सुशोभित झालेली कमलपत्रे हे दमयंतीचे नेत्रच आहेत, असे समजून तिच्या डोळ्यांत अंजन घालावयास नलराजा पुढे सरसावला व पाण्यामुळे भिजला)
Alankar – अलंकार
8. ससंदेह :- |
भ्रान्तिमान अलंकारात उपमान हे उपमेय आहे असा जी भ्रम होती, ती निश्चित असतो पण उपमेय कोणते व उपमान कोणते असा संदेह किंवा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधा अवस्था होते, त्यावेळी ससंदेह हा अलंकार असतो. म्हणजे हा का तो असा गोंधळ असतो.
उदा:
चांदण्या रात्री गच्चीवर पत्नीच्या मुखाकडे पाहताना प्रियकराला वाटले :
कोणता मानू चंद्रमा ? भूवरीचा की नभीचा ?
चंद्र कोणता ? वदन कोणते ?
शशांक-मुख की मुख-शशांक ते ?
निवडतील निवडीत जाणते
मानी परि मन सुखद संभमा-मानू चंद्रमा, कोणता ?
9. अतिशयोक्ती :- |
कोणतीही कल्पना आहे त्याच्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करुन सांगितलेली असते. त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार होतो.
उदा:
दमडीच तेल आणलं….सासूबाईंच न्हाणं झालं…
मामंजीची दाढी झाली… भावोजींची शेंडी झाली…
उरलं तेल झाकून ठेवल.. लांडोरीचा पाय लागला…
वेशीपर्यंत ओघळ गेला…त्यात उंट पोहून गेला…
यात असंभाव्यतेची परिसीमा असते. असंभाव्य किंवा अशक्य गोष्टी शक्य झाल्याचे वर्णन जेथे असते, तेथे अतिशयोक्ति हा अलंकार होतो.
Alankar – अलंकार
10. दृष्टान्त :- |
एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टान्त अलंकार होती.
उदा:
लहानपण देगा देवा ।
मुंगी साखरेचा रवा ।
ऐरावत रत्न थोर ।
त्यासी अंकुशाचा मार ।
उपमेमध्ये सादृश्य दाखविताना जसे, जेवी, सम, सारखा असे शब्द येतात, मात्र दृष्टान्तात सादृश्य दाखविणारे साम्यवाचक शब्द नसतात. हा या दोन अलंकारांतील फरक आहे.
न कळता पद अग्निवरी पडे ।
न करि दाह असे न कधी घडे ।
अजित नाम वदो भलत्या मिसे ।
सकल पातक भस्म करीतसे ।
11. अर्थान्तरन्यास :- |
एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणांवरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला, तर अर्थान्तरन्यास हा अलंकार होती. अर्थान्तर म्हणजे दुसरा अर्थ. न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. अशा प्रकारे एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे, असा या अलंकाराचा अर्थ आहे.
उदा:
बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल ।
श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ ।।
Alankar – अलंकार
12. स्वभावीक्ती :- |
एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालींचे यथार्थ (हुबेहूब) पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन जेव्हा केलेले असते, तेव्हा त्यास स्वभावोक्ती अलंकार म्हणतात.
उदा:
मातीत ते पसरले अतिरम्य पंख ।
केले वरी उदर पांडुर निष्कलंक । ।
चंचू तशीच उघडी पद लांबविले ।
निष्प्राण देह पडला श्रमही निमाले । ।
गणपत वाणी विडी पिताना…. चावायाचा नुसताच काडी…
म्हणायचा अन् मनाशीच की… या जागेवर बांधित माडी…
मिचकावुनी मग उजवा डोळा… आणि उडवुनि डावी भिवई..
भिरकावुनि ती तशिच द्यायचा… लकेर बेचव जैशी गवई..
13. अन्योक्ती :- |
अन्योक्ती म्हणजे अन्य व्यक्तीला उद्देशून बोलणे. कित्येक वेळा एखाद्या व्यक्तीला स्पष्टपणे बोलता येत नाही. अशा वेळी ज्याच्याबद्दल बोलायचे, त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुस याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत असते, तिलाच अन्योक्ती असे म्हणतात. अर्थात, लेकी बोले सुने लागे अशा प्रकारची पध्दत असते.
उदा:
येथे समस्त बहिरे लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक
हे मूर्ख यांस किमपीही नसे विवेक
रंगावरून तुजला गणतील काक
14. पर्यायोक्त :- |
एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने किंवा आडवळणाने सांगणे, यास पर्यायोक्त असे म्हणतात.
उदा:
1. त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत..
2. काळाने त्याला आमच्यातून हिरावून नेले.
3. माझ्या उत्तरपत्रिकेवर खूष होऊन परीक्षकांनी मला वन्समोअर दिला आहे.
Alankar – अलंकार
15. विरोधाभास :- |
एखाद्या विधानावर वरवर दिसायला विरोध आहे, असे वाटते, पण वास्तविक तसा विरोध नसतो, अशा ठिकाणी विरोधाभास हा अलंकार असतो.
उदा:
1. वियोगार्थ मीलन हाते नेम हा जगाचा
2. जरी आंधळी मी तुला पाहते.
3. स्वतःसाठी जगलास तर मेलास… दुस-यासाठी जगलास तरच जगलास
4. सर्वच लोक बोलू लागले की कोणीच ऐकत नाही.
16. सार :- |
एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधलेला असतो, तेव्हा सार हा अलंकार असतो.
उदा :
आधीच मर्कट तशातही मद्य प्याला..
झाला तशात जरि वृश्चिक दंश त्याला..
झाली तयास तदनंतर भूतबाधा…
चेष्टा वढू मग किती कपिच्या अगाधा..
17. चेतनगुणीक्ती :- |
निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत, अशी कल्पना करून ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात, असे जेथे वर्णन असते, तेथे चेतनगुणोक्ती हा अलंकार होतो.
उदा :
कुटुंबवत्सल इथे फणस हा
कटिखांद्यावर घेऊनि बाळे
कथिते त्याला कुशल मुलांचे
गंगाजळिचे बेत आगळे
Alankar – अलंकार
18. व्याजस्तुती :- |
बाह्यतः स्तुती पण आतून निंदा किंवा बाह्यतः निंदा पण आतून स्तुती असे जेथे वर्णन असते, तेथे व्याजस्तुती हा अलंकार होती.
उदा:
काय विद्वान आहेस रे तू !
केवढा उदार रे तू !
19. व्याजोक्ती :- |
एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा जेथे प्रयत्न केला जातो, तेथे व्याजोक्ती हा अलंकार होती.
उदा:
1. येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे ‘डोळ्यांत काय गेले हे ?” म्हणूनी नयना पुसे
2. ‘काय गे बघशी मागे वळूनि अशी ?” विचारिता म्हणे, ‘माझी राहिली पिशवी कशी ?”
Sugam Marathi Vyakaran (M R Walambe)
समानार्थी शब्द – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा
विभक्ती – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा
क्रियापद – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नाम – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा
इतिहास – वाचण्यासाठी येथे क्लिक करा