गहू, तांदूळ, डाळी, कडधान्ये यांसारख्या धान्यांची आपल्याला सतत गरज भासते; परंतु त्यांची पिके वर्षाकाठी ठरावीक काळातच येतात. हे पदार्थ नेहमी उपलब्ध होण्यासाठी एका हंगामाचे पीक पुढील हंगाम येईपर्यंत वर्षभर पुरवावे लागते व ते सुरक्षित ठेवण्याची गरज असते.
विविध अन्नपदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध होतात. तेथून दूर असलेल्या लोकांपर्यंत ते सुस्थितीत पोचवावे लागतात. उदाहरणार्थ, दूध, दुधाचे पदार्थ व अंडी हे दुग्धव्यवसाय केंद्र, कुक्कुटपालन केंद्र यांपासून लोकांना मिळेपर्यंत टिकून राहण्याची सोय करावी लागते.
वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी फळे आणि भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. त्यांच्या नैसर्गिक हंगामात त्यांचा स्वादही सर्वोत्तम असतो. मोठ्या प्रमाणावर आलेली फळे व भाज्या वाया जाऊ नयेत तसेच वर्षभर त्यांचा आस्वाद घेता यावा, यासाठी आपण ती टिकवण्याचा प्रयत्न करतो. घरोघरी अनेक प्रकारचे पापड-कुरडया, मुरांबे लोणची, कांदा, मासळी, मसाले इत्यादी चविष्ट पदार्थ वर्षभरासाठी टिकवून ठेवले जातात.
हल्ली हे पदार्थ विकतही मिळतात. स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठी पुन्हा पुन्हा बाजारात जावे लागू नये, म्हणून आपण बरेच दिवसांसाठीचे सामान आणून घरात साठवतो. दुपारच्या जेवणासाठी तयार केलेले अन्न उरले, तर ते संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशीही खाता यावे यासाठीही अन्न टिकवण्याच्या काही पद्धती वापरतो.
काय आढळून येते?
डब्यात बंद केलेल्या चपातीच्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे किंवा काळे / हिरवे तंतू वाढू लागतात व त्याला वास येऊ लागतो. याउलट फ्रिजमध्ये ठेवलेला तसेच पुन्हा भाजून, थंड करून ठेवलेला तुकडा बरेच दिवस खराब होत नाही.
असे का होते?
चपातीच्या तुकड्यावर वाढणारे कापसासारखे तंतू म्हणजे एक प्रकारची बुरशी असते. बुरशी हा सूक्ष्मजीवांचा एक प्रकार आहे.
बुरशीचे बीजाणू हवेत किंवा पाण्यात असतात. डब्यातील चपातीच्या तुकड्यामुळे बुरशीच्या वाढीसाठी लागणारे पोषक वातावरण म्हणजे अन्न, पाणी तसेच हवा आणि ऊबही मिळते. म्हणूनच डब्यातील चपातीच्या तुकड्यावर बुरशी वाढली.
अन्न आणि सूक्ष्मजीव
आपल्या सभोवती हवेत, पाण्यात सगळीकडे सूक्ष्मजीव असतात हे तुम्हांला माहीत आहे. सर्वसाधारण परिस्थितीत अन्नपदार्थांच्या बरोबर ऊब, पाणी आणि हवा या सर्व गोष्टी उपलब्ध असतात, म्हणजे आपल्या अन्नात किंवा अन्नपदार्थात सूक्ष्मजीवांची वाढ भरभर होणे नेहमीच शक्य असते. ते आपल्याला दिसत नाहीत; परंतु सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की अन्न खराब होते. असे अन्न खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब, उलट्या होऊ शकतात. अशा अन्नाचे पोषणमूल्य कमी झालेले असते. काही वेळेला प्रकृतीला धोका होऊ शकतो.
अन्न टिकवण्याच्या पद्धती
वाळवणे
आपण पदार्थ वाळवतो तेव्हा त्यातील पाणी निघून जाते. पापड, कुरडया, सांडगे, गहू, डाळी असे पदार्थ वाळवून टिकवले जातात.
थंड करणे अन्न फ्रिजमध्ये ठेवतो तेव्हा सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी लागणारी ऊब त्यांना मिळत नाही. उकळणे पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो.
हवाबंद डब्यात ठेवणे
हवाबंद डब्यात पदार्थ ठेवताना त्यातील सूक्ष्मजीवांचा आधी नाश केला जातो. त्यानंतर त्यात हवा, पाणी शिरणार नाही याची ‘काळजी घेतली जाते. याचा अर्थ असा की, अन्नपदार्थ टिकवण्यासाठी त्यांतील सूक्ष्मजीवांचा नाश करावा लागतो. अन्नपदार्थात सूक्ष्मजीवांची वाढ होऊ शकणार नाही अशा परिस्थितीत ते ठेवावे लागतात.
आपल्या जेवणातील पदार्थाच्या चवीमधील विविधता ही मसाल्यांमुळे असते. मसाल्याच्या प्रत्येक पदार्थाची चव वेगळी असते. मसाल्याची चव व वास उम्र असतो म्हणून ते थोड्या प्रमाणात वापरले जातात. मसाल्याचे पदार्थ वाळवून खूप दिवसांसाठी साठवता येतात. त्यांच्या मिश्रणाची पूड करून मसाले तयार करता येतात. विविध मसाले विविध वनस्पतींच्या ठरावीक भागांपासून मिळतात.