लोकमान्य टिळकांचे १९२० साली निधन झाले आणि महात्मा गांधी यांच्याकडे स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व आले.
सत्याग्रहाचा नवा मार्ग : दक्षिण आफ्रिकेत ब्रिटिशांची सत्ता होती. भारतातील काही लोक तेथे स्थायिक झाले होते. त्यांच्यावर आणि तेथील कृष्णवर्णीय लोकांवर ब्रिटिश राज्यकर्ते अन्याय व जुलूम करत होते. गांधीजी वकिली व्यवसाय करण्याच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेत गेले होते. तेथे त्यांनी भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी त्यांना संघटित केले.
त्यासाठी त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब केला. सत्याग्रह म्हणजे जुलमाचा अहिंसक मार्गाने केलेला प्रतिकार अन्याय करणाऱ्या व्यक्तीचे मतपरिवर्तन करणे, यावर सत्याग्रहाचा भर होता. सत्याग्रहाच्या मार्गाने दक्षिण आफ्रिकेतील लोकांना गांधीजींनी न्याय मिळवून दिला. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून १९१५ साली भारतात परत आले.
ब्रिटिश राजवटीत भारतीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने चळवळ चालवण्याचे ठरवले. गांधीजींनी प्रथम बिहारमधील चंपारण्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले. तेथील शेतकऱ्यांना नीळ पिकवण्याची सक्ती ब्रिटिश मळेवाले करत असत.
या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रह केला. ब्रिटिश मळेवाल्यांच्या त्रासातून शेतकऱ्यांची सुटका झाली. गुजरातमधील खेडा जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. तरीही ब्रिटिश सरकार शेतसारा सक्तीने वसूल करत होते. गांधीजींच्या प्रोत्साहनाने शेतकऱ्यांनी या अन्यायाविरुद्ध सत्याग्रहाच्या मार्गाने लढा चालवला. अखेरीस सरकारने शेतसारा माफ केला.
रौलट कायदा : ब्रिटिश सरकारने भारतीयांना सुधारणा कायदयाने काही हक्क दिले, पण त्याचवेळी भारतीयांना दडपून टाकण्यासाठी कायदयाचा बडगा उगारला. त्यासाठी सरकारने ‘रौलट कायदा’ केला. हा कायदा अत्यंत जुलमी स्वरूपाचा होता.
चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचा अधिकार या कायदयाने सरकारला देण्यात आला. याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली. या कायदयाच्या निषेधार्थ गांधीजींच्या आवाहनानुसार देशभर हरताळ पाळण्यात आला. हे आंदोलन सरकारने दडपून टाकण्याचा प्रयत्न केला.
जालियनवाला बाग हत्याकांड : अमृतसर येथे हरताळ केल्यामुळे डॉ. सत्यपाल आणि डॉ. सैफुद्दीन किचलू या दोन नेत्यांना सरकारने हद्दपार केले. या हद्दपारीच्या निषेधार्थ अमृतसर येथील जालियनवाला बागेत एक मोठी सभा भरली होती. त्या वेळी जनरल डायर या लष्करी अधिकाऱ्याने आपल्या सैन्याला गोळीबार करण्याचा आदेश दिला.
गोळीबारात चारशेपेक्षा जास्त लोक ठार झाले व हजारो जखमी झाले. या घटनेनंतर पंजाबमध्ये ब्रिटिशांनी भयंकर अत्याचार सुरू केले. या अत्याचाराच्या बातम्या वणव्यासारख्या देशभर पसरल्या. त्यामुळे सगळीकडे संतापाची लाट उसळली. या अत्याचाराचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेला ‘सर’ हा बहुमानाचा किताब सरकारला परत केला.
खिलाफत चळवळ : तुर्कस्तानच्या सुलतानास ‘खलीफा’ म्हणत. जगातील सर्व मुस्लिम त्याला आपला धर्मप्रमुख मानत असत. तुर्कस्तानने इंग्लंडच्या विरुद्ध पहिल्या महायुद्धात भाग घेतला. भारतातील मुस्लिमांचे युद्धात सहकार्य मिळवण्यासाठी खलीफाच्या सत्तेला आपण धक्का लावणार नाही. असे आश्वासन ब्रिटिशांनी भारतीय मुस्लिमांना दिले होते, मात्र दिलेले आश्वासन इंग्रजांनी पाळले नाही.
युद्ध संपताच त्यांनी तुर्की साम्राज्याचे तुकडे केले आणि त्याचे काही भाग आपल्या ताब्यात घेतले. यामुळे भारतातील मुस्लिम संतापले. इंग्रजांच्या विरोधात खलीफाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी जी चळवळ सुरू केली तिला ‘खिलाफत चळवळ’ असे म्हणतात. राष्ट्रीय सभेने या चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. याला प्रतिसाद म्हणून खिलाफत चळवळीच्या नेत्यांनी असहकार चळवळीला पाठिंबा दिला.
असहकार चळवळ : ब्रिटिशांशी असहकार केला, तर ब्रिटिश एक दिवसही राज्यकारभार चालवू शकणार नाहीत, असे गांधीजींचे मत होते. त्यासाठी राष्ट्रीय सभेने असहकाराचा कार्यक्रम मंजूर केला. ब्रिटिश सरकारने दिलेल्या पदव्या, मानसन्मान नाकारायचे, सरकारी शाळा महाविद्यालयांमध्ये जायचे नाही.
परदेशी मालावर बहिष्कार घालायचा, वकिलांनी सरकारी न्यायालयातील कामावर बहिष्कार टाकायचा, असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. असहकार आंदोलनाबरोबरच गांधीजींनी अस्पृश्यता नष्ट करणे, हिंदूमुस्लिम ऐक्य घडवून आणणे, दारूबंदी असा विधायक कार्यक्रम हाती घेतला.
असहकार चळवळीला देशभर प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांतून नावे काढली व राष्ट्रीय शाळांमध्ये प्रवेश घेतला. अनेकांनी वकिली करण्याचे नाकारले. लोकांनी परदेशी कापडाच्या होळ्या केल्या. डॉ. राजेंद्रप्रसाद, वल्लभभाई पटेल इत्यादी नेत्यांनी या चळवळीत भाग घेतला. या चळवळीत स्त्रियांचा सक्रिय सहभाग होता.
असहकार चळवळीचा जोर जसजसा वाढत गेला तसतशी सरकारची दडपशाही वाढत गेली. उत्तर प्रदेशातील चौरीचौरा येथे सत्याग्रहींनी शांततापूर्ण मिरवणूक काढली. या मिरवणुकीवर पोलिसांनी लाठीहल्ला केला, म्हणून चिडून आंदोलकांनी पोलीस चौकीला आग लावली. या आगीत काही पोलीस मृत्युमुखी पडले.
असहकार चळवळीला हिंसक वळण लागणे गांधीजींना मान्य नव्हते, म्हणून त्यांनी ही चळवळ थांबवली. तरीही सरकारने गांधीजींना अटक केली. असहकार चळवळ थांबली, तरी देशात अनेक ठिकाणी सत्याग्रहाच्या घटना घडत होत्या. अशा सत्याग्रहांना सरकार दाद देत नव्हते.
म्हणून मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास इत्यादी नेत्यांना कायदेमंडळात निवडून जावे व तेथे सरकारच्या दडपशाहीला विरोध करावा असे वाटले. यासाठी त्यांनी ‘स्वराज्य पक्ष’ स्थापन केला. त्यांनी कायदेमंडळात सरकारच्या अन्याय्य धोरणांना विरोध केला.
सायमन कमिशन : ब्रिटिशांनी भारतास दिलेल्या सुधारणांची अंमलबजावणी कितपत झाली, हे पाहण्यासाठी इंग्लंडहून एक समिती भारतात आली. सर जॉन सायमन हे या समितीचे अध्यक्ष होते, म्हणून या समितीला सायमन कमिशन’ असे म्हणतात. या समितीत एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता, त्यामुळे राष्ट्रीय सभेने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला.
देशभर या कमिशनला काळे झेंडे दाखवून त्याचा निषेध करण्यात आला. जेथे जेथे सायमन कमिशन गेले, त्या त्या ठिकाणी ‘सायमन परत जा’ अशा घोषणा देण्यात आल्या. लाहोर येथे सायमन कमिशनविरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपतराय यांनी केले. त्या वेळी पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. पुढे त्यातच त्यांचा अंत झाला.