दुसरे महायुद्ध १९४५ साली समाप्त झाले. या युद्धात इंग्लंडला विजय मिळाला. त्यात इंग्लंडचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेला राष्ट्रव्यापी लढा, क्रांतिकारकांनी केलेल्या सशस्त्र चळवळी, आझाद हिंद सेनेने दिलेला सशस्त्र लढा या घटनांमुळे भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा होऊ लागला, म्हणून भारताचा कारभार भारतीयांच्या हाती सोपवण्याचे ब्रिटिशांनी ठरवले. त्यासाठी त्यांनी भारतीय नेत्यांशी बोलणी सुरू केली.
१८ जुलै १९४७ रोजी ब्रिटिश संसदेने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मंजूर केला. या कायदयाने भारताचे विभाजन होऊन भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली.१५ ऑगस्ट १९४७ हा भारताला स्वातंत्र्य देण्याचा दिवस ठरला.
१४ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर दिल्ली येथे ब्रिटिशांचा ‘युनियन जॅक’ हा ध्वज खाली उतरवण्यात आला आणि त्या जागी स्वतंत्र भारताचा तिरंगी ध्वज फडकावण्यात आला. ब्रिटिशांच्या दास्यातून भारत स्वतंत्र झाला. लक्षावधी भारतीयांच्या असीम त्यागाची ही फलश्रुती होती.
या ऐतिहासिक प्रसंगाच्या वेळी स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या भाषणात म्हणाले, “अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता. आज त्याची पूर्ती. बऱ्याच अंशाने आपण करत आहोत. मध्यरात्रीच्या शांत वेळी सारे जग झोपले असताना भारत स्वातंत्र्याच्या नव्या युगात जन्म घेत आहे.”
संस्थानी प्रजेचा मुक्तिलढा : भारत स्वतंत्र झाला, तरीही भारतीय जनतेचा स्वातंत्र्यलढा संपला नव्हता. ब्रिटिश राजवटीत अनेक लहानमोठी संस्थाने होती. काही संस्थानिक आपल्या प्रजेवर अन्याय, जुलूम करत असत.
त्याविरुद्ध संस्थानी प्रजेने चळवळ सुरू केली होती. संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन व्हावीत, अशी संस्थानी प्रजेची इच्छा होती. स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची कणखर भूमिका व मुत्सद्देगिरी यांमुळे बहुतेक संस्थाने भारतात विलीन झाली.
पाकिस्तानच्या फौजांनी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यास सुरुवात केली. त्या वेळी काश्मीर भारतात विलीन झाले. जुनागढच्या प्रजेने भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला.
हैदराबाद मुक्तिलढा : हैदराबाद हे भारतातील सर्वांत मोठे संस्थान होते. या संस्थानच्या संस्थानिकाला निजाम असे म्हणत. त्याने प्रजेवरअत्याचार केले. निजामाच्या अनियंत्रित राजवटीविरुद्ध प्रजेने प्रखर लढा दिला. या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ इत्यादींनी केले.
‘हैदराबाद स्टेट काँग्रेस’ या संघटनेच्या वतीने चळवळ सुरू करण्यात आली. त्यात शेकडो विदयार्थी सहभागी झाले. आशाताई वाघमारे, सुशीलाबाई दिवाण, कावेरीबाई बोधनकर, सरस्वती बोरीकर इत्यादी स्त्रियांचाही या लढ्यात सहभाग होता.
संस्थानी प्रजेने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे,अशी मागणी केली, परंतु निजाम आपले संस्थान स्वतंत्र ठेवावे, अशाविचाराचा होता. स्वतंत्र भारत सरकारला त्याने उद्दामपणे आव्हान दिले.त्या वेळी भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई केली. १७सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. संस्थानी प्रजेने दिलेला लढा यशस्वी झाला.
फ्रेंच वसाहतींचे विलीनीकरण : भारतातील ब्रिटिश सत्तेचा शेवट झाला, तरी भारताचे काही भाग अद्यापही विदेशी सत्तांच्या ताब्यात होते. चंद्रनगर, पाँडिचेरी, कारिकल, माहे, याणम या प्रदेशांवर फ्रान्सची सत्ता होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फ्रेंच सरकारने भारत सरकारशी बोलणी केली व आपल्या ताब्यातील प्रदेश भारताच्या स्वाधीन केले.
गोवा मुक्तिलढा : गोवा, दीव व दमण, दादरा आणि नगर हवेली या प्रदेशांवर पोर्तुगिजांची सत्ता होती. तो प्रदेश मुक्त करण्यासाठी भारतीय जनतेला लढा दयावा लागला. या लढ्यात डॉ. टी. बी. कुन्हा हे आघाडीवर होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातील पोर्तुगीज सत्ता संपुष्टात आणण्यासाठी निकराचे प्रयत्न करण्यात आले.
गोवा मुक्तिलढ्यात डॉ. राममनोहर लोहिया, नानासाहेब गोरे, हिरवेगुरुजी, सेनापती बापट, मधु लिमये, सुधीर फडके, मोहन रानडे, सुधाताई जोशी, सिंधुताई देशपांडे इत्यादी नेते आघाडीवर होते. महाराष्ट्रातून गोवा मुक्ती समितीच्या अनेक सत्याग्रहींची पथके गोव्यात शिरली.
पोर्तुगिजांनी त्यांना दडपून टाकण्याचा प्रयत्न केला; परंतु सत्याग्रहींनी आपला लढा चालूच ठेवला. अखेरीस भारतीय लष्कराने १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त केला. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा हा इतिहास अतिशय प्रेरणादायी आहे.
हा संग्राम जुलूम व अन्यायाविरुद्ध होता. पाश्चात्त्य साम्राज्यवादाच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी होता. आपल्या स्वातंत्र्यलढ्याने जगातील अनेक देशांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. आपली मातृभूमी परकीयांच्या वर्चस्वापासून स्वतंत्र करण्यासाठी
अनेक देशबांधवांनी त्याग केला. स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा आणि स्त्री पुरुष समानतेचा अनमोल वारसा आपल्याला स्वातंत्र्यलढ्यातून मिळाला आहे. तो जतन करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे.