कला म्हणजे काय ?
स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच मनातील भावभावना इतरांपर्यंत पोचवाव्या, ही प्रत्येक व्यक्तीची सहजप्रवृत्ती असते. या सहजप्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते, तेव्हा तिला कला असे म्हटले जाते. कलानिर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात.
दृक्कला आणि ललित कला : ‘दृक्कला’ आणि ‘ललित कला’ अशी कलाप्रकारांची विभागणी केली जाते. ललित कलांना आंगिक कला असेही म्हटले जाते. दृक्कलांचा उगम प्रागैतिहासिक काळातच झाला, हे दर्शवणारे अनेक कला नमुने जगभरातील अश्मयुगीन गुहांमधून प्राप्त झालेले आहेत. लोककला आणि अभिजात कला कलेच्या ‘लोककला’ आणि ‘अभिजात कला’ अशा दोन परंपरा मानल्या जातात.
‘लोककला’ ही एक अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे चालत आलेली परंपरा आहे. तिचा आविष्कार हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो. त्यामुळे या परंपरेतील अभिव्यक्ती अधिक उत्स्फूर्त असते. लोककलेची निर्मिती समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होते. ‘अभिजात कला’ ही प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेली असते. ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
कलाशैली : कलानिर्मितीची प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र पद्धत म्हणजे शैली असते. एखादी पद्धत जेव्हा परंपरेचे स्वरूप धारण करते तेव्हा ती पद्धत विशिष्ट कलाशैली म्हणून ओळखली जाऊ लागते. प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडाशी आणि प्रदेशाशी निगडित असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली विकसित होतात. त्या शैलींच्या आधारे त्या त्या संस्कृतीमधील कलेच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो.
भारतातील दृक्कला परंपरा
दृक्कलांमध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो.
चित्रकला : चित्रकला द्विमितीय असते. उदा., निसर्गचित्र, वस्तुचित्र, व्यक्तिचित्र, वास्तूंचे आरेखन इत्यादी चित्रे रेखाटली जातात. त्यासाठी शिलाखंड, भिंती, कागद, सुती किंवा रेशमी कापडाचे फलक, मातीची भांडी यांसारख्या माध्यमांचा उपयोग केला जातो. उदा., अजिंठा लेण्यातील बोधिसत्त्व पद्मपाणिचे भित्तिचित्र.
लोकचित्रकला शैली : अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे अनेक देशांमध्ये आढळून येतात. भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये गुहाचित्रे असलेली स्थळे आहेत. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. भीमबेटकाचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसास्थळांमध्ये करण्यात आलेला आहे.
गुहाचित्रांमध्ये मनुष्याकृती, प्राणी आणि काही भौमितिक आकृतींचा समावेश असतो. पुराश्मयुग ते शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळापर्यंत या चित्रांची शैली, त्यांचा विषय यामध्ये बदल होत गेलेले आढळतात. चित्रांमध्ये नवीन प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश झालेला दिसतो, तसेच मनुष्याकृतींच्या रेखाटनाच्या पद्धतीत आणि वापरलेल्या रंगांमध्ये सुद्धा फरक होत जातो.
या चित्रांमध्ये काळा, लाल, पांढरा यांसारखे नैसर्गिक द्रव्यांपासून तयार केलेले रंग वापरलेले असतात. त्या त्या काळातील लोकांचे त्यांच्या परिसरासंबंधीचे ज्ञान आणि नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून घेण्याचे तंत्रज्ञान यांचा विकास कसा होत गेला, याची कल्पना या चित्रांद्वारे करता येऊ शकते.
लोकचित्रकलेची परंपरा गुहाचित्रांच्या परंपरेशी नाते सांगणारी आहे. घरातील लग्नकार्यात, सणासुदीला भिंतींवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे तसेच चित्रांच्या साहाय्याने आख्याने सांगणे यांतून प्रादेशिक लोककला परंपरेतील विविध चित्रशैली विकसित झाल्या.
अभिजात चित्रकला : प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये विविध कलांस सांगोपांग विचार झालेला दिसतो. त्यामध्ये एकूण ६४ कलांचा उल्लेख आहे. त्यामध्ये चित्रकलेचा उल्लेख आलेख्यम्’ किंवा आलेख्य विदया’ या नावाने केलेला आहे. आलेख्य विदयेची ‘षडांगे’ म्हणजे सहा महत्त्वाचे पैलू आहेत. त्यांचा विचार प्राचीन भारतीयांनी अत्यंत बारकाईने केला होता.
त्यांमध्ये रूपभेद (विविध आकार), प्रमाण ( प्रमाणबद्ध रचना आणि मोजमाप), भाव (भावप्रदर्शन), लावण्ययोजन (सौंदर्याचा स्पर्श), सादृश्यता (वास्तवाच्या जवळ जाणारे चित्रण) आणि वर्णिकाभंग (रंगांचे आयोजन) यांचा समावेश आहे. विविध धार्मिक पंथांचे आगमग्रंथ, पुराणे आणि वास्तुशास्त्रांवरील ग्रंथ यांमधून चित्रकला, शिल्पकला यांच्यासंबंधीचा विचार मंदिर बांधणीच्या संदर्भात केलेला दिसतो.
हस्तलिखितांमधील लघुचित्रे : हस्तलिखितांमधील लघुचित्रांवर सुरुवातीला पर्शियन शैलीचा प्रभाव होता. दक्षिणेकडील मुस्लीम राजवटींच्या आश्रयाखाली दख्खनी लघुचित्रशैली विकसित झाली. मुघल सम्राट अकबराच्या कारकिर्दीत पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल लघुचित्रशैलीचा उदय झाला.
युरोपीय चित्रशैली : ब्रिटिश राजवटीत पाश्चात्त्य चित्रशैलीचा प्रभाव भारतीय चित्रशैलीवर पडलेला दिसतो. पुण्यातील शनिवारवाड्यात सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा स्थापन करण्यात आली होती. त्याने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे चित्र काढले होते.
वेल्सच्या सोबत काम करणारे एक मराठी चित्रकार गंगाराम तांबट यांचा इथे विशेष उल्लेख करायला हवा. त्यांनी वेरूळ, कार्ले येथील लेण्यांची चित्रे काढली होती. त्यांची काही चित्रे अमेरिकेतील येल विद्यापीठात असलेल्या ‘येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट’ येथे जतन केलेली आहेत. चित्रवस्तूचे हुबेहूब चित्रण हे पाश्चात्त्य चित्रशैलीचे विशेष वैशिष्ट्य समजले जाते.
मुंबईत सन १८५७ मध्ये स्थापन झालेल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड इंडस्ट्री या पाश्चात्त्य कलाशैलींचे शिक्षण देणाऱ्या कलाशाळेतून अनेक गुणवंत चित्रकार नावारूपाला आले. त्यातील पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा लेण्यांमधील चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचे काम केले.
शिल्पकला : शिल्पकला त्रिमितीय असते. उदा., मूर्ती, पुतळा, कलापूर्ण भांडी आणि वस्तू शिल्पे कोरली किंवा घडवली जातात. त्यासाठी दगड, धातू आणि माती यांचा उपयोग केला जातो. वेरूळचे कैलास लेणे हे अखंड शिलाखंडातून कोरलेले अद्वितीय शिल्प आहे. सारनाथ येथील अशोकस्तंभाच्या शीर्षावरील चार सिंहांच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे.
लोकशिल्पकला शैली : चित्रकलेप्रमाणेच शिल्पकला ही सुद्धा अश्मयुगीन काळाइतकी प्राचीन आहे. दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात ही एक प्रकारे शिल्पकलेचीच सुरुवात होती असे म्हणता येईल. भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा हडप्पा संस्कृतीच्या काळापासून होती.
ती आजतागायत बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये अस्तित्वात असल्याचे दिसते. महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या गणेशमूर्ती, गौरींचे मुखवटे, बैलपोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैल, पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवट्याचे खांब, वीरगळ, आदिवासी घरांमधील साठवणीच्या मातीच्या कोठ्या, इत्यादी गोष्टी या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची साक्ष देतात.
अभिजात शिल्पकला शैली : हडप्पा संस्कृतीमधील मुद्रा, दगडी आणि कांस्य पुतळे पाच हजार वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक प्राचीन असलेल्या भारतीय शिल्पकलेच्या परंपरेची साक्ष देतात. मौर्य सम्राट अशोकाच्या काळातील दगडी स्तंभांपासून भारतातील कोरीव दगडी शिल्पनिर्मितीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, असे मानले जाते.
मध्य प्रदेशातील सांची येथील स्तूप प्रथम अशोकाच्या काळात उभारला गेला. त्याच्यावरील देखण्या शिल्पांची सजावट मात्र नंतरच्या काळात केली गेली असावी, असे मानले जाते. भारतातील शिल्पकलेचा विकास नंतरच्या काळात होत राहिला. याची साक्ष आपल्याला भारहूत येथील स्तूपावरील शिल्पांद्वारे मिळते.
बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर दूरवर झाला. त्यामुळे त्या देशांमध्ये स्तूप उभारण्याची परंपरा सुरू झाली. इंडोनेशियातील बोरोबुदुर येथील स्तूप हा जगातील सर्वाधिक मोठा स्तूप आहे. तो इसवी सनाच्या आठव्या नवव्या शतकात बांधला गेला. इसवी सन १९९१ साली युनेस्कोने बोरोबुदुर जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केले.
भारतीय मूर्तिविज्ञान : अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशात इसवी सनापूर्वी दुसऱ्या शतकात ग्रीक आणि पर्शियन प्रभाव दर्शवणारी गांधार शिल्पकलाशैली उदयाला आली. इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात म्हणजे कुशाण काळात मथुरा शिल्पशैली उदयाला आली. या शैलीने भारतीय मूर्तीविज्ञानाचा पाया घातला. देवप्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना नाण्यांवर कुशाण प्रथम पाहण्यास मिळते.
गुप्त साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्तीविज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झाले. इसवी सनाच्या नवव्या ते तेराव्या शतकांत चोळ राजांच्या आधिपत्याखाली दक्षिण भारतात कांस्यमूर्ती घडवण्याची कला विकसित झाली. त्यामध्ये शिव पार्वती, नटराज, लक्ष्मी, विष्णू यांसारख्या देवतांच्या मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या.
स्थापत्य आणि शिल्पकला : भारतामध्ये अनेक कोरीव लेणी आहेत. कोरीव लेण्यांची परंपरा भारतामध्ये इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकात सुरू झाली. तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण लेणे हे स्थापत्य आणि कोरीव शिल्पाचे एकत्रित उदाहरण असते. प्रवेशद्वारे, आतील खांब आणि मूर्ती हे शिल्पकलेचे उत्तम नमुने असतात. भिंती आणि छत यांवर केलेले उत्तम चित्रकाम काही लेण्यांमध्ये अजूनही काही प्रमाणात टिकून आहे.
महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांना इसवी सन १९८३ मध्ये जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आला. भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसवी सनाच्या चौथ्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात झाली. गुप्तकाळाच्या सुरुवातीस गाभारा आणि त्याबाहेरील चार स्तंभ असलेली ओसरी एवढेच मंदिराचे स्वरूप होते.
इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंत भारतातील मंदिर स्थापत्य पूर्ण विकसित झाले होते, हे वेरूळ येथील कैलास मंदिराच्या भव्य रचनेवरून सहज लक्षात येते. मध्ययुगीन काळापर्यंत भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली विकसित झाल्या. शिखरांच्या रचना वैशिष्ट्यांनुसार या शैली ठरतात. त्यामध्ये उत्तर भारतातील ‘नागर’ आणि दक्षिण भारतातील ‘द्राविड’ या दोन शैली प्रमुख मानल्या जातात.
या दोहोंमधून विकसित झालेल्या मिश्र शैलीला ‘वेसर’ असे म्हटले जाते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आढळणारी ‘भूमिज’ मंदिरशैली आणि नागर’ मंदिरशैली यांच्यामध्ये रचनेच्या दृष्टीने साम्य आढळते. भूमिज शैलीत क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात.
मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लीम सत्तांच्या आश्रयाखाली पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय असे स्थापत्यशैलीचे अनेक प्रवाह एकत्र आले. त्यातून भारतातील मुस्लीम स्थापत्य विकसित झाले. अनेक देखण्या वास्तूंची निर्मिती केली गेली.
दिल्लीजवळच्या मेहरौली येथील कुतुबमिनार, आग्रा येथील ताजमहाल आणि विजापूर येथील गोलघुमट या वास्तू मुस्लीम स्थापत्य शैलीची जगप्रसिद्ध उदाहरणे आहेत. कुतुबुद्दीन ऐबक (इ.स. बारावे शतक) याच्या काळात कुतुबमिनार बांधण्यास प्रारंभ झाला आणि अल्तमश (इ.स. तेरावे शतक) याच्या कारकिर्दीत कुतुबमिनारचे बांधकाम पूर्ण झाले.
कुतुबमिनार जगातील सर्वाधिक उंच मिनार आहे. त्याची उंची ७३ मीटर (२४० फूट) आहे. ज्या वास्तुसंकुलाचा कुतुबमिनार हिस्सा आहे ते कुतुब वास्तुसंकुल युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केले आहे. मुघल सम्राट शहाजहान याने त्याची बेगम मुमताजमहल हिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला.
ताजमहाल हे भारतातील मुस्लीम स्थापत्याच्या सौंदर्याचे अग्रगण्य उदाहरण मानले जाते. जगप्रसिद्ध असलेली ही वास्तू जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोने जाहीर केली आहे. इसवी सनाच्या सतराव्या शतकात बांधलेल्या विजापूरच्या गोलघुमट या अत्यंत भव्य इमारतीत मोहम्मद अदिलशहा याची कबर आहे.
या इमारतीला गोलघुमट हे नाव ज्यामुळे मिळाले त्या घुमटाच्या आतल्या घेराच्या बाजूने गोल सज्जा आहे. या सज्जात उभे राहून कुजबुजले तरी तो आवाज सर्वत्र ऐकू जातो. जोरात टाळी वाजवली तर तिचा प्रतिध्वनी अनेकदा घुमतो. भारतात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर एक नवीन स्थापत्यशैली उदयाला आली.
तिला इंडो-गोथिक स्थापत्यशैली असे म्हटले जाते. ब्रिटिश काळात बांधल्या गेलेल्या चर्च, सरकारी कचेऱ्या, मोठ्या पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने, रेल्वे स्टेशन यांसारख्या इमारतींमध्ये ही शैली पहावयास मिळते. मुंबईचे ‘छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस’ ही इमारत या शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण असून ते युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट झाले आहे.
भारतातील ललित / आंगिक कला परंपरा
लोककलेच्या परंपरा : भारतातील प्रत्येक प्रदेशाच्या वैविध्यपूर्ण अशा लोकगीत, लोकवाद्य, लोकनृत्य आणि लोकनाट्याच्या परंपरा आहेत. महाराष्ट्रातही लोककलेच्या अनेक परंपरा अस्तित्वात आहेत. या लोककला धार्मिक उत्सव आणि सामाजिक जीवन यांचा एक अविभाज्य भाग म्हणून विकसित झाल्या. कोळीनृत्य, नृत्य, तारपा कोकणातील दशावतार, पोवाडा, कीर्तन, जागर गोंधळ ही त्यांपैकी काही ठळक उदाहरणे आहेत.
अभिजात कलेच्या परंपरा : भारताला लोककलांप्रमाणेच अभिजात कलांचाही अत्यंत समृद्ध वारसा लाभलेला आहे. भरतमुनींनी लिहिलेले नाट्यशास हा गायन, वादन, नर्तन, नाट्य या कलांचा सविस्तर ऊहापोह करणारा सर्वाधिक प्राचीन ग्रंथ समजला जातो. शृंगार, हास्य, बीभत्स, रौद्र, करुण, वीर, भयानक, अद्भुत आणि शांत असे नऊ रस हे भारतीय ललित कलांच्या सादरीकरणात मूलभूत मानलेले आहेत.
भारतीय लोकांचा बाहेरील देशातील लोकांशी सतत संपर्क येत राहिला आणि त्याद्वारे त्या कलांच्या सादरीकरणामध्ये अनेक प्रवाह मिसळत गेले. त्यामुळे त्या अधिकाधिक समृद्ध होत गेल्या. शास्त्रीय गायन, वादन, नृत्य यांच्या विविध शैली आणि त्या शैलींचे जतन करणारी घराणी निर्माण झाली.
भारतातील शास्त्रीय गायनाच्या ‘हिंदुस्थानी संगीत’ आणि ‘कर्नाटक संगीत’ अशा दोन प्रमुख शाखा आहेत. तसेच शास्त्रीय आणि उपशास्त्रीय असे दोन भेद आहेत. उपशास्त्रीय गायनात अनेक लोकगीत शैलींचा समावेश झालेला दिसतो.
उत्तर भारतातील कथ्थक, महाराष्ट्रातील लावणी, ओडिशाचे ओडिसी, तमिळनाडूचे भरतनाट्यम्, आंध्रचे कुचिपुडी, केरळचे कथकली आणि मोहिनीअट्टम या नृत्यशैलींच्या सादरीकरणात शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्य यांचा सुरेख मेळ पाहण्यास मिळतो. स्वतंत्र भारतात शास्त्रीय संगीत आणि नृत्य सामान्य रसिकांपर्यंत पोचावे या दृष्टीने विविध ठिकाणी संगीत-नृत्याचे महोत्सव साजरे केले जातात.
त्यांचा आस्वाद घेण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हेत तर परदेशांमधूनही अनेक रसिक येतात. पुण्यातील प्रतिवर्षी सवाई गंधर्व यांच्या नावाने होणारा संगीतमहोत्सव प्रसिद्ध आहे. अलीकडील काळात भारतीय संगीताच्या क्षेत्रात विशिष्ट शैली किंवा विशिष्ट घराणे यांच्या मर्यादा ओलांडून अभिनव प्रयोग करण्याकडे कल असलेला दिसतो.
त्यामध्ये पाश्चात्त्य संगीत, पाश्चात्त्य नृत्य यांचा मेळ भारतीय संगीताशी घालण्याचा प्रयत्नही दिसतो. अशा प्रकारे नवीन शैली विकसित करणाऱ्या कलाकारांमध्ये उदय शंकर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य आणि युरोपीय रंगभूमीवरील नृत्यनाट्य परंपरा यांचा मेळ साधला. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये लोकनृत्याच्या विविध शैलींनाही स्थान दिले.
भारतीय ललित कलांच्या सादरीकरणाचे क्षेत्र अशा तऱ्हेने विस्तारताना दिसत आहे. ही गोष्ट भारतीय दृक्कलांच्या क्षेत्रातही सातत्याने घडते आहे.
कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी
कला : कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे. त्या क्षेत्रात संशोधनाच्या आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात :
(१) कलेच्या इतिहासाचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम करू शकतात.
(२) कलावस्तूंच्या खरेदी-विक्रीचे एक स्वतंत्र जग आहे. तिथे कलावस्तूंचे मूल्य ठरवण्यासाठी ती कलावस्तू नकली नाही ना, हे पारखण्याची आवश्यकता असते. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.
(३) सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन तसेच सांस्कृतिक पर्यटन ही आता नव्याने विकसित होणारी क्षेत्रे आहेत. या क्षेत्रांमध्येही कलेच्या अभ्यासकांना अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये संग्रहालय आणि अभिलेखागार, ग्रंथालय आणि माहिती प्रसारणाचे तंत्रज्ञान, पुरातत्त्वीय संशोधन आणि भारतीय विद्या ही काही महत्त्वाची क्षेत्रे आहेत.
उपयोजित कला : दृक् आणि ललित कलांच्या क्षेत्रात कलेचा केवळ रसिकांनी रसास्वाद घ्यावा म्हणून कलानिर्मिती केली जाते. सर्व कलाक्षेत्रातील कलाकारांचा तो प्राथमिक हेतू असतो. त्याखेरीज कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांची सांगड घालून अनेक प्रकारची निर्मिती केली जाते. अशा प्रकारे उपयुक्तता हा हेतू ठेवून कला निर्मिती करणे म्हणजे उपयोजित कला.
(१) औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्र, तसेच घराची सजावट आणि सजावटीच्या वस्तू, रंगमंचावरील नेपथ्य, चित्रपट आणि दूरदर्शनवरील कार्यक्रम यांसाठी आवश्यक असणारे कला दिग्दर्शन, प्रकाशन आणि मुद्रण क्षेत्रात पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांची मांडणी, सजावट व सुलेखन, भेटकार्डे, आमंत्रणपत्रिका, वैयक्तिक लेखनसामग्री, भेटवस्तू, इत्यादी अनेक गोष्टींसाठी उपयोजित कला क्षेत्रातील जाणकारांची आवश्यकता असते.
(२) स्थापत्य आणि छायाचित्रण ही क्षेत्रेही उपयोजित कला या सदराखाली येतात. सध्याच्या काळात संगणकावर तयार केलेली स्थिर आणि चलत् चित्रे, नक्षी आणि आरेखने वापरली जातात. ती सुद्धा उपयोजित कलेचाच भाग आहेत. दागदागिने, मौल्यवान धातूंच्या कलावस्तू, रंगीत नक्षीची मातीची भांडी, बांबू आणि वेताच्या वस्तू, काचेच्या कलापूर्ण वस्तू, सुंदर कापड आणि वस्त्रे इत्यादींची निर्मिती अशी ही उपयोजित कलेची अत्यंत विस्तृत यादी आहे.
वरील प्रत्येक क्षेत्रात बौद्धिक पातळीवर एखादी संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरवेपर्यंत निर्मितीचे अनेक टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षित आणि कुशल व्यक्तींची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. कलावस्तूंचे उत्पादन करताना त्यांच्या निर्मितीच्या प्रक्रिया काही विशिष्ट सांस्कृतिक परंपरांनी बांधलेल्या असतात. क्षेत्रांमधील या प्रक्रियांचा प्रत्येक टप्प्याच्या विकासाचा इतिहास असतो.
प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात कलावस्तूंच्या उत्पादनप्रक्रियेच्या औदयोगिक, सांस्कृतिक परंपरांच्या इतिहासाचा अंतर्भाव केलेला असतो. वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत. गुजरातमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, अहमदाबाद, ही अशा प्रकारचे प्रशिक्षण देणाऱ्या जगातील अग्रगण्य संस्थांपैकी एक समजली जाते. सन २०१५ मध्ये या संस्थेने एक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे.
पुढील पाठात आपण प्रसारमाध्यमे आणि इतिहास यांबाबत माहिती घेणार आहोत.