‘चले जाव’ आंदोलन

दुसरे महायुद्ध १९३९ साली सुरू झाले. ब्रिटिश सरकारने भारतीयांच्या इच्छेविरुद्ध भारताला इंग्लंडच्या बाजूने युद्धात गोवले. याचा धिक्कार करण्यासाठी राष्ट्रीय सभेने वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सुरू केले. या आंदोलनात पहिले सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबा भावे यांची निवड करण्यात आली.

त्यानंतर अनेक सत्याग्रही आंदोलनात सहभागी झाले. युद्धासाठी भारतीयांचे संपूर्ण सहकार्य ब्रिटिशांना पाहिजे होते. भारतात राष्ट्रीय सरकारची स्थापना केल्याशिवाय अशा प्रकारचे संपूर्ण सहकार्य देण्याचे राष्ट्रीय सभेने नाकारले.

ब्रिटिशांनी राष्ट्रीय सभेची ही मागणी धुडकावून लावली. त्यामुळे भारतात ब्रिटिशविरोधी वातावरण पसरले. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी झालेल्या अधिवेशनात ‘चले जाव’चा ठराव मांडला. राष्ट्रीय सभेने ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढ्याचे रणशिंग फुंकले.

या अधिवेशनात जनतेसमोर भाषण करताना ‘करेंगे या मरेंगे’ असा संदेश देऊन गांधीजी म्हणाले, की या क्षणापासून भारतीयांनी स्वतःला स्वतंत्र समजावे. स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नात एक तर आपण यश मिळवू अथवा हे प्रयत्न करत असताना बलिदान तरी देऊ.

‘चले जाव’चा ठराव राष्ट्रीय सभेने प्रचंड बहुमताने मंजूर केला. गांधीजींच्या भाषणाने भारतीय जनता भारावून जाऊन स्वातंत्र्याच्या अखेरच्या लढ्यासाठी तयार झाली.

‘चले जाव’ आंदोलन : आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ते दडपून टाकण्यास सरकार सज्ज झाले. ९ ऑगस्टच्या पहाटे महात्मा गांधी, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू इत्यादी प्रमुख नेत्यांना कारागृहात डांबण्यात आले.

‘चले जाव’ आंदोलनाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी देशभर शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. प्रमुख नेते गजाआड गेले, की आंदोलन सौम्य होईल, अशी सरकारची अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. प्रमुख नेत्यांना अटक केल्यामुळे देशभर सरकारविरुद्ध प्रखर जनआंदोलन सुरू झाले.

सर्वत्र सभा घेण्यात आल्या, मोर्चे निघाले, हरतांळ पुकारला गेला. निदर्शने करण्यात आली. ब्रिटिशांनी भारत सोडून चालते व्हावे, अशी सर्वत्र मागणी करण्यात आली.या आंदोलनात महिला, विदयार्थी, शेतकरी, दलित, आदिवासी, कामगार इत्यादींचा समावेश होता. नंदुरबार येथे शाळकरी मुलांनी तिरंगा घेऊन मिरवणूक काढली.

‘चले जाव’च्या घोषणा दिल्या. मिरवणुकीवर झालेल्या गोळीबारात शिरीषकुमार, लालदास, धनसुखलाल, घनश्याम आणि शशीधर हे विद्यार्थी ठार झाले.देशात ठिकठिकाणी पोलीस व जनता यांच्यात अक्षरशः रणकंदन सुरू झाले. शेतकरी आणि आदिवासी ब्रिटिशांना प्रखर विरोध करण्यास कचरले नाहीत.

त्यांनी ग्रामीण भागातील काही ठिकाणच्या पोलीस कचेऱ्यांवर ताबा मिळवला आणि तेथील शस्त्रे हस्तगत केली. याच काळात राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज यांच्या प्रेरणेने यावली, चिमूर, आष्टी येथे जनतेने प्रचंड आंदोलने केली.

शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये ओस पडली. शाळकरी मुलांमुलींनीही मिरवणुका काढल्या. त्यात ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा सर्वत्र निनादत होत्या. ब्रिटिश सरकारला राज्यकारभार करणे आता अशक्य झाले. सरकारने नेत्यांची धरपकड केली.

भूमिगत चळवळ : याच सुमारास काही नेत्यांनी भूमिगत राहून सरकारविरोधी चळवळ संघटित केली. जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, सुचेता कृपलानी, सानेगुरुजी, एस. एम. जोशी इत्यादींचा त्यांत समावेश होता.

त्यांनी तरुणांची पथके उभारली. गुप्तपणे पत्रके छापणे, आकाशवाणी केंद्र चालवणे, दूरध्वनीच्या तारा कापणे इत्यादी कामे या पथकांनी केली. ही भूमिगत चळवळ अगदी खेडोपाडी पोहोचली.मुंबई येथील भूमिगत आकाशवाणी केंद्र चालवण्याची जबाबदारी उषा मेहता यांनी घेतली. अरुणा असफअली यांनी भूमिगत राहून आंदोलनाचे नेतृत्व केले.

प्रतिसरकार : या काळात भारतात काही प्रांतांमध्ये आंदोलनाचा प्रभाव वाढत गेला. जनतेने तेथील कारभार आपल्या हाती घेतला. त्यांनी जमीन महसूल गोळा केला, पंचायत नेमून न्यायनिवाडा केला. जनतेची प्रतिसरकारे स्थापन केली.

अशा प्रकारची प्रतिसरकारे बंगालमध्ये मिदनापूर, बिहारमध्ये पूर्णिया, महाराष्ट्रात सातारा येथे स्थापन झाली.महाराष्ट्रात सातारा येथे स्थापन झालेले प्रतिसरकार वैशिष्ट्यपूर्ण ठरले. या प्रतिसरकारचे प्रेरणास्थान क्रांतिसिंह नाना पाटील हे होते.

त्यांनी आपल्या भागातील ब्रिटिश अधिकाऱ्यांना हुसकावून लावले आणि स्वतंत्र यंत्रणा उभारली.या प्रतिसरकारांनी आपापल्या प्रांतांमध्ये एवढा दरारा निर्माण केला, की ब्रिटिश अधिकारी तिकडे जायला घाबरू लागले.

‘करेंगे या मरेंगे’ या निर्धाराने भारतीयांनी आंदोलन निर्भयपणे चालवले. जनतेच्या मनातील ब्रिटिशांबद्दलची भीती नाहीशी झाली.

Leave a Comment