छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास – Chhatrapati Shivaji Maharaj History

छत्रपती-शिवाजी-महाराज-Chhatrapati-Shivaji-Maharaj

मध्ययुगीन भारताच्या इतिहासात मराठ्यांची कामगिरी महत्त्वपूर्ण मानली जाते. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकामध्ये ‘मऱ्हाष्ट्र राज्याची’ स्थापना केली. या स्वराज्याचा विस्तार अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये झाला. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतामध्ये साम्राज्य स्थापन करताना इंग्रजांना मराठ्यांबरोबर प्रखर झुंज द्यावी लागली.

कारण त्या काळात मराठे उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये अत्यंत प्रभावशाली होते. म्हणूनच केवळ महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये मराठ्यांच्या कामगिरीला अनन्यसाधाररण महत्त्व आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर मध्ययुगीन राज्यकर्त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपल्या वंशाचे राज्य स्थापना केले नव्हते.

छत्रपती शिवाजी महाराज – Chhatrapati Shivaji Maharaj

त्यांनी स्थापन केलेल्या राज्याला ‘मऱ्हाष्ट्र राज्य’ असे नामाभिधान होते आणि महाराष्ट्रातील जनता हे राज्य म्हणजे आपले राज्य आहे असे मानत होती. खुद्द शिवाजी महाराजांची अशी भूमिका होती की हे राज्य रयतेचे असून सर्व जातीधर्माच्या लोकांना, साधुसंतांना आणि महिलांना या राज्यामध्ये सुरक्षितता आणि निर्भयता प्राप्त झाली पाहिजे. या ध्येयधोरणासाठी महाराजांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मराठ्यांची अस्मिता जागृती केली. ‘मराठा तितुका मेळवावा’ हा मंत्र सांगून लढाऊ वृत्तीच्या मराठ्यांमध्ये संघठन निर्माण केले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुघल आणि शाही राजवटींना निष्प्रभ करून मराठ्यांच्या राज्याचा विस्तार केला. हा सारा इतिहास लक्षात घेतल्यास छत्रपति शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासात अद्वितीय राज्यकर्ते होऊन गेले याची खात्री पटते. सतराव्या शतकात जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती स्वराज्य स्थापनेला अत्यंत प्रतिकूल होती.

🙏जय भवानी 🙏जय शिवजी 🙏 
चलातर मग खलील👇 link उघडून आपल्या महाराजांची गौरव गाथा वाचुया.

प्रकरण 1 शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र
प्रकरण 2 संतांची कामगिरी
प्रकरण 3 मराठा सरदार-भोसल्यांचे कर्तबगार घराणे
प्रकरण 4 शिवरायांचे बालपण
प्रकरण 5 शिवरायांचे शिक्षण
प्रकरण 6 स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा
प्रकरण 7 स्वराज्याचे तोरण बांधले
प्रकरण 8 स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त
प्रकरण 9 प्रतापगडावरील पराक्रम
प्रकरण 10 शर्थीने खिंड लढवली
प्रकरण 11 शायिस्ताखानाची फजिती
प्रकरण 12 पुरंदरचा वेढा व तह
प्रकरण 13 बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या
प्रकरण 14 गड आला, पण सिंह गेला
प्रकरण 15 एक अपूर्व सोहळा
प्रकरण 16 राज्यकारभाराची घडी बसवली
प्रकरण 17 दक्षिणेतील मोहीम
प्रकरण 18 शिवरायांची युद्धनीती
प्रकरण 19 रयतेचा राजा 
प्रकरण 20 स्फूर्तीचा जिवंत झरा

वरील २० प्रकरणे हि इयत्ता चौथी इतिहासाच्या पुस्तकातून घेतलेली आहेत. आमचा हाच प्रयत्न आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती सर्वत्र पोहोचायला हवी. म्हणून आम्ही हि माहिती एका ठिकाणी गोळा करण्याचा प्रयत्न केला आहे. आवडल्यास नक्की इतरांना शेअर करा. तसेच तुम्हाला ही पोस्ट तुमच्या अधिकारांचे उल्लंघन करत असल्याचे आढळल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म

फाल्गुन वद्य तृतिया शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी शुक्रवारी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीचा जन्म झाला. जेधे शकावलीत म्हटल्याप्रमाणे शके १५५१ शुक्ल संवत्सरे फालगुण वद्य तृतिया शुक्रवार नक्षत्र हास्त घटी १८ पळे ३१ गड ५ पळे ७ ये दिवशी शिवाजी राजे शिवनेरीस उपजले.’

शिवरायाचा जन्म झाला त्यावेळी दक्षिणेमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती. इ.स. १६३० मध्ये दक्षिण भारतात एवढा प्रचंड दुष्काळ पडलेला होता की, या दुष्काळाच्या खाईत रयत अक्षरश: होरपळून निघत होती. गावेच्या गावे ओस पडली होती. अन्न काय पण पाणी मिळणेसुद्धा मुश्किल झाले होते. या विदारक दुष्काळाची वर्णने समकालीन लेखकांनी लिहून ठेवलेली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज – Chhatrapati Shivaji Maharaj

जनता हवालदिल झाली होती. दुष्काळाच्या संकटाला जोडूनच साथीच्या रोगांचा फैलाव सर्वदूर झाला. लोक मेटाकुटीला आले, अशी परिस्थिती असताना समकालीन राज्यकर्ते जनतेच्या प्रश्नांचा विचार न करता परस्परावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे राजकीय अस्थिरताही निर्माण झाली होती.

इ.स. १६३० चे सुमारास निजामशाही अतिशय कमकुवत झाली होती. आदिलशाही दरबारात अंतस्थ कटकटी सुरू झाल्या होत्या. कुतुबशाही जरी आपले अस्तित्व टिकवून असली तरी मुघलांचा प्रभाव तेथेही वाढू लागला होता. अशा परिस्थितीत १६३६ मध्ये शहाजहानने दक्षिणेची स्वारी काढली. कुतुबशहाशी सख्य जुळवून आदिलशहाबरोबर तह करून निजामशाही विरूद्ध लढा उभारला.

शहाजीने निजामशाही वाचविण्याचा निकराने प्रयत्न केला तथापि १६३६ च्या अखेरीस शहाजीला शरणागती पत्करणे भाग पडले. शहाजहानने निजामशाही खालसा केली आणि तो प्रदेश मुघल व आदिलशहा यांच्यामध्ये वाटून देण्यात आला. शहाजीने आदिलशाहीची नोकरी पत्करली आणि तो कर्नाटकात निघून गेला. पुणे जहागिरीची देखरेख करण्यासाठी शहाजीने दादोजी कोंडदेव याची नेमणूक केली.

छत्रपती शिवाजी महाराज – Chhatrapati Shivaji Maharaj

या जहागिरीमध्ये इंदापूर, सुपे, पुणे आणि चाकण हे परगणे मोडत होते. शहाजी जरी कर्नाटकात गेला तरी जिजाबाई व बालशिवाजी यांचे वास्तव्य शिवनेरी किल्ल्यावरच होते. समकालीन साधनांवरून अशी माहिती मिळते की इ.स. १६४१ च्या सुमारास शिवाजी आणि जिजाबाई बंगलोरला शहाजीकडे गेले. बंगलोरहून परत येताना शहाजीने शामराज निळकंठ याची शिवाजीचा पेशवा म्हणून नेमणूक केली.

याशिवाय माणकोजी दहातोंडे, सरनोबत बाळकृष्णपंत दीक्षित याला मुजुमदार म्हणून नेमले. शिवाय सोनोपंत डबीर आणि रघुनाथ बल्लाळ सबनीस यांनाही शिवाजीच्या दिमतीस दिले. अशाप्रकारे हा सरंजाम घेऊन शिवाजी जिजाबाई व दादोजीपंत पुण्यास परतले अशा आशयाची माहिती सभासदाने आपल्या बखरीत दिलेली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिक्षण

क्षत्रियाच्या मुलास आवश्यक ते शिक्षण शिवाजीस स्वाभाविकपणे मिळाले. अश्वारोहण, दांडपट्टा, तलवारीचे हात, नेमबाजी इ. क्षात्रशिक्षण शिवाजीस बालपणी मिळाले. परंतु शिवाजीस लिहिण्यावाचण्याचे शिक्षण मिळाले होते का? असा एक प्रश्न अनेक इतिहासकारांनी उपस्थित केलेला आढळतो. आद्य इतिहासकार, ग्रैंट डफ याने शिवाजीला अक्षरज्ञान नव्हते असे म्हटले आहे.

ख्यातनाम इतिहासकार, यदुनाथ सरकार शिवाजी हा अकबर, हैदरअली, रणजित सिंह यांच्याप्रमाणे निरक्षर होता असे मत व्यक्त केलेले आहे. शिवाजीच्या हस्ताक्षराचा कागद प्रत्यक्षात सापडलेला नसला तरी शिवाजीला निरक्षर ठरविणे अन्यायकारक आहे. कारण शिवाजीला लिहितावाचता येत होते हे अप्रत्यक्षपणे सिद्ध करण्यास काही समकालीन पुरावेसुद्धा सापडतात.

छत्रपती शिवाजी महाराज – Chhatrapati Shivaji Maharaj

फॅक्टरी रेकॉर्डमध्ये शिवाजीला अक्षरज्ञान चांगले होते याविषयी खात्री देणारे पुरावे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवाजीचे वडील शहाजी आणि पुत्र संभाजी हे दोघेही संस्कृत भाषेचे जाणकार होते. स्वतः शिवाजी महाराजांनी ‘राज्यव्यवहार कोश’, ‘करण कौस्तुभ’ यासारखे संस्कृत ग्रंथ विद्वानांकडून लिहून घेतले. शिवभारतकार परमानंद हा तर प्रत्यक्ष शिवाजीच्या दरबारात होता.

या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवाजीला निरक्षर ठरविणे हे निश्चितपणे अन्यायकारक आहे. शिवभारतमध्ये शिवाजी लिपीग्रहणयोग्य वयाचा झाल्यावर शहाजीने त्याला गुरूंच्या स्वाधीन केले असा उल्लेख आलेला आहे. शिवभारतातील नवव्या अध्यायातील उल्लेखावरून शिवाजी साक्षर होता है स्पष्ट होते. ९१ कलमी बखरीमध्ये शहाजीच्या आज्ञेप्रमाणे दादोजी कोंडदेवाने चिरंजीवास म्हणजे शिवाजीस शहाणे केले असा उल्लेख आहे. हा एकच पुरावा शिवाजीच्या साक्षरतेची खात्री पटविण्यास पुरेसा आहे.

बारा मावळांवर प्रभुत्व

इ.स. १६४०-४१ मध्ये शिवाजी आणि जिजाबाई शहाजीच्या बोलावण्यावरून बंगलोरला गेले होते. तेथेच निंबाळकरांची मुलगी सईबाई हिच्याशी शिवाजीचा विवाह झाला. त्यानंतर इ.स. १६४२ मध्ये जिजाबाई व शिवाजी पुण्यास परतले. वर सांगितल्याप्रमाणे त्यांचेबरोबर शामराज निळकंठ, सोनोपंत डबीर वगैरे मंडळी तैनातीसाठी होते. पुण्यास आल्यानंतर शिवाजीच्या कर्तृत्वाला प्रारंभ झाला.

या सुमारास शिवाजीचे वय केवळ १२ वर्षांचे होते. दादोजी कोंडदेवच्या अनुभवाचा लाभ घेऊन या १२ वर्षाच्या मुलाने पुण्याच्या परिसरातील १२ मावळे आपल्या वर्चस्वाखाली आणले. सभासदाने असे म्हटले आहे की ‘पुण्यास येताच शिवाजीने १२ मावळे जिंकले. वास्तविक पाहता हा १२ मावळांचा प्रदेश शहाजीच्या मूळ जहागिरीमध्ये नव्हता.

छत्रपती शिवाजी महाराज – Chhatrapati Shivaji Maharaj

शहाजी महाराजांच्या जहागिरीत इंदापूर, पुणे, सुपे व चाकण एवढे चार परागणे होते. हा मुलूख म्हणजे आजचे इंदापूर, भीमथडी, दौड, पुरंदर, हवेली हे तालुके आणि भीमेच्या दक्षिणेकडील खेड तालुक्याचा पूर्वभाग यातला मुलूख. शहाजोच्या जहागिरीच्या मावळत्या बाजूस डोंगराळ प्रदेश होता. आजचे मुळशी, वेल्हे आणि भोर हे पुणे जिल्ह्यातील तालुके व वाई हा सातारा जिल्ह्यातील प्रदेश शहाजीच्या मूळच्या जहागिरीत नव्हते.

परंतु दादोजी कोंडदेवच्या सुभेदारीमध्ये होते. हा प्रदेश मावळ प्रदेश म्हणून प्रसिद्ध होता. त्यातील बारा मावळे म्हणजे अंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, कोरबारसे मावळ, पौड खोरे, मुठे खोरे, मुझे खोरे, गुंजण मावळे, कानद खोरे, वेळवंड खोरे, हिरडस मावळ व रोहिड खोरे. दादोजी कोंडदेव सुभेदार या नात्याने मावळ प्रदेशाची व्यवस्था पहात असत. दादोजीने शेतकऱ्यांना अभयदान दिले. लावणी संचणीची उत्कृष्ट व्यवस्था केली. चोर दरोडेखोरांचा बंदोबस्त केला.

मावळ भागातील देशमुखाशी ममतेने वागून त्यांना आपलेसे केले. तसेच बंडखोरी करणाऱ्या देशमुखांना कडक शासने केली. अशाप्रकारे मावळ प्रदेशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे आणि सर्वसामान्य जनतेला संरक्षण देण्याचे कार्य दादोजी कोंडदेवने केले. या काळात बाल शिवाजी दादोजी बरोबर मावळच्या दुर्गम डोंगराळ प्रदेशात फिरत होता. या परिसराची अचूक माहिती या काळातच शिवाजीला झालीय.

स्वराज्य कार्यास प्रारंभ

१७ एप्रिल १६४५ रोजी शिवाजीने दादोजी नरसप्रभू देशपांडे यास लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. या पत्रात “हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे” असा स्पष्ट उल्लेख असून या पत्रातच हिंदवी स्वराज्य हाही शब्द आलेला आहे. परंतु राजवाड्यासारखे इतिहासकार हे पत्रच संशयास्पद किंवा बनावट मानतात.

शिवाय शिवाजीच्या दुसऱ्या कोणत्याही पत्रामध्ये हिंदवी स्वराज्य हा शब्द आलेला नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित १६४५ पासून शिवाजीच्या मनात स्वतंत्र राज्याची कल्पना आकार घेऊ लागली होती. २८ जानेवारी १६४६ या तारखेचे शिवाजीचे न्यायनिवाडाविषयक एक पत्र उपलब्ध असून ह्या पत्राच्या शिरोभागी शिवाजी महाराजांची मुद्रा आढळते.

प्रतिपच्चंद लेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ॥

शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।

पत्राच्या अखेरीस ‘मर्यादयं विराजते’ ही दुसरी मुद्रा दिसून येते.

शिवाजीची उपरोक्त मुद्रा म्हणजे त्याच्या स्वराज्य कार्याचा प्रारंभ झाल्याची साक्ष आहे. अस्सल पुराव्यांची छाननी केल्यास १६४७ पासून शिवाजीने स्वराज्यकार्य द्रुतगतीने सुरू केलेले आढळते. ७ मार्च १६४७ रोजी दादोजी कोंडदेव यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शहाजीच्या जहागिरीची संपूर्ण जबाबदारी शिवाजीवर आली.

स्वतंत्र वृत्तीच्या शिवाजीने स्वराज्य स्थापण्याचा धाडशी उद्योग हाती घेऊन आदिलशहासारख्या शत्रूंना आश्चर्यचकीत केले. १६४७ मध्ये तोरणा आणि राजगड हे दोन किल्ले शिवाजीने ताब्यात घेतले. १६४७ च्या दिवाळीत पुरंदरचा किल्लाही मोठ्या कौशल्याने आपल्या वर्चस्वाखाली आणला. याचवर्षी पुण्याचा हवालदार आणि सिंहगडचा किल्लेदार यांच्याशी स्नेह जोडून शिवाजीने कोंढाणा उर्फ सिंहगड हा किल्लाही आपल्या ताब्यात घेतला.

छत्रपती शिवाजी महाराज – Chhatrapati Shivaji Maharaj

अशाप्रकारे केवळ एका वर्षात तोरणा, राजगड, पुरंदर आणि सिंहगड हे चार महत्त्वाचे किल्ले शिवाजीने ताब्यात घेतले. शिवाजीचे किल्ले घेण्याचे धोरण आदिलशहास मोठे भयप्रद वाटले. शिवाजीच्या या हालचालीला शहाजीची फूस आहे असा संशयही आदिलशहाला आला. तेव्हा आदिलशहाने मुस्ताफा खान व बाजी घोरपडे यांना कर्नाटकात पाठवून शहाजीला कैद केले. आणि त्यानंतर अफजलखानाने शहाजीला पायात बेड्या घालून विजापूरला आणले.

शहाजीला पकडल्यानंतर आदिलशहाने शिवाजीविरुद्ध फत्तेखान या सरदारास पाठविले. शिवाजी पुरंदरच्या किल्ल्यावर असल्याचे समजताच फत्तेखानाने पुरंदराला वेढा घातला. पण शिवाजीच्या मावळ्यांनी असा प्रखर प्रतिकार केला की फत्तेखानाला पळून जावे लागले. आदिलशहाने शहाजीचा थोरला पुत्र संभाजी याचेविरुद्धही फहादखान आणि तानाजी दुरे यांना पाठविले होते.

पण हे दोघेही अपयश पदरात घेऊन परत आले. या पराभवामुळे आदिलशहा अधिकच संतप्त झाला. शहाजीला किती दिवस अटकेत ठेवावे हा प्रश्नही आदिलशहापुढे होता. कारण आदिलशाहीतील मराठा सरदारांमध्ये असंतोष वाढू लागला होता. तेव्हा शहाजीची सुटका करण्यासाठी शिवाजी व संभाजी यांच्यावर दडपण आणून महत्त्वाचे किल्ले परत मिळवावेत आणि आपली प्रतिष्ठा सांभाळावी असा विचार आदिलशहाने केला.

छत्रपती शिवाजी महाराज – Chhatrapati Shivaji Maharaj

त्याप्रमाणे कोंढाणा, बंगळूर व कंदर्पी हे ३ किल्ले शिवाजी आणि संभाजी यांनी आपल्या ताब्यात द्यावेत म्हणजे शहाजीची सुटका करण्यात येईल अशी अट त्याने घातली. हे ३ किल्ले ताब्यात घेतल्यावर शिवाजी आणि शहाजी या दोघांच्याही हालचालीवर नियंत्रण करता येईल अशी आदिलशहाची अटकळ होती. शहाजीची सुटका महत्त्वपूर्ण असल्यामुळे शिवाजी आणि संभाजीने हे तिनही किल्ले आदिलशहास दिले. त्यानंतर आदिलशहाने शहाजीची सुटका केली. सुटकेनंतर कर्नाटकात येऊन शहाजीने पुन्हा आपला दबदबा निर्माण केला.

शिवाजी महाराजांनाही कोंढाणा गेल्याचे विशेष दुःख झाले नाही. कारण पुरंदरसारखा महत्त्वाचा किल्ला अद्याप शिवाजीच्या ताब्यात होता. तूर्त आदिलशहाच्या वाटेस न जाता जनतेवर जुलूम करणाऱ्या उन्मत्त मराठा सरदारांना वठणीवर आणण्याचे धोरण शिवाजीने स्विकारले आणि त्याप्रमाणे आपला मोहरा जावळीच्या चंद्रराव मोऱ्याकडे वळविला.

नुतन सृष्टीचा जनक

केवळ ३०-३५ वर्षांच्या काळात स्वराज्याची स्थापना करून त्याचा चौफेर विस्तार करण्याचे अलौकीक कार्य शिवाजी महाराजांनी केले. शेकडो वर्षे पारतंत्र्याच्या मगरमिठीत सापडलेल्या जनतेला स्वातंत्र्याचा मंत्र दिला. अस्मिता जागृत केली. स्वाभिमान शिकविला आणि नवा महाराष्ट्र उभा केला. केवळ स्वतंत्र राज्य स्थापन करणे एवढेच शिवाजी महाराजांचे ध्येय नव्हते तर राज्यातील सर्व सामान्य जनता सुखी झाली पाहिजे हे त्यांच्या धोरणाचे मुख्य सूत्र होते.

सामान्य जनतेला काडीचाही उपसर्ग पोहचू नये, शेतकऱ्यांची दैन्यावस्था संपली पाहिजे, स्वराज्यातील व्यापार समृद्ध झाला पाहिजे, साधुसंतांना निर्भयपणे उपासना करता आली पाहिजे, सर्व जातीना संरक्षण मिळाले पाहिजे आणि स्त्रियांचा सन्मान राखला गेला पाहिजे असे कितीतरी पैलू शिवाजी महाराजांच्या धोरणामध्ये होते.

छत्रपती शिवाजी महाराज – Chhatrapati Shivaji Maharaj

विशेष म्हणजे अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय धोरण सिद्धिस नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे युगपुरूष होते असे म्हणणे सार्थ ठरते. महाराजांच्या या कार्यामुळे त्या काळातील जनता हे अपूर्व आणि नवे वैभव स्वराज्याच्या रूपात पहात होती. म्हणूनच अमात्याने म्हटले त्याप्रमाणे ‘महाराजांनी नूतन सृष्टीच निर्माण केली.

समारोप

“शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली, न्यायदानात निःस्पृहता दर्शविली, गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुलाहिजा न ठेवता समज दिली, पश्चात्तापदग्ध होऊन परतलेल्या वतनदारांना अभयदान दिले, सर्व धर्मांना समान लेखले, साधुसंतांचा यथोचित आदर केला, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकरांप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरूष नव्हते तर मानवतेचे उत्कट तत्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणान्या महात्म्याप्रमाणे ते वंदनीय थोर पुरुष होते.”

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज चरित्र

“शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांनी थोर तत्त्ववेत्त्यांच्या शिकवणुकीतून स्फूर्ती घेतली होती. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून केवळ स्वतःसाठी राज्य स्थापन करण्याची त्यांना इच्छा नव्हती. तत्कालीन राज्यपद्धतींच्या गुणावगुणांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यातून आपले विशिष्ट धोरण व राज्यव्यवस्था यांची आखणी केली. महाराज स्वतः धर्मनिष्ठ हिंदू होते, तसेच इतर धर्मांविषयीची त्यांची भावना सहिष्णुतेची होती.

इतर धर्मीयांच्या पूज्य स्थानांसाठी त्यांनी इनामे दिली. शिवाजी महाराज एक थोर सेनानी होते. स्वातंत्र्यरक्षणासाठी आरमाराची आवश्यकता आणि महत्त्व त्यांना पटले होते. इंग्रज व डच यांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी प्रबळ आरमार उभारले. प्रतापगड किल्ल्याच्या बांधणीत त्यांची युद्धशास्त्रातील निपुणता दिसून येते. शिवाजी महाराजांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे तर ते साक्षात प्रतीक होते.”

छत्रपती शिवाजी महाराज – Chhatrapati Shivaji Maharaj

प्रस्तुत पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास सुलभ आणि परिणामकारक शैलीत गोष्टीरूपाने विदयार्थ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र आणि कामगिरी ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी व देशासाठी एक प्रेरणास्रोत मानली जाते. पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वामधील विविध स्फूर्तिदायी घटना दिलेल्या आहेत.

या पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात विविध सामाजिक संघटना, संस्था यांच्याकडून आणि व्यक्तिगत पातळीवर आलेल्या तक्रारींची व सूचनांची समितीने योग्य पद्धतीने छाननी करून प्रस्तुत पुस्तकाचे पुनर्लेखन केले आहे. तसेच आवश्यक तेथे काही अनुरूप अशा दुरुस्त्याही करण्यात आलेल्या आहेत.

पाठ्यपुस्तक जास्तीत जास्त निर्दोष व दर्जेदार व्हावे, या दृष्टीने महाराष्ट्रातील काही शिक्षणतज्ज्ञ व विषयतज्ज्ञ यांच्याकडून या पुस्तकाचे समीक्षण करण्यात आले. आलेल्या सूचना व अभिप्राय यांचा काळजीपूर्वक विचार करून या पुस्तकाला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. इतिहास विषय समिती, चित्रकार, छायाचित्रकार यांनी अतिशय आस्थेने आणि परिश्रमपूर्वक हे पुस्तक तयार केले आहे. मंडळ या सर्वांचे मनःपूर्वक आभारी आहे.

विद्यार्थी व वाचनकर्ते या पुस्तकाचे स्वागत करतील, अशी आशा आहे.MPSC Online