मोहिमेचा बेत
राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला, पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. राज्याभिषेकानंतर अल्पावधीत १७ जून १६७४ रोजी मासाहेब मृत्यू पावल्या. शिवरायांचा मोठा आधार गेला. स्वराज्यातील सर्व प्रजेचा आधार शिवराय होते; परंतु शिवरायांचा आधार मासाहेब होत्या. त्या त्यांच्या जीवनातील खऱ्या मार्गदर्शक आणि गुरू होत्या.
आईच्या मृत्यूमुळे त्यांना अतिशय दुःख झाले; परंतु दुःख करत बसणे त्यांना शक्य नव्हते. त्यांना स्वराज्याचा गाडा हाकायचा होता. शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला. त्यांना आता आदिलशाहीची मुळीच भीती नव्हती, कारण आदिलशाही मोडकळीस आली होती; परंतु उत्तरेचा मुघल बादशाहा औरंगजेब हा मात्र मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता.
तो स्वराज्याचा घास केव्हा घेईल, याचा नेम नव्हता. मुघलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे असावे, असा विचार शिवरायांच्या मनात आला, म्हणून त्यांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. या मोहिमेसाठी शिवरायांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशाहाची मदत मागितली. त्याने मोठ्या खुशीने शिवरायांना मदत देण्याचे कबूल केले.
या मोहिमेच्या मागे शिवरायांचा आणखी एक हेतू होता. त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते. वडिलांची कर्नाटकातील जहागीरही त्यांच्याकडे होती. त्यातील काहीही वाटा व्यंकोजीराजांनी शिवरायांना दिला नव्हता. एवढेच नव्हे, तर स्वराज्याबद्दल त्यांना फारसा आदर नव्हता. ते शिवरायांशी फटकून वागत असत. त्यांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर पाहावी, असा हेतू शिवरायांच्या मनात होता.
गोवळकोंड्याला भेट
कर्नाटकात जाण्यासाठी शिवराय निघाले. गोवळकोंड्याचा अबुलहसन कुतुबशाहा याने त्यांना भेटीचे आमंत्रण दिले होते, तेव्हा प्रथम कुतुबशाहाच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिण दिग्विजयासाठी पुढे जायचे, अशी योजना त्यांनी आखली. गोवळकोंडा हीच कुतुबशाहाची राजधानी होती. कुतुबशाहाने महाराजांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली. भेटीसाठी खास तंबू उभारला.
शिवराय राजधानीत येऊन दाखल झाले. त्यांचे दर्शन घेण्यासाठी रस्तोरस्ती लोक दुतर्फा उभे होते. त्यांच्या पराक्रमाच्या बातम्या देशात चहूकडे पसरल्या होत्या. अफजलखानाचा वध, शायिस्ताखानाची फटफजिती आणि आग्र्याहून सुटका या रोमहर्षक प्रसंगांची हकीकत देशभर पसरली होती. त्यामुळे तेथे महाराजांचे प्रचंड स्वागत झाले. घराघरांतून लोक महाराजांवर फुलांचा वर्षाव करत होते.
लोकांचे स्वागत स्वीकारून महाराज कुतुबशाहाच्या दरबारात आले. कुतुबशाहा त्यांना सामोरा गेला. त्याने महाराजांना खास तयार केलेल्या सिंहासनावर आपल्या बरोबरीने बसवले. त्याने महाराजांच्या सत्कारात कशाचीही कमतरता राहू दिली नाही. स्वागतसत्कार स्वीकारल्यावर शिवराय कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले.
जिंजी जिंकली
शिवराय पूर्वकिनाऱ्यावर आले. चेन्नईच्या दक्षिणेस जिंजीचा किल्ला आहे. हा रायगडाप्रमाणेच प्रचंड आणि मजबूत आहे. त्याला वेढा घालून महाराजांनी तो किल्ला जिंकला. दक्षिणेत स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले. नंतर त्यांनी वेलूरच्या किल्ल्याला वेढा दिला. कित्येक महिने वेढा देऊनही किल्ला ताब्यात येईना. तेव्हा वेलूरजवळच्या डोंगरावरून शिवरायांनी त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला आणि किल्ला सर केला. त्यांनी कर्नाटकात एकूण वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटेमोठे किल्ले जिंकले.
व्यंकोजीराजांची भेट
महाराजांनी आपले सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांना भेटीसाठी बोलावले. नाखुशीनेच ते आले. महाराजांनी त्यांचा योग्य सत्कार केला. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याच्या कार्यात व्यंकोजीराजांनी सहकार्य करावे, अशी त्यांनी त्यांना गळ घातली. काही दिवस व्यंकोजीराजे महाराजांबरोबर राहिले; परंतु एका रात्री महाराजांना काही न कळवता ते तंजावरला निघून गेले आणि उलट त्यांच्या फौजेवरच त्यांनी हल्ला केला, तेव्हा महाराजांच्या फौजेने त्यांचा समाचार घेतला.
व्यंकोजीराजांचा पराभव झाला. आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले. त्यांनी व्यंकोजीराजांना समजुतीची पत्रे पाठवली. जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश त्यांना दिला. त्यांची पत्नी दीपाबाई हिलाही महाराजांनी चोळीबांगडीसाठी कर्नाटकातील थोडा प्रदेश दिला. महाराजांनी व्यंकोजीराजांना पत्रात लिहिले, ‘परक्या शत्रूंचा भरवसा धरू नये. पुरुषार्थ गाजवावा.’
कर्नाटकातील विजय मिळवून महाराज रायगडावर परतले. या मोहिमेची दगदग जाणवत असतानाच महाराजांना जंजिऱ्याच्या सिद्दीविरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली. या वेळी महाराजांचे वय पन्नास वर्षांचे होते. तीस-पस्तीस वर्षे त्यांनी सतत कष्ट केले होते. त्यांना कधीही विश्रांती मिळाली नाही.
रयतेचा वाली गेला
तारीख ३ एप्रिल १६८०. सर्वांना दुःखसागरात लोटून शिवरायांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. रयतेचा वाली गेला! आपल्या हयातीत महाराजांनी केवढ्या घडामोडी केल्या. जबरदस्त शत्रूंना नमवून महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. अखिल भारतात महाराजांच्या कार्याला तोड नव्हती. महाराज थोर राष्ट्रपुरुष होते.
MPSC Online