एक अपूर्व सोहळा

Shivaji-Maharajancha-Rajyabhishek

राज्याभिषेक का केला ?

रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली, पण त्यांतून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने पार पडले. बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण वेचले. शेवटी स्वराज्य उभे राहिले. शत्रूवर वचक बसला.

या स्वराज्याला सर्व राजेरजवाड्यांनी मान्यता दयावी, म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली. शेकडो वर्षांनंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता. स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळायला हवे, म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही, तर हे केले स्वराज्य भक्कम करण्यासाठी.

स्वराज्याची राजधानी

शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली. रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. शत्रूवर नजर ठेवणे सोईचे होते. चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली. प्रतापगडाच्या भवानीदेवीचे दर्शन घेतले. तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले.

समारंभाची तयारी

नंतर शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करवून घेतले. त्याला मौल्यवान रत्ने जडवली. त्यावर शुभ्र छत्र बसवले. राजेरजवाडे, विद्वान ब्राम्हण व हाताखालचे सरदार कामदार यांना आमंत्रणे गेली. राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागाभट्ट आले. गागाभट्टांचे घराणे मूळ पैठणचे, पण काशीमध्ये स्थायिक झालेले. ते थोर पंडित होते. काशीक्षेत्रात त्यांना मोठा मान होता. सर्वत्र त्यांची कीर्ती पसरली होती.

शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी यथासांग केली. सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणण्यासाठी माणसे गेली. रायगडावर सुमारे पन्नास हजार माणसे जमली. त्यांच्यासाठी जिकडेतिकडे तंबू, डेरे, राहुट्या यांची गर्दी झाली.

राज्याभिषेकाचा सोहळा 

राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. महामंगल दिवस होता तो. वाद्ये वाजू लागली. गवई गाऊ लागले. सगळीकडे आनंदीआनंद झाला. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्यावर छत्रचामरे धरण्यात आली. तूप, दही, मध यांचे कलश पुरोहितांच्या हातांत होते. गागाभट्ट यांच्या हातांत सोन्याची घागर होती. तिच्यात गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या सात नदयांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते.

गागाभट्टांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणू लागले. घागरीच्या शंभर छिद्रांतून शिवरायांवर जलाभिषेक झाला. मग शिवराय उठले आणि जिजामातेच्या पाया पडले. मासाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी केलेल्या तीस वर्षांच्या कष्टांचे चीज झाले. शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माउलीने मनी धरलेले स्वप्न आज साकार झाले होते. आईचा आनंद अश्रूंवाटे बाहेर पडला. शिवरायही गहिवरले. धन्य मासाहेब! धन्य शिवराय !

मासाहेबांच्या भेटीनंतर महाराज सिंहासनावर बसले. त्यांच्याजवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले. अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले. गागाभट्टांनी सोन्यामोत्यांच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व ते मोठ्याने म्हणाले “क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीशिवछत्रपती यांचा विजय असो.” सर्वांनी जयजयकार केला.

गडागडांवर तोफा झाल्या. सर्व महाराष्ट्रभर शिवरायांचा जयजयकार झाला. अशा प्रकारे सन १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्या सालापासून महाराजांनी ‘राज्याभिषेक’ हा शक सुरू केला. शिवाजी महाराज ‘शककर्ते राजे’ झाले. त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली. निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभास हजर होते. इंग्रजांनी ऑक्झिंडेन नावाचा आपला वकील नजराणा घेऊन पाठवला होता. हा सोहळा पाहण्यासाठी दूरदूरचे प्रजाजनही जमा झाले होते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली. शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली.MPSC Online

 

Leave a Comment