गड आला, पण सिंह गेला

Tanaji-Malusare

मासाहेबांची इच्छा 

शिवरायांनी जयसिंगास दिलेले तेवीस किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा हा त्यांतलाच एक किल्ला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, “शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही. तो परत घे.” पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायही तळमळत होते.

कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सलत होती. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला, पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते. शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी निवडावे कुणाला ? कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती.

तानाजी मालुसरे 

तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता. कोकणात महाडजवळ उमरठे गाव आहे, तिथला तो राहणारा. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई, दिरंगाई माहीतच नव्हती. शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार! मोठा हिंमतवान गडी ! तो अंगाने धिप्पाड होता. ताकदीने भारी होता. बुद्धीने चलाख होता. शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती.

आधी लग्न कोंढाण्याचे 

तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता. त्याचा एकुलता एक मुलगा रायबा. तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती. लग्न चार दिवसांवर येऊन ठेपले होते. तानाजीला वाटले, ‘महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बोलवावे.’ तो शेलारमामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला.

शेलारमामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले. शिवराय म्हणाले, “शेलारमामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वत: काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. ” शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी जिवंत म्हणाला, “महाराज, असताना असल्या तानाजी जिवावरच्या कामगिरीवर आपण जाणार ? मग आम्ही कशाला? ते काही नाही. आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार. मला आशीर्वाद दया.”

तानाजीचा बेत 

तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदेभान हा रजपूत किल्लेदार होता. तो मोठा कडक होता. गडाला दोन दरवाजे होते. दोन्ही ठिकाणी उदेभानाने पक्का बंदोबस्त ठेवला होता, तेव्हा गडावर जायचे कसे? तानाजीने गडाभोवती टेहळणी केली. पश्चिमेला उंचच उंच कडा होता. त्या बाजूला पहारा नव्हता. तानाजीने कडा चढून जायचा बेत केला.

तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, “सूर्याजी, तू पाचशे गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी तीनशे मावळे घेऊन कड़ा चढून गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो. मग या तुम्ही आत घुसा एकदम धुव्वा उडवू शत्रूचा. चला.” सूर्याजी आणि तानाजी दोघे दोन वाटांनी निघाले.

कड्यावरून गडावर

रात्रीची वेळ होती, तानाजी व त्याचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखात उभे होते. रातकिडे किरकिरत होते. तानाजीचे पाच-सहा तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले. कडा केवढा उंच! पण ते कपारीस धरून, कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले. वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले. मग काय ? तानाजी आणि त्याचे मावळे दोरावरून भराभर वानरासारखे कडा चढून गडावर गेले.

तानाजीचा पराक्रम 

इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ते वाट पाहत राहिले. लढाईला सुरुवात झाली. उदेभानला खबर लागली. नगारा वाजला. उदेभानाचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. हातघाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले. ढाली खणाणू लागल्या. मशालींचा नाच सुरू झाला.

मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदेभानाने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरू झाली. दोघेही शूर वीर! कोणीही हटेना. इतक्यात तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत तो लढू लागला. शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले.

गड आला पण सिंह गेला !

तानाजी पडला, हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी व त्याच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोहोचले. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले, पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला.

पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, “अरे, तुमचा बाप इथे मरून पडला आहे. तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता ? मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा.” मावळे मागे फिरले. घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला, पण गड सर करताना तानाजीसारखा शूर मोहरा धारातीर्थी पडला.

जिजामातेस व शिवरायांना ही बातमी कळली. त्यांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले, “गड आला, पण सिंह गेला !” कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. ही घटना सन १६७० मध्ये घडली. पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले.MPSC Online

 

Leave a Comment