भौगोलिक स्पष्टीकरण
हवा
एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येक जण अनुभवत असतो. तिचे वर्णनही आपण करतो. ही स्थिती अल्पकालीन असते. यालाच आपण त्या ठिकाणची हवा म्हणतो. उदा., थंड हवा, गरम हवा, कोरडी हवा, दमट हवा इत्यादी.
हवामान
हवामानशास्त्रज्ञ एखादया प्रदेशातील हवेचे अनेक वर्षे निरीक्षण करतात. या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते. हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे ‘हवामान’ होय.
उदा. हवामान शीत व कोरडे, उष्ण व दमट किंवा उष्ण व कोरडे असे सांगता येते. हवेमध्ये तापमान, वारे, आर्द्रता इत्यादींमुळे वारंवार बदल घडताना आढळतात. ही सर्व हवेची मुख्य अंगे आहेत. त्यांचा आपल्या दैनंदिन व्यवहारावर व जीवनशैलीवर परिणाम होत असतो. हवेच्या या अंगांचा विचार हवामान सांगण्यासाठी केला जातो.
हवेची अंगे
तापमान
पृथ्वीच्या पृष्ठभागास सूर्यापासून उष्णता मिळते. या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. तापलेल्या भूपृष्ठाच्या सान्निध्यामुळे जवळची हवा तापते व त्यानंतर हवेचे वरचे थर क्रमाक्रमाने तापतात. त्यामुळे समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जाऊ तसतसे हवेचे तापमान कमी होते. अशाच प्रकारे साधारणपणे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे तापमान कमी कमी होत जाते.
हवेचा दाब
हवेला वजन असते त्यामुळे दाब निर्माण होतो. याला हवेचा दाब म्हणतात. वातावरणाच्या सर्वांत खालच्या थरावर त्यावरील हवेचा दाब पडतो त्यामुळे हवेची घनता वाढते. पृथ्वीच्या पृष्ठभागालगत हवेचा दाब जास्त असतो. उंचीनुसार तो कमी होतो. हा झाला हवेचा ऊर्ध्व दाब. तापमानातील फरकामुळे देखील हवेच्या दाबात बदल होतो. हे बदल क्षितिज समांतर दिशेत घडतात. त्यामुळे हवेचे वाऱ्यात रूपांतर होते.
वारे
जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे हवा क्षितिजसमांतर दिशेत वाहू लागते, त्यास वारा म्हणतात. कमी व जास्त हवेच्या दाबातील फरकानुसार वाऱ्याचा वेग ठरतो.
आर्द्रता
वातावरणात बाष्प असते. ज्या हवेत बाष्प जास्त असते ती हवा दमट असते. वातावरणातील दमटपणास आर्द्रता म्हणतात. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते. जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प मावू शकते.
वृष्टी
हवेतील बाष्पाचे पाणी व हिम यांत होणारे रूपांतरण व ते पुन्हा पृथ्वीवर येणे यास वृष्टी म्हणतात. पाऊस, हिम, गारा इत्यादी वृष्टीची रूपे आहेत. हवा कशी आहे हे त्या त्या वेळेनुसार सांगतात, तर हवामान दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगतात. हवेत सतत बदल होत असतो व तो सहजपणे जाणवतो.
हवामानातील बदल दीर्घकाळाने होतात. ते सहज जाणवणारे नसतात. अक्षवृत्तीय स्थान, समुद्रसपाटीपासून उंची, समुद्रसान्निध्य, सागरी प्रवाह हे घटक हवामानावर परिणाम करतात. याशिवाय पर्वतरांगा, जमिनीचा प्रकार, स्थानिक वारे इत्यादी घटकांचा देखील त्या त्या प्रदेशातील हवामानावर परिणाम होतो.
हवामानाचा परिणाम संपूर्ण सजीवसृष्टीवर विविध प्रकारे होत असतो. बहुतांश सजीवसृष्टी पोषक हवामान असलेल्या प्रदेशात दिसून येते. सजीवांचा आहार, निवारा या बाबींवरही हवामानाचा परिणाम होत असतो. पृथ्वीवरील पाण्याचे वितरण देखील हवामान नियंत्रित करते. |