इंग्रजांचे भारतात आगमन व सत्तास्थापना

इंग्रज हे युरोप खंडातील इंग्लंड या देशाचे रहिवासी. त्यांनी भारत देश कसा ताब्यात घेतला, याची माहिती आपण या पाठात करून घेणार आहोत.

युरोपीय व्यापाऱ्यांचे भारतात आगमन : भारत आणि युरोप यांच्यात प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. युरोपीय बाजारपेठेत भारताच्या मालाला मोठी मागणी होती. मध्ययुगात हा व्यापार प्रामुख्याने खुष्कीच्या मार्गाने चालत होता. नंतर युरोपातील व्यापारी व राजांनी भारताशी व्यापार करण्यासाठी भारताकडे जाणारा समुद्रमार्ग शोधण्यास सुरुवात केली.

Vasko d Gama

पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून इ. स. १४९८ मध्ये भारतात कालिकत बंदरात पोहोचला. त्याने तेथील झामोरिन राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या. पोर्तुगिजांनी इ.स. १५१० मध्ये गोवा काबीज केला. त्यानंतर दीव-दमण आपल्या ताब्यात घेतले. भारताशी झालेल्या व्यापारात पोर्तुगिजांनी अमाप संपत्ती मिळवली. त्यामुळे पोर्तुगिजांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेंच व्यापारी भारतात आले.

June Vyapari Marg

ईस्ट इंडिया कंपनी : भारताशी व्यापार करण्याच्या हेतूने काही इंग्रज व्यापारी लंडन शहरात एकत्र आले आणि त्यांनी व्यापारी कंपनी स्थापन केली. तिला ईस्ट इंडिया कंपनी असे म्हणतात. या कंपनीला पूर्वेकडील देशांशी, विशेषतः भारताशी व्यापार करण्याची सनद इंग्लंडच्या राणीकडून इ.स. १६०० मध्ये मिळाली.

सत्तेची पायाभरणी : या वेळी भारतावर मुघलांचे साम्राज्य होते. ईस्ट इंडिया कंपनीने इ. स. १६०८ मध्ये जहांगीर या मुघल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला. सुरत येथे कंपनीची वखार स्थापन केली. वखारीमध्ये व्यापारी माल साठवला जात असे. यापुढील शंभर वर्षांत इंग्रजांनी भारताच्या किनारी प्रदेशात अनेक ठिकाणी वखारी स्थापन केल्या.

बंगाल प्रांतात इंग्रजांचा शिरकाव : मुघल सम्राटाने व्यापाराचा परवाना देताना इंग्रजांना काही सवलती दिल्या होत्या. बंगालमधील इंग्रज व्यापारी या सवलतींचा दुरुपयोग करू लागले. परवानगी न घेता इंग्रजांनी आपल्या वखारींभोवती तटबंदी करण्यास सुरुवात केली. त्यास बंगालचा नबाब सिराज उद्दौलाने हरकत घेतली. त्यामुळे इंग्रजांनी सिराज उद्दौलाच्या विरुद्ध युद्ध पुकारले.

इ. स. १७५७ च्या प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी सिराज उद्दौलाचा पराभव केला. इंग्रजांनी बंगाल प्रांतात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. येथील माल स्वस्त किमतीत मिळावा म्हणून ते लोकांवर अत्याचार करू लागले.  इंग्रजांच्या या कारवायांना लगाम घालण्यासाठी बंगालचा तत्कालीन नबाब मीर कासीमने मुघल सम्राट शहाआलम व अयोध्येचा नबाब शुजा उद्दौला यांच्या सहकार्याने संयुक्त मोहीम काढली.

या तिघांचा इंग्रजांनी इ. स. १७६४ मध्ये बक्सार येथे पराभव केला. इंग्रजांनी मुघल सम्राटाकडून बंगालच्या दिवाणीचा म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळवला. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा बंगालमध्ये पाया घातला गेला.

इंग्रजी साम्राज्याचा विस्तार : या वेळी दिल्लीच्या मुघल सम्राटाची सत्ता खिळखिळी झाली होती. उत्तर भारतात शीख, राजपूत, जाट व रोहिले यांची स्वतंत्र राज्ये होती. तसेच दक्षिणेत मराठे, निजाम व इतरही राज्ये होती. त्यांच्यात आपापसात संघर्ष चालू होते. त्यामुळे भारतातील राज्यकर्ते दुबळे झाले. याचा फायदा इंग्रजांनी घेतला. मराठे, टिपू सुलतान तसेच शीख यांनी इंग्रजांशी सामना केला.

इंग्रजांशी लढताना टिपू सुलतान धारातीर्थी पडला. इंग्रजांचे मराठ्यांशी युद्ध झाले. दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा पराभव झाला व मराठी सत्ता इ. स. १८१८ मध्ये संपुष्टात आली. झाशी, सातारा, नागपूर, अयोध्या इत्यादी संस्थाने इंग्रजांनी खालसा केली. इंग्रजांनी पंजाबवर आक्रमण करून शिखांचा पराभव केला आणि पंजाबही ताब्यात घेतला. अशा प्रकारे इंग्रजांनी भारतात आपल्या सत्तेचा विस्तार केला.

Leave a Comment