इतिहासलेखन : भारतीय परंपरा

भारतीय इतिहासलेखनाची वाटचाल

इतिहासलेखनाच्या पाश्चात्त्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतली. या पाठात आपण भारतीय इतिहासलेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत.

प्राचीन काळातील इतिहासलेखन : प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवतपरंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सनापूर्वी तिसऱ्या सहस्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते; परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळाले नाही.

भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे. त्यांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकापासून होते. सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत.

इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. यांमधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार तत्कालीन शासनव्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते.

प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्ये, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथांखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवासवर्णने ही इतिहासलेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात.

प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहासलेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. इसवी सनाच्या सातव्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले ‘हर्षचरित’ हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे.

मध्ययुगीन काळातील इतिहासलेखन : इसवी सनाच्या १२व्या शतकात कल्हण याने लिहिलेला ‘राजतरंगिणी’ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. इतिहासलेखन शास्त्रशुद्ध कसे असावे, याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो.

त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला, असा उल्लेख कल्हणाने केला आहे. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लीम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहासलेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो.

मध्ययुगीन मुस्लीम इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बरनी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. ‘तारीख-इ-फिरुजशाही’ या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहासलेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्याच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकत्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे.

एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. बरनीच्या या विचारसरणीमुळे इतिहासलेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले.

त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पदय उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धतही सुरू झालेली दिसते. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र ‘तुझुक-इ-बाबरी मध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत.

त्याच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतीरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही समावेश आहे. इतिहासलेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेल्या ‘अकबरनामा’ या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे.

अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधनपद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. ‘बखर’ हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे.

शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे लेखन आपणांस बखरीत वाचायला मिळते. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यांतील एक महत्त्वाची बखर ‘सभासद बखर’ होय. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते. ‘भाऊसाहेबांची बखर’ या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयावर आधारित ‘पानिपतची बखर’ अशीही स्वतंत्र बखर आहे. ‘होळकरांची कैफियत’ या बखरीतून आपणांस होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. बखरींचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतिपर असे प्रकार आहेत.

आधुनिक काळातील इतिहासलेखन आणि ब्रिटिश इतिहासकाळ : विसाव्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्त्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले.

Alezander And John Marshel

त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. पुढे जॉन मार्शल याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी तिसऱ्या सहस्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झाले.

भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव असलेला दिसतो. जेम्स मिल याने लिहिलेल्या ‘द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया’ या ग्रंथाचे तीन खंड १८९७ साली प्रसिद्ध झाले.

James Mil

ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ. त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. सन १८४९ मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी ‘द हिस्टरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ लिहिला.

माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर (१८१९-१८२७) होते. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रैंट डफ याचे नाव महत्त्वाचे आहे. त्याने ए हिस्टरी ऑफ द मराठाज्’ हा ग्रंथ लिहिला.

या ग्रंथाचे तीन खंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँट डफ याच्या लेखनातही उमटलेली दिसते. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉडसारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात आढळते.

विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्याची निःपक्षपाती वृत्ती दिसते. डफ याच्या इतिहासलेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वि. का. राजवाडे यांनी एकोणिसाव्या शतकात दाखवून दिल्या.

भारतीय इतिहासलेखन विविध तात्त्विक प्रणाली

वसाहतवादी इतिहासलेखन : भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव होता. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे, या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्याच्यामधील काहींच्या लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसते.

वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहासलेखनाचा वापर केला गेला. १९२२ ते १९३७ च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले ‘केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया’ या ग्रंथाचे पाच खंड हे वसाहतवादी इतिहासलेखनाचे ठळक उदाहरण आहे.

प्राच्यवादी इतिहासलेखन : युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. त्याबद्दल आदर, कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला.

वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. त्यातून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो-युरोपीय भाषा होती, अशी कल्पना मांडली गेली. इसवी सन १७८४ मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली.

Villium Jones

त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासास चालना मिळाली. प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्सम्युलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो-युरोपीय भाषागटातील अतिप्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता.

Fedrik Maxmuller

त्याने ‘हितोपदेश’ या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. तसेच ‘द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट’ या नावाने ५० खंड संपादित केले. त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले. ते सहा खंडांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला होता. अलीकडच्या काळात प्राच्यविदयावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैद या विद्वानाने केले.

राष्ट्रवादी इतिहासलेखन : एकोणिसाव्या विसाव्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षणपद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहासलेखन असे म्हटले जाते.

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला.

असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले, असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधाकुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णु मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे उदाहरणादाखल देता येतील.

इतिहासलेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे, याचा पुरस्कार त्यांनी केला. ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे २२ खंड त्यांनी संपादित केले.

V K Rajvade

त्यांतील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. “इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकिकती नव्हेत”, असे त्यांचे मत होते. अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.

Swatantrveer Savarkar

भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा उपयोग झाला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांनी लिहिलेले ‘द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857’ (१८५७ चे ‘स्वातंत्र्यसमर’) या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे.

राष्ट्रवादी इतिहासलेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले.

स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासलेखन : एकीकडे राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारे इतिहासलेखन केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली.

या काळातील इतिहासलेखनात प्रामुख्याने तीन नवे वैचारिक प्रवाह आढळतात. (१) मार्क्सवादी इतिहास (२) वंचितांचा (सबऑल्टर्न) इतिहास (३) स्त्रीवादी इतिहास.

मार्क्सवादी इतिहास : मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. मार्क्सवादी इतिहासकारांनी जातिव्यवस्थेत होत वेधले.

गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहासलेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे.

Damodar Kosambi

डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांचे ‘प्रिमिटिव्ह कम्युनिझम टु स्लेव्हरी’ हे पुस्तक मार्क्सवादी इतिहासलेखनाचे उदाहरण आहे.

वंचितांचा (सबऑल्टर्न) इतिहास : वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतूनच झाली, असे म्हणता येईल. इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे, ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनिओ ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञाचे स्थान महत्त्वाचे आहे.

वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्त्वाचे साधन मानले गेले आहे. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले. परंतु त्यापूर्वीच भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून दिसतो.

महात्मा फुले यांनी ‘गुलामगिरी’ या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे.

Dr. Babasaheb Ambedkar

भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इति नात त्याकडे दुर्लक्ष केले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले. त्यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी ‘हू वेअर द शूद्राज’ आणि ‘द अनटचेबल्स्’ हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येतील.

स्त्रीवादी इतिहास : भारतीय इतिहासलेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता. त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिले आव्हान होते.

तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणेही आवश्यक होते. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे आवश्यक होते.  एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि  जातिव्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले.

सन १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेले ‘स्त्रीपुरुष तुलना’ हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. सन १८८८ मध्ये पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदु वुमन’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांचा राजकीय समतेचा हक्क यांसारख्या विषयांवर केंद्रित झालेले दिसते.

अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या ‘क्रॉसिंग थ्रेशोल्डस् : फेमिनिस्ट एस्सेज इन सोशल हिस्टरी’ या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत.

महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले. त्यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्त्वाचे आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर : रिडिंग दलित बुमेन्स् टेस्टिमोनीज’ यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन आहे.

विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न करता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गो. स. सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा नामोल्लेख करावा लागतो. अलीकडच्या काळात य. दि. फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहासलेखनात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

भारतीय इतिहासलेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचा प्रभाव होता. त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहासलेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली दिसते.

Leave a Comment