इतिहासाची साधने

भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केला आहे. यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या नवव्या शतकापासून ते अठराव्या शतकाअखेरपर्यंतचा मानला जातो. या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत.

भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार, शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात.

या साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करून आपण त्यांची माहिती घेऊ. तसेच, इतिहासाच्या साधनांचे मूल्यमापनही करू. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो.

ही साधने तपासून घेणे गरजेचे असते. त्यांचा अस्सलपणा तपासावा लागतो. या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते. 

भौतिक साधने

Bhautik Sadhane

वरील वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची ‘भौतिक साधने’ असे म्हणतात. भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते. किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार म्हणजे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट हे होत. तसेच स्मारकांमध्ये समाधी, कबर, वीरगळ तर इमारतींमध्ये राजवाडे, मंत्रिनिवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो.

यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. वास्तुकलेची प्रगती समजते. त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान इत्यादींची माहिती मिळते.

Veergal

विविध राज्यकत्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची आहेत. नाण्यांवरून राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती मिळते. तसेच आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती यांची माहिती मिळते.

त्या काळातील धातूशास्त्राची प्रगती समजते.  सम्राट अकबराच्या नाण्यांवरील रामसीतेचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यांवरील शिवपार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते. पेशव्यांच्या नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे. यावरून त्या काळातील भाषाव्यवहार समजतो.

Peshavekalin Nane

शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख, उदा., तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातील लेख चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत. शिलालेख हा इतिहासलेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो.

त्यातून भाषा, लिपी, समाजजीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ‘ताम्रपट’ म्हणतात. ताम्रपटांवर राजाज्ञा, निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असे.

लिखित साधने 

त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फर्माने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सण-समारंभ यांचीही माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची ‘लिखित साधने’ असे म्हणतात

Likhit Sadhane

या काळात परकीय प्रवासी भारतात आले. त्यांनी आपली प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांत अल्बेरूनी इब्न बतुता, निकोलस मनुची यांचा समावेश होतो. बाबराचे चरित्र, कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले ‘श्रीशिवभारत’ हे शिवचरित्र तसेच विविध राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार यांवरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांची उकल करता येते.

तवारिख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम. अल्बेरूनी झियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारिखा उपलब्ध आहेत. बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला. खबर म्हणजे बातमी. बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहासलेखनाचा एक प्रकार आहे.

बखरीतून तत्कालीन राजकीय घडामोडी, भाषाव्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी कळायला मदत होते. मराठीतील अनेक बखरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने त्यात अनेकदा ऐकीव माहितीवर भर दिल्याचेही आढळते.

महिकावतीची बखर, सभासद बखर, एक्याण्णव कलमी बखर, चिटणिसाची बखर, भाऊसाहेबाची बखर, खर्चाच्या लढाईची बखर या काही बखरी होत. रॉबर्ट आर्म, एम. सी. स्प्रंगल आणि ग्रैंट डफ या समकालीन पाश्चात्त्य इतिहासकारांचे ग्रंथही महत्त्वाचे आहेत.

मौखिक साधने

लोकपरंपरेत पिढ्यान्पिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यांतून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात, अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची ‘मौखिक साधने’ असे म्हणतात.

Maukhik Sadhane

वरील तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते. इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्याविषयीचे संशोधन अखंडपणे चालू राहतेच. या संशोधनातून नवी साधने, नवी माहिती समोर येते. त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. उदा. आपल्या आजी-आजोबांच्या काळातील, आई-वडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकांमध्ये काही प्रमाणात फरक पडल्याचे दिसते.

ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन 

ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते. त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते. यांतील अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती ते शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो. लेखकांचा खरेखोटेपणा. त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो.

ही माहिती ऐकीव आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे. यालाही महत्त्व असते. लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा लागतो. इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते. आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते.

सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते. इतिहासलेखनात लेखकाचा निःपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाची असते.

Leave a Comment