इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते. वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो.

या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते.  इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात, तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही.

तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल, त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता असते.

त्यानंतर अक्षरवटिका म्हणजे अक्षराचे वळण, लेखकाची भाषाशैली, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यांसारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही, हे ठरवण्यास मदत करू शकतात.

त्यानंतर इतिहासतज्ज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. इतिहास संशोधनास साहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत. उदा., पुरातत्त्व, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवटिकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळींचा अभ्यास, इत्यादी.

इतिहासलेखनाची परंपरा

इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक सशोधन करून, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते, हे आपण पाहिले. अशी मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला इतिहासलेखन असे म्हणतात. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते.

अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे, इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो, हे त्याला वाचकांपर्यंत काय पोचवायचे आहे यावर अवलंबून असते.

निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. जगभरातील प्राचीन संस्कृतींमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही.

वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या, पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती. गुहाचित्रांद्वारे स्मृतींचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्यांचे गायन यांसारख्या परंपरा जगभरातील संस्कृतींमध् अये तिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो.

आधुनिक इतिहासलेखन

आधुनिक इतिहासलेखनाच्या पद्धतीची चार प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली जातात :

(१) ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते.

(२) हे प्रश्न मानवकेंद्रित असतात. म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी  विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतींसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथाकहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही.

(३) या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते.

(४) मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो.

वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहासलेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात, असे मानले जाते. ‘हिस्टरी’ हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इ. स. पू ५ व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या ‘द हिस्टरिज्’ या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला.

युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहासलेखन

इसवी सनाच्या अठराव्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे, असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता.

पुढील काळात युरोप-अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहासलेखन या विषयांसंबंधी खूप विचारमंथन झाले; इतिहासलेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. अठराव्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते.

परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. इसवी सन १७३७ मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली.

महत्त्वाचे विचारवंत

इतिहासलेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. त्यांतील काही महत्त्वाच्या विचारवंतांची माहिती घेऊया.

रेने देकार्त (१५९६ – १६५०) : इतिहासलेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे. मत आग्रहाने मांडले जात होते. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता. त्याने लिहिलेल्या ‘डिस्कोर्स ऑन द मेथड’ या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. ‘एखादी गोष्ट सत्य आहे असे निःसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये हा तो नियम होय.

Rene Dekart

व्हॉल्टेअर (१६९४-१७७८) : व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्स्वा मरी अरूए असे होते. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहासलेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला.

त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेअर आधुनिक इतिहासलेखनाचा जनक होता असे म्हणता येईल.

Vaultear

जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल (१७७०-१८३१) : या जर्मन तत्त्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यांनुसार इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत बदलत जाणे स्वाभाविक असते, असे प्रतिपादन त्याने केले.

Hegel

त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यासपद्धती विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत, अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली. ‘एनसायक्लोपिडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. हेगेलने लिहिलेले ‘रिझन इन हिस्टरी’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

लिओपॉल्ड व्हॉन रांके (१७९५-१८८६) : एकोणिसाव्या शतकातील इतिहासलेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपॉल्ड व्हॉन रांके याच्या विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे, यावर त्याने भर दिला. 

Ranke

तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोचता येणे शक्य आहे, असा विश्वास त्याने व्यक्त केला. इतिहासलेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थिअरी अँड प्रॅक्टिसऑफ हिस्टरी आणि ‘द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी’ या ग्रंथांमध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे.

कार्ल मार्क्स (१८१८-१८८३) : एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धान्तांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसामाणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर मालकीवर अवलंबून असतात.

Karl Marks

व समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्याने केली. त्याचा ‘दास कॅपिटल’ हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे.

ॲनल्स प्रणाली : विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहासलेखनाची प्रणाली उदयाला आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहासलेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता.

तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते.

स्त्रीवादी इतिहासलेखन

स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सीमाँ-द-बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहासलेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला.

त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशाधन सुरू झाले. १९९० नंतर ‘स्त्री’ हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो.

मायकेल फुको (१९२६-१९८४) : विसाव्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको याच्या लिखाणातून इतिहासलेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्याच्या ‘आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज’ या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे. असे प्रतिपादन केले.

पुरातत्त्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले. फुको याने इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व असे म्हटले. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंगव्यवस्था यांसारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला.

Michel Fuko

आधुनिक इतिहासलेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपटनिर्मिती, दूरदर्शन यांसारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले.

Leave a Comment