Kamat Vyasta Aapali Aantarndriye – कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये

श्वसन

जगण्यासाठी आपल्याला हवा, पाणी आणि अन्न या तीनही गोष्टींची गरज असते. हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला सतत होत राहणे गरजेचे असते. त्यासाठी आपला श्वासोच्छ्वास सतत चालू असतो. आपल्या शरीरात श्वासोच्छ्वासाचे काम करणारी इंद्रिये आहेत. श्वास घेतला की नाकावाटे घेतलेली हवा श्वासनलिकेत जाते.

                                                                     

श्वासनलिकेच्या दोन शाखांमार्फत हवा फुप्फुसांत शिरते, फुप्फुसांत या दोन्ही शाखांपर अनेक शाखा फुटतात. या प्रत्येक शाखेच्या टोकाशी हवेच्या पिशव्या असतात. त्या पिशव्यांना वायुकोश म्हणतात. उरोपोकळी आणि उदरपोकळी दरम्यान लवचीक पडदयासारखा अवयव असतो. त्याला श्वासपटल म्हणतात.

श्वासपटल व त्याची हालचाल

श्वासपटल खालच्या दिशेने सरकते तेव्हा श्वासावाटे हवा नाकावाटे येऊन श्वासनलिका व तिच्या शाखांतून पुढे वायुकोश भरते. श्वासपटल वरच्या दिशेने सरकते तेव्हा उच्छ्वासावाटे हवा बाहेर टाकली जाते.

वायूंची देवाणघेवाण

वायुकोशांमध्ये बाहेरील हवा पोचली, की हवेतील ऑक्सिजन वायुकोशाच्या भोवताली असलेल्या बारीकबारीक रक्तवाहिन्यांत जातो आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागांत वाहून नेला जातो. त्याच वेळी शरीराच्या सर्व भागांतून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साइड वायुकोशांमधील हवेत मिसळतो. उच्छ्वासाच्या वेळी तो शरीराबाहेर टाकला जातो. अशा प्रकारे वायुकोशात ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइड वायूंची देवाणघेवाण होते.

शरीराबाहेरील हवेत धूळ व धुराचे कण असू शकतात, तसेच रोगाला कारणीभूत ठरणारे रोगजंतूही असू शकतात. त्यांचा शरीराला त्रास होऊ शकतो. श्वसनेंद्रियांच्या आतील त्वचेला बारीक केसांसारखी लव असते. श्वसनेंद्रियांच्या आतल्या स्तरावर चिकट बुळबुळीत श्लेष्म असते. हवेतील कण त्यावर चिकटून बसतात. परिणामी हवेतील हानिकारक कण फुफ्फुसांपर्यंत पोहचू शकत नाहीत.

धूम्रपानाचे परिणाम

सतत धूम्रपान केल्यामुळे धूरातील विषारी पदार्थ फुप्फुसात साठू लागतात त्यामुळे फुप्फुसात भरणाऱ्या हवेचे पुरेसे शुद्धीकरण होत नाही. परिणामी हवेतील अशुद्धी फुप्फुसांत पोहोचू लागतात. यामुळे फुप्फुसांची कार्यक्षमता कमीकमी होत जाते. परिणामी फुप्फुसांचे विविध आजार होण्याची शक्यता वाढते.

सिगारेट किंवा विडीतील तंबाखूच्या धुरातील कणांचा चिकट घराच्या आतील बाजूला जमू लागतो. त्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ लागतो. शिवाय तंबाखूतील काही विपारी पदार्थही वायुकोशांत शिरतात. अशा दुष्परिणामांमुळे धूम्रपान करणाऱ्यांना श्वसनेंद्रियासंबंधीचे रोग तसेच फुप्फुसाचा कर्करोग असे दुर्धर रोगही होऊ शकतात.

पाचकर : पचनक्रियेत खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास मदत करणारा द्रवपदार्थ.

ग्रंथी : विशिष्ट द्रव स्रवणारे इंद्रिय.

पचन

अन्ननलिका, पचनेंद्रिये व त्यांच्या कार्याविषयी थोडी माहिती घेऊ.

अन्ननलिका

आपण खातो त्या अन्नाचे शरीरात पचन होते. म्हणजेच अन्नापासून रक्तात मिसळू शकणारे पदार्थ तयार होतात. हे काम आपल्या शरीरातील एका अतिशय लवचीक व लांबच लांब नळीच्या विविध भागांमध्ये पार पडते. या नळीला अन्ननलिका म्हणतात. या नळीचे वरचे टोक म्हणजे आपले तोंड आणि खालचे टोक म्हणजे गुदद्वार.

                                                         

तोंडापासून गुदद्वारापर्यंत एकच नळी जात असली तरी या नळीचा आकार सर्व भागांत एकसारखा नसतो. अन्ननलिकेच्या वेगवेगळ्या भागांची रचना व कार्य वेगवेगळे असते. अन्ननलिकेतील या विविध भागांना पचनेंद्रिये म्हणतात. अन्ननलिकेच्या बाहेर असणाऱ्या काही ग्रंथी पचनक्रियेला मदत करतात.

पचनेंद्रिये

अन्न तोंडात घेतल्याबरोबर पचनक्रियेची सुरुवात होते. तोंडातील दात, जीभ आणि लाळ या सर्वांच्या क्रियांमुळे अन्नाचा गिळता येईल असा ओलसर मऊ गोळा तयार होतो. तो आपण सहज गिळतो. गिळलेले अन्न ग्रासिकेमार्फत जठरात जाते जठर हे पिशवीसारखे इंद्रिय आहे. यात अन्न घुसळले जाते.

जठरातील पाचक रसांमुळे काही पचनक्रिया घडतात आणि अन्नातील काही रोगजंतू नष्ट होतात. येथे अन्नाचे एका पातळ खिरीसारख्या पदार्थात रूपांतर होते. ते पुढे लहान आतड्यात ढकलले जाते. प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे सुमारे सात मीटर लांबीचे असते. आतड्यातील पाचकरसामुळे अन्नपचनातील अनेक क्रिया येथे होतात. येथे काही ग्रंथींच्या स्रावांची पचनास मदत होते.

पचनातून शरीराला उपयुक्त असे पदार्थ तयार होतात व रक्तात शोषले जातात. उरलेले पदार्थ मोठ्या आतड्यात जातात. प्रौढ व्यक्तीमध्ये मोठे आतडे सुमारे दीड मीटर लांबीचे असते. उरलेल्या पदार्थात असलेले बरेचसे पाणी येथे शरीरात शोषले जाते आणि विष्ठा तयार होते. ती मलाशयात जमा होते. मलाशयात विष्ठा म्हणजे मल काही काळ साठून राहते. नंतर गुदद्वारातून विष्ठा शरीराबाहेर टाकली जाते.

इंद्रियसंस्था

अनेक इंद्रिये मिळून श्वासोच्छ्वास घडवून आणतात हे तुम्ही पाहिले. यांपैकी कुठलेही एक इंद्रिय नीट काम करत नसेल, तर श्वासोच्छ्वासाचे काम पूर्ण होणार नाही. शरीराचे एखादे काम एकत्रितरीत्या पूर्ण करणाऱ्या इंद्रियांच्या अशा गटाला इंद्रियसंस्था म्हणतात. म्हणून नाक, श्वासनलिका, फुप्फुसे आणि श्वासपटल यांना एकत्रितपणे श्वसनसंस्था म्हणतात.
जरा डोके चालवा.

शरीरातील ऊर्जा

चनक्रियेमुळे ऑक्सिजन बाबू शरीरातील रक्तात येतो आणि शरीराच्या सर्व भागांत पसरतो. पचनातून तयार झालेले पदार्थही रक्तात मिसळतात व रक्ताबरोबर ते शरीराच्या सर्व भागांत पोचतात. त्यांपैकी काही पदार्थ शरीरासाठी इंधनाचे काम करतात.

हवेतील ऑक्सिजन रक्ताबरोबर शरीराच्या सर्व भागांमध्ये पोहचला, की तेथे पदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने मंद ज्वलन होते आणि शरीराला ऊर्जा मिळते. हीच ऊर्जा शरीराची सर्व कामे होण्यास उपयुक्त ठरते.

रक्ताभिसरण

अन्नातील इंधनपदार्थ व हवेतील ऑक्सिजन शरीराच्या सर्व भागांत पोचवण्याचे काम रक्तवाहिन्यांतून सतत वाहत असणारे रक्त करते.

पण रक्त वाहत ठेवण्याचे काम कोण करते?

हे काम होण्यासाठी हृदयाचे सतत आकुंचन शिथिलीकरण होत असते. हृदयापासून रक्त वाहून नेणाऱ्या तसेच फिरून परत हृदयापर्यंत रक्त आणणाऱ्या रक्तवाहिन्यांचे एक जाळे शरीरभर पसरलेले असते. शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेला ‘रक्ताभिसरण’ म्हणतात.

                                                           

आपल्या शरीरात रक्तातून ऑक्सिजन व्यतिरीक्त असंख्य पदार्थ एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचवले जातात. तेही रक्ताभिसरणामुळे शक्य होते. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या जाळ्याला मिळून ‘रक्ताभिसरण संस्था’ म्हणतात. आपण जिवंत असेपर्यंत रक्ताभिसरणाचे काम रात्रंदिवस सतत चालू राहते.

चेतासंस्था

श्वासपटल, हृदय, पचनसंस्था यांची कामे शरीरासाठी इतकी महत्त्वाची असतात, की आपल्या कळत नकळत ती रात्रंदिवस चालू राहायला हवी असतात. काही कामे आपण आपल्या इच्छेप्रमाणे हवी तेव्हा करतो.

उदाहरणार्थ, बोलणे, धावणे, अभ्यास करणे, खेळणे. या सर्व प्रकारच्या कामांवर लक्ष ठेवून ती योग्य त्या वेळी, योग्य त्या पद्धतीने होतील याची खात्री करणे याला समन्वय साधणे असे म्हणतात हे तुम्ही शिकला आहात. असा समन्वय साधण्याचे काम मेंदूचे असते. मेंदू आणि शरीराच्या विविध भागांमध्ये सतत संपर्क असतो.

                                                                     

त्यासाठी ते एकमेकांना संदेशवहन करणाऱ्या अनेक तंतूंनी जोडलेले असतात. त्यांना ‘ चेतातंतू’ म्हणतात. मेंदू आणि चेतातंतूचे जाळे यांना एकत्रितपणे चेतासंस्था म्हणतात. चेतासंस्था शरीरामध्ये समन्वय राखण्याचे कार्य करते.

शरीरातील इतर संस्था

श्वसनसंस्था, पचनसंस्था, रक्ताभिसरण संस्था व या सर्वांमध्ये समन्वय ठेवणारी चेतासंस्था या संस्थांविषयी या पाठात आपण थोडीशी माहिती घेतली. याशिवायही आपल्या शरीरात अनेक संस्था आहेत.

उदाहरणार्थ, शरीराला आधार, आकार देणारी, महत्त्वाच्या इंद्रियांचे रक्षण करणारी अस्थिसंस्था तसेच शरीरात तयार होणारे अनेक टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणारी उत्सर्जनसंस्था.

Leave a Comment