Kriyapad In Marathi – क्रियापद

kriyapad-in-marathi
 kriyapad in marathi

वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद.

Kriyapad In Marathi – क्रियापद

उदा:

अ) गाय दूध देते.

ब) मुलांनी खरे बोलावे.

क) आमच्या संघाने ढाल जिंकली.

या वाक्यांमध्ये देते, बोलावे, जिंकली या शब्दांनी वाक्यातील क्रिया दाखविल्या आहेत तसेच त्यांनी वाक्याचा अर्थही पूर्ण केला आहे. त्यामुळे अशा शब्दांना क्रियापदे म्हणतात.

आई रोज देवाला जाऊन येते..

या वाक्यात क्रिया दाखवणारे दोन शब्द आहेत. जाऊनयेते. हे शब्द जाण्याची व येण्याची क्रिया दाखवतात. पण जाऊन या क्रियावाचक शब्दाने त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. येते या क्रियावाचक शब्दाने ती अर्थ पूर्ण होती. म्हणून जाऊन हे क्रियापद नसून वाक्यात येते हे क्रियापद आहे.

धातू : वरील वाक्यात येते या क्रियापदात मूळ शब्द ये हा असून त्याला ते हा प्रत्यय लागलेला आहे आणि त्यापासून येते हे क्रियापदाचे रुप बनलेले आहे. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात.

धातुसाधिते किंवा कृदन्ते

धातूला प्रत्यय लागून क्रियापदाची विविध रूपे बनतात.

उदा : बस : बसतो – बसला – बसतात

धातूंपासून बनलेली ही रूपे वाक्याचा अर्थ पूर्ण करतात.

मात्र, गा : गाणे-गाऊन-गाताना ही देखील धातूपासून तयार झालेली रूपे आहेत. ती वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीत.

Kriyapad In Marathi – क्रियापद

उदा:

त्याने सर्वांना गाऊन मंत्रमुग्ध केले.

तो आता गात नाही.

या वाक्यांमध्ये गाऊन, गात या क्रियावाचक शब्दांनी वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. त्यामुळे गाऊन, गात ही केवळ धातुसाधिते आहेत.

धावणे आरोग्यासाठी चांगले असते. ( धावणे- धातुसाधित, असते- क्रियापद)

या मुली पूर्वी फार चांगल्या गात. या वाक्यातील गात हे वाक्याचा अर्थ पूर्ण करते. म्हणून ते क्रियापद आहे.

धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणा-या शब्दांना धातुसाधिते किंवा कृदन्ते असे म्हणतात.

  • धातूसाधिते वाक्याच्या शेवटी कधीच येत नाहीत. ते वाक्याच्या सुरुवातीला, किंवा वाक्याच्या मध्ये येतात.
  • धातुसाधिते नाम, विशेषण किंवा क्रियाविशेषणाचे काम करतात.
  • फक्त संयुक्त क्रियापदातच धातुसाधिते क्रियापदाचे काम करते.

अशा प्रकारे वाक्यातील क्रिया दाखविण्याबरोबरच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द ही क्रियापदाची व्याख्या महत्वाची आहे. वाक्यात क्रिया दाखवणारे आणखी काही शब्द असू शकतात, पण ते वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीत.

उदा: जहाज समुद्रात बुडताना मी पाहिले.

हसणा-याकडे आपण लक्ष देऊ नये.

तंबाखू खाणारी माणसे कर्करोगाला बळी पडतात.

या वाक्यांमध्ये बुडताना, हसणारा, खाणारी हे शब्द त्या वाक्यांमध्ये क्रिया तर दाखवतात, मात्र वाक्याचा अर्थ पूर्ण करीत नाहीत. म्हणून ती क्रियापदे नाहीत. ती धातुसाधिते आहेत.

क्रियापद हा क्रिया दाखवणारा शब्द असला, तरी सर्वच क्रियापदे क्रिया दाखवतात असे नाही.

त्याने मुलाला मारले. या वाक्यातील मारले हा शब्द मारण्याची क्रिया दाखविती.

रावण दुष्ट होता. राम राजा झाला, मी विद्यार्थी आहे.

या वाक्यांमधील होता, झाला, आहे हे शब्द कोणतीही क्रिया दखवित नाहीत, तरीही त्या शब्दांना क्रियापदे म्हणावे लागेल, कारण ते शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतात.

Kriyapad In Marathi – क्रियापद

कर्ता व कर्म

वाक्यात क्रियापदाने दाखविलेली क्रिया करणारा जो कोणी असतो, त्यास कर्ता असे म्हणतात. कर्ता म्हणजे क्रिया करणारा. हा कर्ता क्रियापदाने दाखविलेली क्रिया ज्याच्यावर करतो ते त्याचे कर्म. वाक्यातील क्रियापदाने दाखविलेलीक्रिया कर्त्यापासून निघते व ती दुस-या कोणावर किंवा कशावर तरी घडते. त्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतो किंवा ज्याच्याकडे त्या क्रियेचा रोख किंवा कल असतो, ते त्याचे कर्म.

वाक्यातील कर्ता व कर्म कसे शोधतात

कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा व त्याला – णारा हा प्रत्यय लावून कोण असा प्रश्न करावा. म्हणजे कर्ता मिळतो.

उदा:  1) राम आंबा खातो.

या वाक्यात खातो या क्रियापदातील खा या धातूला णारा हा प्रत्यय लावून खाणारा कोण असा प्रश्न विचारला की राम हे उत्तर मिळते. म्हणून राम हा कर्ता. वाक्यातील कर्म शोधताना मुख्य क्रियापदाने दाखविलेली क्रिया कोणावर घडते असा प्रश्न करावा. ती क्रिया ज्या वस्तूवर किंवा प्राण्यावर घडते, ते त्याचे कर्म. वरील उदाहरणात खाण्याची क्रिया कोणावर घडते आंब्यावर. म्हणून आंबा वाक्यातील कर्म.

2) मी बैलाला मारतो.

या वाक्यात मारणारा कोण : मी. म्हणून मी हा या वाक्यातील कर्ता. मारण्याची क्रिया कोणावर घडते : बैलावर. म्हणून बैलाला हे कर्म.

3) विद्यार्थी प्रामाणिक आहे.

या वाक्यात असणारा कोण : विद्यार्थी म्हणून विद्यार्थी हा या वाक्यातील कर्ता. प्रामाणिक असण्याची क्रिया कोणावर घडते विद्यार्थ्यावरच. म्हणजे येथे क्रिया कर्त्यापासून पुढे जात नाही, म्हणून या वाक्यात कर्म नाही. आहे हे अकर्मक क्रियापद आहे.

4) मला दूध आवडते.

या वाक्यात आवडते हे क्रियापद आहे. आवड हा मूळ धातू आहे. आवडणारे काय : दूध. म्हणून या वाक्यात दूध हा कर्ता आहे.

त्याला थंडी वाजते : थंडी हा कर्ता

राजाला मुकुट शोभतो: मुकुट हा कर्ता

मला चंद्र दिसतो: चंद्र हा कर्ता.

क्रिया करणारा तो कर्ता व ती क्रिया भोगणारे किंवा सोसणारे ते कर्म.

क्रियापदाचे प्रकार (Kriyapadache Prakar)

1. सकर्मक क्रियापद

ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते, त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात. कर्मासह आलेले क्रियापद ते सकर्मक क्रियापद 

Kriyapad In Marathi – क्रियापद

उदा:

अ) गवळी धार काढतो.

ब) अनुराग निबंध लिहितो.

क) मुकुंद लाडू खातो.

वरील वाक्यांना पूर्ण अर्थ आहे. मात्र या वाक्यांतील अनुक्रमे धार, निबंध, लाडू या कर्मामुळे त्या वाक्यांना अर्थ प्राप्त झालेला आहे. म्हणजेच काढतो, लिहितो, खातो या क्रियापदांना त्या वाक्यातील कर्माची जरूरी आहे. अन्यथा वाक्यांना अर्थ प्राप्त होऊ शकला नसता. म्हणून काढतो, लिहितो, खातो ही सकर्मक क्रियापदे आहेत.

2.अकर्मक क्रियापद

कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी लय पावत असेल, तर ते क्रियापद अकर्मक असते

उदा:

अ) मी रस्त्यात पडलो.

ब) आज दीपावली आहे.

क) राम उद्या पुण्याला जाईल.

वरील वाक्यातील मी रस्त्यात पडलो, या वाक्यात पडण्याची क्रिया कर्त्यावरच घडते. ती क्रिया कर्त्यापासून पुढे जात नाही. मी पडलो यात पूर्ण अर्थ आहे. पडलो या क्रियापदाला कर्माची जरूरी नाही. म्हणून पडलो हे क्रियापद अकर्मक आहे. तसेच आहे, जाईल या क्रियापदांना कर्माची गरज नाही. त्यामुळे ती देखील अकर्मक क्रियापदे आहेत. म्हणजे वाक्यात कर्म नसले, तरी वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्यास क्रियापद सक्षम असते.

Kriyapad In Marathi – क्रियापद

काही अकर्मक धातू

अस, नस, हो, ऊठ, बस, नीज, झोप, रड, पड, सड, मर, धाव, थांब, शक, जाग, झीज, वाढ, झड, जळ, उजळ, ओरड, घीर, सळसळ, राह, वाह, उमल, जन्म, पीक, वाज, भीज, रुज, शीज, इ.

द्विकर्मक क्रियापदे

काही वाक्यांमध्ये क्रियापदांना अर्थ पूर्ण करण्यासाठी दोन कर्मे लागतात. अशा क्रियापदांना द्विकर्मक क्रियापदे म्हणतात.

उदा :

अ) गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात.

ब) आजीने नातवाला गोष्ट सांगितली.

क) तिने भिका-याला पैसा दिला.

वरील वाक्यांत शिकवतात, सांगितली, दिला ही क्रियापदे सकर्मक असून त्यांना दोन कर्मे आहेत. पहिल्या वाक्यात शिवकवणारे कोण : गुरुजी. गुरुजी हा कर्ता. शिकविण्याची क्रिया कोणावर घडते : व्याकरण व विद्यार्थी या दोहोंवर यातील वस्तुवाचक कर्माना प्रत्यक्ष कर्म असे म्हणतात व व्यक्तिवाचक कर्माना अप्रत्यक्ष कर्म असे म्हणतात.

वरील वाक्यांत व्याकरण, गोष्ट, पैसा ही प्रत्यक्ष कर्मे आहेत, तर विद्यार्थ्याना, नातवाला, भिका-याला ही अप्रत्यक्ष कर्मे होत. प्रत्यक्ष कर्माची विभक्ती द्वितीया असते तर अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती संप्रदानी चतुर्थी असते.

उभयविध क्रियापदे

जे एकच क्रियापद हे दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही प्रकारे वापरता येते, त्यास उभयविध क्रियापद असे म्हणतात.

उदा : कापले, आठवले, स्मरले, लोटले, मोडले, उघडले, इ.

1) त्याने घराचे दार उघडले ( यात उघडले हे सकर्मक क्रियापद)

त्याच्या घराचे दार उघडले ( यात उघडले हे अकर्मक क्रियापद)

2) रामाने धनुष्य मोडले. (यात मोडले हे सकर्मक क्रियापद)

ते लाकडी धनुष्य मोडले ( यात मोडले हे अकर्मक क्रियापद)

विधानपूरक

सकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते. कर्म दिल्याशिवाय सकर्मक धातूसंबंधीचे विधान पूर्ण होत नाही. अकर्मक क्रियापदांना कर्माची आवश्यकता नसते. केवळ कर्ता व क्रियापद एवढयानेच सकर्मक धातूच्या बाबतीत विधान बहुधा पूर्ण होते. परंतु काही अकर्मक धातू असे आहेत की, कर्ता व क्रियापद असूनही त्यांचा वाक्यार्थ अपुरा असतो.

Kriyapad In Marathi – क्रियापद

उदा:

1) राम झाला

2) मुलगा आहे

3) आंबा निघाला

उपरोक्त उदाहरणांमध्ये झाला, आहे, निघाला ही क्रियापदे अपु-या विधानांची आहेत. अशा प्रकारच्या क्रियापदांना अपूर्ण विधान क्रियापदे म्हणतात. ती विधाने पूर्ण करण्यासाठी काही शब्दांची आवश्यकता असते.

जसे :

1) राम राजा झाला.

2) मुलगा हुशार आहे.

3) आंबा नासका निघाला.

या वाक्यांमध्ये राजा, हुशार, नासका हे शब्द अपुरी विधाने पूर्ण करतात. अशा शब्दांना विधानपूरक किंवा पूरक असे म्हणतात.

संयुक्त व सहाय क्रियापदे 

1) क्रीडांगणावर मुले खेळू लागली.

2) आपणही आता खेळू.

पहिल्या वाक्यातील खेळू हा शब्द खेळण्याची क्रिया दाखवितो, पण वाक्याचा अर्थ पूर्ण करीत नाही. दुस-या वाक्यातील खेळू या क्रियावाचक शब्दाने मात्र वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणून दुस-या वाक्यातील खेळू हे क्रियापद होय. पहिल्या वाक्यातील क्रिया खेळू लागली या दोन शब्दांनी ती क्रिया पूर्ण होते. केवळ लागली या शब्दाने क्रियेचा अर्थ पूर्ण होत नाही. खेळू लागली या संयुक्त शब्दांत खेळू हे धातुसाधित असून लागली या क्रियावाचक शब्दाने खेळण्याची क्रिया पूर्ण करण्यास म्हणजे क्रियापदाचे रूप बनविण्यास साहाय्य केले म्हणून लागली हे सहाय क्रियापद होय.

Kriyapad In Marathi – क्रियापद

खेळू लागली हे क्रियापद धातुसाधित व सहाय क्रियापद यांच्या संयोगाने बनले आहे, म्हणून अशा क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात.

धातुसाधित व सहाय क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद होते. पण त्याला एक अट असते. ती म्हणजे, या संयुक्त क्रियापदाने दर्शविलेली क्रिया एकच असायला हवी. त्या दोन वेगवेगळ्या क्रिया असून चालणार नाही.

उदा :

1) बाळ, एवढा लाडू खाऊन टाक.

2) बाळ, एवढा लाडू खाऊन जा.

पहिल्या वाक्यात खाऊन टाक हे संयुक्त क्रियापद आहे. येथे खाण्याची व टाकण्याची अशा दोन क्रिया नसून खाऊन टाक याचा अर्थ खा. यातील दोन शब्दांनी एकाच क्रियेचा बोध होतो.

दुस-या वाक्यातील खाऊन जा या शब्दांत खाण्याची व नंतर जाण्याची अशा दोन वेगळ्या क्रिया आहेत. म्हणून खाऊन जा हे संयुक्त क्रियापद नाही. जा हे मुख्य क्रियापद असून खाऊन हे धातुसाधित आहे.


Sugam Marathi Vyakaran (M R Walambe)


नाम – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रयोग – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

समास – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

अलंकार – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

इतिहास – वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment