महाराष्ट्रातील समाजजीवन

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे रयतेचे राज्य होते. रयतेचे कल्याण व्हावे, लोकांवर जुलूम होऊ नये, महाराष्ट्र धर्माचे रक्षण व्हावे असा त्यांचा उदात्त हेतू होता. शिवाजी महाराजांनंतरच्या काळातही मराठी राज्याचा भारतभर विस्तार झाला. मराठ्यांची सत्ता सुमारे १५० वर्षे टिकून राहिली.

मराठी राज्याच्या कारभाराची माहिती आपण मागील पाठांत अभ्यासली. या पाठात आपण त्या काळातील सामाजिक स्थिती व लोकजीवन यांविषयी माहिती घेणार आहोत.

सामाजिक परिस्थिती शेती आणि शेतीवर आधारित उद्योग हे उत्पादनाचे गावपातळीवरील प्रमुख साधन होते. गावच्या पाटलाकडे गावाचे संरक्षण, तर कुलकर्ण्याकडे महसूल सांभाळण्याची जबाबदारी असे. पाटिलकीच्या कामासाठी पाटलास जमीन इनाम दिलेली असे. त्याला या कामासाठी महसुलातील काही हिस्सा मिळत असे.

बलुतेदारांना गावकीसाठी केलेल्या कामांचा मोबदला वस्तुरूपाने मिळत असे. खेड्यातील व्यवसायाचे काळी व पांढरी असे दोन प्रमुख भाग होते. काळीत काम करणारे ते शेतकरी आणि पांढरीत काम करणारे पांढरपेशी. गावगाड्यातील सर्व व्यवहार परस्पर समजुतीने करण्यावर भर असायचा. एकत्र कुटुंब पद्धतीवर भर होता.

चालीरिती 

या काळात बालविवाहाची पदधत रूढ होती. बहुपत्नित्वाची प्रथा होती. विधवांनी पुनर्विवाह केल्याची उदाहरणे आहेत. मानवी देहावर अंतिम संस्कार करण्याच्या दहन, दफन आणि विसर्जन पद्धती होत्या. छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी किंवा लढाईसाठी मुहूर्त पाहिला जायचा.

स्वप्न, शकुन यांवर लोकांचा विश्वास होता. देव किंवा ग्रह यांचा कोप होऊ नये म्हणून अनुष्ठाने केली जायची. त्यासाठी दानधर्म केला जात असे. ज्योतिषावर लोकांचा विश्वास होता. शास्त्रीय दृष्टीचा अभाव आणि औषधोपचारापेक्षा नवसाला प्राधान्य होते.

राहणीमान

बहुसंख्य लोक खेड्यांत राहत होते. खेडी स्वयंपूर्ण असत. केवळ मीठ त्यांना इतर ठिकाणांहून मागवून घ्यावे लागत असे. शेतकऱ्यांच्या गरजा मर्यादित होत्या. शेतकरी ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी, मका, तांदूळ इत्यादी धान्य पिकवत होते. रोजच्या जेवणात भाकरी, कांदा, चटणी आणि कोरड्यास यांचा समावेश असे.

आपल्यातील व्यवहार ते वस्तुविनिमय पद्धतीने करत असत. गावातील घरे साधी, माती विटांची असत. शहरात एकमजली वा दुमजली वाडे असायचे. श्रीमंतांच्या जेवणात भात, वरण, पोळ्या, भाज्या, कोशिंबिरी, दही-दुधाचे पदार्थ असत. धोतर, कुडते, अंगरखा, मुंडासे असा पुरुषांचा पोशाख तर लुगडी, चोळी असा स्त्रियांचा पोशाख असे.

सण-समारंभ 

गुढीपाडवा, नागपंचमी, बैलपोळा, दसरा, दिवाळी, मकरसंक्रांत, होळी, ईद इत्यादी सण-उत्सव लोक साजरे करत असत. पेशव्यांच्या काळात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा. तो घरगुती स्वरूपात साजरा व्हायचा. पेशवे स्वतः गणेशभक्त असल्याने त्याला महत्त्व आले. प्रतिवर्षी भाद्रपद चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव चालत असे.

दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने तेव्हापासून शुभकार्याची सुरुवात लोक करायचे. या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा करत. सीमोल्लंघन करत. एकमेकांना आपट्याची पाने देत. दसऱ्यानंतर मराठे मोहिमेवर निघत असत. दिवाळीत बलिप्रतिपदा आणि भाऊबीज विशेषकरून साजरी खेड्यापाड्यांत जत्रा करत असत. भरायच्या.

जत्रेच्या वेळी कुस्त्यांचे फड भरत असत. गुढीपाडवा या दिवशी गुढी उभारून हा सण साजरा करायचे. उत्सवाच्या वेळी नाचगाणी, डफावरची गाणी, तमाशा इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे. तमाशा हा करमणूक प्रकार लोकप्रिय होता.

शिक्षण 

या काळातील शिक्षणपद्धतीत पाठशाळा व मदरसा होत्या. लेखन, वाचन, हिशेबाचे शिक्षण घरातून मिळे. मोडी लिपीचा वापर व्यवहारात होत असे.

दळणवळण

प्रवास घाटमार्ग,सडक, नदयांवरील पूल या मार्गाने वाहतूक चालायची. धान्य, कापड, वाणसामान यांची वाहतूक बैलांच्या पाठीवरून होत असे. नदीतून जाण्यासाठी होड्यांचा वापर व्हायचा. पत्रांची ने-आण सांडणीस्वार व जासूद करायचे.

खेळ

या काळात विविध खेळ खेळले जायचे. खेळ करमणूक व मनोरंजनाचे साधन होते. कुस्ती, युद्धकला हे खेळ लोकप्रिय होते. मल्लखांब, दंड, कुस्ती, लाठी, दंडपट्टा, बोथाटी हे खेळ खेळले जात. हुतुतू, खोखो, आट्यापाट्या हे मैदानी खेळ तर सोंगट्या, गंजिफा, बुद्धिबळ हे बैठे खेळ लोकप्रिय होते.

धर्म व आचार-विचार

हिंदू व मुस्लिम असे दोन प्रमुख धर्म या काळात दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण उदारतेचे होते. प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे वागावे, दुसऱ्यावर आपल्या धर्माची सक्ती करू नये, अशीच विचारधारा या काळात होती.

पाठशाळा, देवळे, मदरसा आणि मशिदी यांना सरकारकडून देणग्या दिल्या जात असत. दोन्ही धर्मांचे अनुयायी एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होत असत. वारकरी महानुभाव, दत्त, नाथ, रामदासी हे पंथ प्रचलित होते.

स्त्रियांचे जीवन

स्त्रियांचे या काळातील जीवन कष्टमय होते. माहेर आणि सासर एवढेच तिचे जग असायचे. त्यांच्या शिक्षणाकडे कोणीच लक्ष देत नसे. अपवादात्मक स्त्रियांनी अक्षरओळख, प्रशासन आणि युद्धकौशल्य यांत प्रगती केली होती.

यांत वीरमाता जिजाबाई येसूबाई, महाराणी ताराबाई, उमाबाई दाभाडे, गोपिकाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचा समावेश होता. बालविवाह, विषमविवाह, वैधव्य केशवपन, सती, बहुपत्नित्व या प्रथांनी स्त्रियांचे जीवन जखडून टाकले होते.

एकंदरीत त्यांचे जगणे अत्यंत प्रतिकूल असे. इ.स. १६३० ते १८१० या पावणे दोनशे वर्षांच्या कालखंडाला सामान्यपणे मराठेशाही म्हणतात. या कालखंडातील कला-स्थापत्याचा थोडक्यात आढावा आपण पाहूयात.

शिल्पकला

शिवकाळात कसबा गणपती मंदिर जीर्णोद्धार, लाल महाल उभारणी, राजगड व रायगडवरील बांधकामे, जलदुर्ग उभारणी या प्रकारचे स्थापत्य उभारणीचे उल्लेख येतात. हिरोजी इंदुलकर हा त्या काळातील प्रसिद्ध स्थापत्य विशारद होता.गाव वसवताना शक्यतो काटकोनांतील रस्ते, कडेला दगडी बांधकाम, नदीपात्राच्या कडेला घाट अशी रचना करत.

पेशवेकाळात अहमदनगर, विजापूरसारखी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुणे शहरात करण्यात आली होती. पेशव्यांनी भूमिगत नळ, छोटी छोटी धरणे, बाग-बगीचे, हौद, कारंजी उभारली. पुणे शहराच्या जवळील हडपसर भागातील दिवे घाटातील मस्तानी तलाव स्थापत्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

पुण्यातील शनिवारवाडा, विश्रामबागवाडा, नाशिकचा सरकारवाडा, कोपरगावचा रघुनाथ पेशव्यांचा वाडा, सातारकर छत्रपतींचे वाडे, याशिवाय वाई, मेणवली, टोके, श्रीगोंदे, पंढरपूर येथील जुने वाडे मध्ययुगीन वाडा संस्कृतीची चिन्हे आहेत.

वाड्यांच्या बांधकामात कच्च्या व पक्क्या विटा वापरत. लाकडी खांब, तुळया, पाट, घडीव दगड, कमानी, उत्तम घोटलेला चुना, नळीच्या कौलांचे छप्पर, चिखल, बांबू यांचा वापर बांधकामात करत असत. वाड्यांच्या सजावटीसाठी चित्रकाम, रंगकाम, काष्ठशिल्प, आरसे यांचा वापर करत.

मंदिरे 

शिवकाळातील मंदिरे यादवकालीन हेमाडपंती पद्धतीची आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचे शिखर, जोतिबाच्या डोंगरावरील मंदिरे, शिखरशिंगणापूरचा शंभू महादेव, वेरूळच्या घृष्णेश्वराचे मंदिर ही शिल्पशास्त्राची उत्तम उदाहरणे होत.

प्रतापगडावर भवानी देवीचे व गोव्याला सप्तकोटेश्वराचे मंदिर शिवाजी महाराजांनी बांधले. पेशवेकाळात नाशिकचे काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वराचे शिवमंदिर, गोदावरी प्रवरा या नद्यांच्या संगमावर असणाऱ्या कायगांव व टोके येथील शिवमंदिरे, नेवासे येथील मोहिनीराज मंदिर ही मंदिरे या काळात उभारली गेली.

घाट

नदी किंवा संगमाच्या ठिकाणी घडीव दगडी घाट मराठेशाहीचे एक वैशिष्ट्य आहे. या काळातील सर्वांत प्रेक्षणीय घाट गोदावरी व प्रवरा नदी यांच्या संगमावरील प्रवरा संगम, टोके येथील होय.

पक्क्या बांधणीच्या पायऱ्यांच्या ओळीत, ठरावीक अंतरावर एक पायरी पुढे काढलेली असे. त्यामुळे सगळ्या घाटांचेच रूप खुलून जात असे. पाण्याच्या प्रवाहाने घाट निखळू नये म्हणून ठरावीक अंतरावर भक्कम बुरूज बांधत असत.

चित्रकला 

पेशवाई काळात शनिवारवाड्याच्या भिंतींवरील चित्रे महत्त्वाची आहेत. या काळात राघो, तानाजी, अनुपराव, शिवराम, माणकोजी हे महत्त्वाचे चित्रकार होऊन गेले. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात गंगाराम तांबट हा प्रख्यात चित्रकार होता. पेशव्यांनी चित्रकलेला उत्तेजन दिले.

धातुमूर्ती

पेशव्यांनी पुण्यातील पर्वती येथील मंदिरात पार्वती व गणपतीच्या मूर्ती पूजेसाठी तयार करून घेतल्या होत्या. त्याचबरोबर काष्ठशिल्पेसुद्धा तयार होत असत.

 वाङ्‍‍मय

संतवाङ्मय, पौराणिक आख्याने, टीका वाङ्मय, ओवी, अभंग, ग्रंथ, कथाकाव्ये, चरित्रकथा, संतांची चरित्रे, स्फुट काव्यरचना, देव देवतांच्या संदर्भातील आरत्या, पोवाडे, बखरी, ऐतिहासिक पत्रे हे वाङ्मयाचे महत्त्वाचे भाग होत.

नाट्यकला दक्षिणेत तंजावर येथे मराठी नाटकांना सतराव्या शतकाच्या अखेरीपासून प्रारंभ झाला होता. सरफोजी राजांनी या कलेस प्रोत्साहन दिले. या नाटकात गायन व नर्तन यांना प्राधान्य असे.

Leave a Comment