Mahasagaranche Mahatva – महासागरांचे महत्त्व

पृथ्वीपृष्ठावरील सर्व जलभागांचा समावेश जलावरणात केला जातो. महासागर, समुद्र, नदया, नाले, सरोवरे व जलाशय तसेच भूजल हे सर्व जलावरणाचे घटक आहेत. यांपैकी एकूण उपलब्ध जलाच्या सुमारे ९७.७% जल महासागरात आहे.

                                                       

आपल्या परिसरातील सजीवसृष्टी आपण नेहमी पाहत असतो. जमिनीवरील सजीवसृष्टीत खूप विविधता आहे. परंतु जमिनीवर असलेल्या एकूण सजीवसृष्टीच्या कितीतरी पटीने जास्त सजीवसृष्टी जलावरणात राहते ! आणि त्यात कितीतरी अधिक विविधता आहे. (आकृती ६.१)

भौगोलिक स्पष्टीकरण

बशीतील पाण्याचे बाष्पीभवन होऊन बशीत पाण्याच्या जागी सफेद रंगाचा थर साचलेला दिसेल. हा थर चवीला खारट तुरट असतो. हे पाण्यातील क्षार असतात, हे आपल्या लक्षात येईल. पेयजल म्हणून आपण जे पाणी वापरतो त्यामध्ये क्षारांचे प्रमाण कमी असते. महासागर, सागर किंवा समुद्र यांच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते. म्हणून ते पाणी चवीला खारट लागते.

                                                           

भौगोलिक स्पष्टीकरण
महासागरांमध्ये अनेक जलचर असतात. सूक्ष्म प्लवकांपासून ते महाकाय देवमासे अशा प्रकारचे जीव महासागरात आढळतात. हे जीव मृत झाल्यावर त्यांचे मृतावशेष महासागरात साचतात. सर्व नदया डोंगरांमधून व पर्वतांमधून वाहत येऊन महासागरांना मिळतात.

नदया पाण्याबरोबर झीज झालेल्या जमिनीचा गाळ, प्रवाहात आलेली झाडे-झुडपे व मृतावशेष सोबत घेऊनच महासागरांना मिळतात. वरील दोन्ही प्रकारांत मृतावशेषांचे विघटन होऊन त्यातून बाहेर पडणारी विविध खनिजे, क्षार इत्यादी महासागराच्या पाण्यात मिसळतात.

ज्याप्रमाणे जमिनीवर ज्वालामुखीचे उद्रेक होतात, त्याप्रमाणे ते महासागरातही होतात हे लक्षात घ्या. आकृती ६.३ पहा. ज्वालामुखीमुळे अनेक प्रकारची खनिजे, राख, क्षार वायू पाण्यात मिसळतात. या सर्वांमुळे समुद्राच्या पाण्यातील खनिज द्रव्यांची, क्षारांची पातळी वाढते. महासागराच्या पाण्याचे सतत बाष्पीभवन होऊन क्षारांचे प्रमाण वाढत असते.

या सर्व गोष्टींमुळे महासागराचे पाणी खारट होते. पाण्याची क्षारता (खारटपणा) प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. समुद्राची क्षारता दर हजारी (%) या प्रमाणात सांगितली जाते. सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता ३५ % असते. ‘मृत समुद्र’ हा जगातील सर्वांत क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो. त्याची क्षारता ३३२% आहे.

खाऱ्या पाण्यापासून आपल्याला मीठ मिळते. मीठ हा पदार्थ समुद्रकिनारी भागात मिठागरे तयार करून मिळवला जातो. आकृती ६.४ पहा. मिठाचा आपल्या आहारात समावेश असतो. मिठाप्रमाणेच फॉस्फेट, सल्फेट, आयोडिन अशी अनेक खनिजे समुद्रात असतात. खनिजांसाठी आपण काही प्रमाणात महासागरांवर अवलंबून असतो.

भौगोलिक स्पष्टीकरण

आपल्यापैकी अनेक जण आहारामध्ये मासे खातात. मासे आपल्याला नदी, तलाव, महासागर यांतून मिळतात. नदी व तलाव यांच्यापेक्षा महासागरातून मिळणाऱ्या माशांचे प्रमाण खूप जास्त असते. समुद्री जीव पकडण्याचे काम जगभर मोठ्या प्रमाणावर चालते. मानवाच्या प्राचीन व्यवसायांपैकी हा एक व्यवसाय आहे.

आहार हे जरी यामागचे मुख्य कारण असले तरीही औषधनिर्मिती, खतनिर्मिती, संशोधन इत्यादींसाठी या जिवांचा वापर होतो. भारतामध्ये प्रामुख्याने कोळंबी, तिसरे, खेकडे, सुरमई, बांगडा, पापलेट, मोरी (शार्क), रावस इत्यादी समुद्री जीव खाल्ले जातात. जगाचा विचार करता यात आणखी प्रजातींची भर पडते.

मानवी शरीराला लागणाऱ्या काही महत्त्वाच्या जीवनसत्त्वांचा पुरवठा माशांच्या सेवनातून होतो. ज्या देशांना सागरी किनारा लाभला आहे व इतर व्यवसायांची कमतरता आहे अशा देशांतील लोकांचे जीवन पूर्णतः सागरावर अवलंबून असते. उदा., मालदीव, मॉरिशस, सेशल्स बेटे इत्यादी.

भौगोलिक स्पष्टीकरण

पृथ्वीवर विविध स्थानांच्या तापमानांत फरक आढळतो. तसेच सरासरी कमाल व किमान तापमानांतही तफावत असते. ही तफावत किनारी प्रदेशात (समुद्रसान्निध्य) कमी तर समुद्रापासून दूर असलेल्या प्रदेशात (खंडांतर्गत) जास्त असते. याचा अर्थ महासागर, समुद्र व मोठे जलाशय यांच्या सान्निध्यातील प्रदेशांत दिवसभराच्या तापमानात फारसा फरक पडत नाही.

याचे मुख्य कारण म्हणजे या जलाशयातून बाष्पीभवनाद्वारे हवेत मिसळणारे बाष्प होय. हवेतील हे बाप जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेते व साठवते. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात तापमान सम राहते. पृथ्वीवर वायुदाब पट्टे निर्माण होतात. या वायुदाबातील फरकामुळे ‘वारे’ वाहतात, त्यांना ग्रहीय वारे असेही म्हणतात.

हे वारे महासागरात पाण्याचे प्रवाह निर्माण करतात. हे प्रवाह ‘उष्ण’ किंवा ‘शीत’ असतात. उष्ण प्रवाह नेहमी थंड प्रदेशांकडे वाहतात तर शीत प्रवाह नेहमी उष्ण प्रदेशांकडे वाहतात. म्हणजेच ते विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे व ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहतात. त्यामुळे पृथ्वीवरील उष्णतेचे फेरवितरण होते.

उष्ण प्रदेशांकडे आलेले शीत प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान सौम्य करतात, तर थंड प्रदेशांकडे आलेले उष्ण प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान उबदार करतात. आकृती ५.६ चा अभ्यास करताना आपण हे पाहिले आहे. वरील दोनही प्रकारे महासागर जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करताना दिसतात.

महासागरांच्या प्रचंड विस्तारामुळे महासागरातील पाण्याची वाफही मोठ्या प्रमाणात होते. ही क्रिया सतत सुरू असते. त्यापासून पृथ्वीवर पाऊस (पर्जन्य) पडतो. महासागर हे पर्जन्याचे उगमस्थान आहे. पर्जन्याचे पाणी नदी- नाल्यांद्वारे शेवटी महासागरातच मिसळते. म्हणजेच पर्जन्यचक्राची सुरुवात व सांगता देखील महासागरातच होते हे लक्षात घ्या.

सागरसान्निध्य लाभलेल्या प्रदेशात हवामान सम असल्यामुळे मानवी लोकसंख्येची घनता या भागामध्ये जास्त असते. हवामानाबरोबरच समुद्रातून मिळणारी विविध उत्पादने, विपुल प्रमाणात उपलब्ध होणारे खादय यांमुळे सागरी किनारी भाग मानवाला नेहमी आकर्षित करत आला आहे.

भविष्यात महासागराच्या लाटा, भरती-ओहोटी यांचा उपयोग करून वीजनिर्मिती करता येणार आहे.

महासागरातील खारे पाणी क्षारविरहित करून पिण्यायोग्य करता येणे शक्य आहे. त्यामुळे पेयजलाची टंचाई काही प्रमाणात दूर करता येईल. संयुक्त अमिरातीमधील दुबई या शहराची पेयजलाची व्यवस्था याच पद्धतीने करतात.

                                                               

सागर किनाऱ्यावर दलदलीच्या भागात, खाडी क्षेत्रात क्षारयुक्त मृदा व दमट हवामान असते. अशा ठिकाणी तिवरी / खारफुटीची जंगले, सुंद्रीची वने वाढतात. खारफुटीचे लाकूड तेलकट, हलके व टिकाऊ असते. इंधनासाठी व नाव तयार करण्यासाठी या लाकडांचा उपयोग होतो.

खारफुटीच्या वनांमुळे किनारी भागास महाकाय लाटांपासून संरक्षण मिळते. तसेच या वनांच्या प्रदेशात सागरी जैवविविधता संरक्षित राहते. या वनांच्या शेजारी शहरे असल्यास या वनांना शहरांची फुप्फुसे म्हणून ओळखतात.

महासागर व संसाधने

महासागरातून मीठ, मासे, शंख, शिंपले यांसारखी उत्पादने मिळतात हे आपण मागे बघितलेच आहे. या व्यतिरिक्त सागरतळातून लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मँगनीज, क्रोमियम, झिंक इत्यादी खनिज पदार्थ मिळतात. खनिज तेल व नैसर्गिक वायूदेखील मिळतो.

मोती व पोवळे यांसारख्या मौल्यवान वस्तू, शंख, शिंपले यांसारख्या शोभेच्या वस्तू तसेच, औषधी वनस्पती देखील आपल्याला सागरातून मिळतात.

महासागर व वाहतूक

महासागरामधून सर्वांत स्वस्त असा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. जलमार्गाने जहाजे, ट्रॉलर, बोटी, नावा यांतून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते. (आकृती ६.८) जलमार्गाने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. सागरकिनारा लाभलेल्या स्पेन, नॉर्वे, जपान यांसारख्या देशांना सागरी मालवाहतुकीमुळे महत्त्व मिळालेले आहे.

                                                     

सागरी प्रवाह जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. जलवाहतूक शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून केली जाते. कारण त्यामुळे जहाजाचा वेग नैसर्गिकरीत्या वाढून वेळेची व इंधनाची बचत होते. जलमार्गाने माल वाहून नेण्याची क्षमता इतर मार्गांच्या क्षमतेच्या तुलनेत बरीच जास्त असते.

यामुळेच अवजड वस्तू जसे कोळसा, कच्चे तेल, कच्चा माल, धातुखनिजे, अन्न- धान्ये इत्यादी मालाची वाहतूक करण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय उपयोगात आणतात.

महासागराच्या समस्या

पृथ्वीचा सुमारे ७०.८०% भाग पाण्याने व्यापलेला आहे. मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी ज्या कृती करत असतो त्यातून अनेक प्रकारचा कचरा निर्माण होत असतो. अशा कचऱ्यापासून प्रदूषण होते. महासागराचे प्रदूषण ही एक मोठी समस्या यातून निर्माण झाली आहे.

 तेलगळती (आकृती ६. ९)

शहरांमध्ये निर्माण होणारा घनकचरा सागरजलात टाकणे.

जहाजांतून टाकले जाणारे साहित्य मासेमारीचा अतिरेक

                                   

किनाऱ्यावरील खारफुटी जंगलतोड पाणसुरुंगामुळे होणारे विध्वंस

उद्योग व शहरे यांतून सोडले जाणारे सांडपाणी (आकृती ६.१०)

समुद्रातील उत्खननामुळे होणारे प्रदूषण

या सर्व बाबींमुळे महासागराच्या पाण्याचे प्रदूषण होते. काही किनारपट्टींचे प्रदेश तरजलचरांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत. अनेक जलचर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. उदा., निळा देवमासा, समुद्री कासव, डॉल्फिन इत्यादी.

Leave a Comment