Manavache Vyavsay – मानवाचे व्यवसाय

भौगोलिक स्पष्टीकरण

वरील सर्व चित्रे पाळीव प्राणी पाळणे, त्यांच्यापासून दूध मिळवणे, दुधाची विक्री करणे, दुधावर दुग्धप्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करणे, दुधापासून तूप, लोणी, चीज, श्रीखंड, पनीर, भुकटी इत्यादी पदार्थ बनवणे, त्यांची बाजारात विक्री इत्यादींशी संबंधित आहेत. यासाठी विविध स्तरांवर कामे केली जातात.

                                                 

या सर्व कृती मानव स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी करत असतो. या कृतींच्या स्वरूपावरून, त्यांतून मिळणाऱ्या घटकांनुसार त्यांचे आपण वर्गीकरण करू शकतो.

● आपण आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी अनेक कृती करत असतो. या कृतींना आपण व्यवसाय, उद्योग, व्यापार म्हणतो. आपण करत असलेल्या या कृतींपैकी काही कृती थेट निसर्गावर आधारित असतात. म्हणजे या कृतींमधून मिळणारे उत्पन्न हे निसर्गाकडून आपल्याला मिळते.

जसे, गाई- म्हशी हे प्राणी आहेत. त्यांना आपण पाळतो. चित्र ‘अ’ पहा. त्यांच्यापासून आपल्याला मिळते. त्यामुळे हा व्यवसाय निसर्गावर आधारित आहे. अशा प्रकारे निसर्गावर आधारित व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. उदा., पशुपालन, मासेमारी इत्यादी.

●प्राथमिक व्यवसायांतील काही उत्पादने आपण थेट वापरतो, तर काही त्यांच्या मूळ रूपात बदल करून वापरतो. आता चित्र ‘उ’ पहा. या चित्रात, मिळालेले दूध हे दूध डेअरीमध्ये आणून त्यावर प्रक्रिया केली जात आहे. म्हणजेच निसर्गाकडून प्राप्त होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती केली जात आहे.

उदा., दुधापासून श्रीखंड, लोणी, चीज व दूध पावडर तयार करणे. हे पदार्थ जास्त टिकाऊ असतात. त्यांची गुणवत्ता देखील वाढलेली असते. त्यामुळे त्यांची किंमतही जास्त असते. अशा प्रक्रिया करण्याला ‘उद्योग’ म्हणतात. उद्योग हे कच्च्या मालावर आधारित असतात. या प्रक्रियेत कच्च्या मालापासून जास्त टिकाऊ पक्का माल तयार होतो.

                                             

उद्योगांना पुरवला जाणारा कच्चा माल हा बहुतेक वेळा निसर्गातून येतो, म्हणजेच प्राथमिक व्यवसायातून येतो. हे व्यवसाय प्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असतात. म्हणून अशा व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात.

• आता चित्र इ, ई, ऊ पहा. या चित्रांमध्ये तुम्हांला अनुक्रमे दुधाचे संकलन व विक्री होताना, दुधाची वाहतूक होताना आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री होताना पहावयास मिळेल. या सर्व कृती प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांतील उत्पन्नाशी निगडित आहेत. बहुतेक वेळा हे व्यवसाय या दोन्ही व्यवसायांना पूरक सेवा देण्याचे काम करतात.

                                               

अशा व्यवसायांना आपण तृतीयक व्यवसाय म्हणतो. हे व्यवसाय इतर सर्व व्यवसायांना पूरक असतात, या व्यवसायांना ‘सेवा व्यवसाय’ असेही म्हणतात. यामध्ये मालाची वाहतूक, मालाची चढ-उतार करणे, मालाची विक्री इत्यादी बाबी येतात.

• आता चित्र ‘उ’ पहा. या चित्रात तयार झालेले दुग्धजन्य पदार्थ तपासताना व्यक्ती दिसत आहे. ही व्यक्ती पदार्थांची ‘गुणवत्ता’ तपासत आहे. हे काम करण्यासाठी या व्यक्तीकडे ‘विशेष’ प्रावीण्य असते. हीसुद्धा एक प्रकारची सेवाच आहे. परंतु ही तृतीयक व्यवसायांप्रमाणे सर्वसामान्य सेवा नाही.

                                                 

ही सेवा देण्यासाठी विशेष प्रावीण्याची गरज असते. त्यामुळे अशा प्रकारच्या सेवांना चतुर्थक व्यवसाय असे म्हणतात. सर्वच सेवा व्यवसाय हे प्राथमिक किंवा द्वितीयक व्यवसायांशी थेट संबंधित असतातच असे नाही. उदा., ड्रायव्हर, धारवाला, पोलीस, टपालसेवा इत्यादी.

                                                     

मानवी व्यवसायांचे आपण अशा प्रकारे वर्गीकरण करतो. जगातील सर्वच देशांमध्ये यांपैकी कोणते ना कोणते व्यवसाय चालत असतात. या सर्व व्यवसायांतूनच देशामध्ये व देशांदरम्यान आर्थिक उलाढाल होते. त्यातूनच देशाचे विविध वस्तूंचे उत्पादन व वार्षिक उत्पन्न ठरते. त्यावरून एखादा देश इतर देशांच्या तुलनेत किती विकसित आहे अथवा विकसनशील आहे ते ठरवले जाते.

                                           

आकृती १०.३ चे निरीक्षण करा. बांग्लादेश, संयुक्त अरब अमिराती व टर्की या देशांमधील विविध व्यवसायांत कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येनुसार ही विभाजित वर्तुळे तयार केलेली आहेत.

                                                          विविध व्यवसायांतील मनुष्यबळाचे शेकडा (%) प्रमाण

प्राथमिक व्यवसायांपासून तृतीयक व्यवसायांपर्यंत हे वर्गीकरण आहे. तृतीयक व्यवसायात जास्त मनुष्यबळ प्रमाण असलेले देश विकसित देश म्हणून गणले जातात, तर प्राथमिक व्यवसायात जास्त मनुष्यबळ प्रमाण असलेले देश विकसनशील देश म्हणून गणले जातात.

Leave a Comment