मराठा सरदार – भोसल्यांचे कर्तबगार घराणे

Shahajiraje

धामधुमीचा काळ

संतांनी लोकांच्या मनांत भक्तिभाव निर्माण केला, तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. तो काळच मोठा धामधुमीचा होता. विजापूरचा आदिलशाहा आणि अहमदनगरचा निजामशाहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत. लढाईसाठी त्यांना फौज लागे. या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत.

शूर मराठा सरदार मराठे काटक व शूर होते. तसेच ते धाडसी होते, स्वामिनिष्ठ होते. लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हातात भाला, कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत. मराठे सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला, की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. त्याला सरदारकी देई. कधीकधी जहागीरही देई. जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत.

विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते. त्यांत सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत.

शौर्याची परंपरा हे सारे सरदार शूर वीर होते, पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात हाडवैर असे. स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांचे शौर्य त्या वेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे; पण असे असले तरी, महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले.

घृष्णेश्वराचे मंदिर सुमारे चारशे वर्षांपूर्वीची गोष्ट. वेरूळच्या लेण्यांजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते. त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता. एवढे महान दैवत ! पण कोण अवकळा आली होती त्या मंदिरावर. त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे. येणारे-जाणारेही हळहळत, उसासे सोडत, पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो ?

त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे. शिवाच्या पिंडीवर बेलफूल वाहत असे. हात जोडून आपल्या मनातले श्रीशिवाला सांगत असे. एक दिवस त्याने गडीमाणसे आणली. मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. मंदिराची सारी व्यवस्था लावली. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आतबाहेर दिवे लावले. घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले. हे कोणी केले? कोण होते हे शिवभक्त ? ते होते मालोजीराजे भोसले.

वेरूळचे भोसले 

वेरूळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते. विठोजीराजे त्यांचे धाकटे भाऊ. वेरूळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले. वेरूळ गावची पाटिलकी बाबाजीराजे भोसल्यांकडे होती. मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते, तसेच ते शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. तो काळ फार धामधुमीचा होता. निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशाहाने स्वारी केली होती.

त्या वेळी दौलताबाद ही निजामशाहाची राजधानी होती. तेथे मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता. तो मोठा कर्तबगार व हुशार होता. त्याने दौलताबादजवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली. त्याने निजामशाहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. निजामशाहाने मालोजीराजांना पुणे व सुपे परगण्यांची जहागीर दिली.

भोसल्यांच्या घरी वैभव आले. उमाबाई ही मालोजीराजांची पत्नी. ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती. या उभयतांना दोन मुलगे होते. एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी. शहाजी पाच वर्षांचे असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. विठोजीराजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली.

जाधवांची लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती. जिजाबाईसाठी विठोजीराजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी स्वीकारली. लखुजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते. ते मोठा फौजफाटा बाळगून होते. निजामशाहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली.

शहाजीराजे

निजामशाहाने मालोजीराजांची जहागीर शहाजीराजांना दिली. शहाजीराजे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. मुघल बादशाहाने ती निजामशाही जिंकायचा बेत केला. विजापूरचा आदिलशाहाही त्याला मिळाला, तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. अहमदनगरजवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली.

या लढाईत शरीफजी मारले गेले, पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली. इतकी की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यातून उभयतांत वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले. आदिलशाहाने त्यांना ‘सरलष्कर’ हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. वजीर मलिक अंबर मृत्यू पावला. त्याचा पुत्र फत्तेखान हा मोठा कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले, तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले.MPSC Online

Leave a Comment