मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार

मराठ्यांनी केलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या आरंभी मुघल सत्ता आक्रमक होती, तर मराठ्यांचे धोरण बचावाचे होते. या स्वातंत्र्यसंग्रामाच्या अखेरीस मात्र परिस्थिती उलट झाली. मराठ्यांनी चढाईचे आणि मुघलांनी बचावाचे धोरण स्वीकारले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांनी मुघल सत्तेला नमवून जवळजवळ भारतभर आपला सत्ताविस्तार केला, त्याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत.

शाहू महाराजांची सुटका 

औरंगजेब बादशाहाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला. शाहजादा आझमशाह हा दक्षिणेत होता. बादशाही तख्त हस्तगत करण्यासाठी तो त्वरेने दिल्लीला निघाला. राजपुत्र शाहू त्याच्या ताब्यात होते.

शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतींच्या गादीसाठी कलह होईल आणि मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची होईल, असे आझमशाहाला वाटले. म्हणून त्याने शाहू महाराजांची सुटका केली.

शाहू महाराजांचा राज्याभिषेक

कैदेतून सुटका झाल्यावर शाहू महाराजांनी महाराष्ट्राकडे कूच केले. त्यांना मराठ्यांचे काही सरदार येऊन मिळाले. परंतु महाराणी ताराबाईंनी शाहू महाराजांचा छत्रपतीपदावरील हक्क मान्य केला नाही. पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी खेड येथे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या सैन्यांमध्ये लढाई झाली.

या लढाईत शाहू महाराजांचा विजय झाला. त्यांनी सातारा जिंकून घेतले.स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला. सातारा ही मराठ्यांच्या राज्याची राजधानी झाली. काही काळ शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यातील विरोध चालू राहिला.

इ.स. १७१० मध्ये महाराणी ताराबाईंनी पन्हाळगडावर आपला अल्पवयीन मुलगा शिवाजी (दुसरा) यास छत्रपती म्हणून घोषित केले. तेव्हापासून मराठेशाहीत सातारच्या राज्याखेरीज कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.शाहू महाराजांचे पूर्वायुष्य मुघलांच्या छावणीत गेल्यामुळे त्यांना मुघलांचे राजकारण जवळून पाहायला मिळाले होते.

मुघलांच्या व विशेषतः उत्तर भारताच्या राजकारणामधील खाचाखोचा त्यांना समजल्या होत्या. मुघल सत्तेच्या बलस्थानांची आणि कमतरतांचीही त्यांना चांगली माहिती झाली होती. शिवाय, मुघल दरबारातील प्रभावशाली व्यक्तींशी त्यांचा परिचय झाला होता. या सर्व बाबींचा उपयोग त्यांना बदलत्या परिस्थितीत मराठ्यांच्या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी झाला.

मराठ्यांच्या राज्याचा नाश करण्याचे पूर्वीचे औरंगजेबाचे धोरण त्याच्या वारसदारांनी आता सोडले होते. त्यामुळे आता मुघल सत्तेशी संघर्ष करण्याऐवजी तिचे रक्षक म्हणून पुढे येऊन त्याच भूमिकेतून आपल्या सत्तेचा विस्तार करायचा, असे नवे राजकीय धोरण मराठ्यांनी स्वीकारले.

नवे देवालय बांधल्याने जे पुण्य मिळते, तेच जुन्या देवळाचा जीर्णोद्धार केल्याने मिळते, हे या धोरणाचे सूत्र होते. मुघल सत्तेला जशी वायव्येकडून होणाऱ्या इराणी, अफगाणी आक्रमणांची भीती होती, तसाच आसपासच्या पठाण, राजपूत, जाट, रोहिले यांच्यासारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका होता.

शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळेही मुघल सत्ता आतून पोखरून निघाली होती. यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या साहाय्याची गरज होती.

बाळाजी विश्वनाथ

शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवा केले. बाळाजी मूळचा कोकणातील श्रीवर्धन गावचा. तो कर्तृत्ववान व अनुभवी होता. शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहेत, हे पटवून देऊन अनेक सरदारांना त्याने शाहू महाराजांकडे वळवले.

कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होता. त्याने महाराणी ताराबाईंची बाजू घेतली. त्याने शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले. त्यामुळे त्यांच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमध्ये त्यांनी बाळाजीला कान्होजी आंग्रेविरुद्ध पाठवले. बाळाजीने युद्ध टाळून मुत्सद्देगिरीने कान्होजीस शाहू महाराजांकडे वळवले.

चौथाई-सरदेशमुखीच्या सनदा 

शाहू महाराजांचे आसन महाराष्ट्रात बळकट केल्यानंतर बाळाजीने आपले लक्ष उत्तरेकडील राजकारणाकडे वळवले. औरंगजेब बादशाहाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात दुही व गोंधळ निर्माण झाला होता. तेथे सय्यिद बंधू अब्दुल्ला ( हसन) व हुसैन अली यांचे वर्चस्व निर्माण झाले होते.

त्यांच्या मदतीने बाळाजीने इ.स. १७१९ मध्ये मुघल बादशाहाकडून दख्खनच्या मुघल प्रदेशातून काही ठिकाणी चौथाई, तर काही ठिकाणी सरदेशमुखी वसूल करण्याच्या सनदा मिळवल्या. चौथाई म्हणजे महसुली उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग, तर सरदेशमुखी म्हणजे एक दशांश भाग होय.

पहिला बाजीराव

शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाजीराव (पहिला) याची इ.स. १७२० मध्ये पेशवेपदी नेमणूक केली. पेशवेपदाच्या वीस वर्षांच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला.

निजामाचा पालखेड येथे पराभव

मुघल बादशाह फर्रुखसियर याने निजाम-उल-मुल्क याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. इ.स. १७१३ मध्ये निजामाने हैदराबाद येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बादशाहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुभ्यांतून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते.

याला निजामाचा विरोध होता. त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला. बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवले. त्याने निजामाचा औरंगाबादजवळ पालखेड येथे पराभव केला. तेव्हा त्याने मराठ्यांचा चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला.

मुघल सत्ता कमकुवत झालेली असल्याने उत्तरेला सत्ताविस्तार करण्यास अधिक वाव आहे, हे बाजीरावाने ओळखले होते. शाहू महाराजांनी त्याच्या धोरणाला पाठिंबा दिला.

माळवा

आजच्या मध्यप्रदेशातील माळवा हा भाग मुघलांच्या ताब्यात होता. बाजीरावाने आपला भाऊ चिमाजी आप्पा याच्या नेतृत्वाखाली मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे व उदाजी पवार यांना माळव्यात पाठवले. तेथे त्यांनी आपली ठाणी मजबूत केली.

बुंदेलखंड

बुंदेलखंड म्हणजे आजचा मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश या प्रांतांतील झाशी, पन्ना, सागर वगैरे शहरांच्या परिसरातील प्रदेश होय.

बुंदेलखंडात छत्रसाल राजाने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले होते. अलाहाबादचा मुघल सुभेदार महंमदखान बंगश याने बुंदेलखंडावर हल्ला केला. त्याने छत्रसालास पराभूत केले. तेव्हा छत्रसालाने बाजीरावाला मदतीची विनंती केली.

बाजीराव मोठी फौज घेऊन बुंदेलखंडात गेला. त्याने बंगशाला पराभूत केले. छत्रसालाने बाजीरावाचा मोठा सन्मान केला. अशा रीतीने माळवा व बुंदेलखंड येथे मराठ्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

बाजीरावाने बादशाहाकडे माळव्याच्या सुभेदारीची मागणी केली. त्याने ही मागणी अमान्य केली, म्हणून बाजीराव मार्च १७३७ मध्ये दिल्लीवर स्वारी करण्याच्या उद्देशाने दिल्लीच्या सीमेवर जाऊन धडकला.

भोपाळची लढाई 

बाजीरावाच्या स्वारीमुळे बादशाह अस्वस्थ झाला. त्याने निजामाला दिल्लीच्या रक्षणासाठी बोलावून घेतले. प्रचंड फौजेनिशी निजाम बाजीरावाविरुद्ध चालून गेला. बाजीरावाने भोपाळ येथे त्याचा पराभव केला. निजामाने मराठ्यांना माळव्याच्या सुभेदारीची सनद बादशाहाकडून मिळवून देण्याचे मान्य केले.

पोर्तुगिजांचा पराभव 

कोकण किनारपट्टीवरील वसई आणि ठाणे हे भाग पोर्तुगिजांच्या ताब्यात होते. पोर्तुगीज सत्ताधीश प्रजेवर जुलूम करत. बाजीरावाने आपला भाऊ चिमाजीआप्पा यास त्यांचे पारिपत्य करण्यासाठी पाठवले. त्याने ठाणे व आसपासचा प्रदेश जिंकून घेतला.

त्यानंतर इ.स. १७३९ मध्ये त्याने वसईच्या किल्ल्याला वेढा घातला. तो किल्ला अतिशय मजबूत होता. पोर्तुगिजांजवळ प्रभावी तोफा होत्या. तरीही चिमाजीआप्पाने चिकाटीने वेढा चालवून पोर्तुगिजांना शरण येण्यास भाग पाडले. त्यामुळे वसईचा किल्ला व पोर्तुगिजांचा बराचसा मुलूख मराठ्यांच्या ताब्यात आला.

बाजीरावाचा मृत्यू

इराणचा बादशाह नादिरशाह याने भारतावर स्वारी केली. तेव्हा बाजीराव शाहू महाराजांच्या आज्ञेने मोठी फौज घेऊन उत्तरेला निघाला. तो बऱ्हाणपूरला पोहचला, तोपर्यंत नादिरशाह दिल्लीतून प्रचंड संपत्ती लुटून मायदेशी परत गेला होता. एप्रिल १७४० मध्ये नर्मदाकाठी रावेरखेडी येथे बाजीरावाचा मृत्यू झाला.

बाजीराव हा एक उत्तम सेनानी होता. आपल्या पराक्रमाने त्याने उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने मराठ्यांच्या सत्तेला अखिल भारतीय पातळीवरील एक प्रबळ सत्ता म्हणून स्थान मिळवून दिले. त्याच्या काळात शिंदे, होळकर, पवार, गायकवाड ही घराणी पुढे आली.

Leave a Comment