Naam In Marathi – नाम मराठी व्याकरण

Naam-In-Marathi
                                                                   Naam In Marathi

नाम – नाम म्हणजे कोणत्याही वस्तूला दिलेले नाव.

Naam In Marathi – नाम मराठी व्याकरण

‘वस्तू’ या शब्दाच्या अर्थामध्ये सर्व प्रकारचे पदार्थ, प्राणी व त्यांच्या अंगी वास करणारे गुण व धर्म यांचा अंतर्भाव होतो.

प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे, त्यांना व्याकरणात नामे असे म्हणतात. उदा. पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा, हरी, वामन, साखर, देव, स्वर्ग, अप्सरा, नंदनवन, गोडी, धैर्य, खरेपणा, औदार्य, विद्वत्ता इत्यादी.

निरनिराळ्या वस्तूंच्या, पदार्थांच्या, व्यक्तींच्या नावांना नाम असे म्हणतात. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर असे म्हणता येईल की, ज्यावरून एखादा प्रत्यक्ष किंवा काल्पनिक पदार्थ, प्राणी किंवा त्याचा गुणधर्म यांचा आपल्याला बोध होतो, त्याला नाम असे म्हणतात.

‘मराठी- घटना, रचना, परंपरा’ या ग्रंथात (लेखक अरविंद मंगरूळकर व कृ. श्री. अर्जुनवाडकर यांनी) नामाची व्याख्या करताना म्हटले आहे. वास्तव अथवा मानस सृष्टीतील इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात, त्या शब्दांना नामे असे म्हणतात. ‘

Naam In Marathi – नाम मराठी व्याकरण

नामांचे मुख्य प्रकार तीन

अ) सामान्य नाम

ब) विशेषनाम

क) भाववाचकनाम

 

सामान्यनाम 

एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते, त्याला सामान्यनाम असे म्हणतात. सामान्यनाम त्या वस्तूच्या जातीला दिलेले नाम आहे. उदा. मुलगा, लेखणी, घर, शाळा, नदी इत्यादी. 

(कळप, वर्ग, सैन्य, घड, समिती ही समूहाला दिलेली नामे आहेत. यांना कोणी ‘समुदायवाचक नामे’ म्हणतात. तसेच सोने, तांबे, दूध, साखर, कापड हे संख्येशिवाय इतर परिमाणांनी मोजण्याचे पदार्थ म्हणून त्यांना कोणी पदार्थवाचक नामे असे म्हणतात. पण मराठीत या सर्वांची गणना सामान्यनामातच होते.)

Naam In Marathi – नाम मराठी व्याकरण

 

विशेषनाम

ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो, त्यास विशेषनाम असे म्हणतात.

उदा. रामा, हरी, आशा, हिमालय, गंगा, भारत. विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, सामान्यनाम हे जातिवाचक असते. विशेषनाम हे त्या व्यक्तीचे अथवा वस्तूचे स्वतःचे नाव असते; ते केवळ खुणेकरिता ठेवलेले नाव असते. सामान्यनाम हे त्या जातीतील सर्व वस्तूंत असलेल्या सामान्यपणाला दिलेले नाव असते. सामान्यनाम हे त्या जातीतील सर्व वस्तूंना लागू पडते. विशेषनाम हे एकट्याचे असते.

 

भाववाचक नाम 

ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला ‘भाववाचक नाम’ किंवा ‘धर्मवाचक नाम’ असे म्हणतात.

उदा. धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इत्यादी.

पदार्थाचा गुण किंवा धर्म हा स्वतंत्र किंवा वेगळा असत नाही. तो कोणत्यातरी जड वस्तूच्या अथवा व्यक्तीच्या आश्रयाने राहतो. भाववाचक नामांना वेगळे अस्तित्व नसते. मात्र कल्पनेने ते आहे असे मानून त्याला नाव दिले जाते.

पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिती किंवा क्रिया दाखविणाऱ्या नामांना भाववाचक नामे असेच म्हणतात. उदा. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवितात. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत.

Naam In Marathi – नाम मराठी व्याकरण

सामान्यनाम किंवा विशेषनाम यांनी प्रत्यक्ष किंवा काल्पनिक प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होतो. भाववाचक नामाने प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होत नसून त्यांच्यातील गुणांचा किंवा धर्माचा बोध होतो. सामान्यनामाचे अनेकवचन होऊ शकते, पण विशेषनामे आणि भाववाचक नामे ही एकवचनीच असतात. सामान्यनामे आणि विशेषनामे यांना धर्मिवाचक नामे म्हणतात. ‘धर्मी’ म्हणजे ज्यात धर्म किंवा गुण वास करतात ते.


Sugam Marathi Vyakaran (M R Walambe)


प्रयोग – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

समास – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

अलंकार – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

इतिहास – वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment