Naisargik Pradesh – नैसर्गिक प्रदेश

भौगोलिक स्पष्टीकरण

पृथ्वीवर वेगवेगळ्या भागांत भूस्वरूपे, हवामान, मृदा यांच्यात भिन्नता आढळते. ही भिन्नता प्रामुख्याने त्या-त्या भागांत उपलब्ध सूर्यप्रकाश आणि पाणी यांच्यावर अवलंबून असते. सूर्यप्रकाश व पाणी यांची उपलब्धता विषुववृत्त ते ध्रुवापर्यंत बदलत जाते. 

भूस्वरूपे, हवामान, मृदा या तीन घटकांतील बदलांचा प्रभाव वनस्पती, प्राणी व मानवी जीवन यांच्यावर पडत असल्यामुळे जैवविविधतेत बदल होतो. पृथ्वीवर वेगवेगळ्या खंडांत विशिष्ट अक्षवृत्तांच्या दरम्यान हवामान, वनस्पती व प्राणिजीवन यांत साधर्म्य आढळते.

अभ्यासाच्या दृष्टीने हवामान, वनस्पती व प्राणी यांमध्ये आढळणाऱ्या साधर्म्यामुळे काही प्रदेशांचा वेगळेपणा प्रकर्षाने लक्षात येतो. हे प्रदेश नैसर्गिक घटकांवर अवलंबून असल्याने त्यांना नैसर्गिक प्रदेश म्हणतात. अशा प्रदेशांतील नैसर्गिक पर्यावरणाचा मानवासह सर्व सजीवसृष्टीवर परिणाम झालेला आढळतो. पृथ्वीवरील भूप्रदेश या नैसर्गिक प्रदेशात विभागला जातो.

पाठातील तक्त्यांच्या व नकाशाच्या आधारे त्याची माहिती करून घेऊया.

                                 

मागील तक्त्यामध्ये दिलेले नैसर्गिक प्रदेश विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत विशिष्ट अक्षवृत्तीय भागांत आढळतात. उष्ण तापमान व पाण्याची उपलब्धता यांवरून या नैसर्गिक प्रदेशांचे स्थान व विस्तार निर्धारित होते. या प्रदेशांशिवाय स्थानिक परिस्थितीमुळे काही प्रदेश वेगळे दिसून येतात. यांत प्रामुख्याने मोसमी, भूमध्य व पश्चिम युरोपीय हवामानाच्या प्रदेशांचा समावेश होतो.

पश्चिम युरोपीय व मोसमी हे विशिष्ट वाऱ्यांच्या प्रभावामुळे लक्षात येतात, तर भूमध्य सागरी प्रदेश हा तेथील पावसाळ्याच्या विशिष्ट कालावधीमुळे लक्षात येतो. येथे हिवाळ्यात पाऊस पडतो, म्हणूनच तो इतर प्रदेशांपेक्षा वेगळा दिसून येतो. खालील तक्ता पहा.

                                     

विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे जाताना जैवविविधतेतील बदल उत्तरोत्तर कमी होत जातात. त्यामुळे साधनसंपत्तीच्या उपलब्धतेबाबत मर्यादा येतात. त्याचा परिणाम मानवी व्यवसायांवरही होतो. मॉन्सून प्रदेशात शेती व शेती पूरक व्यवसाय केले जातात.

                                               

विषुववृत्तीय प्रदेशात वनोत्पादनावर आधारित लाकूड कटाई, डिंक, मध, रबर, लाख गोळा करणे इत्यादी व्यवसाय चालतात. तैगा प्रदेशातील वनामध्ये मऊ लाकूड आढळते. त्यामुळे तेथे प्रामुख्याने लाकूडतोड व्यवसाय चालतो, तर टुंड्रा प्रदेशात फक्त शिकार व मासेमारी करावी लागते. गवताळ प्रदेशात अलीकडे विस्तीर्ण शेती केली जाते.

वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशांत पर्यावरण आणि उपलब्ध साधनसंपत्तीमध्ये खूप फरक असतो. साधनसंपत्तीचा वापर हा त्या त्या प्रदेशांतील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे त्या प्रदेशाचा इतिहास व सांस्कृतिक जडणघडण यांचाही लोकजीवनावर प्रभाव असतो.

माहीत आहे का तुम्हांला ?

पृथ्वीवरील एकूण वाळवंटापैकी साधारण पंचवीस टक्के वाळवंटे वाळूची असतात. उरलेली वाळवंटे माळरानांसारखी कातळांनी, छोट्या छोट्या दगडांनी किंवा गोट्यांनी व्यापलेली असतात. काही वाळवंटांमध्ये उंच डोंगर किंवा चित्रविचित्र आकारांच्या कातळांचे सुळके असतात. आपल्या देशातील लडाख किंवा अमेरिकेतील अॅरिझोना येथील वाळवंटे या प्रकारची आहेत.

वाळवंटावरून वाहणारे वेगवान वारे तेथील वाळू उचलून त्यांच्या टेकड्या तयार करतात. यांनाच इंग्रजीत ‘ड्यून्स’ (Dunes) म्हणतात. काही ड्यून्स २०० मीटर उंचीही गाठतात. या टेकड्या एका जागी स्थिर न राहता वाऱ्यामुळे हळूहळू सरकत राहतात. काही वेळेस या टेकड्यांखाली गावेही गाडली जातात.

Leave a Comment