Narayan Meghaji Lokhande – नारायण मेघाजी लोखंडे

Narayan-Meghaji-LokhandeNarayan Meghaji Lokhande

१९ व्या शतकातील कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे ओळखले जातात. म. फुले यांचे एक कर्तबगार, निष्ठावंत, अभ्यासू व निकटवर्तीय सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. ‘दीनबंधू’ या नावाचे सत्यशोधक चळवळीचे एक मुखपत्र १ जानेवारी १८७७ रोजी पुण्यात सुरू झाले होते.

Narayan Meghaji Lokhande – नारायण मेघाजी लोखंडे

हेच पत्र रामजी संतुजी आवटे व नारायणराव लोखंडे या दोघा सत्यशोधकांनी इ. स. १८८० नंतर चालविले. पण दुर्दैवाने इ.स. १८८०-९२ या १२ वर्षांच्या काळातील ‘दीनबंधू’चे मूळ अंक उपलब्ध नाहीत. लोखंडे हे महात्मा फुले यांचे निष्ठावान, हुशार, तडफदार व कर्तृत्ववान असे अत्यंत निकटचे सहकारी होते; पण फुले यांच्याशी त्यांचे मतभेदही झाले होते. लोखंडे हे समाजसुधारक, संपादक व कामगार नेते होते.

जन्म व सुरुवातीचे आयुष्य – लोखंडे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात कव्हेरसर हे होय. ते जातीने फुलमाळी होते. भाजीपाला, फळे-फुले विकून पोट भरण्यासाठी त्यांचे वडील ठाण्यात स्थायिक झाले असावेत. त्यांचा जन्म इ.स. १८४८ चा व त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत ठाण्यातच झाले होते.

फाजलभाई नानशी या खोजा व्यापाऱ्याचा त्यांच्यावर लोभ असल्याने प्रथम रेल्वेत व नंतर टपालखात्यात नोकरी करून फाजलभाई शेठच्याच शिफारशीवर ठाणे येथील नारायणराव मांडवी मिलमध्ये स्टोअरकीपर म्हणून काम करू लागले. लोखंडे यांनी गिरणी कामगारांची स्थिती जवळून पाहिली होती व प्रत्यक्षात अनुभवली होती.

स्वतः नारायण लोखंडे यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने ब्राह्मणाच्या गैरहजेरीत झाला होता. मुंबईतील पहिली कापड गिरणी इ.स. १८५४ मध्ये सुरू झाली. इ.स. १८७२-७३ मध्ये गिरण्यांची संख्या फक्त १८ होती. मुंबईतील परळपासून ते भायखळ्यापर्यंतचा भाग गिरणगाव म्हणून ओळखला जाई.

Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

त्यावेळी कामगारांना साप्ताहिक सुटी मिळत नव्हती. कामाचे तास निश्चित नव्हते. पगाराची तारीखही निश्चित नसे. बालकामगार व स्त्रियांना दिली जाणारी मजुरीही कमी होती. काळोख्या कोंदट जागेत त्यांना काम करावे लागे. या एकूण पाश्र्वभूमीवर लोखंडे यांनी मुंबईतील कामगारांची संघटना बांधण्याचे ठरविले Bombay Millhands Association ही संस्था त्यांनी स्थापन केली.

गिरणगावात १५ दिवस प्रचार करून लोखंडे यांनी २३ सप्टेंबर १८८४ रोजी मुंबईतील परळच्या सुपारी बागेत ४००० कामगारांची एक जंगी सभा भरवली व कामगारांना संघटित करण्याचा पहिला प्रयत्न केला. ही संघटना स्थापन करण्यामागे म. फुले यांचीच प्रेरणा होती.

इ.स. १८८९ मध्ये कापड धंद्यात मंदी आली तेव्हा गिरणीमालकांनी महिन्यातून ८ दिवस गिरण्या बंद ठेवायचा निर्णय घेतला. तोपर्यंत आठवड्यातून एक दिवसही सुटी द्यावयास तयार नसणारे गिरणीमालक आठवड्यातून २ दिवस गिरण्या बंद ठेवू लागले.

तेव्हा लोखंडे यांनी त्यास विरोध केला. कारण कामगारांची उपासमार होत होती. त्यांनी कामगारांची एक सभा मुंबईत महालक्ष्मीच्या शर्यतीच्या मैदानावर बोलावली १०,००० कामगार त्या सभेस उपस्थित होते. त्या सभेत स्त्री कामगारांनीही भाषणे केली.

संघटित कामगारांच्या शक्तीपुढे गिरणी मालकांना नमते घ्यावे लागले. १० जून १८९० रोजी दर रविवारी कामगारांना सुटी देण्याचा निर्णय गिरणीमालकांनी जाहीर केला.

Narayan Meghaji Lokhande – नारायण मेघाजी लोखंडे

इ.स. १८९१ चा फॅक्टरी ॲक्ट : इ.स. १८९० च्या ऑक्टोबरमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या लेथब्रिज आयोगाच्या शिफारशीवर आधारलेल्या कारखान्यासंबंधीचा सुधारित कायदा १ जानेवारी १८९२ पासून अमलात आला. त्यातील तरतुदी पुढीलप्रमाणे :

१) दर ७ व्या वर्षी कारखान्यास रंग द्यावा.

२) कारखान्यात पंखे असावेत.

३) ९ वर्षाखालील मुलांना कामावर घेऊ नये.

४) ९ वर्षांखालच्या मुलांना ९ तासांपेक्षा जास्त काम देऊ नये.

५ ) स्त्रियांना ११ तासांपेक्षा जास्त काम देऊ नये.

६)  ज्या गिरणीत १० पेक्षा जास्त कामगार कामास आहेत तेथे हा कायदा लागू करावा.

७) ५० किंवा अधिक मजूर जेथे चार महिने किंवा त्यापेक्षा जास्त काम करतात अशा ठिकाणांना ‘फॅक्टरी’ म्हणावे.

८) दुपारी अर्धा तास कामगारांना सुटी असावी.

९) सांडपाण्याची व्यवस्था, स्वच्छता, गिरण्यांतील हवेशीरपणा व पाणीपुरवठा याबाबतचे नियम तयार करण्याचे अधिकार स्थानिक सरकारला देण्यात यावेत.

इ.स. १८९९ च्या वरील कायद्याची अंमलबजावणी इ.स. १८९२ मध्ये सुरू झाली. इ.स. १८९२ च्या फॅक्टरी ॲक्ट निर्मितीसाठी लोखंडे यांनी फॅक्टरी कमिशनला जे महत्त्वपूर्ण सहकार्य केले त्याचा विशेष उल्लेख कमिशनने आपल्या अहवालात केला आहे.

नव्या फॅक्टरी ॲक्टची गिरणीमालक अंमलबजावणी करत नाहीत त्याबाबत लोखंडे यांनी अनेक उदाहरणे देऊन ‘दीनबंधू’मधून सातत्याने त्याचा पाठपुरावा केला.

रॉयल कमिशन पुढे कामगारांची व्यथा :- इ.स. १८९१ मध्ये ब्रिटिश सरकारने Royal Commission of Labour स्थापन केले. भावी काळातील उद्योग, व्यापाराच्या योजनेचा आराखडा व अहवाल सादर करण्यासाठी हे कमिशन नेमण्यात आले होते.

उद्योग व्यापाराच्या सर्व भागांतील वास्तवता व माहिती जमा करण्यासाठी या कमिशनच्या ३ समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. या समित्यांनी कामगारांची संघटना, मालक आणि मालकांची संघटना या तिन्ही घटकांना एक प्रश्नावली देऊन चौकशी केली. या कमिशनपुढे लोखंडे यांनी भारतातील कामगारांच्या अवस्थेचे चित्र मांडले.

त्यात त्यांनी कामगारांना करावे लागणारे अतिरिक्त काम, पगारास होणारा विलंब, नोकरीची अशाश्वती, मंदीच्या काळात होणारी कामगार कपात व वेतनकपात, सुटीच्या दिवशी कामगारांना करावी लागणारी सफाई वगैरे प्रश्न मांडले.

Narayan Meghaji Lokhande – नारायण मेघाजी लोखंडे

इ.स. १८९२ हे वर्ष मुंबईतील विविध गिरण्यांतील संपांनी गाजले. या संपाचे मुख्य कारण म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता पगाराच्या दिवशी कामगारांना कमी पगार देणे हे होते. वाढत्या संपांना तोंड देण्यासाठी गिरणी मालकांनी एकजूट करून इ.स. १८९२ मध्ये एक समिती निर्माण केली होती.

गिरण्यांतील मजूर अत्यंत क्षुल्लक कारणांवरून संप करतात अशी गिरणीमालकांची तक्रार होती.  वारंवार होणाऱ्या संपाबाबत मुंबईच्या कामगारांच्या वतीने व्हॉईसरॉयला पिटिशन दाखल करताना ते म्हणले, ‘चौकशीअंती असे दिसेल की, यातले बरेचसे संप हे पगार उशिरा देणे किंवा कमी देणे अशा कारणांनी कामगारांच्या माथी मारलेले आहेत.’

गिरण्यांतील व्यवस्थापकांचा जुलूम व कपटनीतीचे अनेक दाखले लोखंडे यांनी दिले होते. मुंबईतल्या गिरणी कामगारांमध्ये स्त्रियांचे प्रमाण मोठे होते. इ.स. १८९० मध्ये मुंबईतील रेसकोर्स मैदानावर प्रचंड सभेत दोन कामगार स्त्रियांनी भाषणे केल्याचा उल्लेख आहे.

जेकब मिलमधील स्त्रियांना ९ – १० तास काम करूनही ५-६ रु. एवढीच मजुरी पडे. त्या स्त्रियांना त्यांनी न्याय मिळवून दिला. गिरण्यांचे मालक व मजूर यांच्यातील मध्यस्थ म्हणजे व्यवस्थापक हे व्यवस्थापक प्रामुख्याने ब्राह्मण असत. या ब्राह्मण व्यवस्थापकांवर लोखंडे तसेच मिलहँड असोसिएशनच्या इतर नेत्यांचाही राग होता.

मिलहँड असोसिएशनची सभा उधळण्याचे काम ग्रीव्हज कॉटन मिलच्या व्यवस्थापकांनी केले. लोखंडे यांच्या कामगार संघटनेची प्रेरणा सत्यशोधक चळवळीची होती. सर्व माणूस पातळीवर शोषणमुक्त व्हावा हे या चळवळीचे ध्येय होते.

Narayan Meghaji Lokhande – नारायण मेघाजी लोखंडे

‘दीनबंधू’ त लोखंडे यांनी शूद्रांचे प्रश्न मांडले :- १ जानेवारी १८७७ रोजी ‘दीनबंधू’ हे ब्राह्मणेतरांचे पहिले पत्र कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले होते. इ.स.१८८० मध्ये ‘दीनबंधू’ हे पत्र नारायण मेघाजी लोखंडे व रामजी संतुजी आवटे या दोघांनी मुंबईहून केले. संपादकाची मुख्य जबाबदारी लोखंडे यांचीच होती.

लोखंडे यांचे संपादकीय सुरू लिखाण अतिशय प्रभावी असे. एखाद्या मुद्यावर आपली मते मांडताना ते अतिशय प्रभावीपणे मांडत. संपादकीय सदरात तत्कालीन राजकीय व सामाजिक प्रश्नांवर लेख असत. इ.स.१८८० ते १८९२ पर्यंतचे या पत्राचे मूळ अंक उपलब्ध नसले तरी Reporter on Native Newspapers या सरकारच्या गोपनीय साप्ताहिक पत्रात ‘दीनबंधू’तील मजकुराचे इंग्रजी भाषांतर उपलब्ध आहे.

Narayan Meghaji Lokhande – नारायण मेघाजी लोखंडे

शिक्षण खात्यातील ब्राह्मण पंतोजी शूद्रांच्या शिक्षणाच्या आड कसे येतात हे एका उदाहरणासह ‘दीनबंधू’च्या २० जून १८८० च्या अंकात मांडले होते. देशाचे भवितव्य हे कष्टकऱ्यांच्या श्रमांवर, उत्पादकतेवर अवलंबून असल्याने सरकारने त्यांच्या शिक्षणासाठी वाहून घ्यायला हवे असे ‘दीनबंधू’चे संपादक लोखंडे ठणकावून सांगतात.

शूद्रातिशूद्रांच्या शिक्षणासाठी विशेष व्यवस्था, विशेष संधी आणि राखीव जागांचा विचार पुढील काळातील ‘दीनबंधू’मधून वारंवार मांडला होता. पुढे इ.स.१८८१ मध्ये पुण्याहून ‘केसरी’ व ‘मराठा’ ही पत्रे सुरू झाली. ‘केसरी’ व ‘दीनबंधू’ या दोन पत्रांचे सामाजिक सुधारणांबाबतच्या प्रश्नांवरून अनेकदा खटके उडत असत.

पंडिता रमाबाईवर सातत्याने टीका करणाऱ्या केसरी या पत्राची लोखंडे यांनी अत्यंत कडक शब्दांत हजेरी घेतली होती. सक्तीच्या केशवपनाच्या प्रश्नातही आपले मत लोखंडे यांनी आग्रहाने मांडले आहे. केशवपनाची समस्या ही ब्राह्मण वर्गाची होती. तिच्याविरुद्ध लिहून, बोलून ही दुष्ट प्रथा बंद व्हावी यासाठी उच्च वर्गातील सुधारक प्रयत्न करीत होते.

Narayan Meghaji Lokhande – नारायण मेघाजी लोखंडे

लोखंडे यांनी मुंबईतील न्हाव्यांना एकत्र आणून सामूहिकपणे विधवा केशवपनावर त्यांनी बहिष्कार टाकावा या कामी पुढाकार घेतला. ‘दीनबंधू’त लेखमाला लिहून त्यांनी केशवपन प्रथेवर आपली मते परखडपणे मांडली. इ.स. १८९० मध्ये मुंबईतील न्हाव्यांच्या ३-४ सभा होऊन केशवपनाला धर्मशास्वात आधार नसून हे राक्षसी प्रवृत्तीचे क्रूर कृत्य आहे असे त्यांनी न्हाव्यांना सांगितले, न्हाव्यांनी सर्वसंमतीने केशवपन न करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयास नारायण लोखंडे यांचे प्रयत्न कारणीभूत होते. हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीतींना लोखंडे यांचा विरोध होता. तरुण विधवांनी वाट चुकू नये म्हणून त्यांना पुनर्विवाहाची परवानगी असावी, असे ते आग्रहाने म्हणत. हिंदू धर्मात विविध धर्मबाह्य गोष्टी केल्याबद्दल प्रायश्चित्त घेण्याचा ज्या शिक्षा सांगितल्या होत्या त्यावर लोखंडे यांनी टीका केली होती, धर्म व जातिभेदांविषयी उच्चवर्णीय सुशिक्षितांच्या पारंपरिक मतांवर लोखंडे यांनी वारंवार लिखाणातून हल्ले केले.

लोखंडे यांनी इ.स. १८८०-९० या दशकात सत्यशोधक विचारांचा प्रसार ‘दोनबंधू’च्या माध्यमातून केला. शूद्रातिशूद्रांच्या चळवळीचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू’ ने भरीव कामगिरी केली. ‘मराठा’ म्हणजे सर्व ब्राह्मणेतर जाती अशा तऱ्हेची शूद्रातिशूद्रांच्या एकात्मतेची संकल्पना लोखंडे यांनी मांडली होती.

Narayan Meghaji Lokhande – नारायण मेघाजी लोखंडे

‘मराठा ऐक्येच्छू सभा’ ही संस्था केवळ मराठा जातीतील मुलांनाच साहाय्य करू लागली तेव्हा ‘मराठा’ या शब्दाचा अर्थ फुले यांच्याप्रमाणेच लोखंडे यांनाही पसंत पडला नाही. इ.स. १८८७ च्या मे महिन्यात लोखंडे व त्यांच्या सत्यशोधक सहकाऱ्यांनी मराठा ऐक्येच्छू सभा स्थापन केली होती.

विद्येत मागासलेल्या मराठी भाषा बोलणाऱ्या हिंदू लोकांत म्हणजे मराठे, वाणी, भंडारी, कुणबी, सुतार, लोहार, कुंभार, न्हावी, शेतकरी व कारागीर लोकांत विद्येचा प्रसार करणे, त्यांच्यातील वाईट चालीरीती दूर करणे, विविध जातीत समता, ऐक्य व प्रेमभाव वाढीस लावणे हे त्या संस्थेचे ध्येय होते. इ.स. १८९०-९५ या ५ वर्षाच्या काळात लोखंडे त्या संस्थेचे अध्यक्ष ५ होते. शूद्रातिशूद्रांचे हक्क जिथे डावलले जात तेथे लोखंडे कडाडून हल्ले चढवत.

सत्यशोधक समाजातील कार्य :- लोखंडे हे वक्ते, कुशल संघटक होते. कल्पकता, अभ्यासू वृत्ती हे गुणही त्यांच्या अंगी होते. ते स्वतः कट्टर सत्यशोधक होते. म. फुले यांच्याप्रमाणेच त्यांनीही उपलब्ध असलेल्या सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केला होता. त्यांच्यामुळे मुंबईतील डोंगरी मार्केट, भायखळा या भागात सत्यशोधकांची चळवळ पोहोचली.

विदर्भात सत्यशोधक चळवळीचा प्रसार करण्यासाठी म्हणून लोखंडे विदर्भात गेले होते. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर या तालुक्यात राहून (इ.स. १८८६) त्यांनी सत्यशोधक चळवळीच्या तत्त्वांचा विचारांचा प्रसार केला. सर्व धर्मग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला होता.

Narayan Meghaji Lokhande – नारायण मेघाजी लोखंडे

सत्यशोधक निबंधमाला अथवा हिंदू धर्माचे खरे ज्ञान भाग १, २ या पुस्तिका इ.स. १८८६ मध्ये लोखंडे यांनी लिहिल्या होत्या. ब्राह्मण म्हणजे जो ब्रह्म जाणतो, जो ज्ञानी असतो तो ब्राह्मण अशी व्याख्या त्यांनी केली होती. केवळ जन्मावर, जातीवर नव्हे तर गुणावर त्याला समाजात स्थान मिळाले पाहिजे असे ते आग्रहाने सांगत. ‘पंचदर्पण’ ही छोटी पुस्तिका त्यांनी लिहिली.

इ.स. १८७६ त्यात स्त्री शिक्षण, लग्नाचे वय, पुनर्विवाह, विधवा विवाह, लग्नातील उधळपट्टी, व्यसने, घटस्फोट, सहकार बचत यासंबंधी त्यांचे विचार / नियम त्यांनी मांडले. आजही त्यांचे या छोट्या पुस्तिकेतील विचार/नियम मार्गदर्शक आहेत. हे विचार सत्यशोधक समाज व चळवळीस जवळचे होते.

लोखंडे यांचे फुले, भालेकर यांच्याशी मतभेद :- लोखंडे हे स्वतंत्र बुद्धीचे होते. त्यांचे म. फुले व कृष्णराव भालेकर यांच्याशी मतभेद झालेले दिसतात. इ.स.१८८३ मध्ये ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथाच्या प्रकाशनावरून फुले लोखंडे यांच्यात मतभेद झाले होते. ‘शेतकऱ्याचा आसूड’ची भाषा जळजळीत, कमालीची तिखट होती.

त्याशिवाय वाचकास लक्षात येईल या पद्धतीने प्रतिष्ठित पुढाऱ्यांचे वाभाडे त्या ग्रंथात काढल्याने अब्रुनुकसानीच्या खटल्यास तोंड द्यावे लागेल अशी भीती एक संपादक म्हणून लोखंडे यांना वाटली होती. ‘दीनबंधू’त शेतकऱ्यांचा आसूड’ चे दोन भाग छापल्यानंतर पुढचे ३ भाग छापण्यास लोखंडे यांनी नकार दिला होता.

Narayan Meghaji Lokhande – नारायण मेघाजी लोखंडे

म. फुले यांना मुंबईतील नागरिकांच्या वतीने ‘महात्मा’ ही पदवी देण्याचा कार्यक्रम लोखंडे यांनीच आयोजित केला होता.लोखंडे व भालेकर यांच्यातही मतभेद झालेले दिसतात. हे मतभेद ‘दीनबंधू’च्या संबंधाने झाले होते. टिळक-आगरकरांची डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांना मानपत्र देऊन सत्कार करण्याची कल्पना ही पूर्णपणे लोखंडे यांची होती. हे मानपत्र ‘दीनबंधू’च्या २९ ऑक्टोबर १८८२ च्या अंकात छापले.

गणपती उत्सवाबाबत त्यांची भूमिका वास्तवावर आधारित होती. केवळ कर्मकांड व देखाव्यात अडकलेल्या गणेशोत्सवापासून शूद्रातिशूद्रांनी दूर राहावे असे त्यांनी सुचवले होते. गपणती उत्सवाला सक्तीची वर्गणी, पैशाची उधळपट्टी, रस्त्यातच मंडप घालणे, आदी अनिष्ट प्रवृत्ती निर्माण झाल्या होत्या.

गणपती उत्सवाचे खूळ त्रासदायक होताच त्यावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली होती.  इ.स. १८९६ च्या प्रारंभी इंग्रज राज्यकर्त्यांनी नारायण लोखंडे यांना ‘रावबहादूर’ हा किताब (हिंदू-मुस्लिम दंग्याच्या वेळी केलेल्या सलोख्याच्या कामाबाबत) दिला होता, पण लोखंडे हे केवळ माळी जातीत जन्मास आले म्हणून त्यांना ही पदवी दिली गेली अशी टीका ‘केसरी’ने ७ जानेवारी १८९६ च्या अंकात केली होती.

‘केसरी’ ची टीका लोखंडे यांच्यावर अन्याय करणारी होती. सत्यशोधक चळवळ, कामगार चळवळ व विशेषतः जातीय दंगल शमविण्यामध्ये लोखंडे यांनी बजावलेल्या भूमिकेमुळे त्यांना ‘रावबहादूर हा किताब ब्रिटिशांनी दिला होता. त्यांना ब्रिटिशांनी जस्टिस ऑफ पीस (जे.पी.) हा किताबही दिला होता, असे किताब/पदव्या ब्राह्मण जातीतील अनेकांना मिळाले होते. पण त्याबाबत ‘केसरी’ने कधीच तक्रार केली नव्हती.

Narayan Meghaji Lokhande – नारायण मेघाजी लोखंडे

मृत्यु – मुंबईत १८९६ मध्ये प्लेगची मोठी साथ उसळली. या साथीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. याही वेळी पुढाकार घेऊन लोखंडे यांनी सरकारी मदतीने प्लेग्रस्तांसाठी एक ‘मराठा इस्पितळ’ काढले; परंतु दुर्देवाने ९ फेब्रुवारी १८९७ रोजी लोखंडे प्लेगच्या साथीने ठाणे येथे मृत्यू पावले.

त्यांच्या मृत्यूनंतर ‘दीनबंधू’ पत्र लक्ष्मणराव वाघमारे, वासुदेव बिजें, तान्हुबाई बिर्जे यांनी चालविले. लोखंडे हे ब्राह्मणद्वेष्टे आहेत असा आरोप केला जाई. लोखंडे यांनी ‘दीनबंधू’ या पत्रातून या आरोपाचे वारंवार खंडन केले आहे. ‘बालबोध’ मासिकाचे संपादक विनायकराव ओक यांनी इ.स. १९०० सालच्या डिसेंबरच्या अंकात लोखंडे यांचे संक्षिप्त चरित्र प्रसिद्ध केले.

त्यात म्हटले होते, ‘काही लेख (दीनबंधूतील) ब्राह्मण जातीच्या संबंधाने फारच कडक असल्यावरून त्यांना काही लोक ‘ब्रह्मद्वेष्टे’ म्हणत असत. परंतु तसे काही खरोखर नव्हते. ते कोणत्याही विवक्षित जातीचा द्वेष करत नसत. ते गोपाळराव हरी देशमुखांसारख्या ब्राह्मणांची स्तुती करत आणि प्रसंगी स्वजातीयाने काही वाईट केल्यास ते त्याला उघडउघड दोष देत.

नारायण मेघाजी लोखंडे यांची उपेक्षा झाली आहे. त्यांनी स्वतःबद्दल काही लिहून ठेवले नाही; प्रसिद्धीपासून ते अलिप्त होते. आचार्य जावडेकर यांच्या ‘आधुनिक भारत’ या ग्रंथात त्यांच्या कार्याची नोंदच नाही, हे दुर्दैव होय. इतिहासकारांनी त्यांच्या कार्याची नोंद घेतली नाही. इ.स. २००० मध्ये मनोहर कदम यांनी ‘भारतीय कामगार चळवळीचे जनक – नारायण मेघाजी लोखंडे’ हे मूळ संदर्भ यावर आधारित पुस्तक प्रकाशित करून महाराष्ट्राला त्यांच्या जीवनकार्याची ओळख करून दिली आहे. 

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज चरित्र

Leave a Comment