नवे विचार : नवी दृष्टी

इंग्रजांच्या राजवटीत पाश्चात्त्य शिक्षणपद्धती भारतात सुरू झाली. देशात नवनव्या कल्पना व विचार येऊ लागले. भारतीय समाजातील जातिभेद, स्त्री-पुरुष विषमता, सतीची चाल, बालविवाह अशा अनिष्ट चालीरीतींमुळे भारतीय समाजाची प्रगती खुंटली होती. ही स्थिती बदलण्यासाठी आधुनिक शिक्षण घेतलेल्या भारतीय विचारवंतांनी प्रयत्न सुरू केले. त्यातून समाजसुधारणा चळवळीची सुरुवात झाली.

राजा राममोहन रॉय : भारतातील समाजसुधारणा चळवळीचे राजा राममोहन रॉय हे आय प्रवर्तक होते. त्यांनी हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन या धर्मांचा अभ्यास केला होता. सर्व धर्मांची शिकवण सारखीच आहे, असे त्यांचे ठाम मत होते. बालविवाह, सतीची चाल या अनिष्ट रूढींवर त्यांनी प्रखर टीका केली. त्यांच्या प्रयत्नाने इ. स. १८२९ मध्ये ब्रिटिश सरकारने सतीची चाल कायदयाने बंद केली.

Raja Ram Mohan Roy

भारतातील शिक्षणपद्धतीत बदल केल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही, असे त्यांना वाटे. त्यांनी पाश्चात्त्य शिक्षणाचा पुरस्कार केला. आपल्या विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी ‘ब्राम्हो समाज’ ही संस्था स्थापन केली. समाजाला त्यांनी समानतेचा व बंधुभावाचा संदेश दिला. राजा राममोहन रॉय यांना ‘आधुनिक भारताचे जनक’ असे म्हणतात.

गोपाळ हरी देशमुख : ‘प्रभाकर’ या साप्ताहिकात गोपाळ हरी देशमुख हे ‘लोकहितवादी’ या टोपण नावाने लेखन करत. आधुनिक शिक्षणातून समाजसुधारणा घडेल, असा त्यांना विश्वास होता. समाजातील जातिभेद, धर्मभोळेपणा यांवर त्यांनी टीका केली. विधवाविवाहाचा पुरस्कार केला. वाचनालयाची चळवळ त्यांनी महाराष्ट्रभर सुरू केली. आपल्या देशात तयार होणारा मालच वापरावा, असा त्यांचा आग्रह होता.

Gopal Hari Deshmukh

स्वामी दयानंद सरस्वती : समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, मूर्तिपूजा यांना विरोध करणारे स्वामी दयानंद सरस्वती हे थोर विचारवंत होते. बालविवाह, जातिभेद याला त्यांनी प्रखर विरोध केला. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांना शिक्षणाचा हक्क आहे, असे त्यांचे मत होते. आपले विचार सामान्य लोकांपर्यंत पोहचावेत म्हणून त्यांनी ‘आर्य समाज’ या संस्थेची स्थापना केली.

Swami Dayanand Sarasvati

महात्मा जोतीराव फुले : महात्मा फुले यांनी समाजसुधारणांचे विचार मांडले. त्यांनी जातिभेदाला विरोध केला. मुलींना व दलितांना शिक्षण घेता यावे म्हणून पुण्यात शाळा काढल्या. सर्व लोकांना आधुनिक शिक्षण मिळावे, असा त्यांचा आग्रह होता. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे, अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली.

Mahatma Jyotirao Phule

‘सत्यशोधक समाज’ ही संस्था स्थापन करून त्याद्वारे त्यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ही मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. देशाचे ऐक्य व स्वातंत्र्य यांसाठी सामाजिक समता आवश्यक असल्याचे सांगितले. आपल्या लिखाणातून महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडली.

सावित्रीबाई फुले : सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या. समाजाच्या विरोधाला न जुमानता मुलींना शिकवण्याचे कार्य त्यांनी केले. अनाथ बालकांचे संगोपन केले. महात्मा फुले यांच्या निधनानंतरही सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाचे कार्य चालू ठेवले.

Savitribai Phule

सर सय्यद अहमद खान : मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी सर सय्यद अहमद खान यांनी मोलाची कामगिरी केली. त्याकाळच्या मुस्लिम समाजात पाश्चात्त्य शिक्षणाचा अभाव होता. मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी या शिक्षणाची गरज आहे, हे त्यांनी पटवून दिले. मुस्लिम स्त्रियांनी पाश्चात्त्य शिक्षण घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी अलीगढ येथे शिक्षण संस्था स्थापन केली.

Sir Saiyyad Ahamad Khan

महादेव गोविंद रानडे : न्यायमूर्ती रानडे हे समाजसुधारणा चळवळीत अग्रभागी असलेले विचारवंत होते. त्यांनी जातिभेदाला विरोध केला. स्त्री शिक्षण आणि विधवाविवाहाचा पुरस्कार केला. पाश्चात्त्य शिक्षणाचे महत्त्व त्यांनी समाजाला पटवून दिले. समाजाची सर्वांगीण उन्नती व्हावी, यासाठी ते सतत झटले. भारतात औद्योगिक प्रगती व्हावी, असा त्यांचा आग्रह होता.

Mahadeo Govind Ranade

स्वामी विवेकानंद : स्वामी विवेकानंद यांनी सर्व जगाला मानवजातीच्या सेवेचा संदेश दिला. दीन-दुबळ्या लोकांना मदत करणे, मानवाची निःस्वार्थीपणे सेवा करणे हाच खरा धर्म आहे, अशी त्यांची शिकवण होती. अंधश्रद्धा, कर्मकांड, अनिष्ट चालीरीती यांवर त्यांनी कडाडून हल्ला केला. जातिभेदाला विरोध केला. समाजाच्या सेवेसाठी त्यांनी ‘रामकृष्ण मिशन’ या संस्थेची स्थापना केली.

Swami Vivekanand

ताराबाई शिंदे : ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्रीपुरुषतुलना’ या आपल्या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडली. अनिष्ट रूढी, परंपरा यांवर टीका केली. स्त्रियांची दुःखे दूर व्हावीत, त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे, असे विचार त्यांनी मांडले.

पंडिता रमाबाई : स्त्रियांची स्थिती सुधारण्याच्या कार्यात पंडिता रमाबाई यांनी महत्त्वाचे कार्य केले. बालविवाहास त्यांनी विरोध केला. विधवाविवाहास प्रोत्साहन दिले. विधवांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी ‘शारदा सदन’ ही संस्था स्थापन केली. 

Pandita Ramabai

समाजसुधारणेचे असेच विचार पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, वीरेशलिंगम पंतलू, गोपाळ गणेश आगरकर, नारायण गुरू, महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहूमहाराज इत्यादींनी मांडले. आधुनिकता व मानवता या मूल्यांवर ही सुधारणा चळवळ आधारित होती. त्यामुळे समाजात चैतन्य निर्माण झाले. यातूनच राष्ट्रीय चळवळीचा उदय झाला.

Leave a Comment