Pani – पाणी

पाण्याचे प्रदूषण

पाण्यात इतर पदार्थ मिसळले की पाणी अशुद्ध होते. काही पदार्थ पाण्यात तरंगत राहतात. त्यामुळे पाणी अस्वच्छ किंवा गढूळ दिसते. काही पदार्थ पाण्यात विरघळतात आणि दिसेनासे होतात. पाण्यात मिसळलेले पदार्थ सजीवांसाठी अपायकारक असले तर ते पाणी प्रदूषित आहे असे आपण म्हणतो. नदया, सरोवरे हे आपले पाण्याचे स्रोत आहेत.

सांडपाणी आणि त्याची विल्हेवाट

शहराचे, गावाचे सांडपाणी एकत्र करून सोईच्या ठिकाणी मोठ्या जलसाठ्यात सोडतात. राहत्या इमारतींमधून, तसेच उद्योग, कारखाने यांतून निघणाऱ्या सांडपाण्यात अनेक प्रकारच्या अशुद्धी असतात. यांपैकी काही विरघळलेल्या तर काही न विरघळलेल्या असू शकतात.

                                                         
मैलापाण्यात रोग पसरवणारे सूक्ष्मजीव असू शकतात. तर कारखान्याच्या सांडपाण्यात विषारी पदार्थ असण्याची अधिक शक्यता असते. हे सर्व सांडपाणी जसेच्या तसे जलसाठ्यात सोडले तर जलस्रोतांचे प्रदूषण होऊन ते घातक ठरते. असे पाणी पिण्यासाठी किंवा इतर कुठल्याच कामासाठी वापरता येत नाही.

म्हणून सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते बाहेर सोडण्याची कारखानदारांवर सक्ती आहे. तसेच गावाचे सांडपाणी, मैलापाणी जलस्रोतांमध्ये सोडण्यापूर्वी त्यांवर शुद्धीकरण प्रक्रिया करतात. असे केल्यामुळे जलप्रदूषण टाळता येते. नदीच्या वाहत्या पाण्याचे नैसर्गिकरीत्याही काही प्रमाणात शुद्धीकरण होत असते. याशिवाय गावाला पाणीपुरवठा करण्यापूर्वी त्याचे शुद्धीकरणही करण्यात येते. 

पाण्याचे शुद्धीकरण

निसर्गात उपलब्ध असलेल्या पाण्यामध्ये अनेक पदार्थ मिसळले जातात, उदा., जमिनीवर पोहोचण्यापूर्वी पावसाच्या पाण्यामध्ये हवेतील धूलिकण, जीवाणू, पराग आणि कार्बन डाय-ऑक्साइड व ऑक्सिजन ह्यांसारखे वायू मिसळतात. जमिनीवरून पाणी वाहत असताना तिच्यावर असणारे पदार्थ पाण्याबरोबर वाहत जातात. 

जमिनीमध्ये मुरणाऱ्या पाण्यामध्ये मातीमधील कार्बनी (सेंद्रिय) व अकार्बनी पदार्थ विरघळतात.  थोडक्यात, पाण्याचा कोणताही वापर करण्यापूर्वी त्याच्यामध्ये अनेक पदार्थ मिसळतात, त्यांमध्ये भर पडते ती पाण्याच्या विविध वापरांमुळे.  असे प्रदूषित पाणी शुद्ध केल्याशिवाय कोणत्याच कामासाठी वापरता येत नाही.  पाणी कोणत्या मर्यादेपर्यंत शुद्ध करावे हे त्याच्या वापरावर अवलंबून असते.

                                                                                   

उदा. घरगुती वापरासाठी पाणी रंगहीन, वासहीन, चांगल्या चवीचे आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षित असले पाहिजे. औद्योगिक वापरासाठी पाण्यामध्ये उत्पादन यंत्रणेवर अनिष्ट परिणाम करणारे आणि तयार मालाची प्रत बिघडविणारे पदार्थ असता कामा नयेत. शेतीसाठी वापरण्याच्या पाण्यामध्ये मातीवर आणि पिकांवर दुष्परिणाम करणारे पदार्थ असता कामा नयेत.

पृथ्वीवरील पाण्याचा एकूण साठा तिच्या जन्मापासून आजपर्यंत थोडासुद्धा वाढलेला नाही, उलट वाढती लोकसंख्या आणि तिच्या अनुषंगाने वाढते औद्योगिकीरण आणि सतत उंचावत जाणारे राहणीमान ह्यांमुळे पाण्याची मागणी एकसारखी वाढत आहे, पण त्याची उपलब्धता मात्र मर्यादित आहे.  म्हणून एकदा वापरलेल्या पाण्याचे शुद्धीकरण, त्याचा काटकसरीने वापर करणे आणि त्याचा पुनर्वापर करणे हे क्रमप्राप्तच होते.

दुष्काळ

बाष्पीभवनामुळे पाण्याची सतत वाफ होत असते. त्यामुळे अवर्षण अनुभवणाऱ्या भागांतील नदया, तळी, विहिरी, बंधारे, धरणे यांतील पाण्याची पातळी बाष्पीभवनामुळे कमी कमी होते किंवा त्यांपैकी काही कोरडेही पडतात. तसेच जमीनही कोरडी पडते. अशा परिस्थितीत जनावरांना आणि आपल्यालाही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते, शेतीसाठीही पाणी मिळत नाही.

म्हणजेच दुष्काळ पडतो. दुष्काळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. दुष्काळात धान्य आणि चारा मिळणे कठीण होते. आपल्या राज्यात देशात किंवा जगाच्या एखादया भागात दुष्काळ पडल्याचे तुम्ही ऐकले असेल. ज्या भागात दुष्काळ पडतो तेथील लोकांना विपरित परिस्थितीशी सामना करावा लागतो. त्या भागातील प्राणी, वनस्पती यांनाही दुष्काळाचा तडाखा बसतो.

शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागांतील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवले जाते. तसेच वेळप्रसंगी धान्य, चारा व पाण्याचा पुरवठा केला जातो. पाळीव जनावरांची काळजी घेण्यासाठी चारा छावण्या उभारल्या जातात.

जलव्यवस्थापन

पावसामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा पाणी उपलब्ध होते. सर्वसाधारणपणे आपल्याला वर्षातून चार महिने पावसाचे पाणी मिळते. पावसाचे पाणी साठवले नाही, तर आपल्या दैनंदिन गरजांसाठी आपल्याला पाणी उपलब्ध होणार नाही.

                                                                                       

‘पावसाचे पाणी थांबवायला शिका.
थांबलेल्या पाण्याला जिरवायला शिका.’

                                                                                 

वर्षभर पाण्याची गरज भागवण्यासाठी पावसाचे पाणी अडवावे लागते. पाणी अडवले की, ते जमिनीत जिरते. भूजलाचा साठा वाढल्याने झाडांना पाणी मिळते, तसेच विहिरींना पाणी मिळते आणि शेती करणे शक्य होते. पाणी जमिनीत जिरण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. मोठी धरणे बांधली जातात, परंतु सर्व ठिकाणी धरणे बांधणे शक्य नसते.

                                                                         

अशा वेळी लहान तलावांची निर्मिती करणे, उतारावर लहान बंधारे बांधणे, आडवे चर खणणे, गावातील ओढे, नाले यांवर बांध घालून पाणी अडवणे अशी कामे शासन आणि नागरिक एकत्र येऊन करतात. काही ठिकाणी नदीच्या पात्रात विहिरी खोदून तेथे पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाते.

                                                                           

काही ठिकाणी घरांच्या छतांवर पडणारे पावसाचे पाणी पन्हाळ्याच्या मदतीने अंगणात ठेवलेल्या टाक्यांमध्ये साठवता येते. अशा सर्व पद्धतींमुळे जास्तीत जास्त पाणी साठवले जाते. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे तसेच पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे किंवा टाक्यांमध्ये साठवणे महत्त्वाचे असते. अशा पद्धतीने पावसाळ्यानंतरच्या काळातही पाणी उपलब्ध होईल अशी सोय करणे यालाच ‘जलव्यवस्थापन’ म्हणतात.

Leave a Comment