प्रसारमाध्यमे आणि इतिहास

प्रसारमाध्यमांची ओळख

‘प्रसारमाध्यमे’ या शब्दात प्रसार आणि माध्यमे असे दोन शब्द आहेत. प्रसार याचा अर्थ दूरवर पोहचवणे. एखादी माहिती आपण एखादया माध्यमाच्या साहाय्याने दूरवर पोहचवू शकतो. पूर्वीच्या काळी राजाला एखादी बातमी संपूर्ण राज्यात पोहचवायची असेल तर त्यासाठी कित्येक दिवस लागायचे. पूर्वी गावोगाव दवंडी पिटवत असत. एकाकडून दुसऱ्याला दुसऱ्याकडून तिसऱ्याला असा बातमीचा प्रवास व्हायचा.

प्रसारमाध्यमांचा इतिहास 

भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर मुद्रणकला, वर्तमानपत्रे सुरू झाली. वर्तमानपत्रांमुळे छापील बातमी सगळीकडे पोहचण्यास मदत होऊ लागली. वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन झाले.

वर्तमानपत्रे : मुख्यतः बातम्या, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले, ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे ‘वर्तमानपत्र’ होय. वर्तमानपत्रे स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पुरवण्याचे काम करतात. चालू घडामोडींच्या नोंदींचा वर्तमानपत्रे म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे.

वर्तमानपत्रांचे पूर्वसूरी : इजिप्तमध्ये इसवीसन पूर्वकाळात सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत. प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढत व ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात. यात देश व राजधानीतील घटनांची माहिती असे. ज्युलिअस सीझरच्या आधिपत्याखाली ‘ॲक्टा डायन’ (डेली ॲक्ट – रोजच्या घटना) नावाची वार्तापत्रे, रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत.

लोकांपर्यंत सरकारी निवेदने पोहचवण्याचा तो एक प्रभावी मार्ग होता. सातव्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत असत. इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्त्वाच्या घटनांची पत्रके अधूनमधून वाटत असत. धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी फिरस्ते तेथील स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगत असत. राजांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी असत. ते ताज्या बातम्या राजदरबारात पाठवत.

बेंगॉल गॅझेट : भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र २९ जानेवारी १७८० रोजी सुरू झाले. ‘कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर’ किंवा ‘बेंगॉल गॅझेट’ या नावाने ते ओळखले जाते. जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने ते सुरू केले.

Augustus Hiki

दर्पण : ‘दर्पण’ हे पत्र १८३२ साली मुंबईत सुरू झाले. बाळशास्त्री जांभेकर हे ‘दर्पण’चे संपादक होते. ‘दर्पण’च्या अंकातील बातम्यांमधून आपणांस राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास सापडतो. उदा.,

(१) कंपनी सरकारच्या तीन इलाख्यांतील जमाखर्चाची यादी

(२) या देशावर रशियनांचा हल्ला होण्याचे भय

(३) शहर साफ ठेवण्याकरिता मंडळीची नेमणूक

(४) हिंदू विधवांचा पुनर्विवाह

(५) कोलकाता येथे थिएटरची सुरुवात

(६) राजा राममोहन रॉय यांची इंग्लंडमधील कामगिरी.

Balshastri Jambekar

यावरून तत्कालीन परिस्थितीवर प्रकाश पडतो.

प्रभाकर : हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केले. त्यात फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास (फ्रेंच राज्यक्रांती), लोकहितवादी (गोपाळ हरी देशमुख) यांची समाजप्रबोधनपर ‘शतपत्रे’ प्रसिद्ध झाली.

ज्ञानोदय : ‘ज्ञानोदय पत्रात १८४२ मध्ये आशिया खंडाचा व १८५१ मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला. मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ज्ञानोदयकडे जातो. विजेच्या साहाय्याने बातमी पोहचवण्याचे यंत्र म्हणजे टेलिग्राफ १८५२ पासून सुरू झाल्याची माहिती ‘ज्ञानोदय’ मधून मिळते. भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची बातमी ज्ञानोदयमध्ये ‘चाक्या म्हसोबा’ शीर्षकांतर्गत छापून आली.

१८५७ च्या संघर्षाच्या बातम्या या वर्तमानपत्रात छापल्या होत्या. वर्तमानपत्र हे समाजप्रबोधनाचे कार्य करणारे महत्त्वाचे माध्यम होते. उदा., ‘इंदूप्रकाश’ पत्राने विधवा-विवाहाचा बहुजनसमाजाचे जोरदार मुखपत्र पुरस्कार केला. म्हणजे ‘दीनबंधु’, महात्मा जोतीराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केले. या पत्रातून आपणांस बहुजनसमाजाची समकालीन परिस्थिती समजते.

केसरी आणि मराठा : स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वर्तमानपत्रांनी गाठला. १८८१ मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही पत्रे सुरू केली. या पत्रांनी तत्कालीन, सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली.

‘देशस्थिती, देशभाषेतील ग्रंथ व विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधाने केसरीने लेखन सुरू केले. एकविसाव्या शतकात वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

नियतकालिके : ठरावीक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक होय. यात साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, षाण्मासिक, वार्षिक यांचा समावेश होतो. याखेरीज अनियतकालिक हाही प्रकार रूढ आहे. अनियतकालिकांचा प्रसिद्धीचा काळ निश्चित नसतो. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक ‘दिग्दर्शन’ सुरू केले. नियतकालिकांचा विचार करायचा झाल्यास ‘प्रगति’ (१९२९) साप्ताहिक महत्त्वाचे आहे.

त्याचे संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर हे होते. त्यांनी प्रगति मधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास आणि सामाजिक चळवळी इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केले. आधुनिक काळात भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिके निघत आहेत. उदा., मराठी भाषेतील भारतीय इतिहास आणि संस्कृती’, ‘मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका’ इत्यादी.

वेब पत्रकारिता : अत्याधुनिक नियतकालिकांमध्ये ‘वेब पत्रकारिता’ प्रकारात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांचा समावेश होतो. यामध्येही ‘इतिहास’ हा प्राधान्याचा विषय असतो. वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मिडिया, वेब चॅनेल्स, यू ट्यूब यांवर इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून दिला जातो.

आकाशवाणी : स्वातंत्र्यपूर्व कालखंडात १९२४ मध्ये ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी (आयबीसी) या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे ‘इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस (आयएसबीएस) असे नामकरण केले. ८ जून १९३६ रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ’ (एआयआर) असे झाले.

भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार “आकाशवाणी’ हे नाव दिले गेले. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात.

त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. विविधभारती’ या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे २४ भाषा आणि १४६ बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. अलीकडच्या काळात खासगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत. उदा., रेडिओ मिर्ची.

दूरदर्शन : १५ सप्टेंबर १९५९ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. महाराष्ट्रात १ मे १९७२ रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. १५ ऑगस्ट १९८२ या दिवशी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. १९९९ मध्ये परदेशी व देशी खासगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली. आजमितीला भारतीय प्रेक्षकांसाठी १०० हून अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत.

प्रसारमाध्यमांची आवश्यकता

माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते. अग्रलेख, विविध सदरे, पुरवण्या हे वर्तमानपत्राचे अविभाज्य भाग असतात. वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही आपले म्हणणे मांडत असतात. लोकशाही अधिक सुदृढ होण्यास वर्तमानपत्रे मदत करू शकतात.

दूरदर्शन हे दृक्-श्राव्य माध्यम असल्याने त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला ‘प्रत्यक्ष काय घडले हे दाखवायला सुरुवात केली. जनतेला एखादया घटनेचा ‘आँखो देखा हाल’ पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही.

प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन

प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. प्रत्येक वेळी वर्तमानपत्रांमधून आपणांसमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नाही. आपणांस ती तपासून घ्यावी लागते. अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचे एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे.

‘स्टर्न’ नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना विकल्या. हिटलरच्या या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली. परंतु त्या रोजनिशा नकली असल्याचे सिद्ध झाले. यामुळे प्रसारमाध्यमांमधून मिळणारी माहिती वापरताना काळजी घ्यावी लागते.

संबंधित व्यावसायिक क्षेत्रे

वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहचवायच्या असतात. हे काम करत असताना ‘बातमी मागची बातमी सांगावी लागते. अशा वेळी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज पडते. एखादया बातमीचा सविस्तर आढावा घेताना भूतकाळात तशाच स्वरूपाची एखादी घटना इतरत्र घडली असल्यास वर्तमानपत्रे ती बातमीमध्ये चौकट देऊन छापतात.

तेव्हा वाचकाला जादा माहिती मिळते आणि घटनेच्या मुळापर्यंत जाता येते. वर्तमानपत्रांमधील सदरांमध्ये पन्नास वर्षांपूर्वी, शंभर वर्षांपूर्वी अशा प्रकारची सदरे असतात. ती इतिहासाची साधने आणि इतिहासावर आधारित असतात. या प्रकारच्या सदरांमधून आपणांस भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक घटना समजतात.

भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळण्यास मदत होते. वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. उदा. १९९४ मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले त्याला २०१४ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली. त्या युद्धाचा सर्वंकष आढावा घेणारी पुरवणी काढताना त्या घटनेचा इतिहास माहीत असावा लागतो. १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनाला २०१७ मध्ये ७५ वर्षे पूर्ण झाली.

अशा प्रसंगी वर्तमानपत्रे लेख, अग्रलेख, दिनविशेष, आढावा यांच्याद्वारे त्या घटनेचा वेध घेतात. त्या वेळी इतिहासाचा अभ्यास उपयोगी पडतो. आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा महत्त्वाचा विषय असतो. उदा., १५ ऑगस्ट १९४७ किंवा त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्तची भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात असून त्याचा समकालीन परिस्थिती समजण्यासाठी उपयोग होतो.

आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रम प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज लागते. राष्ट्रीय नेत्यांची जयंती वा पुण्यतिथी, एखादया ऐतिहासिक घटनेस १ वर्ष, २५ वर्षे, ५० वर्षे, १०० वर्षे वा त्यापेक्षा त्या पटीत जास्त वर्षे पूर्ण होत असतील तर त्याची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती लागते. राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषणे देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो.

आकाशवाणीवरही दिनविशेष कार्यक्रम प्रसारित होतो. दूरदर्शन आणि इतिहासाचे जवळचे नाते आहे. इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचे आणि जागृती करण्याचे महत्त्वाचे काम दूरदर्शन आणि इतर वाहिन्या करतात. दूरदर्शनवरील रामायण, महाभारत अशा पौराणिक मालिका तसेच भारत एक खोज, राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मालिकांनी फार मोठा प्रेक्षकवर्ग आकर्षित केला.

रामायण-महाभारत सारख्या मालिकांची निर्मिती करताना तत्कालीन वातावरण, वेषभूषा, शस्त्रास्त्रे, राहणीमान, भाषा यांसंबंधींच्या जाणकारांच्या मदतीची गरज लागते. त्यासाठी इतिहासाचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. आधुनिक काळात डिस्कव्हरी, नॅशनल जिऑग्राफी, हिस्टरी यांसारख्या चॅनेल्सवर प्रसारित होणाऱ्या मालिकांमधून जगभरच्या इतिहासाचा खजिना प्रेक्षकांसाठी खुला केला गेला आहे.

त्याद्वारे लोक जगाचा इतिहास आणि भूगोल घरबसल्या जाणून घेऊ शकतात. या मालिका अधिक रंजक होण्यासाठी काही वेळा इतिहासातील निवडक भागाचे व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सादरीकरण केले जाते. उदा., कर्तृत्ववान स्त्री-पुरुष, खेळाडू, सेनानी, इत्यादी. त्याखेरीज वास्तू, किल्ले साम्राज्यांचे उदयास्त इतकेच नव्हे तर पाककलेच्या इतिहासावरील मालिकाही लोक उत्सुकतेने पाहतात. वरील सर्वच क्षेत्रांसाठी इतिहासाच्या सखोल अभ्यासाची गरज असते.

Leave a Comment