Prayog – प्रयोग

Prayog
                                                                                Prayog

वाक्य म्हणजे पूर्ण विधान करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह होय. वाक्यातील सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे क्रियापद होय. त्याशिवाय, कर्ता आणि कर्म देखील तेवढेच महत्वाचे असतात. किंबहुना वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रुप त्याच्याप्रमाणे बदलत असते. त्यामुळे कर्ता-कर्म-क्रियापद हे तीनही घटक महत्वाचे आहेत. वाक्यातील कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.

Prayog – प्रयोग

वाक्यातील क्रियापदाची रचनाच अशी असते की, कधी ते कर्त्याच्या लिंग, वचन किंवा पुरुष याप्रमाणे बदलते, तर कधी कर्माच्या. कधी कधी तर क्रियापद कर्ता किंवा कर्म यांनुसार मुळीच बदलत नाही. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी ठेवण किंवा रचना असते, तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग, वचन, पुरुष याप्रमाणे बदलते की नाही यावरुन प्रयोगाचे प्रकार पडतात.

प्रयोगाचे प्रकार

प्रयोगाचे मुख्य प्रकार 3 आहेत.

  • कर्तरिप्रयोग
  • कर्मणिप्रयोग
  • भावेप्रयोग

कर्तरिप्रयोग 

वाक्यातील क्रियापद जेव्हा त्यातील कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुष यानुसार बदलते, म्हणजेच क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते, तेव्हा ते वाक्य कर्तरिप्रयोगात आहे असे म्हणता येईल. (Kartari Prayog)

उदा: तो गाणे गातो.

या वाक्यात तो हा कर्ता आहे. गाणे हे कर्म आहे. गातो हे क्रियापद आहे.

या वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी गातो हे क्रियापद कोणाप्रमाणे बदलते, हे पाहाणे आवश्यक आहे. ते कर्त्याप्रमाणे बदलते की कमीप्रमाणे बदलते, हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे लागेल. त्यासाठी क्रमाने कर्त्याचे लिंग, वचन व पुरुष बदलून पाहू. असा बदल करताना एकावेळी एकच प्रकारचा बदल करणे आवश्यक आहे,

ती गाणे गाते.

ते गाणे गातात.

तू गाणे गातोस.

याचा अर्थ असा की, तो गाणे गातो या वाक्यातील गातो हे क्रियापद कर्त्याचे लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे बदलले आहे. म्हणजेच येथे क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते. म्हणून हा कर्तरिप्रयोग आहे. कर्तरिप्रयोगात कर्ता हा क्रियापदाच्या रुपावर अधिकार चालविणारा असतो.

Prayog – प्रयोग

कर्तरिप्रयोगात क्रियापद सकर्मक असले, तर त्यास सकर्मक कर्तरिप्रयोग म्हणतात व क्रियापद अकर्मक असल्यास त्यास अकर्मक कर्तरिप्रयोग असे म्हणतात.

उदा:

ती गाणे गाते (सकर्मक कर्तरिप्रयोग)

ती घरी जाते (अकर्मक कर्तरिप्रयोग)

कर्तरिप्रयोग कसा ओळखावा.

कर्तरिप्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमान्तच असतो व कर्म हे प्रथमान्त किंवा द्वितीयान्त असते.

उदा:

1. मी शाळेतून आताच घरी आलो. (कर्ता मी प्रथमान्त)

2. मुलगा पुस्तक वाचती (कर्म पुस्तक प्रथमान्त )

3. त्याने चोरास पकडले (कर्म चोरास द्वितीयान्त)

कर्मणिप्रयोग

वाक्यातील क्रियापद जेव्हा त्यातील कर्माच्या लिंग, वचन, पुरुष यानुसार बदलते, म्हणजेच क्रियापद हे कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते, तेव्हा ते वाक्य कर्मणिप्रयोगात आहे असे म्हणता येईल. (Karmani Prayog)

उदा: मुलाने आंबा खाल्ला.

या वाक्यात आंबा हे कर्म आहे. मुलाने हा कर्ता आहे. खाल्ला हे क्रियापद आहे. या वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी खाल्ला हे क्रियापद कोणाप्रमाणे बदलते, हे पाहाणे आवश्यक आहे. ते कर्त्याप्रमाणे बदलते की कर्माप्रमाणे बदलते, हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे लागेल. त्यासाठी क्रमाने कर्त्याचे लिंग, वचन व पुरुष बदलून पाहू.

मुलीने आंबा खाल्ला.

मुलांनी आंबा खाल्ला.

वरीलप्रमाणे कर्त्याच्या लिंग व वचनामध्ये बदल करुनही क्रियापदाचे रूप खाल्ला यामध्ये बदल होत नाही. म्हणजे कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचे रुप बदलत नाही, म्हणून हा कर्तरिप्रयोग नाही..

आता कर्माचे लिंग बदलून पाहू. आंबा ऐवजी चिंच हे स्त्रीलिंगी कर्म घेतले तर क्रियापदाचे रूप खाल्ली असे होईल. कर्माचे वचन बदलून पाहू. आंबा ऐवजी आंबे हे अनेकवचनी रूप घेतले, तर मुलाने आंबे खाल्ले असे वाक्य होईल. म्हणजे क्रियापदाच्या रुपात खाल्ले असा बदल झाला..

Prayog – प्रयोग

याचाच अर्थ असा की, वरील वाक्यात कर्त्याऐवजी कर्माच्या लिंग वचनात बदल झाल्यास क्रियापदाच्या रुपात बदल होतो. म्हणून हा कर्मणिप्रयोग आहे. कर्मणिप्रयोगात क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते. म्हणजेच कर्म हा धातुरुपेश आहे.

कर्मणिप्रयोग कसा ओळखावा 

कर्मणिप्रयोगात कर्म प्रथमान्तच असते. कर्ता प्रथमान्त कधीच नसतो. कर्ता केव्हा तृतीयान्त, चतुर्थ्यन्त, सविकरणी तृतीयान्त किंवा शब्दयोगी अव्ययान्त असतो.

उदा:

1. तिने गाणे म्हटले. (कर्ता तिने हे तृतीयान्त. कर्म गाणे हे प्रथमान्त)

2. मला हा डोंगर चढवतो. ( कर्ता चतुर्थ्यन्त.)

3. रामाच्याने काम करवते. ( कर्ता सविकरणी तृतीयान्त.)

4. मांजराकडून उंदीर मारला गेला. (कर्ता शब्दयोगी अव्ययान्त)

वरील वाक्यांमध्ये प्रयोग कर्मणी असला तरी, त्याचेही विविध प्रकार आहेत.

अ) प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग :

या प्रयोगात क्रियापद हे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत असले तरी बहुतेक कर्ताच प्रधान असतो. त्यास प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा:

1. तिने गाणे म्हटले.

2. मला हा डोंगर चढवतो.

ब) शक्य कर्मणी प्रयोग :

रामाच्याने काम करवते. या वाक्यात शक्यता सुचविलेली आहे. यातील क्रियापद शक्य क्रियापद आहे. त्यास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

Prayog – प्रयोग

क) प्राचीन/पुरुष कर्मणी :

प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लावून करिजे, बोलिजे, कीजे, दईजे अशी कर्मणिप्रयोगाची उदाहरणे दिसतात.

उदा:

1. त्वां काय कर्म करिजे लघु लेकराने.

2. नळें इंद्रासी असे बोलिजेले.

3. जो जे कीजे परमार्थ लाहो.

4. द्विजी निषिधापासव म्हणीजेलो.

ड) समापन कर्मणी :

काही वेळा संयुक्त क्रियापदाने क्रियापदाच्या सताप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो. अशा प्रकारच्या प्रयोगाला समापन कर्मणी असे म्हणतात. एखादी कृती करून पूर्ण झाली, हे दर्शविण्यासाठी सामान्यतः अशा प्रयोगाची वाक्यरचना केली जाते.

उदा: त्याची गोष्ट लिहून झाली.

या वाक्यात कर्ता त्याची हा षष्ठी विभक्तीत आहे. लिहून झाली या संयुक्त क्रियापदाने समाप्तीचा अर्थ सूचित केलेला आहे.

इ) नवीन कर्मणी / कर्मकर्तरी :

राम रावणास मारतो

रावण रामाकडून मारला जातो

या दोन्ही वाक्यांचा अर्थ जवळपास सारखाच आहे. पहिल्या वाक्यात मारतो या क्रियापदाचा कर्ता राम असून रावण हे कर्म आहे. दुस-या वाक्यात रावण हा कर्ता आहे. म्हणजे पहिल्या वाक्यातील कर्म दुस-या वाक्यात कर्ता बनले आहे. व मूळच्या वाक्यातील कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय जोडले आहे. पहिल्या वाक्यात राम या शब्दास प्राधान्य असून त्याचा प्रयोग कर्तरी आहे. दुस-या वाक्यात रावण या शब्दाला म्हणजे मूळ वाक्यातील कर्माला प्राधान्य दिले आहे. मग या वाक्यात कर्मणी प्रयोग आहे, असे निर्विवाद म्हणता येईल का…. नाही. इंग्रजी भाषेतील पॅसिव्ह व्हॉईस च्या प्रभावामुळे मराठीतही आता वरीलप्रमाणे वाक्ययरना होऊ लागली आहे. त्यास कर्मकर्तरी प्रयोग म्हणतात.

कर्मणिप्रयोगातील कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पध्दतीप्रमाणे रचना करण्याचा जो नवीन प्रकार मराठीत रुढ झाला आहे, त्यास नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी असे म्हणतात.

उदा: शिपायाकडून चोर पकडला गेला.

Prayog – प्रयोग

यास नवीन कर्मणी असेही म्हणतात. जेव्हा वाक्यातील कर्माला प्राधान्य देऊन विधान करावयाचे असते, किंवा कर्ता स्पष्ट नसतो, किंवा कर्त्याचा उल्लेख टाळायचा असतो, त्यावेळी हा कर्मकर्तरी प्रयोग सोयीस्कररित्या वापरला जातो.

उदा: 1. गाय गुराख्याकडून बांधली जाते.

  1. न्यायाधीशाकडून दंड करण्यात आला
  1. सभेत पत्रके वाटली गेली.
  1. सर्वांवर कारवाई केली जाईल.

भावे प्रयोग 

जेव्हा क्रियापदाचे रुप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नसून ते नेहमी तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भावे प्रयोग असे म्हणतात. (Bhave Prayog)

मुलाने बैलास मारले.

या वाक्यातील कर्त्याच्या आणि कर्माच्याही लिंगवचनात बदल केला, तरी क्रियापदाचे रूप मारले असेच राहते.

भावे प्रयोगात क्रियापदाचा जो भाव किंवा आशय त्याकडे प्राधान्य असते व त्या मानाने कर्ता किंवा कर्म ही दोन्ही गौण असतात.

उदा: 1. रामाने रावणास मारले.

  1.  शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे.
  1. त्याने आता घरी जावे.

या वाक्यापैकी पहिली दोन सकर्मक आहेत, व पुढील वाक्य अकर्मक आहे. भावे प्रयोगाचे सकर्मक भावे प्रयोग व अकर्मक भावे प्रयोग असे दोन प्रकार आहेत.

भावे प्रयोग कसा ओळखावा ….

  • कर्ता तृतीयान्त किंवा चतुर्थ्यन्त असतो.
  • कर्म असल्यास त्याची सप्रत्ययी द्वितीया विभक्ती असते.
  • अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विद्यर्थी असते.
  • शक्यार्थक क्रियापदांचा नेहमीच भावे प्रयोग हातो.

भावकर्तरी प्रयोग 

  1. मला आज मळमळते
  1. त्याला घरी जाण्यापूर्वी सांजावले.
  1. आज सारखे गडगडते.
  1. सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले.

वरील वाक्यांमध्ये क्रियापदांना कर्ते असे नाहीत. सर्वच वाक्यांतील क्रियापदे तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी आहेत. म्हणजेच ती भावे प्रयोगी आहेत. पण त्यांना कर्ते नसल्यामुळे हा अकर्तृक भावे प्रयोग होय. अशा वाक्यात क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच वाक्यातील कर्ता असल्यामुळे यास भावकर्तरी प्रयोग असेही म्हणतात.

Prayog – प्रयोग

मिश्र किंवा संकर प्रयोग 

मराठीत प्रमुख 3 प्रयोग असले तरी, बोलताना आपण एकाच वाक्यात दोन वेगवेगळे प्रयोग वापरत असतो. त्यावरून मिश्र किंवा संकर प्रयोग बनलेले आहेत.

1) कर्तृ-कर्म संकर :

तू मला पुस्तक दिले (कर्मणिप्रयोग)

तू मला पुस्तक दिलेस (कर्तरी व कर्मणी)

वरील वाक्यापैकी पहिल्या वाक्यात निर्विवादपणे कर्मणिप्रयोग आहे. दुस-या वाक्यात पुस्तक या कर्माचे पुस्तके असे वचन बदलल्यास दिलीस असे क्रियापद बदलेल. त्यावरून ती कर्मणिप्रयोग आहे. मात्र तू या कर्त्याचे वचन बदलून तुम्ही घेतल्यास तुम्ही मला पुस्तक दिलेत असे वाक्य होईल. म्हणजे क्रियापद दिलेस हे कर्त्याप्रमाणे देखील बदलते. त्यामुळे याला कर्तरिप्रयोगही म्हणता येईल. त्यामुळेच तू मला पुस्तक दिलेस या वाक्यात कर्तरी व कर्मणी या दोन्ही प्रयोगांच्या छटा आढळतात. म्हणून याला कर्तृ-कर्मसंकर प्रयोग असे म्हणतात.

उदा:

1. तू कविता म्हटलीस 

2. तुम्ही कामे केलीत

3. तू लाडू खाल्लास

2) कर्म-भाव संकर प्रयोग :

वडिलांनी मुलाला शाळेत घातला (कर्मणिप्रयोग)

वडिलांनी मुलाला शाळेत घातले. (कर्मणि व भावे)

वरीलपैकी पहिल्या वाक्यात कर्ता तृतीयान्त आहे. म्हणून हा कर्तरिप्रयोग नव्हे. मुलाला या कर्माचे लिंग व वचन बदलल्यास मुलीला शाळेत घातली, मुलांना शाळेत घातले अशी रूपे होतील. म्हणजे कर्माप्रमाणे क्रियापदाचे रुप बदलते. म्हणून हा कर्मण प्रयोग आहे.

दुस-या वाक्यात घातले क्रियापद कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते. म्हणून हा देखील कर्मणिप्रयोग आहे. शिवाय कर्ता तृतीयान्त आहे, कर्म द्वितीयान्त आहे व क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचन आहे. म्हणजेच भावे प्रयोगाची देखील छटा यात आहे. म्हणून वडिलांनी मुलाला शाळेत घातले या वाक्यात कर्मणी व भावे या दोन्ही प्रयोगाच्या छटा आहेत, म्हणून त्याला कर्म-भाव संकर प्रयोग असे म्हणतात.

उदा:

1. आईने मुलाला निजविले.

2. मी त्याला मुंबईस धाडले.

3) कर्तृ-भाव संकर प्रयोग :

तू घरी जायचे होते. (भावे प्रयोग)

तू घरी जायचे होतेस. ( कर्तरी व भावे)

वरीलपैकी पहिल्या वाक्यात तर निर्विवादपणे भावे प्रयोग आहे. पण दुस-या वाक्यात (तू घरी जायचे होतेस) भावे प्रयोगाची व कर्तरी प्रयोगाची देखील छटा आहे. कर्तरी व भावे या दोन प्रयोगांच्या छटा एकत्र आढळतात, म्हणून यास कर्तृ-भाव संकर प्रयोग म्हणतात.

उदा:

1. तू गाईला घालविलेस

2. तू मला वाचविलेलस 


Sugam Marathi Vyakaran (M R Walambe)


समास – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

अलंकार – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

इतिहास – वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment