पुरंदरचा वेढा व तह

Purandar-Killa

सुरतेवर छापा

या विजयानंतर शिवराय स्वस्थ बसले नाहीत. औरंगजेब बादशाहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या, तेव्हा बादशाहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला. कुठे पुणे व कुठे सुरत ? सुरत म्हणजे त्या वेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ. खूप सधन. शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली. सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही.

चर्च अथवा मशिदी यांना हात लावला नाही. स्त्रियांना त्रास दिला नाही. सुरतेवरील या आक्रमणामुळे बादशाहा भयंकर चिडला. त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला. मिर्झाराजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले. त्याच्या सोबतीला दिलेरखान हा आपला विश्वासू सरदार दिला. अलोट खजिना आणि अफाट दारूगोळाही बरोबर दिला.

जयसिंग आणि दिलेरखान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहोचले. स्वराज्यावर फार मोठे संकट आले. सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परततात, तोच सन १६६४ मध्ये त्यांना कर्नाटकातून एक दुःखद बातमी समजली. शहाजीराजे यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले. शिवराय व जिजाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मातोश्रींच्या गळा पडून शिवरायांनी या दु:खातून त्यांना सावरले.

पुरंदरला मुघलांचा वेढा 

पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता. हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बीमोड होऊ शकणार नाही, हे दिलेरखान जाणून होता. त्यामुळे दिलेरखानाने पुरंदरला वेढा दिला. त्याची फौज फार मोठी होती, पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता. त्याच्या हाताखालचे शिपाई मोठे शूर गडी होते. हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला.

दिलेरखानाच्या तोफा कडाडू लागल्या. तोफेचे लालभडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले, पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले नाहीत. ते अधिक जोराने झुंजू लागले. मुघलांनी तोफांचा भडिमार केला. माचीचा बुरूज ढासळला. मुघल माचीवर घुसले. दिलेरखानाने माची जिंकली. मराठ्यांनी वरच्या बालेकिल्ल्याचा आश्रय घेतला. ते लढतच राहिले. दिलेरखान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता.

मुरारबाजी रागाने लाल झाला होता. त्याने पाचशे मावळे निवडले. त्यांना घेऊन त्याने मुघलांवर हल्ला करायचा बेत केला. बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडला. हर हर महदेव’ अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे मुघलांवर तुटून पडले. थोडा वेळ भयंकर लढाई झाली. मुघलांचे सैन्य अफाट होते, पण मराठ्यांनी त्या सैन्याचा धुव्वा उडवला. शेवटी मुघलांनी माघार घेतली. ते दिलेरखानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले.

मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला. मुरारबाजीचे सैन्य दिलेरखानाच्या छावणीत घुसले. छावणीत एकच गोंधळ माजला. धावाधाव, आरडाओरडा, किंकाळ्या यांचा हाहाकार उडाला. घाईघाईने दिलेरखान हत्तीवर अंबारीत बसला. त्याने समोर पाहिले, तो त्यास मुरारबाजी दिसला. मुरारबाजीची तलवार कोणाच्या छाताडात, कोणाच्या मस्तकात, तर कोणाच्या कंठात घुसत होती. मुरारबाजी कोणालाही आटोपत नव्हता. त्याचे शौर्य बघून दिलेरखान थक्क झाला.

मुरारबाजीचा अतुल पराक्रम

Murarbaji-Dilerkhan-Yudhprasang

दिलेरखानाला बघून मुरारबाजी चवताळला. ‘कापा, तोडा, मुडदे पाडा’, असे ओरडून तो शत्रूवर धावला. त्याची समशेर जोराने फिरू लागली. जो आड आला, तो ठार झाला. या एकट्या वीराला मुघलांनी चोहोकडून घेरले. इतक्यात दिलेरखान अंबारीतून ओरडला, “थांबा!” मुघल थांबले. क्षणभर मागे सरले. खान मुरारबाजीला म्हणाला, “मुरारबाजी, तुझ्यासारखा समशेरबहाद्दर मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये, कौल घे. बादशाहा तुला सरदार करतील. जहागीर देतील, बक्षीस देतील!” मुरारबाजीने दिलेरखानाचे शब्द ऐकले.

रागाने त्याचे डोळे लाल झाले. तो चवताळून म्हणाला, “अरे, आम्ही शिवाजी महाराजांची माणसे ! तुझा कौल घेतो की काय ? आम्हांला काय कमी आहे ? तुझ्या बादशाहाची जहागीर हवी कोणाला ?” मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो तुफान कत्तल करत सुटला. दिलेरखानाने अंबारीतून बाण सोडला. तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला. तो जमिनीवर कोसळला.

मावळ्यांनी त्याचा देह उचलला आणि बालेकिल्ला गाठला. किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाले, पण एक मुरारबाजी पडला तरी काय झाले ? आम्ही तैसेच शूर आहो. हिंमत धरून लढतो’, असे म्हणून ते न डगमगता पुन्हा निकराने लढू लागले. ही बातमी शिवरायांना कळल्यावर ते फार दुःखी झाले. त्यांनी विचार केला, एकेक किल्ला वर्षवर्ष लढवता येईल, पण विनाकारण माणसे मरतील. शिवरायांना ते नको होते.

पुरंदरचा तह

करणार काय ? शक्ती चालेना, युक्ती उपयोगी पडेना, तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य; म्हणून मुघलांशी तह करायचा असे शिवरायांनी ठरवले. शिवराय स्वतः जयसिंगाकडे गेले. त्यांनी त्याच्याशी मुत्सद्देगिरीचे बोलणे केले. ते म्हणाले, “मिर्झाराजे, आपण रजपूत आहात. आमचे दुःख आपण जाणता.

बादशाहाच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे. लोकांचे हाल होत आहेत. लोक सुखी व्हावे, म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे ! आपणही हे काम हाती घ्या. मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू”. जयसिंग मोठा धूर्त होता. त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले. त्यांनी तह केला. या तहात शिवरायांनी तेवीस किल्ले व त्याखालचा चार लक्ष होनांचा मुलूख मुघलांस देण्याचे कबूल केले. हा तह १६६५ साली झाला.

Shivray-Mirzaraje-Jayshing-Bhet

पुरंदरचा तह झाला. याच वेळी, शिवरायांनी आग्र्याला जाऊन बादशाहाची भेट घ्यावी, असे जयसिंगाने सुचवले. त्यांना सुरक्षिततेची हमी दिली. जयसिंगाच्या सूचनेवर शिवरायांनी विचार केला. बादशाहा कपटी आहे, स्वतःच्या भावांशीसुद्धा त्याने दगलबाजी केली, हे शिवराय ओळखून होते. तरीपण या प्रसंगाला सावधगिरीने तोंड यावे, असे त्यांनी ठरवले. आपण बादशाहाची भेट घेण्यास आग्र्याला जाण्यास तयार आहोत, असे शिवरायांनी जयसिंगाला कळवले.MPSC Online

 

Leave a Comment