राज्यकारभाराची घडी बसवली

Ashtpadhan-Mandal

राज्यकारभाराची घडी शिवरायांनी

जिवाचे रान करून स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्याचे ते छत्रपती झाले. स्वराज्यातील प्रजा सुखी होती. देव-देवळे सुरक्षित होती. त्याचप्रमाणे इतर धर्मांचीही प्रार्थनास्थळे सुरक्षित राहिली होती, मात्र स्वराज्यावर अनेक संकटे येत होती. या संकटांतून पार पडून स्वराज्य कायम टिकावे, अशी शिवरायांची इच्छा होती. राज्य कायम टिकवायचे असेल, प्रजेला सुखी ठेवायचे असेल, तर त्यासाठी राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसवावी लागते. ती शिवरायांनी बसवली.

राज्यकारभाराचे काम व्यवस्थित चालावे म्हणून शिवरायांनी राज्यकारभाराची आठ खात्यांत विभागणी केली. प्रत्येक खात्यावर एकेक प्रधान नेमला. प्रत्येक खाते त्या त्या प्रधानाकडे सोपवले. हेच शिवरायांचे ‘अष्टप्रधान मंडळ. ‘

प्रधान अमात्य सचिव मंत्री

सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री

सेनापती त्यात असे सुजाणा

अष्टप्रधानी शिवमुख्य राणा ।।

या चार ओळींत शिवरायांचे अष्टप्रधान सांगितले आहेत. यांतील पंडितराव व न्यायाधीश यांच्याशिवाय इतर सर्वांना युद्धप्रसंग करावे लागत, म्हणजे रणांगणावर सैन्याचे नेतृत्व करून लढाई करावी लागे.

शिवरायांना माणसांच्या गुणांची पारख होती. एखादा रत्नपारखी एकेक मोती पारखून तोलून घेतो आणि त्या मोत्यांचा हार गुंफतो, तशी कसून पारख करून शिवरायांनी आपल्या अष्टप्रधानांची निवड केली होती. त्यांनी प्रधानांना इनामे, वतने किंवा जहागिरी दिल्या नाहीत. रोख पगार मात्र भरपूर दिला.

शिवरायांची संरक्षण व्यवस्था

शिवरायांचे सैन्य 

शिवरायांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे मुख्य विभाग होते. तसेच आरमारदल हा नवीन विभाग शिवरायांनी उभारला होता. शिवरायांच्या सैन्यात कोकणातील हेटकरी व घाटावरील मावळे यांचा भरणा असे. सैन्यातील घोडदळातही दोन विभाग होते. एक विभाग बारगिरांचा होता. त्यांना सरकारकडून हत्यारे व घोडे मिळत असत. बारगीर सरकारच्या प्रत्यक्ष नोकरीत असत.

बारगिरांना मासिक पगार दिला जाई. घोडदळातील दुसरा विभाग होता शिलेदारांचा शिलेदारांकडे स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारे असत. शिलेदार आपला घोडा व हत्यारे घेऊन लढाईत भाग घेत. या कामगिरीबद्दल त्यांना मोबदला दिला जाई.. शिवरायांच्या लष्करात घोडदळाप्रमाणे पायदळही मोठे होते. पायदळाच्या प्रमुखाला सरनोबत म्हणत. पायदळात हवालदार, जुमलेदार, हजारी, पंचहजारी असे अधिकारी असत.

शिवरायांची सैन्यावर जरब होती. त्यामुळे त्यांचे सैन्य शिस्तबद्ध होते. त्यांचे सैनिक स्त्रियांचा आदर करत. त्यामुळे स्त्रियांचे रक्षणकर्ते म्हणून शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. सैनिकांनी दारू पिऊ नये, रयतेला त्रास देऊ नये, रयतेची लूट करू नये, अशी सैनिकांना त्यांची सक्त ताकीद होती. सैनिकांना पगार वेळच्या वेळी मिळे.

मराठ्यांचे आरमार

आरमार म्हणजे युद्धनौकांचे तांडे. मुघल व विजापूरकर हे शिवरायांचे जमिनीवरील शत्रू. त्यांना शिवरायांनी जेरीस आणले. समुद्रावर सिद्दी, पोर्तुगीज व इंग्रज हे शत्रू होते. शिवरायांनी त्यांच्या बंदोबस्तासाठीच दूरदृष्टीने आरमारदल उभारले. मध्ययुगीन भारताचे हे पहिले आरमार होय. या अर्थाने शिवराय हे भारतीय आरमाराचे जनक मानले जातात. शिवरायांनी युद्धनौकाही बांधल्या. सिंधुदुर्ग व विजयदुर्ग यांसारखे समुद्रकिल्ले बांधले. युद्धनौका घेऊन शिवरायांनी अनेक मोहिमा काढल्या. शिवरायांच्या आरमाराचा सागरी शत्रूवर जबर वचक बसला.

किल्ले 

त्या काळात राज्याच्या संरक्षणासाठी किल्ल्यांचा फार उपयोग होई. शिवरायांकडे सुमारे तीनशे किल्ले होते. किल्ल्यांवर कडेकोट बंदोबस्त होता. प्रत्येक किल्ल्यावर किल्लेदार सबनीस व कारखानीस हे अधिकारी असत.

हेर खाते

शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्त हेर खाते होते. बहिर्जी नाईक त्यांच्या हेर खात्याचा प्रमुख होता. महाराजांच्या सुरतेवरील मोहिमेसारख्या मोहिमा यशस्वी होण्याला त्याने आणलेल्या अचूक माहितीची मोठी मदत झाली. शिवरायांचे हेर गुप्तपणे शत्रूच्या गोटात शिरून गोटातील खडानखडा माहिती काढून आणत. कोणतीही चढाई करण्यापूर्वी शिवराय हेरांकडून बातम्या मिळवत आणि मगच चढाईचा बेत आखत.

मुलकी व्यवस्था 

राज्यातील मुलकी व्यवस्थाही शिवरायांनी चोख ठेवली होती. स्वराज्यात बारा सुभे होते. सुभा म्हणजे प्रांत. सुभ्यावर सुभेदार हा अंमलदार असे. सुभ्याचे काही विभाग असत, त्यांना परगणा म्हणत. परगण्याच्या अधिकाऱ्यास हवालदार म्हणत. एका परगण्यात अनेक गावे असत. प्रत्येक गावात पाटील व कुलकर्णी असत. राज्याचा कारभार शिवराय स्वतः बघत. अधिकाऱ्यांच्या नेमणुका स्वतः करत. प्रधानांना कामे नेमून देत. स्वराज्याचा खजिना द्रव्याने भरलेला असे. राज्यकारभारात हिंदू, मुसलमान असा भेद शिवरायांनी केला नाही. त्यांनी गुणी माणसांना जवळ केले. त्यांना स्वराज्याच्या कार्याला लावले. त्यांचा स्वराज्याच्या कामी उपयोग करून घेतला. स्वराज्याशी बेइमानी करणाऱ्याला मात्र त्यांनी कधी क्षमा केली नाही. फितुरांना त्यांनी कडक शिक्षा केल्या. मग तो आपला असो किंवा परका असो. अशा प्रकारे शिवरायांचा राज्यकारभार अतिशय चोख होता.MPSC Online

 

Leave a Comment