Ramabai Ranade
महाराष्ट्राच्या इतिहासात रमाबाई रानडेंचा उल्लेख स्त्री उद्धारक म्हणून मोठ्या आदराने केला जातो. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील ‘देवराष्ट्र’ या गावी कुलेंकर सरदार कुटुंबात २५ जानेवारी १८६२ मध्ये झाला. त्यांचे लहानपणीचे नाव यमुना असे होते. त्यांची आई मिरजचे राजवैद्य यांची कन्या होती.
Ramabai Ranade – रमाबाई रानडे
न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या सोबत रमाबाईंचा विवाह ३० नोव्हेंबर १८७३ ला बालपणातच म्हणजे वयाच्या ११ व्या वर्षी झाला. न्या. रानडेंचा हा दुसरा विवाह होता. त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. घरच्या मंडळींच्या आग्रहाखातीर त्यांनी हा विवाह केला होता. त्यामुळे त्यांच्यावर समाजातील अनेकांकडून टीका सुद्धा झाली.
आपल्या पतीच्या सामजिक आयुष्याचा भाग बनून त्यांची मदत करण्याच्या ध्यासाने रमाबाईंनी शिक्षणाची कास धरली. त्या सर्वप्रथम एक उत्तम विद्यार्थी बनल्या, मग हळूहळू त्या महादेव रानड्यांच्या सचिव झाल्या, आणि शेवटी त्या एक उत्तम सहकारी व मित्र झाल्या. महादेवराव सुरुवातीला रमाबाईंना साधी अक्षरओळख, मराठी वाचन करवून घेत. मग इतिहास, भूगोल, गणित आणि इंग्रजीचेही धडे त्यांनी रमाबाईंना दिले.
पुढे रोजचे वर्तमानपत्र ते रमाबाईंना वाचावयास लावून घडलेल्या घटनांवर त्यांच्याशी चर्चा करत. रमाबाईंना इंग्रजी वाङ्मयाची विशेष गोडी निर्माण झाली होती. रमाबाईंनी स्वतःच्या आयुष्यातील घटना शब्दरूप करून मराठी वाङ्मयाला एक मोठी देणगी दिली आहे. तसेच त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांची धर्मशास्त्रावरील अनेक भाषणे प्रकाशित केली.
Ramabai Ranade – रमाबाई रानडे
पतीच्या निधनानंतरचा काही काळ हा दु:खादायक आणि निराशाजनक होता. त्या मुंबई सोडून पुण्याला परत गेल्या आणि फुले मंडई जवळच्या आपल्या जुन्या वाड्यात राहू लागल्या. सुमारे एक वर्ष त्यांनी एकाकी आयुष्य व्यतीत केले. स्वतःवर लादलेल्या या एकांतवासानंतर त्या सामाजिक आयुष्यात सक्रिय झाल्या आणि त्यांनी भारत महिला परिषदेचे मुंबई मध्ये आयोजन केले.
पतीच्या मृत्यूनंतर आयुष्याची २४ वर्षे रमाबाईंनी समाज जागृती आणि सेवा सदन सारख्या पीडित महिलांना सशक्त बनवणाऱ्या सामाजिक चळवळी उभारण्यात वाहून घेतली. रमाबाई स्त्री शिक्षण, न्याय्य हक्क, समान अधिकार आणि समाज सुधारणेसाठी अविरत झटल्या. त्यांनी स्त्रियांना प्रशिक्षित रुग्णसेवा ही केवळ एक सेवा नव्हे तर उपजिवीकेचे साधन म्हणून स्वीकारण्यास सांगितले.
रमाबाईचे शिक्षण : न्या. रानडे अतिशय दुःखी होते की त्यांनी एका बालिकेसोबत विवाह केला. तसेच रमाबाई व न्या. रानडे यांच्यामध्ये कुठलेच साम्य नव्हते. न्या. रानडे हे उच्च विद्याविभूषीत तसेच न्यायमूर्ती होते. तर रमाबाई ह्या अशिक्षितच होत्या. तेव्हा समाजातील तसेच त्यांच्या घरातील वातावरण स्त्री शिक्षणाच्या विरोधात होते. परंतु याला न जुमानता न्या. रानडेंनी आपल्या पत्नीला शिक्षित करण्याचा निर्धार केला.
Ramabai Ranade – रमाबाई रानडे
Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा
Pandita Ramabai Information in Marathi – पंडिता रमाबाई मराठी
त्यांनी रमाबाईंच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली. त्यांना इंग्रजी शिकविण्यासाठी मिस हरफर्ड यांची नेमणूक केली. शिक्षण घेत असताना रमाबाईला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यांना शिकवणी संपल्यानंतर थंड पाण्याने स्नान करावे लागे. त्याशिवाय कुठलेच काम करता यायचे नाही असा दंडक त्याच्यावर होता.
घरातील मंडळीही याबाबत सतत त्रामा करायची, तरी सर्व त्रास सहन करून त्यांनी न डगमगता आपले शिक्षण पूर्णत्वास नेले. न्या. रानडेंनी सुद्धा त्यांना शिक्षित करण्यासाठी कुठल्यास गोष्टीची कमतरता ठेवली नाही. त्यांनी फिमेल टेनिंग मधील अतिशय अनुभवी, प्रेमळ स्वभावाच्या सगुणाबाईची सुद्धा निवड रमाबाईंना शिकविण्यासाठी केली. रमाबाईनी मराठी, हिंदी, बंगाली इत्यादी भाषेत प्राविण्य संपादन केले होते.
घरातील वातावरण सनातनी होते. परंतु न्या. रानडेंचे मात्र विचार आधुनिक होते, न्या. रानडे न्यायाधीश असल्यामुळे त्यांच्या वारंवार बदल्या होत असत. ह्या कारणामुळे रमाबाईला पतीचा सहवास लाभत असे. ह्याच एकांतात त्या आपल्या पतीबरोबर वेगवेगळ्या विषयावर मनमोकळेपणाने चर्चा सुद्धा करीत.
पतीच्या विचारांचा त्यांच्यावर एवढा परिणाम झाला की त्यांना राजकीय व सामाजिक प्रश्नांची सुद्धा जाण व्हायला लागली. न्या. रानडेंच्या कार्यापासून प्रेरित होऊन रमाबाई समाजसुधारणा चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेऊ लागल्या.. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समजासेवेकरिता वाहून घेतले. याच काळात इतर शिक्षित स्त्रियांसोबत त्यांचा संपर्क आल्याने त्यांच्या विचारकक्षा रूंदावल्या.
Ramabai Ranade – रमाबाई रानडे
रमाबाईचे गृहव्यवस्थापन : रमाबाई एक योग्य गृहिणी सुद्धा होत्या. गृहव्यवस्थापनही त्यांनी उत्तमप्रकारे केले होते. गृहखर्चाची सर्व जबाबदारी न्या. रानडेंनी त्यांच्यावर सोपविली होती. त्यावेळी न्या. रानडेंचा दरमहा पगार १०० रूपये होता. सर्वच खर्च ठरवलेला असे. रमाबाई अत्यंत काटकसर करून, योग्य त्याच ठिकाणी खर्च करीत असत व त्याचा हिशोब सुद्धा लिहून ठेवत.
न्या. रानडेंनी नाशिकला एक बाग खरेदी केली होती. त्याची सर्व जबाबदारी रमाबाईंवर सोपविली होती. रमाबाईने ती जबाबदारी चोखपणे पार पाडली. बागेत उत्कृष्ट दर्जाची पिके, फळभाज्या, फुले यांची लागवड करून उत्पन्नात भर घातली व परिवाराच्या मिळकतीत आपला अत्यंत मोलाचा हातभार लावला.
स्त्री संघटन : रमाबाईनी स्त्रियांना संघटित करायला सुरुवात केली. या कामी त्यांना गोपिकाबाईंची साथ लाभली. स्त्रियांच्चे हळदी-कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करणे, कर्तृत्ववान स्त्रियांचे चरित्र वाचन करणे, मुलींच्या शाळेंना भेटी देणे, गुणवाण मुलींना बक्षिस देणे इ. उपक्रम राबवून त्यांनी नाशिकमध्ये स्त्री संघटन घडवून आणले. इ.स. १८७८ मध्ये त्यांनी नाशिक येथील मुलींच्या शाळेतील बक्षिस समारंभाचे वेळी भाषण दिले.
Ramabai Ranade – रमाबाई रानडे
ही संधी त्यांना १९७८ साली न्या. महादेव रानडेंची नाशिक येथे फर्स्ट क्लास सब जज म्हणून बदली झाल्यामुळे प्राप्त झाली होती. मुंबई प्रांतात सुद्धा रमाबाईना कार्य करण्याची संधी मिळाली. जानेवारी १८८१ मध्ये न्या. रानडेंची बदली तीन महिन्याकरिता मुंबईला झाली. मुंबईतील वास्तव्यात भंडारकरांची मुलगी शांताबाई यांच्यासोबत रमाबाईची मैत्री झाली.
रमाबाई मुंबईतील महिलांना एकत्र करण्याकरिता दर रविवारी सभा घेत, त्या सभेमध्ये महिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असत. पुण्यात सुद्धा रमाबाईंनी स्त्री संघटनाचे कार्य हाती घेतले. पुण्यात अभ्यकरांच्या वाड्यातील दिवाणखाण्यात त्या सभा घेत असत. येथे स्त्रियांना शिक्षित करून त्यांना त्यांचे अधिकार, कर्तव्ये याची जाणीव करून देत. न्या. रानडेंची पुणे येथे एप्रिल १८८१ मध्ये प्रिन्सिपल सदर अमीन या पदावर बदली झाल्यामुळे वरील कार्य रमाबाईला करता आले.
Ramabai Ranade – रमाबाई रानडे
हिंदू लेडीज सोशल ॲन्ड लिटररी क्लबची स्थापना : स्त्रियांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि स्त्रियांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी रमाबाईंनी इ.स. १८९४ मध्ये मुंबईला ‘हिंदू लेडीज सोशल ॲन्ड लिटररी क्लब’ची स्थापना केली. पुण्याला इ.स. १९०२ मध्ये या क्लबची स्थापना झाली. ह्या क्लबच्या माध्यमातून स्त्रियांना संघटित करून त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात.
जसे शिवणकाम, अभ्यासवर्ग इत्यादी. शिवाय गुजराती समाजात जे दोष निर्माण झाले होते ते श्रीमती काशीबाई ठाकरसी यांना सोबत घेऊन दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच स्त्रियांना आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची वेळोवेळी व्याख्याने सुद्धा आयोजित केली जात.
अखिल भारतीय महिला परिषद : रमाबाईंनी स्त्री उद्धाराचे काम सुरू केल्यापासून त्या स्वस्थ बसल्याच नाहीत. आपल्या पतीच्या मृत्यूनंतरही (१९०१) त्यांनी आपले कार्य सुरूच इ.स. १९०४ पासून त्या सार्वजनिक सभा आणि समारंभात उपस्थित राहू लागल्या. एका विधवेने सन्यास्त जीवन सोडून सार्वजनिक सभा संमेलनामध्ये सक्रिय सहभाग घेणे हे क्रांतिकारी पाऊल होते.
इ.स. १९०४ मध्ये काही प्रमुख नेत्यांनी अ. भा. महिला परिषदेची स्थापना केली. ही सभा स्थापन करण्यामागे रमाबाईचे महत्त्वाचे योगदान होते. डॉ. रामकृष्ण गोपाळ भंडारकर यांच्या आग्रहाखातर व सर्वाच्या सहमतीने त्यांना या परिषदेचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले. या परिषदेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे इ.स. १९०४ मध्ये भरले होते. यामध्ये समाजातील सर्व जाती-धर्माच्या स्त्रियांचा सहभाग होता. अशा प्रकारच्या संघटना स्त्रियांसाठी का स्थापन कराव्या लागतात याविषयी त्यांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले.
Ramabai Ranade – रमाबाई रानडे
विविध अधिवेशनांचे अध्यक्षपद रमाबाईकडे : स्त्रियांमध्ये जागृकता होऊन त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, त्यांनी सार्वजनिक जीवनात सहभागी व्हावे याकरिता ठिकठिकाणी अधिवेशने भरविली जात असत. अशाच प्रकारची अधि इ.स. १९०७, इ.स. १९१२. इ.स. १९२० मध्ये सुरत, मुंबई, सोलापूर येथे आयोजित केली गेलीत. ह्या सर्वाचे अध्यक्षपद सर्व सहमतीने रमाबाईकडे सोपविण्यात आले होते. त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडली व आपल्या व्यक्तीमत्वाची चुनूक जगाला दाखवून दिली.
सेवा सदनची स्थापना : रमाबाईच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे ११ जुलै १९०८ मध्ये ‘सेवा सदन’ या संस्थेची मुंबईत केलेली स्थापना होय. ही संस्था स्थापन करीत असताना अनेकांचा हातभार लागला. त्यामध्ये बी. एम. मलवारी, दयाराम गिडूमल आदी सारखी मंडळी होती. ह्या संस्थेचे अध्यक्षपद रमाबाईकडेच होते. ह्या संस्थेमध्ये हिंदू, पारशी, मुसलमान, खिश्चन इत्यादी सर्वच धर्माचे सदस्य होते.
इ.स. १९१५ ला ‘सेवा सदन पुणे’ उदयास आले. १३ फेब्रुवारी १९१५ ला महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांनी पुणे सेवा सदनाला भेट दिली होती. या संस्थेद्वारे स्त्रियांना सुशिक्षित, स्वावलंबी बनविण्याकरिता अथक प्रयत्न केले गेले. तसेच शोषित पिडित लोकांकरिता सुद्धा संस्थेने महत्त्वाचे कार्य केले. जसे दुष्काळग्रस्त, पूरपिडित भागात जाऊन मदत करणे.
साथीच्या रोग्यांची शुश्रूषा करणे, यात्रेच्या ठिकाणी जाऊन यात्रेकरूंची मुले सांभाळणे इ. सोबतच मुलींचे प्रशिक्षण केंद्र, तीन वसतीगृहे असे अनेक उपक्रम सेवा सदरमार्फत राबविले जात. रमाबाईच्या मृत्यूच्या वेळी सेवा सदनच्या उपक्रमांमध्ये एक हजारहून अधिक स्त्रिया विविध प्रकारचे प्रशिक्षण घेत होत्या.
Ramabai Ranade – रमाबाई रानडे
मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत कण्याची मागणी : मुंबई कायदे कौन्सिलने इ.स. १९१८ मध्ये शिक्षणासंबंधी एक कायदा पास केला. या कायद्याद्वारे ५ ते ११ वर्षाच्या मुंबई इलाख्यातील मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आले. यावर खर्च करण्यासाठी पुरेसा रक्कम मात्र पुणे नगरपालिकेजवळ नव्हती. तेव्हा नवीन कर आखण्याची योजना आखण्यात आली.
१२ फेब्रुवारी १९२० रोजी रमाबाईच्या नेतृत्वात २००० स्त्रियांची मिरवणूक सेवासदन पासून निघाली व नगरपालिकेच्या अध्यक्षांना भेटून त्यांनी मुलांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचे निवेदन सादर केले. त्यांनी पुण्यात ‘हुजुरपागा’ या शाळेचीही स्थापना केली होती.
स्त्रियांच्या मताधिकारासाठी आंदोलन : स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा ह्यासाठी देशाच्या अनेक भागात (मुंबई, बंगाल, मद्रास) आंदोलने सुरू होती. मुंबईमध्ये रमाबाईंच्या नेतृत्वात २० महिलांचा समावेश असणारी एक समिती नेमण्यात आली होती. ह्या समितीतील दोन महिलांना इंग्लंडला पाठविण्यात आले. कारण स्त्रियांना मताधिकार देण्यासंदर्भात इंग्लंडमध्ये एक समिती कार्य करीत होती.
Ramabai Ranade – रमाबाई रानडे
इंग्लंडमधील समितीला ह्या दोन महिलांनी आपले मत सांगितले. ह्या समितीला स्त्रियांच्या मताधिकाराचा प्रश्न सोडविण्याचे कार्य भारतातील विभिन्न धार्मिक संघटना तसेच प्रांतीक सरकारने सोपविले होते. याचाच परिणाम जेव्हा इ.स. १९२१ मध्ये प्रांतीक सरकारची कौन्सील अस्तित्वात आल्यावर प्रथम मद्रास कौन्सीलने स्त्री मताधिकाराचा ठराव संमत केला.
हरिलाल देसाई यांनी २७ जुलै १९२१ रोजी मुंबई कायदेमंडळात स्त्री मताधिकारासंबंधी ठराव चर्चेस ठेवला. रमाबाई रानडे समवेत अनेक जातीधर्मीय लोक उपस्थित होते. मुंबई कायदेमंडळात या विषयावर सलग ३ दिवस चर्चा होऊन स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणारा ठराव ५२ विरुद्ध २५ अशा बहुमताने पास झाला.
रमाबाईंची ग्रंथसंपदा : रमाबाईनी इ.स. १९०२ मध्ये पती महादेव यांची धर्मपर व्याख्यान व उपदेश’ हे पुस्तक तयार करून ते प्रकाशित केले. इ.स. १९१५ मध्ये रानडेंची व्याख्याने व लिखाण ग्रंथरूपाने प्रसिद्ध केली. इ.स. १९२० मध्ये त्यांनी ‘आपल्या आयुष्यातील आठवणी’ हा ग्रंथ लिहिला.
Ramabai Ranade – रमाबाई रानडे
मृत्यू : शिक्षण, न्याय, समानता, स्वावलंबन, वैज्ञानिक दृष्टिकोन स्त्रियांना प्राप्त व्हाया याकरिता आयुष्यभर अविरतपणे झटणाऱ्या रमाबाईंचा मृत्यू २६ एप्रिल १९२४ रोजी हृदयविकाराने पुणे येथील सेवासदनाच्या इमारतीमध्ये झाला. ज्ञानप्रकाश या नियतकालिकाने २९ एप्रिलला त्यांच्या कार्याचा गौरव करणारा लेख छापला.
२९ एप्रिल १९२४ रोजी केसरीने सुद्धा रमाबाईच्या कार्याचा गौरव करणारा लेख प्रसिद्ध केला. रमाबाईच्या कार्याने संपूर्ण महाराष्ट्र समाज सदैव त्यांचा ऋणी राहील अशा शब्दात त्यांचा गौरव केसरी वृत्तपत्राने केला. गांधीजींनी सुद्धा ८ मे १९२४ रोजी एका लेखाद्वारे या समाजसेविकेच्या कार्याचा गुणगाण करणारा लेख लिहिला व ‘रमाबाई रानडेंचा मृत्यू ही राष्ट्राची मोठी हानी आहे, असे मत व्यक्त केले.