राष्ट्ररक्षक मराठे

शाहू महाराजांनी बाजीरावानंतर त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब याला पेशवाईची वस्त्रे दिली. नादिरशाहाच्या आक्रमणानंतर दिल्लीमध्ये अस्थिरता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता स्थिर करण्यासाठी त्याने प्रयत्न केले. या काळात अहमदशाह अब्दालीने पानिपतावर मराठ्यांच्या समोर आव्हान निर्माण केले. या सर्व घडामोडींची माहिती आपण या पाठात घेणार आहोत.

उत्तरेतील परिस्थिती

अयोध्या प्रांताच्या उत्तर-पश्चिमेस लागून हिमालयाच्या पायथ्याशी असलेला प्रदेश अठराव्या शतकात रोहिलखंड या नावाने संबोधला जात असे. अफगाणिस्तानातून आलेले पठाण या भागात स्थायिक झाले होते. या पठाणांना रोहिले म्हणत.

गंगा-यमुना नद्यांच्या दोआबाच्या प्रदेशात त्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अयोध्येच्या नबाबाने मराठ्यांना पाचारण केले. मराठ्यांनी त्यांचा बंदोबस्त केला.

अफगाणांशी संघर्ष 

अफगाणिस्तानचा बादशाह अहमदशाह अब्दाली याला भारतातील संपत्तीचे आकर्षण होते. इ.स. १७५१ मध्ये त्याने पंजाबवर आक्रमण केले. या काळात मुघल प्रदेशात अंदाधुंदी निर्माण झाली होती. त्यामुळे मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती होती. या परिस्थितीत आपल्या संरक्षणासाठी मराठ्यांची मदत घेणे त्यांना आवश्यक वाटले.

बादशाहाला मराठ्यांचे सामर्थ्य आणि प्रामाणिकपणा यांची खात्री पटली होती. दिल्लीच्या रक्षणार्थ मराठ्यांएवढी दुसरी समर्थ सत्ताही नव्हती. त्यामुळे बादशाहाने इ.स. १७५२ च्या एप्रिल महिन्यात मराठ्यांशी एक करार केला.

मराठ्यांनी या करारानुसार रोहिले, जाट, राजपूत, अफगाण इत्यादी शत्रूंपासून मुघल सत्तेचे रक्षण करण्याचे मान्य केले.  या बदल्यात त्यांना रोख रक्कम मिळणार होती. शिवाय पंजाब, मुलतान, राजपुताना, सिंध, रोहिलखंड या भागातून चौथाई वसूल करण्याचे हक्क त्यांना मिळाले. तसेच, अजमेर आणि आग्रा या प्रांताची सुभेदारी देण्यात आली.

या करारानुसार छत्रपतींच्या वतीने पेशव्यांनी शिंदे-होळकरांच्या फौजा दिल्लीच्या संरक्षणार्थ पाठवल्या. मराठे दिल्लीकडे निघाले. ही बातमी पोहचताच अब्दाली मायदेशी परतला. मराठे मजल दरमजल करत दिल्लीला पोहचले. मराठ्यांमुळेच अब्दालीचे संकट टळले. म्हणून बादशाहाने मुघलांच्या सुभ्यांमधील चौथाईचा हक्क त्यांना दिला.

या सुभ्यांमध्ये काबूल, कंदाहार आणि पेशावरचाही समावेश होता. हे सुभे पूर्वी मुघल साम्राज्याचा भाग होते. आता ते अब्दालीच्या अफगाणिस्तानमध्ये होते. करारानुसार हे सुभे अब्दालीकडून जिंकून घेऊन परत मुघलांच्या राज्याला जोडणे हे मराठ्यांचे कर्तव्य ठरत होते.

उलट, किमान पंजाबपर्यंत प्रदेश अफगाण अंमलाखाली आणावा अशी अब्दालीची इच्छा होती. त्यामुळे आज ना उदया मराठे आणि अब्दाली यांचा संघर्ष होणे अटळ होते.नानासाहेब पेशव्यांचा भाऊ रघुनाथराव हा जयाप्पा शिंदे व मल्हारराव होळकर यांना बरोबर घेऊन उत्तर अब्दालीशी करण्यासाठी गेला.

 उत्तरेकडील स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या दृष्टिकोनातून दक्षिणेतील मराठे हे त्यांचे स्पर्धक ठरले. मराठ्यांचा व्यापक दृष्टिकोन लक्षात न घेता मराठ्यांना मदत करण्याऐवजी तेतटस्थ राहिले. मराठ्यांचे दिल्ली दरबारातील वर्चस्व व हस्तक्षेप त्यांना रुचत नव्हता. मात्र सुरजमल जाट व राणी किशोरी यांनी पानिपतावरील युद्धात जखमी झालेल्या मराठ्यांना मदत केली.

त्याचप्रमाणे उत्तरेतील काही कट्टरपंथीय मराठ्यांकडे परधर्मीय म्हणून पाहत होते. त्यांनीही मराठ्यांचा व्यापक दृष्टिकोन समजून न घेता हिंदुस्थानवर आक्रमण करण्याचा आग्रह केला. अब्दाली मराठ्यांचा पराभव करून त्यांना दक्षिणेत नर्मदापार हुसकावून देईल अशी त्यांना अपेक्षा होती.

अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला

नजीबखान हा रोहिल्यांचा सरदार होता. उत्तर भारतातील मराठ्यांचे वर्चस्व त्याला सहन होत नव्हते. नजीबखानच्या सांगण्यावरून अब्दालीने भारतावर पुन्हा स्वारी केली. त्याची भारतावरची पाचवी स्वारी होती. त्याने दिल्ली जिंकून घेतली.

मोठी लूट घेऊन तो अफगाणिस्तानात परत गेला. रघुनाथराव व मल्हारराव होळकर हे पुन्हा उत्तरेत गेले. त्यांनी दिल्ली घेतली. त्यानंतर अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावून पंजाब जिंकला. अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करत मराठे इ.स.१७५८ मध्ये अटकेपर्यंत गेले.

अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला. अटक हे ठिकाण आजच्या पाकिस्तानमध्ये आहे. मराठ्यांनी अटकेपार पेशावरपर्यंत मोहीम काढली. तथापि त्यांनी आपल्या प्रभुत्वाखाली आणलेल्या या प्रदेशाची व्यवस्था नीट लावली नाही.

दत्ताजीचा पराक्रम

पंजाबवरील पकड घट्ट करण्यासाठी व नजीबखानाचे पारिपत्य करण्यासाठी पेशव्याने दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवले. दत्ताजी उत्तरेत गेला. नजीबखानाने दत्ताजीला वाटाघाटीत अडकवून ठेवले आणि अब्दालीला मदतीस येण्याची विनंती केली.

हा संदेश मिळताच अब्दाली पुन्हा भारतावर चालून आला. दत्ताजी व अब्दाली यांची यमुनेच्या तीरावर बुराड़ी घाट येथे गाठ पडली. जोरदार लढाई झाली. दत्ताजीने असामान्य शौर्य गाजवले. परंतु या लढाईत दत्ताजीला वीरमरण आले.

सदाशिवरावभाऊ

अब्दालीचे पारिपत्य करण्यासाठी नानासाहेबाने आपला चुलत भाऊ सदाशिवरावभाऊ व थोरला मुलगा विश्वासराव यांस उत्तरेला पाठवले. सदाशिवरावभाऊ हा चिमाजीआप्पाचा मुलगा होय. त्याच्याबरोबर प्रचंड फौज व प्रभावी तोफखाना होता.

इब्राहीमखान गारदी हा तोफखान्याचा होता. त्याच्या प्रमुख या तोफखान्याच्या जोरावर त्याने इ.स. १७६० मध्ये लातूर उदगीरच्या निजामाचा केला होता.

पानिपतचा रणसंग्राम

उत्तरेच्या मोहिमेत  सदाशिवरावभाऊने दिल्ली जिंकून घेतली. त्यानंतर मराठ्यांचे सैन्य आणि अब्दालीचे सैन्य पानिपत येथे समोरासमोर आले. १४ जानेवारी १७६१ रोजी मराठ्यांनी अब्दालीवर हल्ला करून लढाईला सुरुवात केली. ही पानिपतची तिसरी लढाई होय. लढाईत विश्वासरावाला गोळी लागून तो ठार झाला.

हे सदाशिवरावभाऊला समजताच तो बेभान होऊन शत्रूवर तुटून पडला. युद्धाच्या धुमश्चक्रीत तो दिसेनासा झाला. आपला नेता नाहीसा झालेला पाहून मराठी सैनिकांचा धीर खचला. अब्दालीच्या राखीव व ताज्या दमाच्या सैन्याने मराठ्यांवर हल्ला चढवला.

मराठ्यांचा पराभव झाला. महाराष्ट्रातील एक सबंध तरुण पिढी गारद झाली. अनेक पराक्रमी सरदार धारातीर्थी पडले. परक्या अब्दालीला येथे राज्य करण्याचा नैतिक हक्क नाही, या व्यापक भूमिकेतून मराठे अब्दालीशी लढले.

आपण सर्व एतद्देशीय असून अब्दाली परकीय शत्रू आहे, अशा आशयाची पत्रे लिहून सदाशिवरावभाऊने उत्तरेकडील सत्ताधाऱ्यांना मराठ्यांची व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका कळवली.परंतु त्याला अनुकूल प्रतिसाद न देता हे सत्ताधारी तटस्थ राहिले. साहजिकच भारताच्या रक्षणाची जबाबदारी एकट्या मराठ्यांवर पडली.

भारत हा एक देश असण्याची व त्याचा राजा धर्माने कोणीही असला तरी सर्वांनी त्याला पाठिंबा देण्याची जाणीव इतिहासात पहिल्यांदा मराठ्यांनी दाखवली, असे म्हणता येईल.

पेशवा माधवराव

नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा माधवराव हा पेशवेपदी ●आला. माधवरावाने आपल्या कारकिर्दीत निजाम व हैदरअली यांचा त्याने उत्तरेमध्ये बंदोबस्त केला. त्याने उत्तरेमध्ये मराठ्यांचे प्रभुत्व पुन्हा प्रस्थापित केले.

पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला, हे पाहून  निजामाने  त्यांच्या विरोधात पुन्हा हालचाली सुरू केल्या. त्याने त्यांच्या मुलखावर आक्रमण केले. परंतु माधवरावाने पैठणजवळील राक्षसभुवन येथे त्याला पराभूत केले.

हैदरअली हा म्हैसूरचा सुलतान होता. पानिपतवरील मराठ्यांच्या पराभवाचा फायदा घेऊन त्याने कर्नाटकातील मराठ्यांच्या प्रदेशावर हल्ले केले. परंतु मराठ्यांनी श्रीरंगपट्टणजवळील मोती तलाव येथे झालेल्या लढाईत त्याला पराभूत केले. तेव्हा त्याने तुंगभद्रा नदीच्या उत्तरेकडील प्रदेश मराठ्यांना देण्याचे मान्य केले.

माधवराव पेशव्यांचा मृत्यू इ.स.१७७२ मध्ये झाला. मराठ्यांच्या इतिहासात एक प्रामाणिक, कष्टाळू, जिद्दीचा आणि लोकहितदक्ष असा शासक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. या कर्तृत्ववान पेशव्याच्या मृत्यूमुळे मराठ्यांच्या राज्याची मोठी हानी झाली.

पेशवा माधवरावांनंतर गादीवर आलेले नारायणराव आणि सवाई माधवराव हे दोन पेशवे अल्पायुषी ठरले. शिवाय त्यांच्या काळात पेशवाईला गृहकलहाने ग्रासले. एकेकाळी अटकेपार झेंडा रोवणारा रघुनाथराव सत्तालालसेपोटी इंग्रजांच्या आश्रयाला गेला. त्यामुळे मराठे व इंग्रज यांच्यात युद्ध झाले.

हैदरअलीचा मृत्यू इ.स. १७८२ मध्ये झाला. त्यानंतर त्याचा मुलगा टिपू हा म्हैसूरचा सुलतान झाला. तो निष्णात योद्धा असण्याबरोबरच विद्वान आणि कवी होता. आपल्या कर्तबगारीने त्याने राज्याचा प्रभाव वाढवला. त्याने फ्रेंचांशी संधान साधून इंग्रजांच्या वर्चस्वाला हादरे देण्यास सुरुवात केली. इ.स. १७९९ मध्ये इंग्रजांविरुद्धच्या एका युद्धात तो मारला गेला.

मराठी सत्तेच्या वर्चस्वाची पुनःस्थापना

पानिपतच्या पराभवामुळे मराठ्यांच्या उत्तर भारतातील प्रतिष्ठेला जबर धक्का पोहचला होता. उत्तरेत पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी माधवरावाने महादजी शिंदे, तुकोजी होळकर, रामचंद्र कानडे व विसाजीपंत बिनीवाले या सरदारांना तिकडे पाठवले.

मराठ्यांच्या फौजांनी जाट, रोहिले व राजपूत यांना पराभूत केले. बादशाह शाहआलम यास आपल्या आश्रयाखाली दिल्लीच्या तख्तावर बसवले. उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता पुनः स्थापित झाली.पानिपतच्या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. अब्दालीच्या सैन्याचीही हानी झाली.

पानिपतच्या विजयानंतर आर्थिक लाभ फारसा न झाल्याने त्याने किंवा त्याच्या वारसदारांनी भारतावर पुन्हा आक्रमण करण्याची हिंमत केली नाही. उलट, उत्तरेतील अराजकतेला आवर घालण्याचे सामर्थ्य मराठ्यांमध्येच आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी त्या पातशाहीचा सांभाळ करावा अशी इच्छा प्रकट केली.

सलोखा करण्यासाठी पुणे दरबारात दूतही पाठवला. पानिपतचा मोठा पराभव पचवून उत्तरेच्या राजकारणात पुन्हा उभे राहण्यात मराठे यशस्वी झाले, ही बाब महत्त्वाची आहे. यामध्ये मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर आणि महादजी शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे.

Leave a Comment