रयतेच्या सुखासाठी
वडिलांकडून शिवरायांना केवळ लहानशी जहागीर मिळाली होती. या लहानशा जहागिरीतून त्यांनी ‘स्वराज्य’ निर्माण केले. लहानपणी त्यांनी लोकांचा छळ बघितला. त्यांनी लोकांना जागे केले, स्वाभिमानी बनवले. त्यांनी लोकांची संघटना उभारली. आपला जीव धोक्यात घातला आणि बलाढ्य शत्रूंचा पराभव करून शिवरायांनी न्यायाचे स्वराज्य निर्माण केले. त्या स्वराज्याची चोख व्यवस्था लावली. त्यामुळे रयत सुखी झाली.
सेवकांवर माया
शिवरायांची आपल्या सेवकांवर मोठी माया होती. बाजीप्रभूने देशासाठी मरण पत्करले, शिवरायांनी त्याच्या मुलांचे संगोपन केले. तानाजीने देशासाठी आत्मबलिदान केले, शिवरायांनी स्वतः त्याच्या गावी जाऊन रायबाचे लग्न केले. रायबाला आपल्या मायेचे छत्र दिले.
आग्र्याच्या कैदेत मदारी मेहतर याने आपला जीव धोक्यात घातला शिवरायांनी त्याला शेवटपर्यंत अंतर दिले नाही. प्रतापराव गुजर याने स्वराज्यासाठी प्राण अर्पण केले. शिवरायांनी त्याच्या मुलीचे लग्न आपला दुसरा मुलगा राजाराम याच्याशी केले. अशा किती गोष्टी सांगाव्या ! शिवराय राजे होते, पण आपल्या सेवकांची त्यांनी पित्यासारखी काळजी घेतली.
रयतेचे रक्षण
शायिस्ताखान स्वराज्यावर चालून आला, त्या वेळची गोष्ट. खानाची फौज पिके तुडवत, लोकांना त्रास देत, मुलूख उद्ध्वस्त करत येऊ लागली. शिवरायांना प्रजेची चिंता वाटू लागली. त्यांनी आपल्या सरदारांना लिहिले, ‘तमाम रयतेला घाटाखाली पाठवा. जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना पाठवा. आळस करू नका. या कामासाठी रात्रीचा दिवस करा. गावोगावी फिरा. लोकांना आसरा मिळवून दया. मुघलांनी लोकांना कैद केले, तर ते पाप तुम्हांला लागेल.’ शिवरायांनी आपल्या प्रजेवर अशी मातेसारखी माया केली.
चांगले ते केले
जुन्यातील वाईट टाकून देणे आणि चांगले निर्माण करणे, हा शिवरायांच्या राज्यकारभाराचा विशेष गुण होता. देशमुख, देशपांडे व इनामदार यांना महसूल गोळा करण्याचा हक्क असे. ते शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त महसूल गोळा करत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे हाल होत. शिवरायांनी ही पद्धत बंद केली.
त्यांनी शेतकऱ्यांना शेतसारा ठरवून दिला. त्यापेक्षा जास्त वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक शिक्षा ठोठावल्या. वतनदारी पद्धत बंद करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला, कारण ही पद्धत स्वराज्याला घातक आहे, असे त्यांचे मत होते. सुभेदारापासून कमावीसदारापर्यंत सर्व अधिकाऱ्यांना रोख पगार देण्याची पद्धत त्यांनी सुरू केली.
कडक शिस्त
राज्यात कुठे काय चालले आहे, याची शिवरायांना खडान्खडा माहिती असे, कारण त्यांचे हेर खाते चोख होते. फितुरीपासून राज्याला धोका असतो, म्हणून शिवरायांनी फितुरांना कडक शिक्षा ठेवली होती. त्यांची शिस्त कडक होती. सैनिकांनी रयतेला त्रास देऊ नये, रयतेला लुटू नये, अशी सैन्याला सक्त ताकीद होती. नियमांचा भंग करणाऱ्यांना ते कडक शिक्षा करत.
दिलदार शिवराय
शिवराय पराक्रमाने थोर होते, तसेच मनानेही मोठे दिलदार होते. त्यांनी स्वराज्याच्या कामी सर्व जातीजमातींना जवळ केले. सर्व जातीजमातींतील लोकांना स्वराज्याच्या कारभारात त्यांनी स्थान दिले. पायदळात नूर बेग हा एक प्रमुख सेनानी होता. त्यांच्या आरमारदलातील अधिकारी दौलतखान, सिद्दी मिसरी, तसेच त्यांचा वकील काझी हैदर हे मुसलमान होते.
ते सारे स्वराज्याचे निष्ठावंत पाईक होते. कुतुबशाहा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची गोवळकोंडा येथे बरोबरीच्या नात्याने झालेली हृदय भेट भारतीय समाजाला ऐक्याची नवी दिशा दाखवणारी आहे. धर्म, जात न पाहता माणसाची योग्यता पाहून ते त्यास नोकरीला ठेवत. शिवरायांच्या आरमारी दलात कोळी, भंडारी होते, तसेच मुसलमानही होते.
महार, रामोशी इत्यादी मंडळींनाही त्यांनी स्वराज्याच्या कारभारात स्थान दिले होते. राज्यकारभाराचे काम त्यांनी ब्राम्हण व प्रभू जमातींकडे सोपवले होते. शिवरायांच्या सैन्यात हेटकरी होते, मराठे होते, मुसलमान होते. त्यांच्या मोहिमेवर असताना शिवरायांनी मशिदींना उपद्रव दिला नाही. कुरआन शरीफची एखादी प्रत हाती आल्यास ते ती प्रत सन्मानपूर्वक मुसलमानांकडे सोपवून देत. लढाईत हाती लागलेल्या कोणाही स्त्रियांच्या अब्रूस त्यांनी कधीही धक्का लागू दिला नाही.
उदार धार्मिक धोरण
शिवरायांचे धार्मिक धोरण उदार होते. कोणी मुसलमान म्हणून ते त्याचा द्वेष करत नसत. कोणी धर्म बदलला, पण पुन्हा त्याला स्वतःच्या धर्मात परत यावे असे वाटले, तर ते त्याला दूर लोटत नसत. बजाजी नाईक निंबाळकर हा शिवरायांचा मेहुणा होता. तो विजापूरच्या आदिलशाहाच्या चाकरीत होता. आदिलशाहाने त्याला स्वतःच्या धर्मात घेतले.
बजाजी विजापुरात राहू लागला. त्याला काही कमी नव्हते, पण आपला धर्म बदलला याबद्दल त्याचे मन त्याला खाई. त्याला वाईट वाटे. त्यामुळे त्याने स्वधर्मात परत यायचे ठरवले, तेव्हा शिवरायांनी त्याला स्वधर्मात घेतले. नेतोजी पालकर याची हकीकतही अशीच आहे. नेतोजी पालकर याचा धर्म बदलला, पण नंतर त्याला स्वधर्मात येण्याची इच्छा झाली, तेव्हा शिवरायांनी त्यालाही स्वधर्मात घेतले. त्याची हकीकत अशी-
नेतोजी पालकर
नेतोजी शिवरायांचा सेनापती होता. तो मोठा चपळ आणि शूर होता. नेतोजी म्हणजे शिवरायांचा उजवा हात. लोक त्याला ‘प्रतिशिवाजी’ म्हणत. एक दिवस शिवरायांवर रुसून नेतोजी मुघलांना जाऊन मिळाला. शिवराय आग्र्याहून निसटून महाराष्ट्रात आले, त्या सुमारास मुघलांनी दक्षिणेत नेतोजीस पकडून बादशाहाकडे पाठवले. बादशाहाने त्याला आग्र्यास पाठवले.
नेतोजी आग्र्याला गेला. बादशाहाने त्याला मुसलमान केले. नेतोजी पालकर आता ‘मुहम्मद कुलीखान’ झाला. तो बादशाहाची चाकरी करू लागला. बादशाहाने त्याला काबूलच्या मोहिमेवर पाठवले. तेथे त्याने पराक्रम गाजवला. दहा वर्षे लोटली. एकदा बादशाहाने दिलेरखानाबरोबर नेतोजीला शिवरायांवर पाठवले. तो दक्षिणेत आला.
नेतोजीचे धर्मांतर झाले असले, तरी शिवरायांना व महाराष्ट्राला तो विसरला नव्हता. त्याला आपले पूर्व आयुष्य आठवले. त्याचे मन उचंबळून आले. त्याच्या मनात स्वराज्याची व स्वधर्माची प्रीती जागी झाली. एक दिवस मुघलांच्या छावणीतून निघून तो थेट शिवरायांजवळ आला आणि म्हणाला,
“ मी परधर्मात गेलो, पण मला आता स्वधर्मात यायचे आहे. मला नाही का पुन्हा स्वधर्मात येता येणार ?” शिवराय म्हणाले, “का नाही ? तुमची इच्छा असेल, तर तुम्ही पुन्हा स्वधर्मात येऊ शकाल.” नेतोजी विनवणी करून शिवरायांना म्हणाला, “मग मला हिंदू धर्मात घ्या.”
शिवरायांनी शास्त्री आणि पंडित यांची बैठक भरवली. ते म्हणाले, “पंडित हो ! नेतोजी पालकरांना पुन्हा स्वधर्मात यायचे आहे. त्यांना दूर लोटणे हा धर्म नाही. त्यांना जवळ घेणे हा धर्म आहे.” शिवरायांनी नेतोजी पालकरला पुन्हा स्वधर्मात घेतले. पुढे नेतोजीने पुष्कळ वर्षे स्वराज्याची सेवा केली.
MPSC Online