सामाजिक आरोग्य
पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यांतून उत्तम आरोग्य मिळते. व्यक्तीचा विकास होतो. जसे आपण आपले ‘आरोग्य’ सांभाळतो, तसे समाजातील सर्व लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या सर्वांना तणावरहित आणि आनंदी जगणे हवेहवेसे वाटते तसेच ते संपूर्ण समाजालाही उपलब्ध झाले पाहिजे.
व्यक्तिगत आरोग्य व स्वच्छतेच्या सवयीतून आपल्याला समाजाचे आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता प्राप्त करता येते. प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटकदंशापासून होणारे आजार सामाजिक आरोग्य धोक्यात आणतात. अशा आजारांपासून सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करणे आणि त्यांना आनंदी व स्वास्थ्यपूर्ण जीवन उपलब्ध करून देणे, म्हणजे सामाजिक आरोग्याची जोपासना होय.
सामाजिक आरोग्याचे महत्त्व
देशाची प्रगती आणि विकास यांतील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे त्या देशातील लोक, स्वच्छ पर्यावरण, पोषक आहार, निर्धोक पाणी आणि आरोग्य जोपासनेसाठी पुरेशा सोई-सुविधा असतील तर लोकांचे स्वास्थ्य टिकते. म्हणूनच पिण्याच्या पाण्याची काळजी.
तसेच अन्नपदार्थांची काळजी घेण्यासंबंधीचे शिक्षण समाजकल्याण कार्यक्रमाखाली लोकांना देण्यासाठी प्रसार माध्यमांचाही उपयोग करण्यात येतो. परिसर स्वच्छ ठेवण्यासंबंधी सतत आग्रह धरला जातो. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायदयाने मनाई केली आहे. रोगप्रसार होऊ नये हे या मनाईमागचे मुख्य कारण आहे.
निरामय जीवन
आपल्याला आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येते. कोणाचाही दूद्वेष आणि मत्सर न करणे, आनंदी व उत्साही राहणे, शरीर तंदुरुस्त ठेवणे यांमुळे निरामयपणे जगता येते. निरामयतेमुळे आपले आणि आपल्या शरीराचे स्वास्थ्य वाढते. स्वास्थ्यपूर्ण समाजात सामाजिक ताणतणाव कमी होतात. निरामयतेमुळे आपल्यातील मित्रत्वाची भावना वाढते.
तंबाखू सेवन
तंबाखू, गुटखा, सिगारेट, विडी, मशेरी, मावा, पानमसाला अशा अनेक तंबाखूयुक्त पदार्थांची नावे आपण सतत ऐकत असतो. तंबाखूचे सेवन अनेक व्यक्ती करताना दिसतात. तंबाखू किंवा तंबाखूयुक्त पदार्थ खाणे हे आरोग्याला घातक आहे. सुरुवातीला एखादी व्यक्ती सहज कोणीतरी आग्रह केला म्हणून तंबाखू खाते.
सहज म्हणून खायला सुरुवात केलेली ही व्यक्ती तंबाखू पुन्हा पुन्हा खाऊ लागते. वारंवार तंबाखू खाल्याने अशी व्यक्ती तंबाखूच्या आहारी जाते. तिला तंबाखू खाण्याची सवय लागते. तंबाखू खाण्याच्या सवयीचा परिणाम म्हणजे तंबाखू खाल्याशिवाय चैन न पडणे, कोणत्याही कामात लक्ष न लागणे इत्यादी. तोंडात कायम तंबाखू असते.
असे जेव्हा होते तेव्हा त्या व्यक्तीला तंबाखूचे व्यसन लागले असे म्हणतात. ती व्यक्ती तंबाखू खाऊन सतत जागोजागी थुंकत असते व परिसर घाण करत असते.
तंबाखूच्या व्यसनाचे दुष्परिणाम
• तोंडामध्ये हळूहळू व्रण पडतात.
• व्रणांच्या मोठमोठ्या जखमा होतात. काही दिवसांनी गाठी होतात.
• दवाखाना व औषधोपचार सुरू होतात. तोंडातील जखमा भरून आल्या नाहीत तर गंभीर त्रास होतो. व शेवटी व्यक्तीला तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. कर्करोग म्हणजे कॅन्सर. तंबाखू पोटात गेल्यावर पोटाच्या निरनिराळ्या तक्रारी सुरू होतात. तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो.
• कर्करोग झालेल्या व्यक्तीला औषधोपचाराचाही त्रास होत राहतो. एवढे होऊनही कर्करोग बरा होतोच असे नाही. ती व्यक्ती बरी होईल किंवा नाही याची खात्री नसते.
मद्यपान
तंबाखूप्रमाणेच मद्यपानाचेही शरीरावर विपरीत परिणाम होतात. मदयपान म्हणजे दारू पिणे होय. मदयपानामुळे गुंगी येते व मेंदूवरील नियंत्रण सुटते.
• अति मद्यपानामुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात. तंबाखूचे सेवन व मद्यपान करणे या दोन्हीही वाईट सवयी आहेत. यांसारख्या घातक सवयींपासून आपण नेहमी दूर राहावे. स्वतःच्या आरोग्याबाबत निष्काळजी असू नये.
• मदयपान तसेच तंबाखू सेवनामुळे त्या व्यक्तीची अवस्था दयनीय होतेच, पण त्याबरोबरच घरातील इतरांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. औषधपाणी करण्यासाठी वारेमाप पैसा खर्च होतो, वेळ वाया जातो, श्रम होतात. कुटुंबात आरोग्य आणि आनंद उरत नाही व कुटुंबाची वाताहत होते.
• आपल्यामुळे आपले कुटुंबही उद्ध्वस्त होते याची जाणीव असावी.
लक्षात घ्या.
तंबाखू खाणे, सिगारेट-विडी ओढणे, तपकीर हुंगणे, दातांना मशेरी लावणे, चिलीम, हुक्का, चिरूट यांतून तंबाखूचे सेवन करणे यांपैकी कोणत्याही प्रकारे तंबाखूचे सेवन केले, तरी ते घातकच असते. दारू, तंबाखू यांप्रमाणेच आणखी एक भयंकर व्यसन आजकाल समाजात पसरू लागले आहे. या व्यसनाने तरुण वयातील मुला-मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होते. हे व्यसन म्हणजे अमली पदार्थांचे व्यसन होय. कोकेन, हेरॉईन, इत्यादी अमली पदार्थ या व्यसनात वापरले जातात. |
तंबाखूसेवन व मद्यपान मृत्युला आव्हान
तंबाखू, दारू व विविध अमली पदार्थ नशा उत्पन्न करतात. त्यांचे व्यसन शेवटी व्यक्तीचा प्राण घेते. मदयपान, धूम्रपान व अमली पदार्थ या व्यसनांचे वाईट परिणाम प्रत्येकाने ध्यानात ठेवावे व अशा व्यसनांपासून दूर राहावे. विविध कारणे सांगून काही लोक आपल्याला मदयपान किंवा धूम्रपान करण्यासाठी भरीस घालण्याची शक्यता असते.
त्यांच्या दबावाला बळी पडू नये. मद्यपान व धूम्रपानाच्या आहारी जात असल्यास त्यातून बाहरे पडण्यासाठी सल्ला आणि वैदयकीय मदत घ्यावी. आपला आहार वेळच्या वेळी घ्यावा. भरपूर खेळावे. विविध छंद जोपासावे. आपल्या मनावर संयम ठेवून खंबीरपणे कोणत्याही व्यसनापासून दूर राहावे.