
समास
शब्दांच्या एकत्रीकरणास समास असे म्हणतात. समासात एक जोडशब्द तयार करताना त्या शब्दांतील परस्परसंबंध दाखविताना त्यातील विभक्तिप्रत्यय किंवा शब्द आपण गाळतो. सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला आहे, हे स्पष्ट करण्यासाठी आपण फोड करुन सांगतो. फोड करुन विग्रह दाखविण्याच्या पध्दतीला विग्रह असे म्हणतात.
samas – समास
समासाचे प्रकार :
समासात कमीत कमी दोन शब्द किंवा पदे एकत्र येतात. दीन शब्दापैकी कोणत्या पदाला वाक्यात महत्व अधिक असते, यावरुन समासाचे प्रकार ठरविण्यात आलेले आहेत.
1) पहिले पद प्रमुख : अव्ययीभाव समास
2) दुसरे पद प्रमुख : तत्पुरुष समास
3) दोन्ही पदे महत्वाची : द्वंद्व समास
4) दोन्ही पदे महत्वाची नसून त्यावरून तिस-याच पदाचा बोध : बहुव्रीही समास
अव्ययीभाव समास
जेन्हा समासातील पहिले पद महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणा सारखा केलेला असतो, तेव्हा अव्ययीभाव समास होतो.
उदा:
आजन्म : जन्मापासून
यथाशक्ती : शक्तींप्रमाणे
प्रतिदिन : प्रत्येक दिवशी
प्रतिक्षण : प्रत्येक क्षणाला
या उदाहरणांत आ, यथा, प्रति हे संस्कृतमधील उपसर्ग आहेत. संस्कृतमध्ये उपसगांना अव्ययेच मानतात. हे उपसर्ग प्रारंभी लागून बनलेले वरील शब्द सामासिक शब्द आहेत. त्यांचा वर दिल्याप्रमाणे विग्रह करताना या उपसर्गाच्या अर्थांना या सामासिक शब्दांत अधिक महत्व आहे. म्हणून या सगासाला प्रथमपदप्रधान समास असेही म्हणतात. शिवाय, एकूण सामासिक शब्द हे क्रियाविशेषण अव्यय आहे, म्हणून त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात.
उदा:
दररोज, हरहमेशा, बिनधोक, बेलाशक, गैरशिस्त, बरहुकूम, दरमजल, बिनशर्त, बेमालूम, गैरहजर
(या शब्दांमध्ये फारसी उपसर्ग आहेत)
गावोगाव, जागोजाग, गल्लोगल्ली, रात्रंदिवस, पदोपदी, घरोघर, दारोदार, रस्तोरस्ती, दिवसेंदिवस, पावलोपावली
(या शब्दांमध्ये मराठी शब्दांची द्विरुक्ती करण्यात आलेली असून क्रियाविशेषणाप्रमाणे वापरली आहेत. मात्र या शब्दांमध्ये संस्कृत किंवा फारसी समासाप्रमाणे आरंभीचा शब्द अव्यय नाही. काही शब्दांतील प्रथमपदाच्या अंती ओ कार आलेला आहे. तरी एकंदरीत त्याचे स्वरूप क्रियाविशेषण अव्ययाचे असल्यामुळे ही मराठीतील अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत.
samas – समास
तत्पुरुष समास
ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्तिप्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो. त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
उदा:
तोंडपाठ (तोंडाने पाठ)
कंबरपट्टा (कंबरेसाठी पट्टा)
महादेव ( महान असा देव)
अनष्टि (नाही इष्ट ते)
समानाधिकरण तत्पुरुष समास
तत्पुरुष समासातील दोन्ही पदे केव्हा केव्हा विग्रहाच्या वेळी एकाच विभक्तीत असतात. त्यास समानाधिकरण तत्पुरुष समास असे म्हणतात.
उदा: काळमांजर (काळे असे मांजर)
व्याधिकरण तत्पुरुष समास
केव्हा केव्हा दोन्ही पदे भिन्न अशा विभक्तीत असतात. या प्रकारास व्याधिकरण तत्पुरुष समास असे म्हणतात.
उदा: देवपूजा (देवाची पूजा)
तत्पुरुष समासाचे प्रकार
अ) विभक्ति तत्पुरुष समास
ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणा-या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास विभक्ति तत्पुरुष समास असे म्हणतात. या समासाचा विग्रह करताना एका पदाचा दुस-या पदाशी असलेला संबंध ज्या विभक्तिप्रत्ययाने दाखविला जातो, त्याच विभक्तीचे नाव त्या समासास दिले जाते.
तत्पुरुष समासात काही सामासिक शब्द वेगवेगळ्या विभक्तींमध्ये देखील असू शकतात.
उदा: गावदेवी : गावची देवी (षष्ठी तत्पुरुष समास),
गावातील देवी (सप्तमी तत्पुरुष)
चीरभय : चौराचे भय (षष्ठी तत्पुरुष),
चीरापासून भय ( पंचमी तत्पुरुष)
samas – समास
आ) अलुक् तत्पुरुष समास
ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पूर्वपदाच्या विभक्तिप्रत्ययाचा लोप होत नाही, त्यास अलुक् तत्पुरुष समास असे म्हणतात.
उदा: अग्रेसर युधिष्ठिर, पंकेरुह, कर्तरिप्रयोग, कर्मणीप्रयोग, सरसिज या शब्दांच्या पहिल्या पदातील अग्रे, युधि, पंके, कर्तरि, कर्मणी, सरसि ही त्या त्या शब्दांची संस्कृतमधील सप्तमीची रूपे न गाळता तशीच राहिली आहेत. (अलुक् म्हणजे लोप न होणारे )
इ) उपपद तत्पुरुष समास
काही सामासिक शब्दांतील दुसरी पदे धातुसाधित किंवा कृदन्ते असतात व ही कृदन्ते अशी असतात की, त्यांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही. अशा समासास उपपद किंवा कृदन्त तत्पुरुष समास असे म्हणतात.
उदा : पंकज = पंकात (चिरवलात) जन्मणारे ते
जलद = जल देणार ते
ग्रंथकार = ग्रंथ करणारा
मार्गस्थ = मार्गावर असणारा ( राहणारा)
शेषशायी = शेषावर निजणारा सुखद = सुख देणारा/ देणारे
देशस्थ = देशात राहणारा
उपरोक्त सर्वच शब्द तत्सम आहेत. मात्र उपपद तत्पुरुष समासात केवळ तत्सम शब्दच असतात असे नाही.
काही मराठी शब्द :
शेतकरी = शेती करणारा
कामकरी = काम करणारा
आगलाव्या = आग लावणारा
भाजीविक्या = भाजी विकणारा
पहारेकरी = पहारे करणारा
गळेकापू = गळे कापणारा
मळेकरी = मळे करणारा
ई) नञ् तत्पुरुष समास
ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद नकारार्थी असते, त्यास नञ् तत्पुरुष समास असे म्हणतात.
उदा: अपुरा = पुर्ण नसलेला
नास्तिक = आस्तिक नसलेला
अयोग्य = योग्य नव्हे ते
अनादर = आदर नसणे
नापसंत = पसंत नसलेला
अन्याय = न्याय नसलेले
अहिंसा = हिंसा नसणे
नाइलाज = इलाज नसणे
बेडर = डर (भिती) नसलेला
गैरहजर = हजर नसलेला
वरील शब्दांमध्ये पहिली पदे अ, अन्, न, ना, बे, नि, गैर यांसारखी अभाव किंवा निषेध दर्शविणारी आहेत. म्हणजेच ती नकार दर्शवणारी आहेत.
samas – समास
उ) कर्मधारय समास
ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात, तेव्हा त्यास कर्मधारय समास असे म्हणतात.
उदा:
महादेव = महान असा देव
घनश्याम = घनासारखा शाम
यातील शक्यतो पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते. यातील दोन्ही पदांतील संबंध विशेषण-विशेष्य किंवा उपमान-उपमेय अशा स्वरुपाचा असतो.
उदा:
रक्तचंदन = रक्तासारखे चंदन
मुखकमल = मुख हेच कमल
उपप्रकार
1) विशेषण पूर्वपद
सामासिक शब्दातील पहिले पद विशेषण : रक्तचंदन, नीलकमल, पीतांबर
2) विशेषण उत्तरपद
सामासिक शब्दातील दुसरे पद विशेषण : घननील, पुरुषोत्तम, भाषांतर
3) विशेषण उभयपद
सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण : पांढराशुभ्र, श्यामसुंदर, लालभडक,
4) उपमान पूर्वपद
सामासिक शब्दातील पहिले पद उपमान असते :
कमलनयन = कमळासारखे डोळे
मेघश्याम = मेघासारखा काळा
चंद्रमुख = चंद्रासारखे मुख
5) उपमान उत्तरपद
सामासिक शब्दातील दुसरे पद उपमान असते :
नरसिंह = सिंहासारखा नर
मुखचंद्र = चंद्रासारखे मुख
चरणकमल = कमलासारखे चरण
6) रुपक उभयपद
सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकरूप असतात.
विद्याधन = विद्या हेच धन
काव्यामृत = काव्यरुपी अमृत
ऊ) द्विगु समास
ज्या कर्मधारय समासातील पहिले पद संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शविला जातो, तेव्हा त्यास द्विगु समास असे म्हणतात. हा समास नेहमी एकवचनात असतो. हा समास कर्मधारय समासच असतो, त्यामुळे त्याला संख्यापूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात.
उदा:
पंचवटी = पाच वडांचा समूह
नवरात्र = नऊ रात्रींचा समूह
चातुर्मास = चार मासांचा समूह
त्रिभुवन = तीन भुवनांचा समूह
सप्ताह = सात दिवसांचा समूह
बारभाई = बारा भाईचा समूह
samas – समास
ए) मध्यमपदलोपी समास
काही सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुस-या पदाशी संबंध दाखवणारी मधली काही पदे लोप करावी लागतात म्हणून या समासाला मध्यमपदलोपी समास असे म्हणतात. या सामासिक शब्दाचा विग्रह करताना युक्त, द्वारा, पुरता असलेला अशांसारखी गाळली गेलेली पदे घालावी लागतात. म्हणून या समासाला लुप्तपद कर्मधारय समास असेही म्हणतात.
उदा:
कांदेपोहे = कांदे घालून केलेले पोहे
साखरभात = साखर युक्त भात / साखर घालून केलेला भात
चुलतसासरा = जब-याचा चुलता या नात्याने सासरा
डाळवांगे = डाळयुक्त वांगे
पुरणपोळी = पुरण भरून तयार केलेली पोळी
लंगोटी मित्र = लंगोटी घालत असल्यावेळेपासूनचा मित्र
घोडेस्वार = घोडा असलेला स्वार
मावसभाऊ = मावशीचा मुलगा या नात्याने भाऊ
द्वंद्व समास
ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात, त्यास व समास असे म्हणतात. आणि, व, अथवा, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी ही पदे जोडलेली असतात. द्वंद्व समासाचे तीन प्रकार पडतात :
अ) इतरेतर द्वंद्व समास
समासविग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक अव्ययांचा उपयोग :
उदा: आईबाप = आई आणि बाप
हरिहर = हरि आणि हर
स्त्रीपुरुष = स्त्री आणि पुरुष
अहिनकुल = अहि आणि नकुल
कृष्णार्जुन = कृष्ण आणि अर्जुन
आ) वैकल्पिक द्वंद्व समास
समासविग्रह करताना किंवा, अथवा, वा या विकल्प दर्शक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग :
उदा: खरेखोटे = खरे किंवा खोटे
तीनचार = तीन किंवा चार
बरेवाईट = बरे किंवा वाईट
पापपुण्य = पाप किंवा पुण्य
सत्यासत्य = सत्य किंवा असत्य
इ) समाहार द्वंद्व समास
समासविग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश (समाहार) केलेला असतो. त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात.
उदा: मीठभाकर = मीठ, भाकरी व इतर साधे खाद्यपदार्थ
चहापाणी = चहा, पाणी व नाष्ट्याचे इतर पदार्थ
भाजीपाला = भाजी, पाला, व इतर पालेभाज्या
केरकचरा = केर, कचरा आणि इतर टाकाऊ वस्तू
samas – समास
बहुव्रीही समास
बहुव्रीही या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन पदांशिवाय तिस-याच पदाचा बोध होती. हा सामासिक शब्द त्या तिस-याच पदाचे विशेषण असते.
उदा: नीळकंठ = नीळा आहे कंठ ज्याचा असा ती (शंकर)
नीळकंठ हे शंकर या तिस-याच नामाचे विशेषण आहे.
पीतांबर हा सामासिक शब्द आपण कर्मधारय समासात आहे, असे म्हणू शकतो, कारण त्याचा विग्रह पिवळे असे वस्त्र असा होईल. मात्र त्याचा विग्रह पिवळे आहे अंबर (वस्त्र) ज्याचें असा ती विष्णू असा देखील होईल.
बहुव्रीही समासाचे चार प्रकार आहेत.
अ) विभक्तिबहुव्रीही समास
बहुव्रीही समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. हे संबंधी सर्वनाम ज्या विभक्तीत असते, तिचेच नाव या समासाला देतात.
उदा:
लक्ष्मीकांत = लक्ष्मी आहे कान्ता (पत्नी) ज्याची तो (षष्ठी बहुव्रीही)
गजानान = गजाचे आहे आनन ज्याला, तो. (चतुर्थी बहुव्रीही)
जितेंद्रिय = जित् (जिंकली) आहेत इंद्रिये ज्याने तो (तृतीया)
समानाधिकरण बहुव्रीही समास
बहुव्रीही समासातील दोन्ही पदे केव्हा केव्हा विग्रहाच्या वेळी एकाच विभक्तीत असतात. त्यास समानाधिकरण बहुजीही समास असे म्हणतात.
उदा : भक्तपिय = भक्त आहे प्रिय ज्याला ती (देव)
व्याधिकरण बहुव्रीही समास
केव्हा केव्हा दोन्ही पदे भिन्न अशा विभक्तीत असतात. या प्रकारास व्याधिकरण बहुव्रीही समास असे म्हणतात.
उदा: पद्मनाभ = पद्म आहे ज्याच्या नाभीत (बेंबीत) ज्याच्या तो (विष्णु)
samas – समास
आ) नञ् बहुव्रीही समास
बहुव्रीही समासाचे पहिले पद अ, अन, न, नि असे नकारदर्शक असेल तर त्यास नञ् बहुवीही समास असे म्हणतात.
उदा : अव्यय, अनेक, नपुंसक, अनादी, निरोगी
इ) सहबहुव्रीही समास
सामासिक शब्दातील पहिली पदे सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द विशेषण असेल, तर त्यास सहबहुव्रीही समास असे म्हणतात. (हा शब्द क्रियाविशेषणासारखा वापरला, तर अव्ययीभाव समास होईल)
उदा:
सादर = आदराने सहित असा जी (नमस्कार)
सहकुटुंब = कुटुंबाने सहित असा जी (गृहस्थ )
सफल = फलासहित आहे जे ते (कार्य)
सानंद = आनंदासह (नमस्कार)
samas – समास
ई) प्रादिबहुव्रीही समास
बहुव्रीही समासाचे पहिले पद जर प्र, परा, अप, दुर, सु, वि अशा उपसर्गांनी युक्त असेल, तर त्यास प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात.
उदा:
सुलोचना = जिचे डोळे चांगले आहेत ती स्त्री
दुर्गुणी = गुण नाहीत ज्यात असा तो
प्राज्ञ = प्रज्ञा (बुध्दी) आहे ज्याच्याकडे असा तो
Sugam Marathi Vyakaran (M R Walambe)