
जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुस-या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. संधी म्हणजे सांधणे, जोडणे.
संधीचे प्रकार
- स्वरसंधी
- व्यंजनसंधी
- विसर्गसंधी
स्वरसंधी
एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडलेले असतील तर त्यांना स्वरसंधी असे म्हणतात.
स्वर + स्वर असे त्यांचे स्वरूप असते.
उदा: सूर्य + सूर्य = (अ + अ = आ) सूर्यास्त
Sandhi in marathi – संधी व संधीचे प्रकार
स्वरसंधीचे प्रकार
अ) सजातीय स्वरसंधी
-हस्व स्वरापुढे किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर -हस्व किंवा दीर्घ आल्यास म्हणजेच दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर होतो. यालाच सजातीय स्वरसंधी असे म्हणतात.
उदा:
पोटशब्द | एकत्र येणारे स्वर व संधी | जोडशब्द |
सूर्य + अस्त | अ+अ आ | सूर्यास्त |
देव + आलय | अ + आ = आ | देवालय |
विद्या + अर्थी | आ + अ = आ | विद्यार्थी |
महिला + आश्रम | आ + आ = आ | महिलाश्रम |
मुनि + इच्छा | इ + ई = ई | मुनीच्छा |
गिरि + ईश | इ + ई = ई | गिरीश |
मही + ईश | र्ड + ई = ई | महीश |
गुरु + उपदेश | उ + उ = ऊ | गुरुपदेश |
भू + उद्धार | ऊ + उ = ऊ | भूद्धार |
Sandhi in marathi – संधी व संधीचे प्रकार
ब) गुणादेश स्वरसंधी
अ किंवा आ यांच्यापुढे इ किंवा ई आल्यास त्या दोहींऐवजी ए येती
अ किंवा आ यांच्यापुढे उ किंवा ऊ आल्यास ओ येतो, आणि
अ किंवा आ यांच्यापुढे ॠ आल्यास त्या दोहोंऐवजी अर् येतो.
उदा:
पोटशब्द | एकत्र येणारे स्वर व संधी | जोडशब्द |
ईश्वर + इच्छा | अ + इ = ए | ईश्वरेच्छा |
गण + ईश | अ + ई = ए | गणेश |
उमा + ईश | आ + ई = ए | उमेश |
चंद्र + उदय | अ + उ = ओ | चंद्रोदय |
महा + उत्सव | आ + उ = ओ | महोत्सव |
देव + ऋषी | अ + ऋ = अर् | देवर्षी |
महा + ऋषी | आ + ऋ = अ | महर्षी |
क) वृद्ध्यादेश स्वरसंधी
अ किंवा आ यांच्यापुढे ए किंवा ऐ हे स्वर आल्यास त्या दोहोबद्दल ऐ येतो आणि अ किंवा आ या स्वरापुढे ओ किंवा औ हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल औ हा स्वर येतो. याला वृद्ध्यादेश असे म्हणतात.
उदा:
पोटशब्द | एकत्र येणारे स्वर व संधी | जोडशब्द |
एक + एक | अ + अ = ऐ | एकैक |
मत + ऐक्य | अ + ऐ = ऐ | मतैक्य |
सदा + एवं | आ + ए = ऐ | सदैव |
प्रजा + ऐक्य | आ + ऐ = ऐ | प्रजैक्य |
जल + ओघ | अ +ओ = औ | जलौघ |
गंगा + ओघ | आ + ओ = औ | गंगौघ |
वृक्ष + औदार्य | अ + औ = औ | वृक्षौदार्य |
Sandhi in marathi – संधी व संधीचे प्रकार
ड) यणादेश स्वरसंधी
इ, उ, ऋ (-हस्व किंवा दीर्घ) यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास :
इ-ई बद्दल य हा वर्ण येऊन पुढील स्वर त्यात मिसळतो.
उ – ऊ बद्दल व हा वर्ण येऊन पुढील स्वर त्यात मिसळतो आणि
ऋ बद्दल र हा वर्ण येऊन त्यात पुढील स्वर मिसळतो व संधी होतो.
य, व, र यांच्याबद्दल अनुक्रमे इ, उ, ऋ आल्यास संप्रसारण म्हणतात.
उदा:
पोटशब्द | एकत्र येणारे स्वर व संधी | जोडशब्द |
प्रीती + अर्थ | इ+ अ = य् + अ = य | प्रीत्यर्थ |
इति + आदि | इ + आ = य् + आ = या | इत्यादि |
अति + उत्तम | इ + उ = य् + उ = यु | अत्युत्तम |
प्रति + एक | इ + ए = य् + ए = ये | प्रत्येक |
मनु + अंतर | उ + अ = व् + अ = व | मन्वंतर |
सु + अल्प | उ + अ = व् + अ = व | स्वल्प |
पितृ + आज्ञा | ऋ + आ = र् + आ = रा | पित्राज्ञा |
इ) उर्वरित स्वरसंधी :
ए, ऐ, ओ, औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्यांबद्दल अनुक्रमे अय, आय, अवी, आदि असे आदेश होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो.
उदा:
पोटशब्द | एकत्र येणारे स्वर व संधी | जोडशब्द |
ने + अन | ए + अ = अय् + अ = अय | नयन |
गै + अन | ऐ + अ = आय् + अ = आय | गायन |
गो + ईश्वर | ओ + ई = अव् + ई = अवी | गवीश्वर |
नौ + इक | औ + ई = आव् + इ = आवि | नाविक |
पुढील शब्दांचे संधी करा व ते ज्या नियमांनुसार झाले आहेत, ते नियम सांगा
राष्ट्र + इतिहास
राष्ट्रतिहास : गुणादेश
स्वभाव + उक्ती
स्वभावीक्ती : गुणादेश
महा + ईश
महेश : गुणादेश
गुरु + आज्ञा
गुरवाज्ञा : यणादेश
क्षण + एक
क्षणैक : वृद्ध्यादेश
राजा + आज्ञा
राजाज्ञा : सजातीय
रमा + ईश
रमेश : गुणादेश
व्यंजनसंधी
जोडाक्षर होताना जवळ जवळ येणा-या दोन वर्णापैकी दोन्ही व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल, तेव्हा त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात. व्यंजन + व्यंजन किंवा व्यंजन + स्वर असे त्याचे स्वरूप असते.
अ) प्रथम व्यंजन संधी
पहिल्या पाच वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. याला प्रथम व्यंजन संधी म्हणतात.
उदा:
पोटशब्द | एकत्र येणारी व्यंजने व संधी | जोडशब्द |
विपद् + काल | द् + क् = त् + क् = त्क | विपत्काल |
वाग् + पती | ग् + प् = क् + प् = क्प | वाक्पती |
वाग् + ताडन | ग् + त् = क् + त् = क्त | वाक्ताडन |
षड् + शास्त्र | ड् + श् = ट् + श् = ट्श | षट्शास्त्र |
क्षुध् + पिपासा | ध् + प् = त् + प् = त्प | क्षुत्पिपासा |
Sandhi in marathi – संधी व संधीचे प्रकार
ब) तृतीय व्यंजन संधी
पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होतो. याला तृतीय व्यंजन संधी म्हणतात.
उदा:
पोटशब्द | एकत्र येणारी व्यंजने व संधी | जोडशब्द |
वाक् + ईश्वरी | क् + ई = ग् + ई = गी | वागीश्वरी |
वाक् + विहार | क् + व् = ग् + व = ग्व | वाग्विहार |
षट् + रिपू | ट् + र् = ड् + र् = ड्र | षड्रिपू |
सत् + आचार | त् + आ = द् + ा = दा | सदाचार |
अच् + आदी | च् + ा = ज् + आ = जा | आजादी |
अप् + ज | प् + ज् = ब् +ज् = ब्ज | अब्ज |
क) अनुनासिक संधी
पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होती, याला अनुनासिक संधी म्हणतात.
उदा:
पोटशब्द | एकत्र येणारी व्यंजने व संधी | जोडशब्द |
वाक् + निश्चय | क् + न् = ङ् + न् | वाङनिश्चय |
षट् + मास | ट् + म् = ण् + म् | षण्मास |
जगत् + नाथ | त् + न् = न् + न् | जगन्नाथ |
सत् + मती | त् + म् = न् + म् | सन्मती |
ड) त व्यंजन संधी :
तू या व्यंजनापुढे :
च् छ् आल्यास त् बद्दल च् होतो.
ज् झ् आल्यास त् बद्दल ज् होतो.
ट् ठ् आल्यास त् बद्दल टू होतो.
ल् आल्यास त् बद्दल ल् होतो.
श् आल्यास त् बद्दल च् होतो व श् बद्दल छ् होतो.
उदा:
पोटशब्द | एकत्र येणारी व्यंजने व संधी | जोडशब्द |
सत् + चरित्र | त् + च = च् + च् | सच्चरित्र |
उत् + छेद | त् + छ् = च् + छ् | उच्छेद |
सत् + जन | त् + जं = ज् + ज् | सज्जन |
तत् + टीका | त् + ट् = द् + ट् | तट्टीका |
उत् + लंघन | त् + ल् = ल् + ल् | उल्लंघन |
सत् + शिष्य | त् + श = च् + छ् | सच्छिष्य |
Sandhi in marathi – संधी व संधीचे प्रकार
इ) म् पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म् मध्ये मिसळून जातो. व्यंजन आल्यास म् बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार किंवा बिंदू येतो.
उदा :
सम् + आचार = समाचार
सम् + गती = संगती
फ) छ् पूर्वी -हस्व स्वर आल्यास त्या दोहोंमध्ये च् हा वर्ण येती.
उदा:
रत्न + छाया = रत्नच्छाया
शब्द + छल = शब्दच्छल
पुढील शब्दांचे संधी करा व ते ज्या नियमांनुसार झाले आहेत, ते नियम सांगा
दिक् + विजय
दिग्विजय : तृतीय व्यंजन
पृथक् + करण
पृथक्करण : प्रथम व्यंजन
क्षुध् + तृषा
क्षुत्तृषा : प्रथम व्यंजन
तत् + मय
तन्मय : अनुनासिक संधी
भगवत् + लीला
भगवल्लीला : त नियम संधी
तत् + चरित्र
तच्चरित्र : त नियम संधी
पुढील संधी सोडवा व ते कोणत्या नियमांनी तयार झाले आहे, ते सांगा.
मच्छर
मत् + शर : त नियम संधी
उच्छृंखल
उत् + शृंखल : त नियम संधी
सच्चिदानंद
सत् + चित् + आनंद : त नियम आणि तृतीय व्यंजन
परीक्षा
परि + ईक्षा : सजातीय स्वरसंधी
प्रत्यक्ष
प्रति + अक्ष : गुणादेश
सद्भावना
सत् + भावना : तृतीय व्यंजन संधी
दिङ्मूढ
दिक् + मूढ : अनुनासिक संधी
Sandhi in marathi – संधी व संधीचे प्रकार
विसर्गसंधी
विसर्ग हे स्वरादी आहेत. विसर्ग कोणत्या तरी स्वरानंतर येतात. विसर्गसंधीमध्ये एकत्र येणा या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो, तेव्हा त्याला विसर्गसंधी असे म्हणतात.
उदा: मनः + रंजन = मनोरंजन
नः + रं = न् + अ + विसर्ग + र + अ + अनुस्वार
म्हणजेच विसर्ग + र् असे वर्ण येथे एकत्र आले व मनोरंजन असा जोडशब्द तयार झाला आहे.
1) विसर्ग-उकार संधी
विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो.
पोटशब्द | एकत्र येणारे स्वर, विसर्ग व संधी | जोडशब्द |
यश : + धन | श् + अ + विसर्ग + धन = श् + ओ + धन | यशोधन |
मन: + रंजन | न् + अ + विसर्ग + रंजन = न् + ओ + रंजन | मनोरंजन |
अधः + वदन | ध् + अ + विसर्ग + वदन = ध् + ओ + वदन | अधोवदन |
तेज: + निधी | ज् + अ + विसर्ग + निधी = ज् + ओ + निधी | तेजोनिधी |
2) विसर्ग-र्- संधी
विसर्गाच्या मागे अ, आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र् होऊन संधी होतो. या संधीच्या प्रकाराला विसर्ग-र-संधी असे म्हणतात.
पोटशब्द | एकत्र येणारे स्वर, विसर्ग व संधी | जोडशब्द |
नि: + अंतर | नि + विसर्ग + अं = (नि) रं | निरंतर |
दु: + जन | दु + विसर्ग + जन = (दुर्) ज | दुर्जन |
बहि: + अंग | हि + विसर्ग + अं = (हि) रं | बहिरंग |
र् च्या पुढे र हा वर्ण आल्यास र चा लोप होतो व त्यामागील स्वर -हस्व असल्यास दीर्घ होतो.
उदा:
नि: + रस = निः + र् + रस = नीरस
निः + रख = निः + र् + रख = नीरव
येथे मागील नियमाप्रमाणे विसर्गाचा र् झाला पण अशा र् च्या पुढे र हा वर्ण आल्यामुळे यातील र् चा लोप होऊन त्याचा नि दीर्घ झाला आहे.
3) पदाच्या शेवटी स येऊन त्याच्यापुढे कोणतेही व्यंजन आल्यास स् चा विसर्ग होतो.
उदा:
मनस् + पटल = मनःपटल
तेजस् + कण = तेजःकण
4) पदाच्या शेवटी र येऊन त्याच्यापुढे कठोर व्यंजन आल्यास त्या र चा विसर्ग होतो.
उदा :
अंतर् + करण = अंतःकरण
चतुर् + सूत्री = चतुःसूत्री
5) विसर्गाच्या ऐवजी येणा-या र् च्या मागे अ व पुढे मृदू वर्ण आल्यास तो र् तसाच राहून संधी होतो.
उदा:
पुनर् + जन्म = पुनर्जन्म
अंतर् + आत्मा अंतरात्मा
6) विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क्, ख्, प् फ् यापैकी एखादे व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो. मात्र पुढे अन्य स्वर आला तर विसर्ग लोप पावतो.
प्रातः + काल = प्रातःकाल
तेज: + पुंज = तेज:पुंज
इतः + उत्तर = इतउत्तर
Sandhi in marathi – संधी व संधीचे प्रकार
7) विसर्गाच्या मागे इ किंवा उ असून पुढे क्, ख्, प्, फ् यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा ष् होतो.
उदा:
निः + कारण = निष्कारण
नि: + पाप = निष्पाप
दु: + परिणाम = दुष्परिणाम
दु: + कृत्य = दुष्कृत्य
(दु:ख आणि नि:पक्ष हे अपवाद आहेत)
8) विसर्गाच्या पुढे च्, छ, आल्यास विसर्गाचा श् होतो आणि त्, थ् आल्यास विसर्गाचा स होतो.
उदा:
नि: + चल = निश्चल
दु: + चिन्ह = दुश्चिन्ह
मनः + ताप = मनस्ताप
नि: + तेज = निस्तेज
9) विसर्गाच्या पुढे श्, स् आल्यास विसर्ग विकल्पाने कायम राहतो. किंवा लोप पावतो.
उदा :
दु: + शासन = दुःशासन (दुश्शासन)
नि: + संदेह = नि:संदेह (निस्संदेह)
चतु: + शृंगी = चतुःशृंगी (चतुशृंगी)
पुरः + सर = पुरःसर (पुरस्सर)
Sandhi in marathi – संधी व संधीचे प्रकार
मराठीचे विशेष संधी
1) पूर्वरूप संधी
मराठीत केव्हा केव्हा दोन स्वर एकापुढे एक आले असता त्यांतील पहिला स्वर (पूर्व स्वर) नं बदलता तसाच राहतो व दुसरा स्वर लोप पावतो.
उदा :
काही + असा = काहीसा
खिडकी + आत = खिडकीत
केले + असे = केले से
2) पररूप संधी
केव्हा केव्हा मराठी शब्दांचा संधी होताना पहिल्या पदातील शेवटचा स्वर लोप पावती व दुसरा स्वर (पर स्वर) कायम राहून संधी होतो. याला पररूप संधी असे म्हणतात.
उदा:
घर + ई = घरी
एक + एक = एकेक
कर + उन = करुन
3) दीर्घ स्वरापुढे येणा-या स्वराचा मागील स्वराशी सामान्यतः संधी होत नाही.
उदा:
जा + ऊन = जाऊन
हो + ऊन = : होऊन
घे + ईल = घेईल
4) ही या शब्दयोगी अव्ययाचा संख्याविशेषणाशी दोन प्रकारांनी संधी होतो.
अ) ह चा लोप न पावता : दोन + ही = दोन्ही (तिन्ही, चा-ही)
ब) ह चा लोप होऊन : दोन + ही = दोनी (तिनी, चारी)
5) अनुरूप, अनुस्वार यांसारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्यरूप होऊन मग पूर्वरूप संधी होतो.
उदा :
गरज + अनुरूप = गरजेनुरूप
पद्धती + अनुसार = पद्धतीनुसार
6) बोली भाषेतील संधी
बोलण्याच्या ओघात मराठीत काही शब्द एकमेकांत मिसळून नवीन रूपे तयार होतात.
उदा :
येतो + आहे = येतीहे, येतोय
गेली + आहे = गेलीहे, गेलीय
करती + आहे = करतीहे, करतोय
चालली + आहे = चाललीहे, चाललीय
Sandhi in marathi – संधी व संधीचे प्रकार
पुढील शब्दांचा संधी करा
दु: + कर = दुष्कर
बहि: + कार = बहिष्कार
धनु: + वात = धनुर्वात
आयु: + वेद : आयुर्वेद
पुन: + आगमन = पुनरागमन
अध: + तल = अधस्तल
Sandhi in marathi – संधी व संधीचे प्रकार
पुढील संधी सोडवा.
मोठेसे
मोठे + असे = मोठेसे
पुनरुच्चार
पुन: + उच्चार = पुनरुच्चार
दारी
दार + ई = दारी
अंतर्गत
अंतः + गत = अंतर्गत
शनैश्चर
शनि: + चर = शनैश्चर
चक्षुस्तेज
चक्षुः + तेज = चक्षुस्तेज
निर्विवाद
नि: + विवाद = निर्विवाद
पुनरुक्ती
पुनः + उक्ती = पुनरुक्ती
अध:पतन
अध: + पतन = अध:पतन
रजःकण
रजः + कण = रजःकण
निर्लोभ
नि: + लोभ = निर्लोभ
दुरात्मा
दु: + आत्मा = दुरात्मा
मनोगत
मनः + गत = मनोगत
मनःपटल
मनः + पटल = मनःपटल
घामोळे
घाम + ओळे = घामोळे
Sugam Marathi Vyakaran (M R Walambe)
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास – Chhatrapati Shivaji Maharaj History
इतिहास – वाचण्यासाठी येथे क्लिक करा