Sarvjanik Suvidha Aani Mazi Shala – सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा

आपण सर्वजण सार्वजनिक सेवासुविधांचा वापर करत असतो. पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि वाहतूक या काही महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत. या सेवा सर्वासाठी असतात. सार्वजनिक सेवा, त्या देणाऱ्या संस्था आणि आपण यांची मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होते. आपली शाळा ही सार्वजनिक व्यवस्थेचा एक भाग आहे.

शाळेत आपल्याला अनेक सुविधा उपलब्ध असतात. तशाच सुविधा आपल्याला बाहेरच्या सार्वजनिक जीवनातही उपलब्ध असतात. बस, रेल्वे या सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा आहेत. याशिवाय टपालसेवा, दूरध्वनी, अग्निशमन दल, पोलीस, बँका, नाट्यगृहे, बागबगिचे, पोहण्याचे तलाव यांसारख्या अनेक सार्वजनिक सेवांचा आपण उपयोग करत असतो. या सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे.

आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे जग असते. आपल्याला जसे आपले घर आवडते, तशीच शाळाही आवडते. प्रत्येक शाळेची एक स्वतंत्र ओळख असते.  शाळा सर्वांसाठी असते. शाळेत जाऊन शिकणे हा प्रत्येक मुलामुलीचा हक्क आहे. याला शिक्षणाचा हक्क असे म्हणतात. शिक्षण हक्क कायदयानुसार ६ ते १४ वयोगटांतील सर्व मुलामुलींनी शाळेत जाऊन आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले पाहिजे. विशेष गरजा असलेल्या मुलामुलींसाठी कमाल वयाची अट १४ ऐवजी १८ वर्षे आहे.

शाळेच्या जडणघडणीत समाजाचा सहभाग

आपल्या शाळेच्या उभारणीत अनेक व्यक्ती आणि संस्था मदत करतात. कितीतरी पालक, माजी विद्यार्थी, साहित्यिक, खेळाडू, शास्त्रज्ञ आणि उदयोजक असे अनेकजण आपल्या शाळेच्या वाढीला हातभार लावतात. वर्गखोल्या बांधून देणे, ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडासाहित्य उपलब्ध करून देणे या प्रकारे समाजातील विविध घटकांची शाळेला मदत होते. शाळेच्या जडणघडणीत समाजाचा वाटा असतो.

सर्व शाळांमध्ये शिक्षक-पालक आणि माता पालक संघ असतात. या संघांमुळे आपले शिक्षक व पालक यांच्यात संवाद होतो. त्यामुळे शाळेच्या विविध उपक्रमांत पालकांचा सहभाग वाढतो. शाळा सर्व पालकांचा सारखाच सन्मान करते. शाळेतल्या घडामोडींविषयी आपणही पालकांशी बोलले पाहिजे. शिक्षक व पालक या दोहोंच्याही मदतीने आपण शिकत असतो. त्यांच्यातील देवाण घेवाण आपल्या फायदयाची असते.

Leave a Comment