सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

भारतीय राष्ट्रीय सभेने भारताला स्वतंत्र करण्यासाठी शांततामय, अहिंसक व सनदशीर मार्गाचा अवलंब केला; परंतु या मार्गाने भारत स्वतंत्र होऊ शकेल, यावर काही तरुणांचा विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला.

राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी ब्रिटिश सत्तेविरुद्ध महाराष्ट्रात उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, कर्नाटकात कित्तुरची राणी चन्नमा आणि पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी सशस्त्र उठाव केले होते. १८९७ साली पुण्यात प्लेगची साथ पसरली होती.

या साथीचा बंदोबस्त करण्यासाठी नियुक्त केलेला अधिकारी रँड याने जनतेवर जुलूम, जबरदस्ती केली. म्हणून चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली. याबद्दल चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आले. याच सुमारास बिहारमधील बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला.

मणिपूर येथील नागा नेता जदोनांग यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला. त्यांना फाशी देण्यात आले. त्यानंतर त्यांची राणी गायडीनलूने नागांचे नेतृत्व केले.

अभिनव भारत : क्रांतिकारकांनी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीला सामोरे जाण्यासाठी गुप्त संघटना स्थापन केल्या. महाराष्ट्रात १९०४ साली नाशिक येथे ‘अभिनव भारत’ या गुप्त संघटनेची स्थापना झाली होती. बाबाराव सावरकर व त्यांचे बंधू विनायक दामोदर सावरकर यांचा या संघटनेच्या स्थापनेत पुढाकार होता.

बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. या संघटनेचे एक सभासद अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याची हत्या केली. कान्हेरे यांना फाशी देण्यात आले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे इंग्लंडमध्ये असताना भारतात गुप्तपणे क्रांतिकारकांना शस्त्रे पाठवत असत.

ब्रिटिश सरकारविरोधी कारवायांबद्दल त्यांना पन्नास वर्षांची शिक्षा झाली. ही खडतर शिक्षा भोगण्यासाठी त्यांना अंदमान येथील कारागृहात ठेवण्यात आले. काही काळाने त्यांना रत्नागिरी येथे आणण्यात आले. पुढे सरकारने त्यांची सुटका केली.

अनुशीलन समिती : बंगालमध्ये ‘अनुशीलन समिती’ ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. बारींद्रकुमार घोष आणि जतींद्रनाथ बॅनर्जी या तरुणांनी या संघटनेची स्थापना केली. मुझफ्फरपूर येथील किंग्जफोर्ड या जुलमी न्यायाधीशाने स्वदेशी चळवळीतील अनेक तरुणांना कठोर शिक्षा ठोठावल्या होत्या.

खुदीराम बोस या क्रांतिकारकाने किंग्जफोर्डच्या गाडीवर बाँब टाकला. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा झाली. अनुशीलन समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना पकडण्यात आले. यांपैकी अरविंद घोष हे एक होत. त्यांचे या संघटनेला मार्गदर्शन मिळत असे.

महाराष्ट्र, बंगाल या प्रदेशांबरोबर देशातील इतर भागांतही क्रांतिकारी चळवळींना वेग आला. पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेशात क्रांतिकारी केंद्रे उभारली. मद्रास प्रांतातही क्रांतिकारी कार्य चालू होते.

इंडिया हाउस : भारतातील क्रांतिकार्याला परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांकडून मदत मिळत असे. अशी मदत करणाऱ्यांमध्ये बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा हे एक होते. त्यांनी लंडन येथे ‘इंडिया हाउस’ची स्थापना केली.

त्यांचे हे निवासस्थान भारतीय क्रांतिकारी चळवळीचे केंद्र बनले.इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या राष्ट्रीय वृत्तीच्या भारतीयांना श्यामजी कृष्ण वर्मा शिष्यवृत्त्या देत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला होता.

या केंद्राच्या साहाय्याने सेनापती बापट, हेमचंद्र दास व मिर्झा अब्बास यांनी बाँब तयार करण्याची माहिती मिळवली. ती भारतातील क्रांतिकारकांना पुरवली. ब्रिटिश अधिकारी कर्झन वायली याचा इंडिया हाउसच्या चळवळीला विरोध होता, म्हणून मदनलाल धिंग्रा या क्रांतिकारकाने त्याची हत्या केली.

याबद्दल धिंग्रा यांना फाशीची शिक्षा झाली.मादाम कामा या श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या सहकारी होत्या. जर्मनीत स्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला. याच परिषदेत मादाम कामा यांनी तयार केलेला भारताचा ध्वज फडकावला होता.

गदर संघटना : क्रांतिकार्याला गती देणे, भारताला स्वतंत्र करण्यासाठी लढाऊ सैनिक तयार करणे, ही गदर संघटनेची प्रमुख उद्दिष्टे होती. लाला हरदयाळ, डॉ. खानखोजे यांनी गदर संघटनेची स्थापना केली.

हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन : सचिंद्रनाथ संन्याल, राजेंद्र लाहिरी, अशफाक उल्ला खान इत्यादींनी ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ ही क्रांतिकारी संघटना १९२४ साली स्थापन केली. ब्रिटिश सत्ता संपुष्टात आणून भारतात प्रजासत्ताक संघराज्य स्थापन करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट होते.

क्रांतिकार्यासाठी पैसा आवश्यक होता. तो उभा करण्यासाठी क्रांतिकारकांनी ९ ऑगस्ट १९२५ रोजी काकोरी रेल्वे स्टेशनजवळ सरकारी खजिना लुटला. या संघटनेच्या अनेक सभासदांना अटक होऊन फाशीची शिक्षा झाली,परंतु चंद्रशेखर आझाद हे पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद इत्यादींनी ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ या गुप्त संघटनेची स्थापना १९२८ साली केली. चंद्रशेखर आझाद हे या संघटनेच्या सेनाविभागाचे प्रमुख होते.ब्रिटिश सरकारने कामगारांचे हक्क व जनतेचे राजकीय हक्क यांवर बंधने घालणारी दोन विधेयके मध्यवर्ती कायदेमंडळात मांडली.

या विधेयकांना विरोध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती कायदेमंडळात बैठक चालू असताना बाँब टाकले, मात्र ते टाकताना कोणालाही दुखापत होणार नाही, याची काळजी घेतली. ‘इन्किलाब झिंदाबाद’ अशी घोषणा देत ते पोलिसांच्या स्वाधीन झाले.

लाला लजपतराय यांच्या मृत्यूला साँडर्स हा ब्रिटिश अधिकारी जबाबदार होता, म्हणून साँडर्सची हत्या करण्यात आली. या हत्येचा आरोप भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्यावर ठेवून त्यांना फाशी देण्यात आले. चंद्रशेखर आझाद हे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले.

मीरत कट खटला : याच सुमारास कामगार चळवळीने जोर धरला. या चळवळीवर समाजवादी विचारांचा प्रभाव होता. तो रोखण्यासाठी सरकारने श्रीपाद अमृत डांगे, मिरजकर, निंबकर, मुझफ्फर इत्यादी नेत्यांना अटक केली.

मीरत येथे भरलेल्या या नेत्यांच्या परिषदेत ब्रिटिश सरकार उलथून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांच्यावर भरलेला खटला ‘मीरत कट खटला’ म्हणून प्रसिद्ध आहे.

चितगाव कट : बंगालमधील चितगाव येथील शस्त्रागारावर हल्ला करण्याची योजना सूर्य सेन व त्यांच्या सहकाऱ्यांनी आखली. ही योजना ‘चितगाव कट’ म्हणून ओळखली जाते. क्रांतिकारकांनी शस्त्रागारांवर हल्ला करून तेथील शस्त्रे लुटली.

दळणवळण यंत्रणा बंद पाडली. या कटातील क्रांतिकारकांना अटक करण्यात आली. सूर्य सेन व त्यांच्या सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली. प्रीतिलता वड्डेदार यांनी पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती दिली.

बंगालमध्ये शांती घोष, सुनीती चौधरी आणि बीना दास यांचा सशस्त्रक्रांतिकार्यात सहभाग होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारी चळवळीने महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

Leave a Comment