स्फूर्तीचा जिवंत झरा

Patra-Shivaji-Maharaj

स्फूर्तिदाता 

शिवरायांनी छोट्याशा जहागिरीतून स्वराज्य निर्माण केले, अशक्य होते ते शक्य करून दाखवले, म्हणूनच शिवरायांचे चरित्र पुन्हापुन्हा सांगावेसे वाटते आणि पुन्हापुन्हा ऐकावेसे वाटते. त्यांच्या चरित्रातून स्फूर्ती मिळते.

मातृपितृभक्ती 

शिवराय नेहमी मासाहेबांच्या आज्ञेत वागले. मासाहेबांच्या सगळ्या इच्छा त्यांनी पूर्ण केल्या. शहाजीराजांविषयी त्यांच्या मनात अपार आदर होता. एकदा शहाजीराजे त्यांना भेटायला आले. शिवरायांना खूप आनंद झाला. त्यांनी वडिलांना पालखीत बसवले. त्यांचे जोडे आपल्या हातांत घेऊन पालखीबरोबर ते चालू लागले. केवढी ही पितृभक्ती ! जिजाबाई व शहाजीराजे या थोर मातापित्यांचे हिंदवी स्वराज्याचे मनोरथ शिवरायांनी पूर्ण केले.

साधुसंतांचा आदर

शिवरायांची कुलदेवता भवानीदेवी तिच्यावर शिवरायांची अपार भक्ती होती. ते साधुसंतांना फार मान देत. त्यांना मंदिरे प्रिय होती. त्यांनी मशिदींचेही रक्षण केले. त्यांना भगवद्गीता पूज्य होती. त्यांनी कुरआन शरीफचाही मान राखला ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थनामंदिरांनाही ते जपत.

शिवराय विद्वानांचा आदर करत. परमानंद, गागाभट्ट, धुंडिराज, भूषण इत्यादी विद्वानांचा त्यांनी सत्कार केला. तसेच संत तुकाराम, समर्थ रामदास, बाबा याकूत, मौनीबाबा यांचाही त्यांनी बहुमान केला. सज्जनांना राखावे, दुर्जनांना ठेचावे,’ हा शिवरायांचा बाणा होता. तो त्यांनी हयातभर पाळला.

स्वदेशाभिमान

शिवराय एका जहागीरदाराचे पुत्र होते. धनदौलत त्यांना कमी नव्हती, पण लहानपणीच त्यांना गुलामगिरीचा वीट आला. आपल्या देशात आपले राज्य व्हावे, प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे वागता यावे, सर्वांना सुखासमाधानाने जगता यावे, मराठी भाषेला, स्वधर्माला मान मिळावा, यासाठी शिवरायांनी बलाढ्य शत्रूशी झुंज देऊन स्वराज्य स्थापन केले.

स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा यांच्या उत्कर्षासाठी ते आयुष्यभर झटत राहिले आणि त्यात ते यशस्वी झाले. शिवरायांना मायबोलीचा अभिमान होता. राज्यकारभारात मराठी शब्द वापरता यावेत, यासाठी त्यांनी राजव्यवहारकोश हा ग्रंथ तयार करून घेतला.

हिंदवी स्वराज्य

Sfurticha-Jivant-Jhara

हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते. हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे; मग ते कोणत्याही धर्माचे असोत, कोणत्याही जातीचे असोत. त्यांचे राज्य ते हिंदवी स्वराज्य. शत्रू बलाढ्य होते, पण शिवरायांनी हिंमत सोडली नाही. काळ कठीण होता, पण त्यांनी स्वाभिमान सोडला नाही. बादशाहाच्या बाजूने लाखो लोक होते, पण शिवरायांनी न्यायाची बाजू घेतली.

बलाढ्य परकीय सत्तेपुढे ते कधीच नमले नाहीत. शिवरायांचे आठवावे रूप : काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढायची; संकटे आली असता डगमगून न जाता त्यांवर मात करून पुढे जायचे; बलाढ्य शत्रूंशी आपल्या तुटपुंज्या बळाने झुंज देत आपले सामर्थ्य वाढवत जायचे; सहकाऱ्यांना उत्साह देत व शत्रूंना सतत चुकवत यश मिळवायचे हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते.

आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ, सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता, असे शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. हे सारे पाहिले, की पुन्हापुन्हा वाटते –

“शिवरायांचे आठवावे रूप ।

शिवरायांचा आठवावा प्रताप ।।’

Paryawaran-Patra



MPSC Online

Leave a Comment