शायिस्ताखानाची फजिती

Shivaji-Maharaj-ani-Shayistakhan

शायिस्ताखानाची स्वारी

विजापूरच्या आदिलशाहाने जंगजंग पछाडले, पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही. त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला. शेवटी आदिलशाहा नरम झाला. त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले. यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली. मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती.

त्या वेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाहा होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे बादशाहा चिडला. त्याने आपला मामा शायिस्ताखान याला शिवरायांवर पाठवले. तो पुण्यावर चालून आला. त्याच्याबरोबर पाऊण लाख सैन्य होते. शेकडो हत्ती, उंट आणि तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत घेत शायिस्ताखान आला.

त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढेपुढेच येत होता, पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले. मराठे अतिशय चपळ, भीमथडी तट्टावर बसणारे! चटणी- भाकरी खावी, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरदऱ्यांतून धावपळ करावी, यांत मराठे फार पटाईत. मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शायिस्ताखानाचे सैन्य हैराण झाले. कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला.

फिरंगोजी नरसाळा 

मग शायिस्ताखान पुण्याकडे वळला त्याने प्रथम चाकणचा किल्ला घेतला. चाकणच्या किल्ल्यात फिरंगोजी नरसाळ्याने मोठ्या मर्दुमकीने शायिस्ताखानाशी मुकाबला केला. दोन महिने फिरंगोजीने किल्ला लढवला, पण शायिस्ताखानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. फिरंगोजी नरसाळ्याच्या शौर्यावर शायिस्ताखान खूश झाला. त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले, पण फिरंगोजी बदलला नाही.

लाल महालात शायिस्ताखान

शायिस्ताखान पुण्यात आला. त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला. त्याच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला. एक वर्ष गेले, दुसरे गेले, पण खान काही लाल महालातून हलेना. उलट तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवी. रयतेची गुरे ओढून आणी, शेतीची नासधूस करी. अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलूख उद्ध्वस्त केला.

धाडसी बेत

शायिस्ताखानाची खोड मोडायचीच, असे शिवरायांनी ठरवले. खान लाल महाल बळकावून बसला होता, हे एका दृष्टीने शिवरायांना सोईचेच होते, कारण त्या वाड्यातील खोल्या, दालने, खिडक्या, दारे, वाटा, चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती होती. शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरलेले होतेच. खुद्द शायिस्ताखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे, असा बेत शिवरायांनी केला.

किती धाडसी बेत होता हा ! महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता. लाल महालाभोवती पाऊण लाख फौजेचा खडा पहारा होता. हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला शायिस्ताखानाने मनाई केली होती, पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला. शिवरायांनी दिवस निश्चित केला. तारीख ५ एप्रिल १६६३ ची रात्र. वाजतगाजत लग्नाची वरात चालली होती.

पुढे चंद्रज्योती जळत होत्या. शेकडो स्त्री-पुरुष नटूनथटून चालले होते. कोणी पालख्यांत, कोणी मेण्यांत, तर कोणी पायी. शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते. वरात पुढे निघून गेली. सर्वत्र सामसूम झाली. शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली. या वेळी शायिस्ताखान गाढ झोपला होता.

शायिस्ताखानाची खोड मोडली

वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले. त्यांचा स्वतःचाच वाडा तो! त्यांना त्याचा कोनाकोपरा माहीत होता. खानाचे पहारेकरी पेंगत होते. शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले. शिवराय आणखी आत शिरले. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केले.

त्यांना वाटले शायिस्ताखान असावा, पण तो त्याचा मुलगा होता. गडबड झाली. लोक जागे झाले. शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी समशेर उपसली. शायिस्ताखान घाबरला. ‘सैतान ! सैतान !’ म्हणून ओरडत खिडकीवाटे पळू लागला. शिवराय त्याच्या मागोमाग धावले. शायिस्ताखान खिडकीवाटे बाहेर उडी टाकणार, तोच शिवरायांनी त्याच्यावर वार केला.

खानाची तीन बोटे कापली गेली. प्राणावर आले ते बोटांवर निभावले. खान खडकीतून उडी टाकून पळाला. ‘शिवाजी आला, धावा, धावा! पकड़ा त्याला,’ असे मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली. खानाची माणसेही घाबरून पळत होती. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली.

शायिस्ताखानाने तर हायच खाल्ली. आज बोटे तुटली, उदया आपले शीर शिवाजी कापून नेईल’, अशी भीती त्याला वाटू लागली. औरंगजेब बादशाहाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला. तो शायिस्ताखानावर नाराज झाला. त्याने फर्मान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली. मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता. शिवराय फत्ते होऊन आले. तोफा उडाल्या. साऱ्या महाराष्ट्रात आनंदीआनंद झाला.



MPSC Online

Leave a Comment