शिवरायांची युद्धनीती

Vijaydurg

शिवरायांचे शौर्य व धैर्य

शिवरायांनी वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली. वयाच्या पन्नासाव्या वर्षी रायगडावर त्यांनी आपला देह ठेवला. अवघ्या पस्तीस वर्षांचा हा काळ ! या काळात शिवरायांनी आपल्या पराक्रमाच्या व मुत्सद्देगिरीच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्यासाठी ते हयातभर लढत राहिले.

अत्यंत कठीण प्रसंगी समशेर हाती घेऊन स्वतः लढाईत उतरले आणि त्यांनी विजय मिळवले. त्यांचे आयुष्य युद्धप्रसंगांनी भरलेले आहे. स्वराज्यावर अनेक संकटे आली, पण शिवरायांनी प्रसंग पाहून आणि दूरवरचा विचार करून त्यांना तोंड दिले. शिवराय पराक्रमी होते, तसेच थोर मुत्सद्दीही होते. शक्ती कमी पडली, तेव्हा शिवरायांनी युक्ती चालवली.

अफजलखान म्हणजे तुफान ताकदीचा वीर, पण शिवरायांनी त्याची बेधड़क भेट घेतली आणि त्याचा निकाल लावला. धोधो पावसात व दाट काळोखात शिवराय सिद्दी जौहरच्या वेढ्यातून बाहेर पडले. रात्रीच्या अंधारात शायिस्ताखानावर छापा घालून त्यांनी त्याची खोड मोडली. आग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतून किती युक्तीने ते निसटले! त्यांच्यासारखा धाडसी आणि मुत्सद्दी सेनानायक सापडणे कठीण !

सरदारांची स्वामिनिष्ठा 

शिवराय स्वतः शूर योद्धे होते. त्यांनी आपल्या सरदारांनाही शूर बनवले. सरदारांची शिवरायांवर केवढी निष्ठा होती ! वीर बाजी पासलकर पुरंदर किल्ल्याच्या जवळील खळद बेलसरच्या लढाईत धारातीर्थी पडले. शहाजीराजांनी कान्होजी जेघेंना मावळातील देशमुखांना सोबत घेऊन शिवरायांच्या पाठीशी राहण्यास सांगितले.

त्यांनी स्वराज्यस्थापनेच्या कामी आयुष्यभर शिवरायांना साथ दिली. फिरंगोजी नरसाळा याने चाकणचा किल्ला जिवावर उदार होऊन लढवला. सिद्दी जौहराने पन्हाळ्याला वेढा घातला, तेव्हा सिद्दी हिलाल आणि त्याचा पुत्र शिवरायांच्या बाजूने लढले. शिवरायांना वाचवण्यासाठी पावनखिंडीत बाजीप्रभूने आनंदाने मरणाला मिठी मारली.

तानाजीने मुलाचे लग्न टाकून कोंढाणा घेण्यासाठी प्राणार्पण केले. सेनापती प्रतापराव गुजर याने आदिलशाही सरदार बहलोलखानाशी लढताना हौतात्म्य पत्करले. प्रतापराव गुजर यांच्यानंतर शिवरायांनी हंबीरराव मोहिते याची सरसेनापती म्हणून नेमणूक केली. त्याने अनेक लढायांमध्ये पराक्रम केला. तसेच जालना स्वारीच्या वेळी शत्रूशी लढताना सेनानायक सिधोजी निंबाळकर याने प्राणार्पण केले. महाराजांच्या सेवकांनी दाखविलेल्या स्वामिनिष्ठेची अशी कितीतरी उदाहरणे आहेत.

शिवरायांचा गनिमी कावा 

शिवरायांचे सारे शत्रू बलाढ्य होते. शत्रुंजवळ अफाट फौजा होत्या, भरपूर दारूगोळा होता, शेकडो तोफा होत्या, पण शिवरायांचे सैन्य मात्र थोडे होते. हे थोडे सैन्य शत्रूच्या बलाढ्य सैन्याबरोबर कसे लढणार ? उघड्या मैदानावर शत्रूशी कसा सामना देणार? तेव्हा शिवरायांनी विचार केला, की महाराष्ट्र हा डोंगराळ मुलूख इथे डोंगर, घाट व खिंडी पुष्कळ आहेत.

त्यांचा आपण भरपूर उपयोग करून घेतला पाहिजे. हे सारे लक्षात घेऊन शत्रूशी सामना कसा दयावा हे शिवरायांनी ठरवले. शत्रूच्या घोडेस्वारांजवळ भरपूर सामान असे. ते आवरून लढाईला निघायला त्यांना वेळ लागे. उलट मराठे घोडेस्वारांजवळ जड सामान काहीच नसे. पाठीला ढाल, कमरेला तलवार, हातात भाला एवढेच त्यांचे सामान पाहता पाहता ते डोंगर चढत व उतरत.

शिवरायांचे मावळे चपळ व काटक होते. या साऱ्या गोष्टींचा विचार करून शिवरायांनी शत्रूबरोबर उघड्या मैदानावर लढाई करण्याचे शक्यतो टाळले, यात त्यांची केवढी मुत्सद्देगिरी दिसून येते. शत्रूच्या गोटात गुपचूप आपली माणसे पाठवून शिवराय शत्रुपक्षाची खडान्खडा माहिती मिळवत. मग शत्रूवर अचानक हल्ला करत. बेसावध शत्रूची दाणादाण उडवत.

शत्रू लढाईला तयार होण्यापूर्वीच ते वाऱ्याच्या वेगाने दिसेनासे होत. डोंगराळ भागात अशा लपूनछपून लढाया करायला शिवरायांनी सुरुवात केली. यालाच ‘गनिमी कावा’ म्हणतात. शिवरायांनी गनिमी काव्यानेच बादशाहाच्या प्रचंड फौजांचा धुव्वा उडवला.

डोंगरी किल्ले

शिवरायांची डोंगरी किल्ल्यांवर अधिक भिस्त होती. किल्ला ताब्यात आला म्हणजे आसपासच्या प्रदेशावर सत्ता निर्माण करणे सोपे जात असे. किल्ल्यावर अन्नधान्य व दारूगोळा यांचा भरपूर साठा ठेवला म्हणजे झाले ! मग शिवरायांची किल्ल्यावरील लहानशी फौज शत्रूच्या प्रचंड फौजेला दोन-दोन वर्षे दाद देत नसे.

शत्रू ताकदवान असला, तरी किल्ल्याचा आश्रय घेता येत असे. शिवरायांनी स्वराज्याची राजधानी उघड्या मैदानावर एखादया शहरात ठेवली नाही. ती त्यांनी प्रथम राजगडावर ठेवली आणि नंतर राजधानीसाठी रायगडाची निवड केली, याचे इंगित हेच होते.

किल्ल्यांचे रक्षण 

किल्ल्यांच्या रक्षणासाठी शिवरायांनी गडांवर भिन्नभिन्न जातीजमातींची माणसे नेमली. त्यामुळे कामे सुरळीत पार पडत. शत्रूला किल्ल्यावर फितुरी माजवता येत नसे. यात शिवरायांची केवढी दूरदृष्टी होती.

चौथाई

स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी पैसा उभारणे आवश्यक होते. शत्रूच्या मुलखावर स्वाऱ्या करून शिवराय हा पैसा उभारत शत्रूच्या मुलखातून वसुलीचा जो चौथा हिस्सा शिवराय घेत, त्यास चौथाई म्हणत. चौथाई देणाऱ्यांना शिवरायांच्या फौजा त्रास देत नसत. चौथाईचा हक्क हा शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

आरमारदल उभारले 

सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज यांच्यापासून स्वराज्याला धोका निर्माण होण्याचा संभव आहे, हे शिवरायांनी ओळखले होते, म्हणूनच त्यांनी दूरदृष्टीने आरमारदल उभारले. समुद्रात सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे भक्कम सागरी किल्ले बांधले. ते पाहिले, की आजही आपले मन थक्क होते. स्वराज्यावर केवढी संकटे आली, पण शिवरायांनी मोठ्या शौर्याने आणि मुत्सद्देगिरीने त्यांना तोंड दिले, म्हणूनच स्वराज्य निर्माण झाले.



MPSC Online

Leave a Comment