शिवाजी महाराज थोर पुरुष होते. आपण दरसाल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता. महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता, त्यांच्या तसबिरीला हार घालता. मोठ्या उत्साहाने ‘शिवाजी महाराज की जय’ असा महाराजांच्या नावाचा जयजयकार करता. कोण बरे हे शिवाजी महाराज? अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली ?
शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. त्या काळी सर्वत्र राजेशाह्यांचा अंमल असे बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच चैनविलासात मग्न असत; पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले, की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवर्टीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते.
शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाहा आणि विजापूरचा आदिलशाहा या दोन सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते. ते प्रजेवर जुलूम करत होते. या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते. त्यांच्यात नेहमी लढाया होत. त्यात रयतेचे हाल होत. रयत सुखी नव्हती. उघडउघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते.
रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. राहायला सुरक्षित निवाराही नव्हता. सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते, पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त वतनावर, जहागिरीवर वतनासाठी ते एकमेकांशी भांडत. आपापसात लढत. त्यात रयतेचे खूप हाल होत. या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती. सगळीकडे अंदाधुंदी माजली होती.
शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापण्याचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले. स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाच्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. जुलमी राजवटींचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जातिधर्मांच्या लोकांचे होते. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू, मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधुसंतांचा त्यांनी सन्मान केला. अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली, की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते.
शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे तीन-चारशे वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्यस्थापनेच्या कामी उपयोग झाला. संतांची ती कामगिरी आपण पुढील पोस्ट मध्ये पाहू.
Tnx